नव्या पिढीला आदर्शवत- डॉ. मंगलाताई नारळीकर

विवेक मराठी    24-Jul-2023   
Total Views |
vivek
ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांच 17 जुलै 2023 रोजी निधन झालं. त्या संशोधन-कार्यकुशलता-कलांची आवड असं सारं जपत जपत मंगला नारळीकर यांनी गृहिणी म्हणूनही कुटुंबाचा डोलारा मनापासून सांभाळला होता. त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देणारा लेख...
 
“मराठी विकीपिडिया संपादनातल्या काही गोष्टी आ. मंगलाताईंना समजावून सांगायला जाशील का आर्या?” असं मला सुबोध कुलकर्णींनी विचारलं आणि मला गंमत वाटली.
 
“इतक्या मोठ्या व्यक्तीला मी काय शिकवणार सुबोध?”
 
“अग, त्यांना स्वत:होऊन शिकण्याची आवड आहेच, पण तरीही थोडं अडतंय तांत्रिकदृष्ट्या, तेवढं दाखवून ये” असं मला सुबोध म्हणाला.
 
सुबोधने संपर्क दिला आणि एका भल्या संध्याकाळी मी नारळीकरांच्या पाषाण इथल्या घराची बेल वाजवली. त्या क्षणी मोठ्ठं दडपण माझ्या मनावर होतं. बेरीज-वजाबाकी, सूत्र-प्रमेय असे विषय लहानपणापासूनच माझे शत्रू असताना दोन ज्येष्ठ गणितज्ञांच्या उंबरठ्यावर उभं राहताना मला दडपण येणं स्वाभाविकच होतं.
 
 
डॉ. नारळीकर सर लहानपणी आयुकात भेटले होते. शाळेतून नेलं होतं आम्हाला. त्यांच्या ‘प्रेषित’ पुस्तकाची मी पारायणं केलेली. मंगलाताई आणि गणित हे समीकरण डोक्यात पक्कं बसलेलं. ‘चार नगरातलं माझं विश्व’ हे नारळीकर सरांचं आत्मचरित्र मी दोनदा वाचलं होतं आणि त्यातून या दांपत्याची घडण मला समजली होती. त्यांचं सहजीवन, त्यांच्या तिन्ही मुलींच्या संगोपनामध्ये पालक म्हणून त्यांचा असलेला सहभाग हे सारं भारावून टाकणारं असतानाच मी साक्षात त्यांच्या घराच्या दारात उभी होते.
 
 
दार सरांनी उघडलं आणि “तुला भेटायला कुणीतरी आलंय” असं मंगलाताईंना सांगून ते खोलीत आत वळले. मी वाकून सरांना नमस्कार केला आणि माझी ओळख करून दिली.
 
 
डॉ. मंगलाताई नारळीकर यांच्याशी भेट झाल्यानंतर मला समजलं की गणित हा विषय इतकाही अवघड नसतो. तो नीट समजून घेतला की आपल्याला त्या विषयाची भीती वाटत नाही. गणितासारखा क्लिष्ट विषय सोपा आहे असं इतक्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला सांगावं, हे माझं भाग्यच!
 
 
डॉ. मंगलाताई नारळीकर या एक गणितज्ञ होत्या, म्हणजेच गणित या विषयात त्यांचा विशेष अभ्यास होता. मंगलाताईंनी मुंबई विद्यापीठातून 1962 साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या 1964 साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. यासाठी त्या विद्यापीठाच्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या.
 
 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात 1964 ते 1966 या कालावधीत आधी साहाय्यक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केलं. नंतर 1974 ते 1980 या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूट येथे संशोधन करून त्यांनी 1981 साली प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयातली पीएच.डी. मिळवली. ‘संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त’ हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता. 1982 ते 1985 या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणित विद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणार्‍या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केलं. 1989 ते 2002 दरम्यान पुणे विद्यापीठांतील एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना गणिताचं अध्यापन दिलं.
 
 
सद् आणि सदसत् विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.
 
 
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अंतराळशास्त्रज्ञ आणि गणिती रँग्लर जयंत नारळीकर यांच्याशी मंगलाताईंचा विवाह झाला. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह परदेशात वास्तव्यास असताना त्यांनी तिथे स्थानिक मित्रमैत्रिणी मिळवले. या सर्वांशी त्यांची खूप छान मैत्री झाली. परदेशात असतानाही मंगलाताईंनी गणित विषयातलं आपलं काम आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं सुरूच ठेवलं होतं.
 
स्थानिक खाद्यपदार्थ, संस्कृती याबद्दल त्यांना कुतूहल होतं आणि नवे शिकलेले पदार्थ करून पाहणं आणि सर्वांना खायला घालणं हे त्यांना मनापासून आवडत असे. शिवणकामापासून स्वयंपाकापर्यंत ताईंना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. आमच्या भेटीत त्यांनी स्वत: शिवलेले छोटे हातरुमाल ताईंनी मला भेट म्हणून दिले आहेत.
 
 
डॉ. नारळीकर सरांसह परिषदांसाठी देशोदेशी फिरत असताना ताईंनी त्या त्या देशातील वारसा स्थळांना आवर्जून भेट दिली आहे. परिषदेला आलेल्या विविध शास्त्रज्ञांच्या पत्नींसह केलेलं हे स्थानिक पर्यटन ताईंच्या चश्म्यातूनच पाहण्यासारखं आहे.
 
 दोन बुद्धिमंतांचं, संशोधकांचं सहजीवन आणि पालक म्हणून लेकीच्या विवाह संस्कारासाठी त्यांनी केलेला अभ्यास मला थक्क करणारा होता.
 मी ज्ञान प्रबोधिनीच्या पौरोहित्य उपक्रमाची जबाबदारी काही वर्षं सांभाळली आहे. नारळीकर दांपत्याच्या धाकट्या कन्येचा विवाह ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने झाला, त्या वेळी मी आणि माझे विभागप्रमुख विश्वनाथ गुर्जर आमच्याशी सर आणि मंगलाताई विवाहाची पोथी समोर ठेवून अभ्यासपूर्ण चर्चेसाठी आले होते. दोन बुद्धिमंतांचं, संशोधकांचं सहजीवन आणि पालक म्हणून लेकीच्या विवाह संस्कारासाठी त्यांनी केलेला अभ्यास मला थक्क करणारा होता. आमच्या नंतरच्या भेटीत सरांना त्याची आठवण मी करून दिली. त्यांनाही ते आठवलं.
 
 
मुक्त ज्ञानकोश असलेल्या मराठी विकीपिडियावरसुद्धा मंगलाताईंनी योगदान दिलं आहे. विकीपिडिया हाच आम्हाला दोघींना जोडणारा दुवा होता.
 
 
शालेय वयातील मुलांना गणित विषय कसा शिकवावा याबद्दल ताई खूप आग्रही होत्या. मराठी विकीपिडियावरदेखील त्यांनी गणित विषयाशी संबंधित विविध लेख संपादित केले आहेत.
 
 “जायफळाची पूड, लवंगांची पूड हे सारं वापरायला मी जयंतच्या मित्रांकडून शिकले आहे ग”
 मी त्यांना विकीपीडियाची तांत्रिक माहिती शिकवायला गेले, तेव्हा मंगलाताई लॅपटॉपसह सज्ज होत्याच. “प्रबोधिनीतून दमून आलेली दिसतेस.. थांब, आधी चहा घेऊ” असं म्हणून त्यांनी मला चहा दिला आणि स्वत: केलेला सुंदरसा केक. “जायफळाची पूड, लवंगांची पूड हे सारं वापरायला मी जयंतच्या मित्रांकडून शिकले आहे ग” असं म्हणत त्यांनी मला केकची रेसिपीही पटकन सांगून टाकली.
 
 
गणित विषयासंदर्भात ताई लेखांचं संपादन करीत होत्या आणि संपादनातले बारकावे मी त्यांना समजावून सांगितले. “थांब, थांब, मीपण लगेच करून पाहते, मला तुझ्यासारखं जमतं आहे की नाही!” त्या स्पष्टवक्त्या असल्या, तरी मला त्यांचं ते विद्यार्थिनीच्या भूमिकेत शिरलेलं रूप अनुभवताना छान वाटत होतं.
 
 
दोनेक तास आमचा हा सर्व कारभार सुरू होता. मध्येच ताई मला गणितातल्या संकल्पना समजावून सांगायच्या. बालभारतीची गणित शिकवण्याची भूमिका याविषयीही त्या माझ्याशी बोलल्या.
 
 
निघताना ताईंनी माझ्या घरातल्यांची आवर्जून चौकशी केल्यानंतर माझ्या त्या वेळी साडेतीन वर्षांच्या असणार्‍या लेकीसाठी भरपूर केक खाऊ म्हणून दिला. मी त्यांना शिकवून दमले आहे या भावनेतून चहाचा एक कप पुन्हा माझ्या हातात आला. त्यांच्या तिन्ही मुली काय करतात, नातवंडं कशात रमतात अशा कौटुंबिक गप्पाही ताई माझ्याशी मारत होत्या.
 
 
अधूनमधून त्या “जयंत, तू काय करतो आहेस?” अशी हाक मारून सरांची चौकशीही करत होत्या. “त्याच्याकडे आता अधूनमधून असं लक्ष ठेवावं लागतं” असं मला ताई म्हणाल्या, त्यातून सरांप्रतीचं त्याचं वात्सल्य मला जाणवून गेलं.
 
 
मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये शिक्षण विवेकच्या बालमेळाव्यात ताई भेटल्या. मी आता कोकणातल्या घरी असते का? तिथे आमचे शेतीचे काय काय प्रयोग सुरू आहेत? हे ताईंनी मला आवर्जून विचारलं. माझी लेक माझ्यासह असल्याने मी तिला ताईंना नमस्कार करायला सांगितलं, तेव्हा त्यांनी तिला पटकन मांडीवरच बसवलं. मी तिला सांगितलं की अशी मांडी म्हणजे साक्षात विद्यापीठ आहे. माझ्या भाग्याने मला ताईंचा सहवास मिळाला आणि त्यांच्यातली गृहिणी-सचिव-सखी अनुभवायला मिळाली.
 
 
संशोधन-कार्यकुशलता-कलांची आवड असं सारं जपत जपत ताईंनी गृहिणी म्हणूनही कुटुंबाचा डोलारा मनापासून सांभाळला आहे, हे माझ्यासारख्या नव्या पिढीच्या अभ्यासक आईसाठी आदर्शवतच आहे.
लेखिका मराठी विकीपिडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत.

डाॅ.आर्या आशुतोष जोशी

 डाॅ.आर्या आशुतोष जोशी

जन्मदिनांक - २५ |७|१९८०

शैक्षणिक अर्हता—
१.  विद्यावाचस्पती ( संस्कृत) 
टिळक महाराष्ट विद्यापीठ पुणे येथून वाच.नारायण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 'श्राद्धविधीची दान संकल्पना'  या विषयावर संशोधन
फेब्रुवारी २॰१५
 
२. टिळक महाराट्र विद्यापीठ पुणे येथून भारतविद्या या विषयात  विशेष प्रावीण्यासह पदविका.
 
३. पुणे विद्यापीठ संस्कृत विभाग येथून M.Phil पदवी प्राप्त. स्री पौरोहित्य या विषयात लघुप्रबंध सादर. आॅक्टोबर २००७
 
४. पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात M.A. 
वेद विषयासाठी विद्यापीठाचे शंकरराव माणगावकर पारितोषिक
 
५. विविध राट्रीय आणि आंतरराष्टीय परिषदांमधे हिंधू धर्म, तत्वज्ञान,संस्कृती, धर्मशास्र अशा विषयांच्या  सुमारे १७ शोधनिबंधांचे सादरीकरण.
याच विषयांवर ६  राट्रीय आणि आंतरराष्टीय  शोधपत्रिकांमधे निबंध प्रकाशित.
६. ज्ञान प्रबोधिनी पुणे येथे संस्कृत संस्कृती संशोधिकेत संशोधक म्हणून कार्यरत. तसेच तेथील पौरोहित्य उपक्रमाची जबाबदारी २००५ सालापासून घेतली होती. 2018 साली हे काम थांबवले आहे.
 
 विशेष नोंद 
धर्मशास्र या विषयातील अभ्यासासाठी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संशोधनपर कामासाठी २०१० मध्ये पूर्णकन्या प्रतिष्ठानचा कन्यारत्न पुरस्कार आणि २०११मध्ये सुलोचना नातू ट्रस्टचा स्री शक्ती पुरस्कार प्राप्त.
 
७. मराठी विपीडियावर गेली दीड वर्षे संपादिका म्हणून कार्यरत.प्रशिक्षक प्रशिक्षण वर्गात सहभाग.९००० संपादने पूर्ण. हिंदू धर्म, सण, उत्सव, इतिहास, संस्कृती,शिल्पशास्र अशा विविध विषयांच्या लेखांचे संपादन. दोन मुखपृष्ठ लेखांच्या संपादनात योगदान.
या कामासंबंधी TEDEX Pune च्या व्यासपीठावर जुलै २०१६मध्ये व्याख्यान.
 
* हिंदू धर्म,संस्कृती याविषयावर वृत्तपत्रे,नियतकालिके यात लेखन प्रसिद्ध. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील या विषयांच्या कार्यक्रमात सहभाग.
* आकाशवाणी पुणे येथून युववाणी निवेदिका म्हणून निवड आणि तीन दिवसीय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
 
 
* छायाचित्रण,गायन, वाचन,कविता लेखन हे छंद.