समर्पणमूर्ती भानुमती दत्तात्रय गायधनी

08 Jul 2023 12:34:19
@मिलिंद चिंधडे
 
rss
संघस्वयंसेवकाच्या प्रत्येक घरातील एक गोष्ट सारखी असे, ती म्हणजे संघाचे प्रचारक अथवा संघस्वयंसेवक कामानिमित्त मुक्कामाला असायचे. या सर्व महिलांनी आपल्या संसाराबरोबरच संघाचा संसार वाहिला. संसार करता करता देशभावना जागृत ठेवण्याचे काम ज्या महिलांनी सातत्याने केले, त्याचे भानूआजी प्रतीक होत्या.
 
भानूआजी गेल्याचे वृत्त आले. तशा त्या तीन-चार महिन्यांपासून आजारीच होत्या. 29 ऑगस्ट 1931चा त्यांचा जन्म. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. नाशिकला 1933मध्ये प.पू. डॉक्टर हेडगेवार यांनी केतकर टाउन हॉलमध्ये संघाची शाखा सुरू केली. 1937पासून स्व. राजाभाऊंच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी गायधनी कुटुंबाचा संबंध आला. त्यांच्यापाठोपाठ त्यांचे धाकटे बंधू स्व. दत्ताकाका संघात यायला लागले. हळूहळू सगळे घरच संघाचे झाले. संघातील कामाच्या अनेक जबाबदार्‍या उभयतांकडे आल्या.
 
 
पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वयाच्या चाळिसाव्या वर्षी 10 ऑगस्ट 1967 रोजी दत्ताकाकांचे दु:खद निधन झाले. भानूआजी त्यांच्या माघारी तब्बल 56 वर्षे होत्या. स्व. राजाभाऊ आणि भानूआजींचे चिरंजीव रमेश गायधनी हे दोघे आणीबाणीच्या वेळी तुरुंगात होते. पण राजाभाऊंच्या पत्नी इंदूकाकू आणि रमेशच्या आई भानूकाकू त्या काळातही घरी येणार्‍या सर्वांचे अत्यंत प्रेमाने आणि काळजीने स्वागत करत. त्यांच्या मनात असलेला ताण त्यांनी कधीही चेहर्‍यावर प्रकट केला नाही, असे गोविंदराव यार्दी यांनी लिहून ठेवले आहे.
 
संघ सुगंध राजाभाऊ गायधनी

संघ तपस्वी, संघ योगी यांच्या आठवणींचे पुस्तक

 https://www.vivekprakashan.in/books/sangh-sugandh-rajabhau-gaidhani/
 
संघाच्या सर्वच घरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हीच गोष्ट होती. ‘समाजतळातील मोती’ या पुस्तकातील एका लेखात नानाराव ढोबळे यांनी अशा अनेक वहिनींचा, राष्ट्रव्यापी शक्तींचा गौरव केला आहे. भानूआजींकडे पाहिले की मला माझ्या आजीची आठवण व्हायची. माझे आजोबा मालेगावला जाईपर्यंत मालेगाव तालुका संघचालक होते. कायम कोणीतरी एक जण - म्हणजे बहुतेक संघाचे प्रचारक मुक्कामाला असायचे. सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती होती. या सर्व महिलांनी आपल्या संसाराबरोबरच संघाचा संसार वाहिला. आताचा काळही मी पाहतो आहे.
 
 
आता मंडळींना उतरायला बहुतेक ठिकाणी वेगळी जागा आहे. संघशाखांकडे स्वत:ची कार्यालये आहेत. पूर्वी प्रचारक एखाद्या स्थानिक अधिकार्‍याकडे अगर स्वयंसेवक बंधूंकडे उतरायचे. कोणतीही संघटना एकदम उगाचच मोठी होत नाही. त्यामागे प्रचारक म्हणून गेलेल्या व्यक्तींची तपश्चर्या आहे, तशी या ठिकठिकाणी असलेल्या वहिनींचीदेखील तपश्चर्या आहे. यामुळे संघाला चांगले दिवस आलेलेदेखील या महिलावर्गाला पाहता आले. आयुष्यात चांगले काम केल्यामुळे, रविवार कारंजावरील विकसित झालेल्या नवीन घरात सर्व मंडळी परत आलेली भानूआजींनी ’याची देही याची डोळा’ पाहिली.
 

rss 
 
आणीबाणीसंबंधी ‘संघ सुगंध’ या पुस्तकात राजाभाऊ गायधनी यांनी लिहून ठेवले आहे की जेलमध्ये अनेकांना अनेक वस्तू हव्या असायच्या. निरनिराळी दुकाने हिंडून त्या वस्तू गोळा करायचे काम केले जायचे आणि माझी पत्नी आणि भावजय भानू या दोघी अशा वस्तू घेऊन भेटीला यायच्या. त्या दोघींना ते आणतानाही कष्ट व्हायचे. बिटको टॉकीजजवळ उतरायचे. तिथून दोन किलोमीटर चालत यायचे. बराच वेळ जेलच्या दाराबाहेर तिष्ठत उभे राहायचे. मग आमची भेट व्हायची. त्या भेटीत ते सामान आमच्या ताब्यात मिळायचे. पण त्या दोघींनी कंटाळा न करता हे सगळे मनापासून केले.
 
 
इंदूला आणि भानूला आणखी एक काम करायला लागायचे, ते म्हणजे पाहुण्यांची व्यवस्था. सोलापूर, मराठवाडा, विदर्भ हे लांबचे भाग. तिकडचे लोक कुटुंबीय, स्थानबद्धांना भेटायला यायचे. सोयीचे ठिकाण म्हणून त्यांच्यापैकी बरेचसे लोक आमच्याकडे उतरायचे. काही जणांची जेवायची व्यवस्था आमच्या घरीच असायची. एखाद्या वेळी तर रात्री घरातल्या प्रत्येक दालनात कोणीतरी झोपलेला असायचा. घरभर पाहुणे असायचे. या दोघी जावा त्यांची सगळी व्यवस्था करायच्या.
 
 
भेटीला आलेले लोक कधीकधी निराश झालेले असायचे. त्यांना धीर देण्याचे कामही त्या दोघी करायच्या. या दोघींना अधिक कष्ट आणि अधिक त्रास सहन करावा लागला. पैसा आणि श्रम यांचा विचार न करता या दोघींनी जे पडेल ते काम केले. कर्तव्याची जाणीव ठेवून आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केले. भूमिगत असलेले प्रचारक घरी येऊन जात. नाना ढोबळे, तात्या इनामदार आणि विनीत कुबेर हे जास्त वेळा. त्यांची काळजी घेणे हेही एक जोखमीचे काम या दोघींनी केले.
 
 
हे सगळे काम चालू असताना घरात ओढाताण व्हायची. रमेशचा व्यवसाय बंद होता. राजाभाऊ लिहितात - ‘माझा पगार येत नव्हता. घरभाड्याच्या उत्पन्नावर सगळा खर्च भागायचा. तरीही ओढाताण कमी करण्यासाठी इंदूला, भानूला काही गोष्टी कराव्या लागल्या. साबुदाणा चकल्या, उडदाचे पापड, सुपारी, राजगिर्‍याच्या वड्या, अनारशाचे पीठ असे काही पदार्थ करून ते विकण्याचा उद्योग त्यांनी केला. हे समजल्यावर काही लोक मुद्दाम असे पदार्थ घेऊन जायचे. पण या दोघींनी जास्त वाच्यता होऊ न देता या गोष्टी केल्या.’
 
 
गायधनींचे घर मध्यवस्तीत होते. त्यामुळे कोणत्याही वाहनाने येणार्‍याला सुलभतेने येता येई. वाडा मोठा. जागा मुबलक. त्यामुळे मुक्काम करणार्‍याला किंवा घरातल्या लोकांना अडचण होईल अशी परिस्थिती नव्हती. घरातले सगळे लोक संघाच्या किंवा समितीच्या कामात असलेले होते. संघकार्य म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही पुस्तकात कदाचित लिहिलेले आढळणार नाही. सगळ्याचे डॉक्युमेंटेशन झाले असण्याची शक्यता नाही. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या घरातील महिलांनी स्वकर्तृत्वाने देऊन ठेवलेली आहेत. संघ वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. भानूआजी त्याचे प्रतीक होत्या. मी त्यांना जे पाहिले ते त्यांचा अगदी शांत स्वभाव. नातेसंबंधांमुळे मला त्यांचा आशीर्वाद मिळाला, ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे.
 
 
भानूआजींचे जीवन समर्पित होते. संसार करता करता देशभावना जागृत ठेवण्याचे काम ज्या महिलांनी सातत्याने केले, त्याचे त्या प्रतीक होत्या. आज त्यांच्या जाण्याने अशा महिलांमधली शेवटची कडी निसटली आहे.
 
 
अशा जीवनाचे मूल्यमापन कोणत्या निकषावर करायचे? तात्यासाहेब शिरवाडकरांच्या शब्दात सांगायचे झाले, तर
 
अतर्क्य असला तरीही जेव्हा ओतून घेतो जमिनीवरती।
 
 
समर्पणातून एक कळे की निरर्थकातील यात्रा नव्हती।
 
Powered By Sangraha 9.0