सात्त्विकता, शालीनता, सोज्ज्वळपणा म्हणजेच सुलोचनादीदी. रुपेरी पडद्यावर वावर असूनही ’नटीपणाचं’ वारंही जिच्या प्रतिमेला शिवू धजलं नाही, अशी ही दुर्मिळ अभिनेत्री! सिनेसृष्टीतल्या या सात्त्विक पर्वाची आता सांगता झाली आहे.
@धनंजय कुरणे
1961 सालची गोष्ट आहे. ’प्रपंच’ चित्रपटाचं शूटिंग पुण्याजवळ पिरंगुट इथं चालू होतं. सुलोचना शूटिंगसाठी आल्या होत्या. दीदींना भेटायला खेडुतबायांचा एक समूह आला होता. त्यातली एक थकलेली, सुरकुतलेली बाई, रणरणत्या उन्हात, डोळ्यावर हात आडवा धरत पुढे आली. आपले खडबडीत हात दीदीच्या चेहर्यावरून मायेने फिरवून, आलाबाला घेऊन ती म्हणाली, “साजिरी गं बाई माजी.. आन मंग सिनेमात तरी तमाशातल्या त्या वाईट, वंगाळ बाईचं काम कशापायी करती? पुन्यांदा नग गं असं वंगाळ काम करू!”
पाहणारे गलबलले. सुलोचनाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्यांनी म्हातारीला वाकून नमस्कार केला.
म्हातारीचा आशीर्वाद शब्दश: फळाला आला. नंतर असली ’वंगाळ’ कामं दीदींच्या वाट्याला आलीच नाहीत. उलट, ’सात्त्विकता, शालीनता, सोज्ज्वळपणा म्हणजेच सुलोचना’ असं समीकरण तयार करणार्या भूमिका मिळत गेल्या. खरं तर ’कुठल्याही स्त्रीच्या जीवनाची सहज माती होईल’ अशा सामाजिक स्तरात जन्म झालेला. वाटतं की कुठलं सत्त्व घेऊन यांचा जन्म झाला असेल? पूर्वजन्मीचं सुकृत म्हणतात ते हेच का? भालजी पेंढारकरांच्या निखळ भारतीय संस्कारात मनाचा पिंड घडलेल्या या गावरान कृष्णकमळीचं, लक्ष्मीचं वाहन असलेल्या श्वेतकमलामध्ये झालेलं रूपांतर हा एक चमत्कारच होता. वर्षानुवर्षं रुपेरी पडद्यावर वावर असूनही ’नटीपणाचं’ वारंही जिच्या प्रतिमेला शिवू धजलं नाही, अशी ही दुर्मिळ अभिनेत्री!
राष्ट्रीय नेत्यांपासून सामान्य कामगारांपर्यंत प्रत्येकाच्या मनात दीदींची अगदी हीच पवित्र सात्त्विक प्रतिमा सदैव वास करत होती. प्रसिद्ध गांधीवादी नेते बाळूकाका कानेटकर म्हणत असत की ’ग्रामस्वराज’ या कल्पनेवर लोकांचा ठाम विश्वास बसावयाचा असेल तर, सुलोचनादीदींना घेऊन त्याची महती सांगणारे चित्रपट तयार केले पाहिजेत.
एखाद्या नटीच्या फॅन मेलमध्ये, चित्रविचित्र प्रकारची पत्रं हजेरी लावू शकतात. दीदींनाही चाहत्यांची असंख्य पत्र येत. पण यच्चयावत पत्रं ’आदर, पावित्र्य, निर्मळता’ यांनी भरलेली! जालंदरच्या सूरज प्रकाश दत्त नावाच्या चाहत्यानं लिहिलं होतं, ‘माताजी, आईचं सुख माझ्या नशिबात नाही. पण तुम्हाला पडद्यावर पाहिलं आणि मला माझी दिवंगत आई मिळाल्याचा आनंद झाला. हल्ली मी दररोज तुमच्या तसबिरीला नमस्कार करूनच कामासाठी बाहेर पडतो!’ कलकत्त्याच्या एका चाहत्यानं लिहिलं, ’माताजी मी पदवीधर झालो हा तुमच्या कृपेचा प्रसाद. तुमचा फोटो समोर ठेवूनच मी अभ्यास केला!’ ग्वाल्हेरच्या रिटा मायकेल नामक महिलेने सुलोचना यांना ’आई म्हणून दत्तक घेण्याची’ इच्छा प्रकट केली होती.. असे जिव्हाळ्याचे असंख्य ऋणानुबंध दीदींच्या सात्त्विक प्रतिमेमुळे निर्माण झाले.
त्यांच्या अभिनयाच्या उंचीबाबत वेगळं लिहायची आवश्यकता नाही. साक्षात दिलीपकुमार ’आईच्या भूमिकेसाठी सुलोचनाबाईंना घ्या’ असा आग्रह धरत. मीनाकुमारी एकदा दीदींना म्हणाली होती, ”तुला जे ’वहिनीच्या बांगड्या’मध्ये जमलं, ते मला ’भाभी की चुडियाँ’ मध्ये नाही जमलेलं!”
’आए दिन बहारके’च्या सेटवर बलराज साहनी अचानक मराठी बोलायला लागले. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा ते हसून म्हणाले, ”अहो, ही सुलोचनाबाईंची कृपा. मला त्यांच्याबरोबर मराठी सिनेमात काम करायची इच्छा आहे, म्हणून मराठी शिकतोय. त्यांच्याबरोबर मराठीत काम करणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे!”
’सुहागन’च्या वेळेस दीदींचा अभिनय पाहून गीता बाली म्हणाली, ‘’तुम उधर कोल्हापूर-पूना में क्या कर रही हो? बंबई में आओगी तो पूरे देशमें छा जाओगी!” एकटी, प्रपंच, देव पावला, साधी माणसं, छोटा जवान, दूधभात, मोलकरीण, बाळा जो जो रे, माझं घर माझी माणसं, पतिव्रता, सुजाता, सुहागन.. त्यांच्या अभिनयशिल्पांची यादी न संपणारी आहे. ‘साने गुरुजींची गरीब ’मोलकरीण’ दीदींनी आपल्या अभिनयाने श्रीमंत केली’ हा सुप्रसिद्ध अभिप्राय त्यांच्या असंख्य भूमिकांना लागू पडतो.
सहकलाकारांसाठी त्यांनी जितकं केलं, तितकं कुणालाच करणं शक्य नाही. प्रत्येक सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटी सर्व तंत्रज्ञ, कामगार यांना त्या ’गिफ्ट’ देत असत. मधू आपटेसारख्या एकाकी कलाकाराला त्यांनी भावाप्रमाणे सांभाळलं. त्याची एकसष्ठी अगदी थाटामाटात आपल्या घरात साजरी केली आणि एकशे एकसष्ठ चांदीची नाणी त्याला भेट दिली. हे निर्व्याज प्रेम पाहून मधू आपटे ढसाढसा रडू लागले. रंजनाला अपघात झाल्यावर वारंवार तिच्या घरी जाऊन दीदी विचारपूस करत. विवेक हा नट देशोधडीला लागला, तेव्हा दीदींनी त्याचा चरितार्थ चालवला.. ही यादीसुद्धा न संपणारीच.
सुलोचनाबाई थोडंच पण अतिशय मार्मिक बोलत असत. त्यांचे जावई डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या फोटोचं अनावरण चिपळूणच्या लायब्ररीत होणार होतं. दीदींच्या हस्ते. तेव्हा त्या विध्द स्वरात एकच वाक्य बोलल्या.. “ज्यांनी माझ्या फोटोला हार घालायचा, त्याच्या फोटोला हार घालायची वेळ माझ्यावर आली!” सर्व उपस्थित हेलावून गेले.
’सांगत्ये ऐका’च्या सुवर्णमहोत्सवाच्या वेळचा किस्सा सर्वश्रुत आहे. पुण्याचं विजयानंद थिएटर चाहत्यांनी फुललं होतं. सर्व कलाकार स्टेजवर बसले होते. हारतुर्यांचा पाऊस पडत होता. इतक्यात एक म्हातारा काठी टेकीत पुढे आला. थिएटरबाहेरचा भिकारी होता तो. त्याने सुलोचनादीदींना हारासाठी नऊ आणे रंगमंचावर पाठवून दिले. त्याची दिवसभराची भिक्षा होती ती. शेजारी बसलेले गदिमा लगेच म्हणाले, “बाई, हे मोलाचं धन आहे. जनताजनार्दनाचा हा महान प्रसाद आहे. हे धन खर्चू नका. देव्हार्यात जतन करून ठेवा. तुमच्या कलेवर प्रेम करणार्या एका भोळ्या जिवाच्या भावना गुंफलेल्या आहेत त्याभोवती!” दीदींनी ते ’नऊ आणे’ भरलेल्या अंत:करणानें कपाळाला लावले आणि नंतर देव्हार्यात ठेवले. सुलोचनादीदींनी पडद्यावर ’सोळा आणे’ साकारलेल्या अनेक भूमिकाही रसिकांनी आपल्या मनाच्या देव्हार्यात अशाच कायमच्या जपून ठेवल्या आहेत.
सिनेसृष्टीतल्या या सात्त्विक पर्वाची आता सांगता झाली आहे. स्वर्गात स्थानापन्न झाल्यावरही दीदींच्या ’सु-लोचनांची मायाळू दृष्टी’ सर्व रसिकांचं मंगलच चिंतीत असेल, यात शंका नाही.
दीदींना आदरपूर्वक नमस्कार आणि साश्रु श्रद्धांजली!