प्रेमाचा मधुमास - पबजीचा सापळा...

19 Jul 2023 12:44:10
मागील काही वर्षांपूर्वी भारतात असुरक्षितता असल्यामुळे भारत सोडून जाण्याची घोषणा काही मंडळींनी केली होती. मात्र भारत सोडून कोणत्या देशात जाणार हे त्यांनी सांगितले नव्हते. याउलट पबजी खेळत प्रेमाचा मधुमास फुलला आणि पाकिस्तानी सीमा हैदर भारतात आली. नॉयडा येथील सचिन मीना या तरुणाशी तिने ऑनलाइन प्रेम केले आणि नेपाळमार्गे ती भारतात दाखल झाली. ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे. या घटनेचे अनेक पदर आता समोर येत आहेत.
 
pabji
प्रेम आंधळे असते असे म्हणतात. आंधळ्या प्रेमाला वय, जात, धर्म.. एवढेच काय, तर देश यांचीही आडकाठी येत नाही, हे सीमा हैदर प्रकरणाने सिद्ध केले आहे. पाकिस्तानी महिला प्रेमासाठी आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात येते, हिंदू धर्म स्वीकारते आणि सचिन मीना या ऑनलाइन प्रेमीसोबत राहते.. वरवर पाहता ही चित्रपट तयार करावी अशी प्रेमकथा आहे. उदात्त प्रेम कोणत्या बंधनात अडकून पडत नाही. सीमा आणि सचिन यांचेही उदात्त प्रेम असल्यामुळे सीमा अनेक बंधने तोडून भारतात आली आहे. या प्रेमी युगुलाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत आणि त्यांच्या या प्रेमकहाणीची चर्चा चालू आहे. ऑनलाइन गेमविषयी खूप चर्चा होत असते. सोशल मीडियाचे फायदे-तोटे यावरही सातत्याने बोलले जाते. या पार्श्वभूमीवर सचिन मीना आणि सीमा हैदर यांच्या प्रेमकथेला जोडून असणारी अनेक उपकथानके आता समोर येऊ लागली आहेत. सोशल मीडियावर सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमाचे व्हिडिओ पाहणार्‍या आणि त्यांचे समर्थन करणार्‍यांसाठी ही उपकथानके म्हणजे डोळ्यात अंजन आहे.
 
 
एक सीमा हैदर पाकिस्तानातून दुबईला जाते, तेथून नेपाळला येते आणि नेपाळमार्गे भारतात प्रवेश करते. भारतात ती 13 मे 2023 रोजी दाखल होते. असे असले, 2019पासून सीमा आणि सचिन यांचे ऑनलाइन संबंध होते. गेम खेळत खेळत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सीमा नॉयडा येथे आल्यानंतर सचिन मीना आणि सीमा हैदर यांच्या संबंधित काही व्हिडिओ प्रदर्शित झाले आणि पाकिस्तानमधील हिंदू बांधवांना त्याचा थेट परिणाम भोगावा लागला. सीमा हैदरला परत पाकिस्तानमध्ये पाठवा, नाहीतर इथल्या हिंदू महिलांवर अत्याचार केले जातील अशी धमकी दिली गेली. हिंदू मंदिरावर हल्ला केला गेला. हे केवळ एक सीमा सीमापार आल्यामुळे होते आहे. आपल्या देशात सीमा हैदर हिंदू धर्म स्वीकारते म्हणून तिचे कौतुक आणि मुस्लीम सीमा हिंदू झाली म्हणून पाकिस्तानमधील हिंदूंना त्रास होतो आहे. कट्टर मानसिकता काय असते, याचे हे उदाहरण आहे.
 
 
pabji
 
गोष्ट एवढीच नाही. जी सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली, तिच्याकडे चार पासपोर्ट आहेत, सीमाचा भाऊ आणि चुलता पाकिस्तानी सैन्यात काम करतात, या गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत आणि यावरून हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही, प्रेमप्रकरण तर मुळीच नाही असा तपास यंत्रणांनी अंदाज लावला असून सीमा हैदर पाकिस्तानी हेर आहे का? याचा तपास करण्यासाठी सीमा हैदर हिला एटीएसने ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने मात्र तत्काळ खुलासा करत सीमा हैदर पाकिस्तानी हेर नसून सचिन मीनाची प्रेमिका असल्याचे जाहीर केले आहे, तर भारतीय तपास यंत्रणा अधिक खोलात जाऊन तपास करत आहेत. एकूणच या दोघांची प्रेमकहाणी दोन्ही देशांचे संबंध अधिक बिघडवण्यास कारणीभूत ठरणार, असे दिसते आहे. सीमा हैदरच्या रूपाने पाकिस्तानी हेर आपल्या देशात आला असेल, तर पुढील काळात खूप गंभीरपणे सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. भारतीय तपास यंत्रणा सीमा हैदरचे खरे स्वरूप समोर आणतीलच. मात्र हा विषय तेवढ्यापुरता मर्यादित नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण आपला हेर पकडला गेला, तर कोणताही देश त्याची जबाबदारी स्वीकार करत नाही. पाकिस्तानी यंत्रणानी तेच पाऊल उचलले आहे. आता सीमा हैदरमागे काय सत्य दडले आहे, हे शोधण्याची जबाबदारी भारतीय तपास यंत्रणांची आहे.
 
 
यंत्रणा त्यांचे काम करतीलच. पण भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे? याचा विचार करण्याची ही वेळ आहे. या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियातून झाली आहे. सचिन मीना आणि सीमा हैदर दरदोज चार ते पाच तास ऑनलाइन पबजी खेळत होते. त्यातून त्यांचा परिचय वाढला आणि तथाकथित प्रेमकथेचा जन्म झाला. किराणा दुकान चालवणारा सचिन चार मुलांच्या आईच्या प्रेमात पडला. याचा अर्थ इतकाच की सोशल मीडियाने आपल्या जगण्यावर ताबा मिळवला आहे. दिवसाचा सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवणार्‍याची संख्या वेगाने वाढत जाते आहे आणि अशा मंडळींना गुंतवून ठेवणारी विविध अ‍ॅप्सही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. अशा वेळी सारासार विचार केला जातो का? मुबलक तंत्रज्ञान, भरपूर वेळ आणि ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पैसा कमावण्याची लालसा यामुळे अशा गोष्टी घडत असतात, हे आता उघड झाले आहे. आज सीमा हैदर प्रकरणाने या गोष्टी उघड झाल्या असल्या, तरी अशा अनेक सीमा हैदर याआधी आपल्या देशात आल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सचिन मीना आणि सीमा हैदर हे हिमनगाचे टोक नसेल कशावरून? सरकारने अशा ऑनलाइन गेम्सच्या वापरावर बंदी घालण्याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांनी ही ऑनलाइन धोक्याची घंटा ऐकून घेत आपला व्यवहार बदलला पाहिजे.
 
 
Powered By Sangraha 9.0