@निलिमा जोरवर
महाराष्ट्राच्या कोरडवाहू भागापासून ते अतिपावसाच्या परिसरात दिसणार्या व सहज उपलब्ध होणार्या काही रानभाज्या सामान्यत: आढळतात. या जर ओळखू आल्या, तर आपल्याला सहजच रानभाज्यांचा आस्वाद घेता येईल. अशाच काही दुर्मीळ रानभाज्यांची ओळख करून देणारा हा लेख.

पावसाच्या नवलाईने धरतीचे रंगरूप पालटले. वाळलेल्या रानात हिरवे अंकुर दिसू लागले. जमीन, झाडे, वेली हिरवाईने खुलून आल्या. हा झाडांचा रानाचा हिरवा मोहक रंग जीवसृष्टीला आकर्षित करू लागला. कुंभारकुकडा अर्थातच भारद्वाज पक्ष्याची जोडी झाडावर एकत्र दिसू लागली. हिरव्या जावळमाखल्या भुईतून एखादा हिरवा गवत्या साप दिसू लागला. बेडकांचे-रातकिड्यांचे संगीत साथीने ऐकू येऊ लागले. आतापर्यंत दडलेले जीव पावसाच्या आगमनाने सक्रिय झाले. ‘कित्ती महत्त्वाचा आहे नाही पाऊस. जीव-जंतूसाठी आणि ज्या मातीतून इतके जीव जन्म घेतात, ती जिवंत मातीदेखील जपली पाहिजे’ असा विचार मनात घोळत राहिला. या वेळी लक्ष वेधून घेतले त्या वेगळ्याच झुडपांनी. यातले तण किंवा गवत म्हणून ओळखल्या जाणार्या अशा बर्याच वनस्पती दिसत होत्या. रस्त्याच्या दुतर्फा, बांधावर, मोकळ्या जागेत यांच्या हिरव्या टवटवीतपणामुळे रस्त्याची शोभा वाढली होती. ही सर्व झुडपे लावण्यासाठी कुणीही बियाणे पेरले नव्हते की खत दिले नव्हते, तरीही तजेलदार झुडपे फोफावली होती. विशेष म्हणजे या नको असलेल्या - म्हणजेच तण म्हणून शेतीसाठी ‘कुप्रसिद्ध’ असलेल्या वनस्पतींमध्ये ज्यांची भाजी केली जाते अशा अनेक वनस्पती होत्या.
महाराष्ट्राच्या कोरडवाहू भागापासून ते अतिपावसाच्या परिसरात दिसणार्या व सहज उपलब्ध होणार्या काही रानभाज्या सामान्यत: आढळतात. या जर ओळखू आल्या, तर आपल्याला सहजच रानभाज्यांचा आस्वाद घेता येईल. हिरव्या झुडूपवर्गीय पालेभाज्या, मेथीच्या भाजीप्रमाणे पावसाळ्यात उगवणारी अल्पायुषी झुडपे असणार्या अनेक रानभाज्या खाण्यासाठी उपयोगी येतात. त्यात घोळ किंवा चिवळ, माठ (काटेमाठ, छोटा माठ, रानमाठ) असे अनेक प्रकार आपोआप उगवतात. टाकळा किंवा तरोटा तर अगदी रस्त्याच्या दुतर्फा उगवलेला दिसतो. डोंगराच्या कुशीत तर ही विविधता वाढत जाते. कोळू, रानतेरा, दिवा, बडदा, लोत, शेवळ अशा कितीतरी भाज्या दिसू लागतात. ठरावीक प्रक्रिया करून या सर्व रानभाज्यांची भाजी केली जाते.
शेतात उगवणार्या रानभाज्या
ज्वारी, बाजरी अशा कोरडवाहू पिकांबरोबर इरवाड म्हणून मूग, माठ, चवळी वगैरे डाळवर्गीय पिके घेतली जात. ही शेती शेणखत वापरून सेंद्रिय पद्धतीने केली जात असे. त्यामुळे पिकांबरोबर काही तण उगवत असे. हे तण म्हणजे अनेकदा रानभाज्या असत. यात कुंजीर, तांदुळजा, पोकळा, चिल किंवा चंदन बटवा, माठ अशा भाज्या हमखास असत. निंदणी करताना या रानभाज्या खुडून घेतल्या जात असत, म्हणजे पुढच्या वेळी पुन्हा याला पाने येत आणि भाजी उपलब्ध होई. मिश्र शेतीत काही भाज्या - राजगिरा, हिरवी अंबाडी, लाल अंबाडी, खुरासणी, करडई या भाज्या मुद्दाम लावल्या जात असत. खुरासणी, करडई यांच्या पानांबरोबरच तेलबियादेखील असतात, जेणेकरून कुटुंबासाठी घरचेच तेल उपलब्ध होत असे. बांधाच्या कडेला भोपळावर्गीय, वालवर्गीय वेल लावले जात, याच्याही पानांची भाजी होत असे. हा मिश्रपाटा आता कमी झाला आहे. ज्वारी-बाजरीची जागा सोयाबीन-कापशीने घेतली आहे. शेणखताऐवजी रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. तणनाशकाच्या वापराने शेतात कोणतेच तण येऊ दिले जात नाही, त्यात रानभाज्यादेखील कमी झाल्या.
जंगलभागातील रानभाज्या
सदाहरित व निमसदाहरित, डोंगरावरील अतिपर्जन्य असणारे जंगल असते, तसे कमी पाऊस असणारे डोंगराळ भागातील खुरट्या वनस्पतींचे जंगलदेखील असते. विशेषत: सह्याद्रीचा भूभाग रानभाज्यांसाठी जास्त समृद्ध आहे, असे दिसते. अशा भागात झुडपी वनस्पती जशा आढळतात, तशा अनेक कंदवर्गीय, वेलवर्गीय, वृक्षवर्गीय, इतकेच नाही तर जंगली अळंबी व निवडुंगदेखील भाज्या म्हणून वापरात आहेत. दिवा, बडदा, तेरा, कोळू. सोळू, कोंबडा, कवला अशी ही यादी खूप मोठी आहे. मोह, भोकर, करवंद, कांचन, शेवगा, हदगा, कोशिंब अशा बर्याच वृक्षांची पाने, फळे व फुलेदेखील भाजीसाठी वापरात आहेत. डुक्करकंद, चाई, कडूकंद, अमरकंद अशा कंदवर्गीय अनेक भाज्या येथे आढळतात. ही विविधता खूप मोठी आहे.
या सर्व रानभाज्या का खाव्यात?
निसर्गाने स्वत: तयार केलेल्या ह्या वनस्पती कोणत्याही खतांचा अथवा रसायनांचा वापर न करता आपोआप उगवलेल्या असतात. यासाठी कुणीही माणसाने बिया लावलेल्या नसतात की त्याची मशागत केलेली नसते. विशेषत: हंगामानुसार येणार्या या रानभाज्या प्रचंड औषधी असतात. पावसाळ्यात जेव्हा पिण्याचे पाणी प्रदूषित झालेले असते, तेव्हा पोटाचे विकार वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी टाकळा, भारंगी अशा भाज्या कृमिनाशक म्हणून काम करतात. उन्हाळ्यात मिळणार्या पाथरी, घोळू या भाज्या शरीराचे वाढलेले तापमान नियंत्रित करून थंडावा देण्यासाठी उपयोगी पडतात. साबरबोंड कोवळे असताना केलेली भाजी सांधेदुखीवर औषध आहे. कांगुनीच्या पानांची भाजी कावीळ झालेल्या रुग्णाला खाऊ घालतात. प्रत्येक भाजीचे काहीना काही औषधी गुण आहेतच. या रानभाज्यांमध्ये anti cancerous गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. मोहासारखी भाजी अनेक मूलद्रव्यांचा खजिना आहे.
रानभाज्या आरोग्यदायक आणि चविष्टदेखील असतात. अनेकदा आरोग्यदायक असलेले अन्न चविष्ट नसते, असा आपला समज असतो. परंतु रानभाज्या तुमचा हा समज नक्कीच दूर करतील. काही ठरावीक रानभाज्या - चिचुरडे, पाषाणभेद, शेरणी या कडू असतात, पण त्यांवर विशिष्ट प्रक्रिया करून खाल्ल्यास आरोग्यास खूप फायदेशीर आहेत.
शिंदळ माकडे - पित्तावर हमखास इलाज असणारी व वर्षातून फक्त एकदाच मिळणारी खुरट्या जंगलातील भाजी. मस्त आंबट-गोड-कडू-तिखट अशी चव असणारी. याच्या मांसल भागाला ठेचून घेऊन दोन पाण्यात स्वच्छ धुऊन घेऊन कांदा, मिरची घालून तेलात परतून शिजवून घ्यावीत. ही भाजी खाल्ल्यावर तोंडाला छान चव येते.
मोहाच्या फुलांची भजी - मोहाच्या झाडाचे अनेक उपयोग आहेत. याच्या फळांची भाजी होते, बियांपासून तेल काढले जाते. तर याची ताजी फुले सुकवून वर्षभर वापरता येतात. याच सुकवलेल्या फुलांची भजी (भाजी नव्हे) चविष्ट व पौष्टिक बनतात.
मोहाची वाटीभर फुले कुकरमध्ये शिजवून घ्या. मिक्सरवर त्याचे वाटण करून त्यात तांदळाचे पीठ, कापलेला कांदा, कोथिंबीर व हळद-तिखट-जिरे-ओवा पूड घालून पीठ तयार करा. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर भजी तळा.
हदग्याच्या फुलांची भाजी - हदग्याचा वृक्ष काही वर्षे टिकतो. बियांपासून त्याचे रोप बनवता येते. रोपवाटिकेत याची रोपे विकतदेखील मिळतात. याच्या पानांची, शेंगांची व फुलांचीदेखील भाजी बनवली जाते. याला दुधी व गुलाबी अशा दोन रंगांत फुले येणारी रोपे असतात. या फुलांची भाजी छान, मस्त लागते. विशेषत: लहान मुलांनादेखील ही आवडते. फुलांमधला दंड काढून पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. कांदा, टमाटा कापून घ्यावा. मिरची पावडर, हळद, जिरे, धने पावडर हे मसाले इ.ची फोडणी करावी. चवीनुसार मीठ घालून आवडत असल्यास शेंगदाण्याचा कूट घालू शकता.
माणसाने शेती करायला सुरुवात केली आणि आपल्याला गरजेच्या त्या वनस्पतींची वाढ केली. यातून अनेक पिकांची विविधता जन्माला आली आणि जोपासली गेली. परंतु गेल्या काही दशकांत शेती बाजारकेंद्री होऊ लागली आणि पीकविविधतेलाही फाटा बसला. ठरावीक पिकांचे जास्त उत्पन्न पैशाच्या रूपात मिळवण्यासाठी शेतातील खाद्य तण उपटून फेकली जाऊ लागली. यामुळे त्यांचे बियाणे पुन्हा जमिनीत पडण्याची प्रक्रियाच थांबली. हळूहळू शेतातून हे तण कमी होऊ लागले आहेत. आता तर तणनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वालाच धोक्यात आणले गेले आहे. पण निसर्ग स्वत:ची व्यवस्था स्वत: जरूर ठेवतो. जिथे काही काळ मोकळी असणारी जागा मिळाली किंवा शेताचा बांध मिळाला, तर ते फोफावतच राहणार आहे. परंतु माणसाच्या वेगवान बदलत्या विकासप्रक्रियेत त्याचा कसा निभाव लागेल, हे काळच ठरवेल.
प्रस्तुत लेखिका ‘बखर रानभाज्यांची’ या पुस्तकाच्या लेखिका आहेत.