प्रा. स्नेहल पाठक । 8412818126
रत्नागिरीला स्थानबद्ध झाल्यावर समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, जाचक, अन्यायी परंपरा, अंधश्रद्धा यांच्या निर्मूलनासाठी कार्य करण्याचे ठरविले. स्पृश्य-अस्पृश्यता, समाजातील विषमता, वर्णभेद सावरकरांना अस्वस्थ करू लागले. देशस्वातंत्र्याइतकेच समाजस्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे. आपल्या लेखणीतून नि वाणीतून समरसतेचा विचार मांडण्याचा निर्धार केला. संस्कृती राखण्यासाठी हिंदू समाजाचे संघटन करून त्यांच्यामध्ये लढाऊ वृत्ती, स्वाभिमान निर्माण करण्याचा ध्यास घेतला.
जसाठी मरण ते जनन
तुजविण जनन ते मरण..
या दोन ओळींत स्वा. सावरकरांच्या जीवनाचे सार होते. स्वा. वि.दा. जे जीवन जगले, त्या जीवनात एक निश्चित हेतू होता, एक ध्येय होते, त्यांनी निश्चित असे जीवितकार्य स्वीकारले होते. स्वातंत्र्य हा श्वास आणि तोच ध्यास होता. प्रत्येक भारतीयाच्या मनात जाज्वल्य राष्ट्रभक्तीची ज्योत अविरतपणे तेवत ठेवली. राष्ट्रभक्तीचा अंगार फुलविण्यासाठी साहित्यनिर्मिती तर केलीच, तसेच सशस्त्र क्रांतीसाठी शपथही घेतली.
स्वा. सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महान पर्व असून राष्ट्रभावना जागृत करणारा इतिहासाचा एक अध्याय आहे. सावरकर म्हणजे व्यक्ती आणि समष्टी यांच्यातील एकात्म भावाचे मूर्तिमंत प्रतीक होय. स्वा. सावरकर क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. स्वा. सावरकर हे फक्त देशभक्त किंवा क्रांतिकारक नव्हते, तर ते प्रतिभासंपन्न लेखक होते. कवी, महाकवी, कादंबरीकार-कथाकार-इतिहासकार, निबंधकार, नाटककार, व्याकरणकार, भाषा आणि लिपी शुद्धीकरणाचे प्रणेते असे बहुआयामी व व्यासंगी व्यक्तिमत्त्व, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ध्यास घेणारे समर्पित जीवन म्हणजे सावरकर. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश, लॅटिन, ग्रीक व उर्दू भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. सावरकरांचा अधोरेखित करण्यासारखा आणखी एक पैलू म्हणजे ते कृतिशील समाजसुधारक होते. देशाच्या स्वातंत्र्याइतकेच समाजस्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे; जातिभेद, विषमता यामुळे समाजातील काही बांधव आपल्यापासून दुरावत असतील, तर ते अमानवी आहे अशी सावरकरांची विचारधारा होती. अस्पृश्यतेचा विचार हा समाजाला लागलेला कलंक आहे ही भावना त्यांनी कृतीतून दाखवून दिली.
जातिभेद, विषमता, अस्पृश्यता आणि अनिष्ट रूढी-परंपरा यामुळे समाज संघटित नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावरकरांनी सामाजिक परिवर्तन करण्यासाठी संकल्प केला आणि तो सिद्धीस नेण्याचा लक्षवेधी ध्यास घेतला, हे खरेच न विसरता येण्यासारखे कार्य आहे. त्यांनी जनतेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला.
अंदमानातील यातनापर्व संपले आणि सावरकरांना काही अटी, बंधने लादून रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले. रत्नागिरीत राजकारण करण्यावर बंधन आले. मग त्यांनी सामाजिक कार्य करण्याचे मनोमन ठरवले. अंदमानात सोसलेल्या यातना लिखित करण्यासाठी ‘माझी जन्मठेप’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यांनी भोगलेल्या यमयातना अंत:करण हेलावून टाकणार्या आहेत.
कल्पनेला भोवळ यावी, यातनेला कापरे सुटावे असे हाल त्यांना भोगावे लागले. किती प्रतिकूलता, मानसिक-शारीरिक छळ, अपमान, अवहेलना, कुटुंबाचा कुठलाच संपर्क नाही.. पण ते डगमगले नाहीत की निश्चयापासून दूर गेले नाहीत. स्वातंत्र्याचा ध्यास आणि साहित्यनिर्मिती यांच्याशीच ते प्रामाणिक राहिले. सामान्य माणूस केव्हाच थांबला असता. खरेच, सावरकर असामान्य होते, अचंबित करणारे हे व्यक्तिमत्त्व होते. कोणाचीही पर्वा न करता जे व्रत घेतले होते, त्याची परिपूर्तीच करत राहिले, म्हणूनच म्हणावेसे वाटते -
की घेतले व्रत न हे
आम्ही अंधतेने...
प्रतिकूलतेमध्ये लेखन, स्वातंत्र्य, समाजस्वातंत्र्यासाठीचे कार्य हे असामान्यत्वाचे, अलौकिकतेचे लक्षण आहे. यासाठी जिद्द, संयम, आत्मविश्वास, सकारात्मकता, सहनशीलता लागते. सावरकरांमध्ये ही गुणवैशिष्ट्ये होती, म्हणूनच ते अविरत कार्य करू शकले.
सावरकरांचे व्यक्तिमत्त्व आम्हालाही कसे जगावे, कसे असावे यासाठी प्रेरणा देणारे आहे. सावरकर हे तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत. तरुणांनी अपयशाने खचून न जाता, अपेक्षाभंगाच्या दु:खाचा फारसा ताण न घेता तणावमुक्त जगण्यासाठी सावरकरांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवावे. त्यांचे साहस, कार्य करण्याचा झपाटा, सकारात्मक परिवर्तनाचा घेतलेला ध्यास आपण सातत्याने आपल्या मनात जपला पाहिजे, असे मला वाटते.
सावरकर म्हणजे खरेच ध्यासपर्व. त्यांच्या पाऊलखुणा आपण मनोमन जपल्या पाहिजेत. स्वत:साठी जगताना दुसर्यासाठीही वेळ द्यावा, हे शिकण्यासारखे आहे.
आज सर्व अनुकूल परिस्थिती आहे, सोयीसुविधा, सवलती सर्व आपल्याला मिळूनही आपली उदासीनता वाढते आहे. प्रतिकूलतेवर मात करून मार्ग कसा काढला पाहिजे, हे सावरकरांच्या जगण्यातून आपल्याला समजते. सावरकरांचा जीवनपट आपले मनोधैर्य वाढविणारा आहे. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, फक्त देशाच्या विकासासाठी, उन्नतीसाठीच प्रयत्न करायचा आहे. तरुणाईने सकारात्मक विचार करून आपला आत्मविश्वास वाढवावा, असे मला वाटते.
सावरकरांनी आयुष्यात परकीय गुलामगिरीविरुद्ध झगडण्यात आपली शक्ती पणाला लावली. रत्नागिरीला स्थानबद्ध झाल्यावर समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, जाचक, अन्यायी परंपरा, अंधश्रद्धा यांच्या निर्मूलनासाठी कार्य करण्याचे ठरवले. स्पृश्य-अस्पृश्यता, समाजातील विषमता, वर्णभेद सावरकरांना अस्वस्थ करू लागले. देशस्वातंत्र्याइतकेच समाजस्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे. आपल्या लेखणीतून नि वाणीतून समरसतेचा विचार मांडण्याचा निर्धार केला. संस्कृती राखण्यासाठी हिंदू समाजाचे संघटन करून त्यांच्यामध्ये लढाऊ वृत्ती, स्वाभिमान निर्माण करण्याचा ध्यास घेतला. निद्रिस्त समाजाला जागृत करणे हे काम तितके सोपे, सहज नव्हते. जातिभेदाच्या शृंखला तोडून त्यांची मानसिकता बदलणेे कठीणच होते. पण सावरकर निश्चयी होते. समाजजागृतीचा विचार त्यांच्या बालपणीच त्यांच्या हृदयात घर करून होता.
शाळेतला एक प्रसंग - शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, “संत एकनाथ महाराजांच्या अंगावर यवन शंभर वेळेस थुंकला, याबद्दल तुमचे मत नोंदवा.” विद्यार्थ्यांनी मते मांडली. सावरकरांचे उत्तर चिंतन करण्यासारखे आहे - “संत एकनाथांच्या अंगावर यवन शंभर वेळेस थुंकूनही कोणीही प्रतिकार करीत नाही, संतासाठी कोणी धावून येत नाही.. हा समाज निद्रिस्त होता, असमर्थ होता.”
सावरकरांचे समाजाविषयीचे चिंतन रत्नागिरीच्या वास्तव्यात कामी आले. समाजजागृतीचे व्रत त्यांनी मनोमन स्वीकारले.सावरकरांचे सागरदिव्य जसे धाडसी, तसेच रत्नागिरीच्या पतितपावन मंदिराची उभारणी, अस्पृश्योद्धारासाठी केलेले कार्यही तेवढेच क्रांतिकारक आहे. रूढीविरुद्धचे बंड हे खूप मोठे धाडस होते. आव्हान होते. व्यक्तिमत्त्व विकासाच्या आड येणार्या सात शृंखला तोडण्याचा केलेला प्रयत्न खरेच उल्लेखनीय आणि महनीय कार्य आहे. एकोणिसाव्या शतकात शुद्धीबंदी, बेटीबंदी, वेदोक्तबंदी, स्पर्शबंदी, व्यवसायबंदी आणि सिंधुबंदी या शृंखलांनी समाज वेढला होता. एखाद्या माणसाने धर्म सोडला, तर त्याला परतीची दारे बंद होती. सोनाराच्या मुलाने सोनाराचा व्यवसाय तोच करायचा, हे जाचक बंधन होते. वेदाध्ययनाचा अधिकार फक्त उच्चवर्णीयांचाच, आपआपल्या जातीमध्येच रोटी-बेटीचा व्यवहार, समुद्रगमन हे पाप असे निर्बंध लादले होते. जगण्याची अशी चौकट होती. खरे याला कुठलाही शास्त्रीय आधार नव्हता. माणसानेच हे ठरवले होते. बुद्धीला न पटणार्या, मनाला वेदना देणार्या अमानवी अशा शृंखला तोडून सावरकरांनी वेगवेगळ्या मार्गांनी समाजामध्ये समरसतेचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. समाजप्रबोधनासाठी नाटक या माध्यमाचा आधार घेतला. इ.स. 1927मध्ये ‘उ:शाप’ हे नाटक लिहिले. या नाटकातून अस्पृश्यता आणि धर्मांतर यासारख्या जळजळीत समस्या मांडल्या. अतिरिक्त अहिंसेचे दुष्परिणाम ‘संन्यस्त खड्ग’मध्ये, तर 1930मध्ये ‘उत्तरक्रिया’ या नाटकात मुसलमानी अत्याचाराविरुद्ध सूडाची भावना मांडली आहे. समाजाला अहिंसक आणि सतत भेडसावणार्या समस्या या नाटकात मांडून परिवर्तनाचे, प्रबोधनाचे पाऊल अतिशय मोलाचे ठरले. अनिष्ट रूढी-परंपरांच्या विरोधातील ही चळवळ सावरकरांनी आपल्या रत्नागिरीच्या वास्तव्यात यशस्वी करून दाखविली. पतितपावन मंदिर हे सावरकरांच्या कार्याचे जिवंत स्मारक आहे. ही सामाजिक क्रांती खरोखर अपूर्व अशी आहे. अज्ञातवासाच्या सात वर्षांत स्वत:चा, कुटुंबाचा कुठलाच विचार न करता समाजकार्य करणे हे समर्पण शब्दातीत आहे.
रत्नागिरीच्या शाळेतील शिक्षकाची भेट घेऊन त्यांनी वर्गात स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना वेगवेगळे न बसविता त्यांना सरमिसळ बसविण्याचा आग्रह धरला. हा प्रयोग हळूहळू यशस्वी झाला. अस्पृश्यताविरोधी बंडाचा संदेश घरोघरी जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभातफेर्या काढल्या. परधर्मात गेलेल्यांना शुद्ध करून त्यांना परत हिंदू धर्मात घेऊन त्यांचे विवाहही लावून दिले. प्रवाहाच्या विरोधात जाऊन नवीन विचार रुजविणे, परिवर्तनाचा ध्यास हे कठीण होते. समाजाची मानसिकता बदलणे आव्हानात्मक होते. सावरकर कृतिशील सुधारक आणि निश्चित स्वभावाचे असल्यामुळे हे साध्य होऊ शकले. इ.स. 1931मध्ये भागोजी कीर या धनिकाच्या सहकार्याने पतितपावन मंदिर बांधले. या मंदिरात सर्वांना खुला प्रवेश होता. मंदिरामध्ये कोणालाही मज्जाव नसावा, प्रवेशासाठी स्वातंत्र्य असावे हे सावरकरांचे स्वप्न होते, तेही पूर्ण केले. भंगी मुलांच्या मौंजी, सहभोजनाचे कार्यक्रम, महिलांचे संघटन, हळदीकुंकवाचे कार्यक्रम अशा एकत्रीकरणातून विषमता, वर्णभेद घालवून देण्याचा तळमळीने प्रयत्न केला.
हे समाजकार्य करत असताना समाजकंटकांनी प्रचंड विरोध केला. धमकी देणे, मारण्याचा प्रयत्न, कार्यक्रमात व्यत्यय आणणे असे त्रास देऊनही सावरकर आपल्या कार्यापासून दूर झाले नाहीत, किंचितही विचलित झाले नाहीत, कारण ‘वश्म् जनहितम् ध्येयम्। केवळ न जनस्तुती:।’ ही त्यांची कार्यक्रमाची भावना होती.
कर्मवीर शिंदे यांनी 1908मध्ये अस्पृश्यता निवारण चळवळीला प्रारंभ केला. सावरकरांचे समरसतेचे कार्य पाहून समाधान व्यक्त केले. आपले उर्वरित आयुष्य सावरकरांना मिळावे ही भावना व्यक्त करून त्यांचा गौरवही केला. सामाजिक क्रांतीला मिळालेली ही पावती आहे, ही नोंद सावरकरांना आणखी ऊर्जा देणारी ठरली.
या अस्पृश्योद्धाराच्या कामाने म. गांधीही प्रभावित झाले होते. 1927मध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांनी रत्नागिरीमध्ये जाऊन सावरकरांची भेट घेतली व सावरकरांच्या पत्नी यमुनाबाईंच्या चरणी लीन होऊन ‘यमुनाबाईंनी सावरकरांना अतिशय खंबीरपणे साथ दिली’ अशा भावनाही व्यक्त केल्या होत्या. दोन्ही महापुरुषांमध्ये असे आदराचे नाते होते. हा प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो. महात्मा गांधी आणि सावरकर दोघांचे ध्येय एकच होते, मार्ग भिन्न होते. देशाच्या स्वातंत्र्यावर दोघांचे एकमत होते, पण सशस्त्र आणि नि:शस्त्र लढा हे वेगळे मार्ग होते. अहिंसा, सत्याग्रह आणि असहकार यापेक्षा शस्त्रांनी इंग्रजांचा पराभव करणे हा क्रांतिकारक सावरकरांचा विचार होता. स्वदेशी आणि अस्पृश्योद्धारासाठी दोघांचेही कार्य अतुलनीय असेच आहे. स्वदेशीचा आग्रह धरून सावरकरांनी रत्नागिरीमध्ये खूप मोठी चळवळ केली. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न या आजच्या विचाराची मुहूर्तमेढ सावरकरांनी 1932मध्येच रोवली. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये असतानाच या स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली होती. 1903मध्ये लोकमान्य टिळकांच्या सहमतीने, सहकार्याने पुण्यात विदेशी कपड्यांची होळी करून त्यांनी स्वदेशीचा जोरदार प्रचार केला होता.
स्वा. सावरकर क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून सर्वपरिचित आहेत. पण त्यांनी हिंदू समाज संरक्षणासाठी केलेले कार्य मात्र लोक विसरले. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केलेल्या कार्याचे आपल्याला विस्मरण होत आहे. इंग्रजांची वक्रदृष्टी, सतत मानसिक छळ, कारावास, अनेक अटी, बंधने असूनही या कामाचा ध्यास आपल्या स्मरणात राहायलाच हवा. सावरकर म्हणतात, “माझी मार्सेलिसची साहसी उडी विसरलात तरी चालेल, पण रत्नागिरीमध्ये केलेली सामाजिक क्रांती मात्र विसरू नका.” सावरकरांची ही तळमळ आपण समजू शकतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेले कार्य, उचललेले पाऊल, धाडस, योगदान हे निश्चितच नोंद घेण्यासारखे आहे. हा इतिहास थरारक जसा आहे, तसा तरुणांना प्रेरणा देणारा आहे. व्यवस्थेच्या विरोधात लढा देण्यासाठी सावरकरांची दुर्दम्य इच्छाशक्ती होती, समर्पण भाव होता, म्हणूनच सावरकरांनी उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केले. सावरकर म्हणजे भव्यदिव्य स्वप्न पाहणारा महामानव होते.
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगती असा कवण जन्मला।
अशा या क्रांतिकारकास माझे नम्र अभिवादन!