पृथ्वीवरील खंडांचे पुनश्च विभाजन

विवेक मराठी    08-Jul-2023
Total Views |

vivek
’जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधन पत्रिकेतील अहवालानुसार आफ्रिका खंडामध्ये असलेली खचदरी रुंदावून आफ्रिका खंडाचे आता दोन तुकडे होण्यास सुरुवात झाली असून, त्यातून आजपासून एक कोटी वर्षांनंतर आणखी एका नवीन महासागराचा व खंडाचा जन्म होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. पुढील काळातील भूगोल बदलण्याची शक्यता यानिमित्त वर्तवण्यात आली आहे.
पृथ्वीच्या भूगर्भात विविध कारणांमुळे होणार्‍या असंख्य हालचालींचे परिणाम आता जगभरात स्पष्टपणे दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. हे परिणाम खूप गंभीर असून भविष्यात जगाचा भूगोलच त्यामुळे बदलण्याची शक्यता निर्माण होत आहे.
 
 
’जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या संशोधन पत्रिकेतील अलीकडच्या अहवालानुसार आफ्रिका खंडामध्ये असलेली खचदरी रुंदावून आफ्रिका खंडाचे आता दोन तुकडे होण्यास सुरुवात झाली असून, त्यातून आजपासून एक कोटी वर्षांनंतर आणखी एका नवीन महासागराचा व खंडाचा जन्म होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. यामुळे अरेबियन भूतबक युरेशियन तबकाला धडक मारील आणि पर्शियन आखातात जमीन उंचावेल व हिमालय थोडा आणखी उत्तरेला सरकेल आणि हिंदी महासागरांत नवीन बेटे निर्माण होतील, असाही कयास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे!
 
 
20 ते 30 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अखिलभूमी (पँजिया - Pangea) हा एकच अतिविशाल महाखंड (Supercontinent) होता. साडेसतरा ते 20 कोटी वर्षांपूर्वी लॉरेशिया आणि गोंडवनभूमी अशा दोन महाखंडांत त्याचे विभाजन झाले. त्या वेळी अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका हे खंड गोंडवनभूमी या एकाच खंडाचे भाग होते. पृथ्वीच्या अंतरंगातील प्रक्रियांमुळे 18 कोटी वर्षांपूर्वी गोंडवनभूमीच्या पश्चिम भागातील आफ्रिका व दक्षिण अमेरिका हे खंड पूर्व भागातील भारत, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या खंडांपासून वेगळे झाले. त्यानंतर 14 कोटी वर्षांपूर्वी अशाच एका घटनेत भारत आफ्रिका खंडापासून वेगळा झाला, 5 कोटी वर्षांपूर्वी आशिया खंडाला धडकला आणि त्यातून हिमालयाच्या पर्वतरांगा अस्तित्वात आल्या.
 
 पार्श्वभूमीवर भूगर्भशास्त्रज्ञांना आफ्रिका खंडाचे तुकडे होण्याची चिंता सतावू लागली आहे.
 आता इतक्या वर्षांनंतर काही महिन्यांपूर्वी आफ्रिका खंडामध्ये मोठी भेग पडली. त्याकडे त्या वेळी कोणी फारसे लक्ष दिले नाही. मात्र, या भेगेचा आकार वाढू लागल्याने भूगर्भशास्त्रज्ञांनी त्यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मार्च 2023मध्ये या भेगेविषयी सर्वप्रथम माहिती कळली, तेव्हा तिची लांबी 56 किलोमीटर होती. मात्र जूनपर्यंत तिचा आकार आणखी वाढत गेला. या पार्श्वभूमीवर भूगर्भशास्त्रज्ञांना आफ्रिका खंडाचे तुकडे होण्याची चिंता सतावू लागली आहे. हा प्रकार वाचायला जितका सोपा वाटतो, तितका तो प्रत्यक्षात येण्यास पृथ्वीच्या कवचावर अवघड प्रक्रिया पार पडावी लागते. पृथ्वीच्या गर्भातील लाव्हारस जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आतल्या बाजूने स्वत:चा दाब निर्माण करतो, तेव्हा वरील बाजूने पृष्ठभागाला भेग पडण्यास सुरुवात होते. हे काही वर्षांमध्ये घडून येत नाही, त्यासाठी अनेक कोटी वर्षे जावी लागतात.
 
 
 
 
 
आत्ताची ही घटना पूर्व आफ्रिकेच्या खचदरीच्या मार्गात घडते आहे. पूर्व आफ्रिकेतील (ईस्ट आफ्रिकन रिफ्ट सिस्टिम EARS ) हे जगाच्या भौगोलिक आश्चर्यांपैकी एक आहे, जिथे पृथ्वीच्या भूप्रक्षोभक ( Tectonic ) शक्ती सध्या जुन्या भूतबकांचे (Plates चे) विभाजन करून नवीन भूतबके तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही भेग का व कशी वाढण्याची शक्यता आहे हे कळण्यासाठी खचदरी म्हणजे काय हे समजणे गरजेचे आहे.
 
 भूपृष्ठ खचणे ही पृथ्वीवरील एक महत्त्वाची घटना आहे. यामुळे खचदर्‍या निर्माण होतात.
 
पृथ्वी निर्माण झाल्यावर पृथ्वीचे कवच कधीही स्थिर राहिलेले नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ताण आणि दाब तसेच खचणे व उंचावणे अशा क्रियांनी ते सदैव अस्थिर राहिले आहे. भूपृष्ठ खचणे ही पृथ्वीवरील एक महत्त्वाची घटना आहे. यामुळे खचदर्‍या निर्माण होतात. भूकवचावर ताण निर्माण करणार्‍या हालचालींमुळे जमिनीला भेगा पडतात आणि त्यांच्या अनुषंगाने जमीन खचते. असा खचलेला, खोलगट भाग म्हणजेच खचदरी किंवा रिफ्ट व्हॅली. सोप्या भाषेत, खचदरी (Rift) म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भूभ्रंश (Fracture) किंवा भेग, जी कालांतराने रुंद व खोल होते.
 
 
 
रिफ्ट व्हॅली ही भूपृष्ठ खचण्याच्या क्रियेमुळे निर्माण होणारी अनेक उंच प्रदेशात किंवा पर्वतरांगांत आढळणारी लांबट आकाराची खोलगट रचना असते. हे खड्डे कालांतराने झिजेमुळे आणखी खोल होतात. साधारणपणे खचदर्‍या त्यांच्या दोन्ही बाजूंकडून आणि आसपासच्या भागांतून वाहत येणार्‍या गाळाच्या साठ्यांनी भरून जाण्याची शक्यता असते. अनेक खचदर्‍यांत सरोवरे तयार होतात, त्यांना रिफ्ट लेक असे म्हटले जाते. पृथ्वीवर, समुद्राच्या तळापासून पठारांपर्यंत आणि महाद्वीपीय कवचातील पर्वतरांगांमध्ये किंवा महासागरी कवचांमध्ये सर्व उंचीवर खचदर्‍या आढळतात. मुख्य खचदरीच्या आजूबाजूला अनेक लहान खचदर्‍या तयार होतात. भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या त्या मुख्य खचदरीचाच भाग मानल्या जातात.जगातील खचदर्‍यांच्या सर्वोत्कृष्ट उदाहरणांपैकी एक म्हणजे पूर्व आफ्रिकेतील खचदरी.
 

vivek 
 खचदरी ( सौजन्य : https://marathivishwakosh.org/)
 
जगातील अनेक मोठी सरोवरे खचदर्‍यांमध्ये असल्याचे दिसून येते. सैबेरियातील बैकल सरोवर सक्रिय (Active) रिफ्ट व्हॅलीमध्ये आहे. बैकल हे जगातील सर्वात खोल सरोवर आहे आणि पृथ्वीवरील सर्व गोङ पाण्यापैकी 20% पाणी या सरोवरात आहे. सक्रिय पूर्व आफ्रिकन रिफ्टच्या सर्वात पश्चिमेकडील भागात टांगानिका हे सरोवर अल्बर्टाइन रिफ्टमध्ये आहे, उत्तर अमेरिकेतील सुपीरियर लेक क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर, प्राचीन आणि सुप्त रिफ्टमध्ये आहे. आइसलँडचे सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर हेदेखील एका खचदरीतील तलावाचेच उदाहरण आहे. नर्मदा आणि तापी या भारतातील प्रमुख नद्या खचदरीतून वाहतात. ईस्ट आफ्रिकन रिफ्ट, बैकल रिफ्ट व्हॅली, वेस्ट अंटार्क्टिक रिफ्ट आणि रिओ ग्रांडे रिफ्ट अशी खचदर्‍यांची अनेक उदाहरणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळून येतात.
 
 
 
खचदरी, भूभ्रंश क्रियेने नेमकी कशी तयार होते याबद्दल भूगर्भशास्त्रज्ञात एकमत नाही. ही प्रक्रिया पूर्व आफ्रिकेत, इथिओपिया-केनिया-युगांडा-टांझानिया या भागात अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त झाली आहे. नवीन तयार होत असलेल्या व न्युबियन प्लेट या आफ्रिकेचा मोठा भाग असलेल्या भूतबकापासून दूर खेचत असलेल्या छोट्या प्लेटला भूवैज्ञानिकांकडून ‘सोमालियन भूतबक‘ असे नाव दिले गेले आहे. या दोन प्लेट्स एकमेकांपासून दूर जात आहेत आणि उत्तरेकडे अरबी भूतबकापासूनही दूर जात आहेत.
 
 
पूर्व आफ्रिकेतील भूपृष्ठ खचण्याची क्रिया केवळ आफ्रिकेच्या भूशिरापर्यंत मर्यादित नाही. केनिया, टांझानिया आणि आफ्रिकेतील ग्रेट लेक्स प्रदेशातही ही क्रिया दिसून येते. न्यान्झा रिफ्टसारख्या अनेक खोल संरचना मुख्य खचदरीशी जोडलेल्या आहेत. अशा प्रकारे पूर्व आफ्रिकेतील ही खचदरी अनेक छोट्या-मोठ्या खचदर्‍यांची मालिका आहे, जिने पूर्व आफ्रिकेचा विशिष्ट भूप्रदेश निर्माण केला आहे. इथिओपियाच्या अफार प्रदेशात खचदरीच्या दोन शाखा लाल समुद्राच्या आणि एडनच्या आखाताच्या दिशेने, तर तिसरी इथिओपियामार्गे दक्षिणेकडे जाते.
 
 
ह्या 6400 कि.मी. लांबीच्या संपूर्ण खचदरीच्या भूभ्रंश रेषेच्या बाजूने अस्तित्वात असलेल्या लहान खचदर्‍या माउंट केनिया आणि किलिमांजारो यासारख्या पर्वतीय आणि सक्रिय ज्वालामुखींच्या सीमेवर आहेत. या भूगर्भीय खचदरीत गरम पाण्याचे झरे आणि फवारेदेखील आहेत. खचदरीच्या काठावर 2700 मीटर उंचीचे तीव्र उताराचे कडे (Escarpments) आहेत.
 
 
 
भूगर्भशास्त्रज्ञांनी आफ्रिकन रिफ्ट व्हॅली कशी तयार झाली यासाठी पुढील कालगणना मांडली आहे- त्यांनी दावा केला आहे की पश्चिमेकडची रिफ्ट व्हॅली पूर्व रिफ्ट व्हॅलीइतकीच, म्हणजे सुमारे 2.5 कोटी वर्षांपूर्वी तयार झाली. पूर्वी भूगर्भशास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की पश्चिम शाखा पूर्व खचदरीपेक्षा 1.4 कोटी वर्षे नवीन आहे. शोधाचा अर्थ असा आहे की प्राचीन मानव आणि मानवांची उत्क्रांतीदेखील त्याआधीच झाली असावी.
 
 
रुकवा नावाची लहान खचदरी पश्चिम शाखेत आहे. या दरीत 2.5 कोटी वर्षे जुने तलावातील आणि नदीतील गाळाचे साठे आहेत आणि त्यात ज्वालामुखीची राख आणि पृष्ठवंशीय जीवाश्मही आहेत. त्या जीवाश्मांमध्ये नर-वानर वंशाच्या मानवाचे ( primatesचे) अवशेष आहेत, जे ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या इतर भागातील मानवी उत्क्रांतीच्या आधीचे आहेत. शिवाय या खचदरी निर्मितीत जमीन अशा प्रकारे उंचावली, ज्यामुळे काँगो आणि नाइल नद्यांना त्यांच्या प्रवाहाची दिशा बदलण्यास भाग पाडले.
 
 
पृथ्वीच्या प्रावरण (Mantle) भागातून उष्णतेचे प्रवाह मध्य केनिया आणि उत्तर-मध्य इथिओपियाच्या अफार प्रदेशात घुमटाकार औष्णिक उंचवटे (Thermal domes) निर्माण करतात. या प्रदेशाच्या कोणत्याही स्थलाकृती नकाशावर उंच प्रदेश म्हणून हे उंचवटे सहज दिसून येतात. जसजसे हे उंचवटे तयार होतात, तसतसे ते बाहेरील ठिसूळ कवच ताणतात आणि त्यामुळे भूभ्रंश होऊन खचदरी निर्माण होते.
 
 
खचदरीच्या निर्मितीशी संबंधित भूकवच ताणण्याची प्रक्रिया अनेकदा मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या आधी घडते. हे उद्रेक भेगी स्वरूपाचे ’पूर बेसाल्ट’ (Flood basalt) असतात. उद्रेकातून बाहेर पडलेले पदार्थ खचदरीच्या दोन्ही बाजूंवर उघडे पडलेले दिसतात. अशा उद्रेकामुळे भारतातील दख्खन पठाराप्रमाणे जमिनीचा मोठा भाग व्यापला जातो. जर कवचाचे ताणणे चालूच राहिले, तर ते पातळ कवचाचा ताणलेला प्रदेश बनवते. अधिक ताणण्यामुळे कवच समुद्रसपाटीच्याही खाली खचते आणि लाल समुद्राच्या आणि एडनच्या आखातात निर्माण झालेल्या खचलेल्या भागाप्रमाणे नवीन खोर्‍याचा जन्म होतो.
 
 
पूर्व आफ्रिकेतील ही खचदरी क्लिष्ट असण्याचे आणखी एक कारण म्हणजे पश्चिमेला असलेली पाण्याने भरलेली तिची आफ्रिकन ग्रेट लेक्स ही शाखा आणि आणि दुसरी जवळजवळ समांतर अशी सुमारे 600 किलोमीटर लांबीची टांझानियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी केनियाचे उत्तर-दक्षिण भाग करीत जाणारी पूर्वेकडची शाखा. या दोन शाखांमध्ये व्हिक्टोरिया सरोवर आहे. असे मानले जाते की या शाखा प्राचीन भूखंडातील अब्जावधी वर्षांपूर्वी झालेल्या टकरीतून तयार झालेल्या भेगातून जातात. व्हिक्टोरिया सरोवराभोवतीचे विभाजन एका प्राचीन रूपांतरित खडकाच्या लहानशा गाभ्यामुळे झाले.
 
 
 
जरी पूर्व आणि पश्चिम शाखा एकाच प्रक्रियेद्वारे विकसित झाल्या असल्या, तरीही त्यांच्यात खूप भिन्नता आहे. पूर्वेकडील शाखा मोठ्या ज्वालामुखी क्रियांनी बनली आहे, तर पश्चिम शाखा अनेक मोठे तलाव आणि भरपूर गाळ यांनी बनलेली आहे.
 
 
अलीकडेच इथिओपियन खचदरीत बेसाल्टचे उद्रेक आणि सक्रिय भेगानिर्मिती दिसून आली आहे. जगाच्या इतर भागांतील बहुतेक खचदर्‍या आता पाण्याखाली आहेत किंवा गाळांनी भरलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा थेट अभ्यास करणे कठीण आहे. तथापि, पूर्व आफ्रिकन रिफ्ट प्रणाली ही सक्रियपणे विकसित होत असलेल्या रिफ्ट प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी एक उत्कृष्ट क्षेत्रीय प्रयोगशाळा आहे.
 
 
 
मानवी उत्क्रांतीची मुळे समजून घेण्यासाठीही हा प्रदेश महत्त्वाचा आहे. या खचदरीत अनेक होमिनिड जीवाश्म आढळतात. या खचदरीची रचना आणि उत्क्रांती यांनी ही खचदरी पूर्व आफ्रिकेतील हवामानातील बदलांबद्दल अधिक संवेदनशील बनवली आहे. यामुळेच या भागात ओल्या आणि कोरड्या हवामान कालावधीत अनेक बदल झाले. या बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना आपले पूर्वज अधिक विवेकी आणि हुशार बनले, असे वैज्ञानिकांना वाटते.
 
 
 
ईस्ट आफ्रिकन रिफ्ट ही खचदर्‍यांच्या रचनेची एक क्लिष्ट प्रणाली आहे. यामुळे भूखंड कसे तुटतात हे समजण्यास मदत होते. खचदरीच्या नैसर्गिक प्रणाली एकमेकांत कशा पद्धतीने गुंफल्या जाऊ शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या अनोख्या भूवैज्ञानिक रचनेमुळे स्थानिक हवामान बदलले असावे आणि त्याचा मानवी उत्क्रांतीवर मोठा परिणाम झाला असावा. ग्रँड कॅनियनप्रमाणेच पूर्व आफ्रिकन रिफ्ट कोणत्याही भूवैज्ञानिकासाठी भूगर्भीय चमत्कारांच्या यादीमध्ये सर्वाधिक महत्त्वाची असावी!
बहुतेक मानववंशशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पूर्व आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीने मानवी उत्क्रांतीत मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. मोझांबिक ते इथिओपियापर्यंत नऊ राष्ट्रांमध्ये पसरलेले जीवाश्म आणि पुराजीवशास्त्रीय हत्यारे यांच्या अनेक प्रमुख शोधांचे हे ठिकाण आहे. मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे, कारण त्यासाठी लागणारे योग्य प्रकारचे खडक सर्व येथे आहेत.
 
 
तांबड्या समुद्रापासून मोझाम्बिकपर्यंत 3500 किलोमीटरचे नदीखोर्‍यांचे मोठे जाळे आहे. मात्र, लंडनच्या जिऑलॉजिकल सोसायटीच्या मते आता या भागात भेगेमुळे मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सोसायटीच्या मते पूर्व आफ्रिका खंडात तयार झालेल्या या भेगेमुळे नव्या महासागराची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खरोखरच आफ्रिका खंडाचे दोन भागांत विभाजन होणार का? विभाजन झालेच, तर ते कधी होणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
 
 
 
अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांकडून भूतबकांचा (Tectonic platesचा) पुनश्च अभ्यास करण्यात येत आहे. जर्नल जिओफिजिकलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, आफ्रिका खंडासह जगाचीही दोन भागांत विभागणी होण्याची शक्यता आहे. एखादे भूतबक (टेक्टॉनिक प्लेट) तुटण्याची प्रक्रिया सुरू झाली की तिला खचदरी निर्मितीकरण (Rifting) असे म्हणतात. या प्रक्रियेत जमिनीच्या वरच्या भागापासून भेगा पडायला सुरू होऊन त्या समुद्राच्या तळाशी जाऊन रिकाम्या जागेत समुद्र तयार होतो. याआधीही खंड विभागणीची प्रक्रिया घडली आहे. सुमारे 13 कोटी वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे दोन खंड वेगळे झाले. या घटनेचाच परिणाम म्हणून तांबडा समुद्र आणि एडनचे आखात तयार झाले. भविष्यातील आफ्रिका खंडाच्या विभाजनाचा संबंध पूर्व आफ्रिकेच्या खचदरीशी आहे. वर नमूद केल्याप्रमाणे आता तेथे 56 किलोमीटर अंतराची भेग पडली असून, ती दिवसेंदिवस वाढतेच आहे.
 
 
 
सध्या आफ्रिका खंडात असे सहा देश आहेत, जे चारही बाजूंनी जमिनीने वेढले आहेत. मात्र, या खंड विभागीकरणानंतर या सहा देशांना सागरी किनारा मिळणार आहे. या देशांमध्ये रवांडा, युगांडा, काँगो, बुरुंडी, मालावी आणि झांबिया यांचा समावेश आहे. याशिवाय केनिया, टांझानिया आणि इथिओपियामध्ये प्रत्येकी दोन नवीन प्रदेशांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2018मध्ये केनियाची राजधानी नैरोबीपासून सुमारे 142 किलोमीटर अंतरावरील नारोक या लहानशा गावातही अशीच मोठी भेग दिसून आली होती. मुसळधार पावसानंतरही येथील भेग वाढतच होती.
 
 
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते जमिनीच्या आतील हालचालींमुळे अशा भेगा निर्माण होत आहेत. आफ्रिकेच्या भौगोलिक स्थितीचा विचार केल्यास असे दिसते की उत्तर दिशेकडे हालचाली होण्याचा वेग कमी आहे. कारण येथे पृथ्वीचा पृष्ठभाग मजबूत आहे. आपण दक्षिणेकडे गेलो, तर असे दिसते की जमीन ज्वालामुखीच्या मुखावर असून मुख्य भूमीपासून तुकडा पडण्याची प्रक्रिया इथे जवळपास पूर्ण होण्याच्या बेतात आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की समुद्राचे पाणी या भेगेत भरण्यास सुरुवात होईल. जशी जागा मिळेल तसे हे पाणी उत्तरेकडे सरकू लागेल. पाण्याने जमीन वेढली जाऊ लागताच पूर्ण तुकडा वेगळा होईल आणि तो तुकडा मुख्य भूमीपासून दूर जाऊ लागेल. काही कालावधीनंतर तो मादागास्कर देशाला जाऊन मिळेल.
 
 
 
या संपूर्ण घटनेला कोट्यवधी वर्षे लागणार आहेत. ही प्रक्रिया फारच मंद गतीने होणार असून, जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बघायला आपण या जगात नसू. आपल्या पुढील कित्येक पिढ्यांनंतर जेव्हा जगाचा भूगोल शिकवला जाईल, तेव्हा त्यांना अभ्यासात पृथ्वीवर आठ खंड आहेत असे शिकवले जाईल, हे मात्र निश्चित!