अप्रतिम भाष्य

18 Jul 2023 19:13:29
ज्ञानेश्वरीत 9300 ओव्या आहेत, या ज्ञानेश्वरीवर Thoughts On Jnaneswari:The Maiden Translation of Gita हे 75 पानांचे पुस्तक संघप्रचारक रंगा हरिजींनी लिहिले आहे. संघप्रचारक रंगा हरिजींचे हे पुस्तक ज्ञानेश्वरीवरील इंग्लिशमधील लघुभाष्य ठरावे या तोडीचा ग्रंथ झालेले आहे.
vivek
 
पुस्तकाचे नाव

Thoughts On Jnaneswari :
The Maiden Translation of Gita

लेखक - रंगा हरिजी

पृष्ठसंख्या - 75
 
मूल्य - 120 रु.
 
प्रकाशक - कुरुक्षेत्र प्रकाशन, कोची
संघप्रचारक रंगा हरिजी यांचा जन्म केरळचा आहे. मल्याळम ही त्यांची मातृभाषा. 1951 सालापासून ते प्रचारक आहेत. संघातील एक विचारवंत आणि मूलगामी चिंतक अशी त्यांची प्रतिमा आहे. आज त्यांचे वय 93 आहे. या वयातही त्यांनी ज्ञानेश्वरीवर ढर्हेीसहीीं जप गपरपशीुरीळ:ढहश चरळवशप ढीरपीश्ररींळेप ेष ॠळींर हे 75 पानांचे पुस्तक लिहिले आहे. ज्ञानेश्वरीत 9300 ओव्या आहेत, त्यावर 75 पानांचे पुस्तक कसे काय असू शकेल? असा प्रश्न ज्ञानेश्वरीचे वाचन असणार्‍यांना पडल्याशिवाय राहणार नाही.
रंगा हरिजींचे हे पुस्तक ज्ञानेश्वरीवरील इंग्लिशमधील लघुभाष्य ठरावे या तोडीचा ग्रंथ झालेला आहे. रंगा हरिजींचे इंग्लिश भाषेवरील प्रभुत्व वाक्यावाक्यात जाणवत राहते. ज्ञानेश्वरीचा विषय गीतेचा अर्थ मराठीत समजावून सांगण्याचा आहे. ज्ञानेश्वरी हा आध्यात्मिक ग्रंथ आहे. त्यात उच्च प्रतीचे काव्य आहे, तत्त्वज्ञान आहे, साहित्यातील सर्व अलंकार त्यात आहेत, अशा ग्रंथावर भाष्य करणे येर्‍यागबाळ्याचे काम नव्हे. ज्ञानेश्वर हे योगी होते आणि जन्मजात ज्ञानी होते. रंगा हरिजींची संघसाधना 1951पासून चालू आहे. ही देश, धर्म आणि जन यांच्या उपासनेची साधना आहे. तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी त्यांच्या परिस्थितीच्या संदर्भात हीच साधना केली. एकविसाव्या शतकातील एका साधकाने तेराव्या शतकातील ज्ञानियांचा राजा गुरूमहाराव यांच्या आविष्काराचा शोध घ्यावा, हेदेखील विलक्षणच आहे.
 
 
रंगा हरिजी मराठी जाणतात. त्यांनी ज्ञानेश्वरीचे वाचन केले आहे. ती पचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे पुरावे प्रत्येक पानावर सापडतात. त्यांनी योग्य ठिकाणी समर्पक ओवी उद्धृत केली आहे. पृष्ठ क्र. 26वर तीन ओव्या आहेत. पृष्ठ क्र. 35वर ‘ऐसे जे अगाध, जेथे वेडावती वेद, तेथ अल्प मी अतिमंद काय हो॥’ पृष्ठ क्र. 42-43वर अशा अनेक ओव्या आहेत. याचा अर्थ एवढाच की एका मल्याळी भाषकाने ज्ञानेश्वरीचा सूक्ष्म धांडोळा घेतला आहे. ही भारताची अद्भुतता आहे. राजकारणी भाषेवरून भांडतात. सत्पुरुष भाषेच्या पलीकडे जाऊन एकात्मतेचा शोध घेतात.
 
 
भारताच्या एकात्मतेत ज्ञानदेवांचे स्थान कोणते? रंगा हरिजी सांगतात की, ज्ञानदेवांनी संस्कृतमधील गीता मराठीत आणली. नेवाशाला ही ‘भावार्थदीपिका’ म्हणजे ज्ञानेश्वरी मराठीत सांगितली गेली. नेवासे भारताच्या नकाशातील एक छोेटा ठिपका आहे. तिथून संस्कृतमधील ज्ञान आपापल्या प्रादेशिक भाषेत आणण्याची सर्व देशात एक लाट उसळली. रामायण आपापल्या मातृभाषेत आले. गीता आपल्या मातृभाषेत आली. ज्ञानेश्वरांनी केलेली ही क्रांती आहे असे काही जण म्हणतात. रंगा हरिजी त्यासाठी शब्दप्रयोग वापरतात, रिजुव्हिनेट (Rejuvinate). मराठीत त्याचा अर्थ होतो, मालिन्य झटकून टाकून मूळ स्वरूप टवटवीत करणे, जी अर्थपूर्ण शब्दरचना या छोट्या ग्रंथात अनेक ठिकाणी वाचायला मिळते.
 
 
 
गीतेवर शंकराचार्यांनी भाष्य केले, ते संस्कृत भाषेत आहे. त्यात त्यांनी पहिला अध्याय सोडून दिला, दुसर्‍या अध्यायातील दहा श्लोक सोडून दिले आणि शेवटच्या अध्यायातील पाच श्लोक वगळले हे सांगून रंगा हरिजी सांगतात की, ज्ञानदेवांनी भगवान श्रीकृष्णांनी उच्चारलेल्या सर्व प्रश्नांवर भाष्य केले आहे. पहिल्या अध्यायावरील ज्ञानदेवांचे भाष्य आणि शेवटच्या पाच श्लोकांवरील ज्ञानदेवांचे भाष्य रंगा हरिजींनी पूर्ण दिले आहे. शंकाराचार्य आपल्या काळाच्या संदर्भात महानच होते. त्यांना वेदान्त सांगायचा होता. गीतेच्या ज्या श्लोकांपासून वेदान्त सांगता येईल, तो भाग त्यांनी निवडला. ज्ञानदेवांना परमात्मा श्रीकृष्ण आणि त्यांनी सांगितलेला ज्ञानमूलक कर्ममार्गी भक्तियोग सांगायचा होता. ज्ञानदेवांनी वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाची बैठक घालून दिली. हरिजी एक अतिशय सुंदर वाक्य लिहून जातात - ‘शंकराचार्य श्रीकृष्णाच्या माध्यमातून गीतेचे अवलोकन करतात, तर ज्ञानेश्वर गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे अवलोकन करतात.’ एक मोठे पुस्तक लिहिण्याचे सामर्थ्य असलेले हे वाक्य आहे. श्रीगणेशाच्या रूपातील सनातन धर्म ज्ञानदेवांनी कसा मांडला आहे, हे हरिजींनी या पुस्तकाच्या प्रकरण 10मध्ये केवळ अडीच पानांत सांगितले आहे. मराठी भाषकांना ‘ओम नमोजी आद्या..’ हे माहीत असते, अनेकांचे ते पाठही असते. परंतु या गणेशरूपात वेद, उपनिषदे, षडदर्शने, बौद्धमत हे सर्व काही आलेले आहे, हे मात्र फार कमी लोकांना समजते आणि अज्ञानी लोकांना प्रश्न पडतो की हत्तीचे डोके असलेला देव कसा काय? अज्ञान म्हणजे काय? यावर ज्ञानेश्वरीत अतिशय विस्तृत भाष्य केले आहे. रंगा हरिजींनी प्रकरण सातमध्ये त्याचा सुंदर आढावा घेतलेला आहे. तेराव्या अध्यायातील या 650 ते 862 ओव्या आहेत. वाचकांनी हे प्रकरण वाचले, तर ज्ञानदेवांनी ज्यांना अज्ञानी म्हटले, त्या सर्वांचे फोटो आपण रोजच वर्तमानपत्रातून पाहतो असे वाटेल.
 
 
हरिजींच्या प्रकरणातील शेवटचे प्रकरण पसायदानावरील आहे. पसायदान आपल्याला पाठ असते. दत्तोपंतांचे एक वाक्य सांगून हरिजी त्याचा शेवट करतात. दत्तोपंत ठेंगडी म्हणतात, ‘विश्वासाठी भारताचा हा जाहीरनामा आहे.’ इंग्लिश वाचण्याची सवय असणार्‍यांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे असे झालेले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0