@अॅड. प्रशांत यादव। 9822844925
भारतीय संविधानावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. संविधानाची मूळ प्रत आपल्या प्राचीन संस्कृतीची ओळख करून देणारी आहे. ॠषिमुनी आणि संत ह्यांच्या चिंतनातून संस्कृती प्रवाहित झाली आहेे. भारतीय समाजाला एकत्रित बांधणारा भक्तिमार्ग संतसाहित्यातून प्रकट होतोे. तोच मार्ग भारतीय संविधानात प्रवाहित होऊन भारतीय समाज एकात्म राखण्याची योजना घटनाकारांनी केली आहे.
ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले ते वर्ष 1947 आहे आणि सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी कालखंड आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यकारभाराचा आराखडा तयार केला गेला. त्या नियमावलीला ‘भारतीय राज्यघटना‘ अथवा ‘भारतीय संविधान’ म्हणतात. जगभरातील अनेक देशांच्या राज्यघटनांतील उपयुक्त नियमांचा अभ्यास करून ते नियम आपण स्वीकारले आहेत. जगातील सर्वांत मोठी आणि प्रदीर्घ लिखित राज्यघटना म्हणून भारतीय संविधानाची गणना केली जाते.
देश म्हणजे भौगोलिक सीमा, राज्य म्हणजे शासन रचना आणि राष्ट्र म्हणजे संस्कृती, म्हणून भारतीय संविधानावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे, तो असलाच पाहिजे. ॠषिमुनी आणि संत ह्यांच्या चिंतनातून संस्कृती प्रवाहित होत असते.
भारतीय संविधानाची मूळ प्रत आपल्या प्राचीन संस्कृतीची ओळख करून देणारी आहे. रामायण-महाभारतातील प्रसंग त्यात चित्ररूपाने रेखाटले आहेत. भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक ह्यांचे उपदेश सचित्र रेखाटलेले आढळतात. संविधानाची उद्देशिका, नागरिकांचे मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, राज्याची कर्तव्ये-अधिकार अशा विविध विभागात सुसंगत सचित्र आणि श्लोकांची शृंखला जोडलेली आहे. शांतिनिकेतन येथील बोहेर राममनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस ह्यांनी हे मौलिक सचित्र घडविले आहे. ‘धर्म’ ह्या शब्दाची परिभाषा मानवाच्या कर्तव्याशी जोडली असल्याने संकल्पना स्पष्ट होती. मानवी कर्तव्य तसेच राज्याचे कर्तव्य, मानवी अधिकार तसेच राज्याचे अधिकार असा ऊहापोह संविधानात दिसून येतो. सन 1976 साली डशर्लीश्ररी - ‘सेक्युलर’ हा शब्द संविधानात बळजबरीने घुसविण्यात आला. आस्तिक आणि नास्तिक ह्या दोन्ही प्रवृत्तींना मान्यता देणारी आमची प्राचीन संस्कृती आहे. अशी ती एकमेव संस्कृती आहे. म्हणूनच मूर्तिपूजा नाकारणारे महावीर आणि बुद्ध हेसुद्धा ह्या संस्कृतीत भगवंत ठरतात. भौतिक सुखांचा आग्रही चार्वाक हे ॠषीदेखील आपल्या संस्कृतीत चिंतनयात्रेतील एक योगी म्हणून पूजनीय ठरतात. शेवटी द्वेषमुक्त चिंतन असेल, तर त्याचे स्वागत याच भूमीवर होत असते. अन्यत्र ते शक्य नाही. परस्परविरोधी विचार याच भूमीवर सुखाने नांदतात. दुसरीकडे नाही. द्वेषमुक्त आणि दोेषमुक्त समाजनिर्मितीसाठी भारतीय संस्कृती ही एकमेव आहे, याबाबत जगभरात सहमती होत आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानदेव माउली म्हणतात, ‘जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो। भूतां परस्परे पडो। मैत्र जीवाचे॥’ ज्ञानदेवांच्या साहित्यातून सर्व माणसे परस्परांशी प्रेमाने वागावीत, त्यातून जिवाचे मैत्र निर्माण व्हावे, सर्व माणसांच्या हातून सत्कृत्ये घडावीत, त्यांच्या मनातला अंधकार दूर व्हावा असे सकारात्मक तत्त्वज्ञान मांडले आहे. माणसाच्या मूलभूत चांगल्या वृत्तीवर ज्ञानदेवांची श्रद्धा आहे, म्हणूनच माणसाचा वाकडेपणा गळून पडला की प्रत्येक ‘खल’व्यक्ती सुद्धा योग्य नागरिकच आहे, असे ज्ञानदेव सांगतात. आपल्या भारतीय संविधानामध्ये प्रत्येक भारतीय हा संविधानाचा विषय आणि केंद्रबिंदू आहे. ‘आम्ही भारताचे लोक’ अशा घोषवाक्याने संविधानाचा आरंभ होतो. येथे भारताचे लोक म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्ती असा अर्थ अभिप्रेत आहे. ज्ञानदेवांनी ज्याप्रमाणे लोकांचे वर्गीकरण केले नाही, त्याचप्रमाणे राज्यघटनाकारांनी ठरावीक लोकांसाठी ही घटना नसून ती सर्वांसाठी आहे, असे आश्वासन दिलेले आहे. संविधानाच्या उद्देशिकेमधून पसायदान प्रतिबिंबित होते.
भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर ह्यांनी आपल्या साहित्यातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्त्वे दिलेली आहेत. 2600 वर्षांपूर्वीचे हे तत्त्वज्ञान आहे. मानवी अधिकार किती महत्त्वाचे आहेत, याची प्रचिती बुद्ध-महावीर ह्यांनी समाजाला दाखवून दिली. आमचे ज्ञान किती प्रगल्भ आणि सर्वव्यापी होते, याचा हा पुरावा आहे. ‘धम्मं सरणं गच्छामि। संघं सरणं गच्छामि।’ याचा अर्थ मी मानवीय कर्तव्याला शरण जात आहे, मी समाजरूपी संघाला शरण जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांच्या साहित्याचा अभ्यास केलेला होता. त्या साहित्यातूनच त्यांना भारतीय संविधानाचा पाया रचावयाचा होता. बुद्धवंदनेत सांगितलेली पंचशील म्हणजे प्राणिहिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य, मद्य अशापासून दूर राहणे, हेसुद्धा भारतीय संविधानात भाग चारमध्ये मार्गदर्शक तत्त्वात दिसून येते. गोहत्येविरुद्ध कायद्याचे प्रयोजन, एकरूप नागरी संहिता निर्माण करण्याची योजना अशा आदर्श बाबींचा राज्यांकडून पाठपुरावा केला जाईल, हे भाग चारमध्ये प्रतिबिंबित होत आहे. जे तत्त्वज्ञान महावीरांचे, तेच तत्त्वज्ञान बुद्धांनी मांडले आहे.
संत ज्ञानदेवांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत संतसाहित्य समृद्ध होत गेले. त्या सहित्याने समाजकारणाचा एक निश्चित मार्ग दाखविला, तो म्हणजे ‘लोककल्याणाचा मार्ग.’ लोकांची मने बळकट करणारे ते साहित्य आहे. अहंकार आणि जातिभेद दूर करणारे संतसाहित्य आहे. भारतीय संविधानामध्ये समाजामध्ये एकात्म वाढीस लागावे असे प्रयोजन केलेले दिसते. संविधानाच्या भाग पाचमध्ये असलेेले सर्व प्रावधान ‘द युनियन’ साठी म्हणजेच एकात्म संघासाठी आहे. अनेक राज्यांचा एक संघ आणि केंद्रस्थ एक शासनप्रणाली अशी रचना भारतीय संविधानात केली आहे. भाषावार प्रांतरचना असली, तरी तो प्रांतभेद येथे नष्ट केलेला दिसतो. समाजाला एकत्रित बांधणारा भक्तिमार्ग संतसाहित्यातून प्रकट झाला, तोच मार्ग भारतीय संविधानात प्रवाहित होऊन भारतीय समाजाचे एकात्म साधण्याची योजना घटनाकारांनी केली आहे.
धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य एकच आहे, हे स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, स्वामी रामतीर्थ ह्यांनी सांगितले आहे. मसूरकर महाराजांनी हिंदू समाजाच्या जागृतीचे काम करत असताना गोव्यात हजारो ख्रिस्तींचे शुद्धीकरण केले. स्वामी श्रद्धानंदांनी हिंदू धर्मप्रवेशाची दारे उघडी केली. ह्या कार्याचे प्रतिबिंब भारतीय संविधानात अनुच्छेद 25मध्ये आहे. धर्मांतर जे फसवून, प्रलोभन, दडपण अशा गैरककृत्याने प्रकट होत आहे, ते अवैध आहे असे संविधान सांगते. धर्मस्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क हे मूलभूत हक्क समजण्यात आले आहेत. अनुच्छेद 48मध्ये ‘गाई-वासरांच्या’ कत्तलीस मनाई करण्यात आली आहे. येथे मानवी आणि शेती उपयोगी जनावरे या दोघांचा स्वातंत्र्य आणि सहजीवन म्हणून संविधानामध्ये विचार केलेला आहे. हा विचार संतसाहित्यातून उगम पावतो.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे..’ यात संत तुकारामांनी पर्यावरणाविषयी जागृती दिली आहे. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करण्याची सूचना संतांनी दिली आहे. मानवाचे हक्क आहेच, परंतु कर्तव्यदेखील आहे, याची जाणीव समाजाला संतसाहित्याने दिली आहे. भारतीय संविधानाचे एक वेगळे वैशिष्ट्य असे की अनुच्छेद 51मध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. त्या प्रावधानामध्ये पर्यावरणाचे जतन, देशाचे रक्षण, स्त्रियांची प्रतिष्ठा अशा मानवी कर्तव्यांचे लिखित स्वरूपात वर्णन केलेले आहे. ‘संत’पद बहाल करणारे कोणतेही विद्यापीठ भारतात नाही. मात्र संतांनी रचलेल्या ओव्यांवर दीर्घ प्रबंध लिहून नागरिकांना डॉक्टरेट मिळविता येते. संतवचनांचा अभ्यास करावा, त्याचे चिंतन करावे, त्यातून नवनवीन आविष्कार बाहेर पडल्याने एकूणच समाजाला दिशा मिळते. संतसाहित्याविषयी सुलभ मार्गदर्शन होते. अशा संतसाहित्याचे प्रतिबिंब भारतीय संविधानाच्या निर्मितीत दिसते.
(लेखक कायदेतज्ज्ञ आहेत.)