भारतीय संस्कृतीचे आणि वारशाचे प्रतीक

07 Jun 2023 13:20:06
देशात सर्व विकास प्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदू - भारतीय संस्कृतीस सर्वोच्च महत्त्व दिले आहे. त्याच धर्तीवर नव्या संसदेचे लोकार्पण झाले. या संसदेत लोकसभेचे 888 आणि राज्यसभेचे 384 सदस्य बसू शकतील अशी व्यवस्था आहे. भव्य संविधान सभागृह, संसद सदस्यांसाठी एक विश्रामगृह, लायब्ररी, डायनिंग हॉल आणि पार्किंगची जागादेखील आहे. पर्यावरणपूरक नव्या वास्तूवर खास भारतीय झाक असल्याने, आता देशाचे सत्ताकेंद्र असलेल्या या नवी दिल्लीस खास भारतीय चेहरा प्राप्त होतो आहे. संसदेच्या नूतन वास्तूचे अंतरंग उलगडणारा लेख...
 
vivek
 
@पार्थ कपोले
। 8830093051
  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 28 मे रोजी भारतीय संसदेच्या नव्या वास्तूचे राष्ट्रार्पण केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील एक ऐतिहासिक घटना म्हणून भारताच्या इतिहासात या घटनेचा उल्लेख होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीय संस्कृतीचे, भारतीय परंपरा-प्रथांचे आणि वारशाचे पालन करून नव्या भारताच्या आधुनिक संसदेस राष्ट्रास अर्पण केले. या वेळी भारतीय राजनीतीचे आणि राजकारणाचे प्रतीक असलेला पवित्र सेंगोळदेखील पुन:स्थापित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या कारकिर्दीचा विचार करता त्यांनी अनेक प्रसंगी भारतीय संस्कृतीची आणि परंपरांची आधुनिकतेशी सांगड घातली आहे. त्याचप्रमाणे मनात कोणताही किंतू अथवा न्यूनगंड न ठेवता भारतीय संस्कृती जगभरात प्रदर्शित केली आहे. मग अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन असो, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक, केदारनाथ विकास प्रकल्पांचे लोकार्पण असो. या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांनी हिंदू - भारतीय संस्कृतीस सर्वोच्च महत्त्व दिले आहे. त्याच धर्तीवर नव्या संसदेच्या राष्ट्रार्पणप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमंत्रांच्या घोषात पवित्र सेंगोळ स्वीकारला आहे.
 
 
राष्ट्रपती भवन, संसद भवन, पंतप्रधानांचे कार्यालय असलेले साउथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक, त्यानंतर अन्य मंत्रालयांच्या इमारती यातून संपूर्ण देशाचा कारभार चालतो. त्यापैकी राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि साउथ-नॉर्थ ब्लॉक यांना आता बरीच वर्षे झाली आहेत उभारून. त्यामुळे कालानुक्रमे त्यात बदल करणे, डागडुजी करणे, सुधारणा करणे हे होतच असते. संसदेच्या सध्याच्या इमारतीचा विचार केल्यास 1927 सालात ती बांधून पूर्ण झाली. त्यानंतर आजतागायत जुजबी वगळता मोठे बदल त्यात करण्यात आलेले नाहीत. मात्र, आता त्यामध्ये बदल करणे गरजेचे होऊन बसलेले आहे. कारण लोकसभा सभागृहाची स्थिती पाहिल्यास पहिल्या तीन रांगा वगळता मागच्या रांगांमध्ये खासदार अगदी दाटीवाटीने बसलेले असतात. त्याचप्रमाणे 1971च्या जनगणनेवर आधारित परिसीमन केल्यापासून लोकसभेच्या जागांची संख्या 545वर अपरिवर्तित राहिली आहे. तथापि, 2024नंतर त्यात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे आकाराने मोठ्या सभागृहांची आवश्यकता होती. त्यामुळे भविष्याचा आढावा घेत संसदेत बदल गरजेचे होते.
 
 
modi
 
त्यामुळे आता संसदेच्या सध्याच्या वास्तूजवळच नवी वास्तू बांधण्यात आली आहे. त्रिकोणी आकाराच्या या वास्तूमध्ये लोकसभा आणि राज्यसभा, मंत्र्यांची आणि खासदारांची दालने, सचिवालय असणार आहे. नव्या वास्तूमधील लोकसभेचे सभागृह सध्याच्या सभागृहापेक्षा तीन पट, तर राज्यसभेचे सभागृह चार पट मोठे असेल. नवीन संसद भवनात लोकसभेचे 888 आणि राज्यसभेचे 384 सदस्य बसू शकतात. जर दोन्ही सभागृहे एकत्र जमली, तर येथे एका वेळी 1 हजार 280 खासदार बसू शकणार आहेत. नव्या संसद भवनास तीन नवीन प्रवेशद्वार आहेत. त्यांना ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ म्हणून ओळखले जाणार आहे. नवीन संसदेचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संविधान सभागृह, जे इमारतीच्या मध्यभागी आहे. त्याच्या वर अशोकस्तंभ आहे. नवीन संसद भवनाच्या बांधकामादरम्यान वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. सर्व खासदारांसाठी स्वतंत्र कार्यालय असेल, त्यांचे कार्यालय पेपरलेस कार्यालय बनवण्यासाठी नवीन डिजिटल इंटरफेसने सुसज्ज करण्यात आले आहे. नवीन इमारतीमध्ये एक भव्य संविधान सभागृह, संसद सदस्यांसाठी एक विश्रामगृह, लायब्ररी, डायनिंग हॉल आणि पार्किंगची जागादेखील आहे. अहमदाबाद येथील एचसीपी डिझाइन स्टुडिओने नव्या संसद भवनाचे आरेखन केले आहे, तर टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने 21 महिन्यात ही वास्तू बांधून पूर्ण केली आहे.
 
 
 
या इमारतीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिचा त्रिकोणी आकार. हा आकार वेगवेगळ्या धर्मांच्या पवित्र भूमितीला अनुकूल आहे. याबरोबरच भारतीय संस्कृतीतील वास्तुशास्त्राच्या नियमांचीही काळजी घेण्यात आली होती, त्यामुळे सर्व प्राण्यांच्या मूर्ती बसवतानाही प्रवेशद्वारावर, खोल्यांच्या आकाराची काळजी घेण्यात आली आहे. या इमारतीला तीन बाजूंनी प्रवेशद्वार आहेत, राष्ट्रपती, सभापती, पंतप्रधान याचा वापर करतील. सामान्य जनतेला आणि संसद भवनात येणार्‍या अभ्यागतांना प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाजवळील संसद मार्गाने प्रवेश दिला जाईल.
 
 
नवीन इमारत पर्यावरणपूरक असावी, याचीही तिच्या रचनेत काळजी घेण्यात आली आहे. त्याच्या बांधकामात हरित तंत्राचा वापर करण्यात आला आहे. जुन्या संसदेपेक्षा मोठी झाल्यानंतरही वीजवापर सुमारे 30 टक्क्यांनी कमी होणार आहे. त्याबरोबरच त्यात पावसाचे पाणी साठवण आणि पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा बसवण्यात आली असून, पुढील दीडशे वर्षांच्या गरजांनुसार त्याची रचना करण्यात आली आहे. लोकसभेचा कक्ष मोराच्या थीमवर आधारित आहे, ज्यामध्ये भिंतीवर आणि छतावर मोराच्या पंखांची रचना आहे. त्याच वेळी, राज्यसभेचे सभागृह लाल गालिचे असलेल्या कमळाच्या थीमवर तयार करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहांमध्ये एका बाकास दोन खासदारांच्या बसण्याची व्यवस्था असून त्यांच्या डेस्कवर टच स्क्रीन लावण्यात आला आहे.
नव्या संसदेच्या बांधकामात देशभरातून योगदान
 

modi 
 
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील विविध संरचनांचे बाह्य आणि आतील दोन्ही अस्तर विकसित करण्यासाठी राजस्थानच्या ढोलपूर जिल्ह्यातील सर्मथुरा येथील वालुकाश्म खडक आणि राजस्थानच्याच जैसलमेरच्या लाखा गावातून ग्रॅनाइटचा दगड वापरला आहे. विशेषतः सरकारी कार्यालयांत आणि संस्थांमध्ये मुख्य बांधकाम साहित्य म्हणून दगडाचा वापर संपूर्ण भारतभर प्रचलित आहे.
नवीन संसद भवन पारंपरिक आकृतिबंध आणि घटकांमध्ये मूळ असलेल्या अंतर्गत आणि बाह्य सजावट तयार करण्यासाठी लाकडाच्या संरचनेचा व्यापक वापर केला आहे. त्यासाठी नागपुरातून लाकूड आणून मुंबईतील कारागीरांनी वास्तुशिल्परचना केली आहे. लाकडी रचनांमुळे नवीन संसद भवनाची भव्यता आणि वैभव वाढले आहे.
 
 
नवीन संसद भवनामध्ये उत्तर प्रदेशातील भदोही येथील हाताने विणलेले गालिचे आहेत. नॉट-बाय-नॉट तंत्राद्वारे हे गालिचे विणले जातात. ’नॉट-बाय-नॉट’ कार्पेट बनवण्याची ही पारंपरिक आणि प्रसिद्ध कलाकुसर नवीन इमारतीच्या वैभवात भर घालणार आहे. त्याचप्रमाणे यामुळे भदोहीच्या अद्वितीय हस्तकला तंत्रांना प्रोत्साहन देईल, ज्यामुळे कारागीरांसाठी भविष्यातील उपजीविकेच्या संधी वाढतील.
 
 
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर बांधकाम कामगार अत्यंत उत्साहाने काम करत आहेत. हे कर्मचारी राष्ट्रीय महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रकल्पाचा भाग बनण्यास सक्षम असल्याचा अभिमान बाळगतात. हा संपूर्ण प्रकल्प देशाच्या सर्व भागांतील कुशल, अर्धकुशल तसेच अकुशल मजुरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे.
 
 
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प ठरणार भारताची शान
 
 
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पामध्ये 51 मंत्रालये आणि 10 केंद्रीय सचिवालयांसह उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान निवासस्थानदेखील असणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिवालयही असेल. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या काही इमारतींमध्ये कोणताही बदल होणार नाही, काही इमारतींचा वापर अन्य कामासाठी केला जाणार आहे, काहींचे नूतनीकरण केले जाणार असून काही पाडून त्यांच्या जागी नवीन इमारती बांधल्या जाणार आहेत.
 
 
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत ज्या इमारतींमध्ये कोणताही बदल होणार नाही, त्यात राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, वॉर मेमोरियल, हैदराबाद हाउस, रेल भवन, वायुभवन यांचा समावेश आहे. या इमारती पुनर्विकास प्रकल्पाचा भाग नाहीत. नॉर्थ ब्लॉक येेथे सध्या वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ यांचे कार्यालय आहे. साउथ ब्लॉकमध्ये सध्या पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद (एनएससी) यांची कार्यालये आहेत. या दोन्ही वस्तूंचे राष्ट्रीय संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे. पुरातत्त्व वारसा म्हणून संसदेच्या विद्यमान इमारतीचे रूपांतर केले जाईल. संसदीय कार्यक्रमांमध्येही त्याचा वापर केला जाईल. राष्ट्रीय अभिलेखागाराचे, वाणिज्य भवनाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
 
 
या प्रकल्पात संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. आता उपराष्ट्रपतींचे नवीन निवासस्थान बांधले जाणार आहे. एक नवीन केंद्रीय सचिवालय तयार केले जाईल, ज्यामध्ये सरकारची सर्व मंत्रालये आणि त्यांची कार्यालये स्थलांतरित केली जातील. कृषी भवन, शास्त्री भवन, आयजीएनसीए, उद्योग भवन, निर्माण भवन, जवाहर भवन, राष्ट्रीय संग्रहालय, विज्ञान भवन, रक्षा भवन, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान, जामनगर हाउस नूतनीकरणासाठी पाडण्यात येणार आहे. या इमारतींच्या जागी केंद्रीय सचिवालयाच्या 10 नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. याबरोबरच सध्या ज्या ठिकाणी जवाहर भवन आणि निर्माण भवन आहेत, त्याच ठिकाणी केंद्रीय परिषद केंद्र बांधण्यात येणार आहे.
 
 
देशाच्या सत्ताकेंद्रास प्राप्त होतोय खास भारतीय चेहरा
 
 
रायसिना हिलवरची राष्ट्रपती भवनाची भव्य वास्तू. रायसिना हिल ते इंडिया गेट असा लांबलचक सेंट्रल व्हिस्टा. तिथून बाहेर आल्यावर तेवढेच भव्य नॉर्थ आणि साउथ ब्लॉक. त्यांच्या बाजूला असलेली संसदेची प्रशस्त आणि देदीप्यमान वास्तू. संसदेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल भवन, उद्योग भवन, निर्माण भवन, कृषी भवन, शास्त्री भवन, परिवहन भवन या इमारती. आणि सोबतीला देशाच्या राजधानीची धीरगंभीरता. गेली अनेक वर्षे देशाच्या सत्ताकेंद्राचे हेच चित्र राहिले आहे. मात्र, आता लवकरच हे चित्र बदलणार आहे. दीर्घकाळपासून देशाच्या सत्ताकेंद्राचा चेहरा असलेल्या आणि ल्यूटन्स दिल्ली या नावाने ओळखल्या जाणार्‍या या परिसराला खास भारतीय चेहरा लाभण्यास प्रारंभ झाला आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत संसदेची नवी वास्तू, राजपथाचा पुनर्विकास करून ‘कर्तव्यपथ’ असे त्याचे नामकरण आणि इंडिया गेटजवळील मेघडंबरीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची स्थापना हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आता राजपथाच्या दोन्ही बाजूंना केंद्रीय सचिवालयाची निर्मिती आणि पंतप्रधान व उपराष्ट्रपती यांची नवी निवासस्थाने हे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व नव्या वास्तूंवर खास भारतीय झाक असल्याने आता देशाचे सत्ताकेंद्र असलेल्या या नवी दिल्लीस खास भारतीय चेहरा प्राप्त होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत - श्रेष्ठ भारत’ या तत्त्वाचाही यामध्ये समावेश आहे.
ही आहेत नव्या संसदेची वैशिष्ट्ये
संसदेची नवी वास्तू फाइव्ह स्टार प्लॅटिनम रेटेड असून सर्व प्रकारच्या स्मार्ट फिचर्सने युक्त आहे.
 
भूकंपप्रवण क्षेत्र - झोन 5 लक्षात घेऊन ही वास्तू उभारण्यात आली आहे.
 
पुढील 150 वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन ही वास्तू उभारण्यात आली आहे.
 
आतापर्यंत 23 हजार 095 मानवी दिवसांची रोजगारनिर्मिती झाली आहे.
 
26 हजार 045 मेट्रिक टन स्टीलचा वापर.
 
 
63 हजार 807 मेट्रिक टन सिमेंटचा वापर.
 
9 हजार 689 घनमीटर फ्लाय अ‍ॅशचा वापर.
Powered By Sangraha 9.0