‘राष्ट्रीय शीख संगत’ सर्वपंथसमभावाचे तत्त्व

11 Aug 2023 12:16:06
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून समाजघडणीसाठी अनेक दिशांनी कार्यरत असलेली देशव्यापी संघटना आहे. समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक अशा अनेक राष्ट्रीय विषयांमध्ये संघ वा संघपरिवारातल्या संस्था/संघटना काम करत आहेत. ‘राष्ट्र देवो भव’ हाच भाव, ‘हम रहे या ना रहे, यह देश रहना चाहिए’ हीच भावना या सर्व कामांचा मूलाधार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने यातील काही कामांचा परिचय करून देत आहोत. ही कामे म्हणजे निरलस वृत्तीने राष्ट्रदेवतेला अर्पण केलेल्या समिधा आहेत...


Sikh Sangat
1984मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मुळे शिखांमध्ये असंतोष पसरला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या प्रक्षोभक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ‘राष्ट्रीय सिख संगत’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. श्री गुरू ग्रंथ साहिबजींमधील शिकवणींवर आधारित समाज व कुटुंबव्यवस्था उभारण्याचा राष्ट्रीय सिख संगतचा मानस आहे. एक राष्ट्र म्हणून भारताचे सबलीकरण आणि स्वाभिमान कायम ठेवण्यात योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. सर्वपंथसमभाव हे या संघटनेचे तत्त्व आहे आणि याच मूल्यांचा देशभर प्रसार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Sikh Sangat
राजन खन्ना
। 9004000616



शिखांचा इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये तज्ज्ञ असलेल्या भारतातील विविध भागांमधील 160 विचारवंतांच्या विचारविनिमयानंतर 1986मध्ये ‘राष्ट्रीय सिख संगत’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. 1984मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मुळे शिखांमध्ये असंतोष पसरला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या प्रक्षोभक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून या संघटनेची स्थापना करण्यात आली. या सगळ्या घटनांची परिणती म्हणून शिखांचे एकांगी हत्यासत्र सुरू झाले आणि 3000हून अधिक मृत्यू झाले. या सगळ्या परिस्थितीमुळे द्वेषाचे आणि अविश्वासाचे वातावरण तयार झाले.
 
 
सरदार शमशेर सिंग हे या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आणि त्यानंतर सरदार गुरचरण सिंग गिल यांनी या संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपल्या उत्तम संघटनकौशल्याने या संघटनेला मार्गदर्शन केले. गेली अनेक दशके सरदार चिरंजीव सिंग हे या संघटनेचे संरक्षक आहेत. अविनाश जैस्वाल संघटनात्मक सचिव आहेत आणि त्यांच्या हाती राष्ट्रीय सिख संगतची धुरा आहे.
कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि योगदानामुळे 2010नंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकाजवळ ‘संगत भवन’ बांधण्यात आले. या ठिकाणी शिखांचा इतिहास व गुरुपर्व यांच्याशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शीख तत्त्वज्ञान व इतिहास यांच्याशी संबंधित वाचनालय या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. या विषयांशी संबंधित अगणित पुस्तकांचा खजिना या ठिकाणी आहे.
 
 
हिंदू आणि शीख धर्मांच्या तत्त्वांमध्ये तसूभरही फरक नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सनातन हिंदू परंपरा हा विविध पंथांचा व संप्रदायांचा संच म्हणता येईल. या परंपेनुसार परमात्मा हा साकार-सगुण, निराकार-निर्गुण आणि निराकार-सगुण अशा विविध स्वरूपांमध्ये असतो, तसा शीख तत्त्वज्ञानानुसार तो निराकार असतो अशी श्रद्धा आहे. शंकराचार्यांच्या अद्वैतवादाशी शिखांची विचारसरणी सुसंगत आहे. म्हणूनच श्री गुरू ग्रंथ साहिब आणि दहा आदरणीय सिख गुरूंचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय सिख संगत हे काम अत्यंत विश्वासाने पार पाडत आहे आणि यासाठी त्यांच्या आदेशानुसार संपूर्ण ऊर्जेसह हे प्रयत्न करण्यात येत आहेत.
 

Sikh Sangat 
 
राष्ट्रीय सिख संगतच्या हेतूंचा सारांश खालीलप्रमाणे -
श्री गुरू ग्रंथ साहिबजीच्या शिकवणीवर आधारित जीवनशैली (कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय) तयार करणे

देशातील सर्व स्तरांमध्ये गुरुबानीचा (शीख गुरूंच्या शिकवणीचा) प्रसार करणे

सरबत का भला (सर्वांचे कल्याण) या वृत्तीने सेवा देणे

हिंदू-शीख एकीला, सुसंवादाला आणि बंधुतेला चालना देणे.

भारतीय संस्कृती, ऋषी, महर्षी, गुरू यांचा आणि श्री गुरू ग्रंथ साहिबमध्ये नमूद केलेल्या महान व्यक्तिमत्त्वांचा आदर करणे.

श्री गुरू नानक देवजींनी घोषित केलेल्या तत्त्वांच्या आधारे राष्ट्रीय भावना आणि एकात्मता स्थापित करण्याचा प्रयत्न करणे.

देशभरात राष्ट्रवादी शीख समाजासाठी आदर निर्माण करणे.

शीख गुरूंच्या उच्च आदर्शांची पूर्तता करून त्यांचा संदेश पसरवणे आणि शीख गुरूंच्या व इतर शीख व्यक्तिमत्त्वांच्या हौतात्म्याचे स्मरण ठेवणे.
8. शीख धर्माच्या अस्तित्वावर आणि देशाच्या एकतेवर व एकात्मतेवर परिणाम करणार्‍या मुद्द्यांसंदर्भात खंबीर भूमिका घेणे.

शीख पंथ ही दश-गुरू परंपरा आहे; गुरू नानक देवजींपासून ते गुरू गोविंद सिंगांपर्यंत शीख पंथांत एकूण 10 गुरू आहेत.


Sikh Sangat

 त्यांच्या जयंतीचे दिवस गुरुपूरब म्हणून साजरे करण्यात येतात. पाचवे गुरू अर्जन देव आणि नववे गुरू तेघ बहादुर यांच्या हौतात्म्याचे दिवस शहिदी पूरब म्हणून पाळण्यात येतात. या दिवसांव्यतिरिक्त जेव्हा गुरू गादीवर (सिंहासन) बसले, तो दिवसही अनेक गुरुद्वारांमध्ये कीर्तन दरबार आयोजित करून साजरा करण्यात येतो.
शिखांच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना साजर्‍या करण्यासाठी राष्ट्रीय सिख संगततर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. स्रोत इतरांसह वाटून घेणे ही लंगरची संकल्पना आहे. पहिले गुरू नानक देवजी यांनी ही परंपरा सुरू केली. पुढे तिसरे गुरू अमर दासजी यांनी लंगर या संकल्पनेला संस्थात्मक रूप दिले. समाजातील सर्व जातींचे आणि सर्व स्तरांमधील लोक एकत्र बसून लंगरमध्ये (सामुदायिक स्वयंपाकघर) जेवतील, यावर त्यांनी भर दिला. या परंपरेला संगत-पंगत म्हणतात. सामाजिक समरसतेसाठी शीख गुरूंनी राबविलेला हा उत्तम उपक्रम होता. राष्ट्रीय सिख संगतला लंगरची ही वृत्ती सामाजिक पातळीवर स्थापित करायची आहे. याव्यतिरिक्त संत रविदास, संत नामदेव यांच्यासारख्या प्रख्यात समाजसुधारकांचे संदेश, शिकवणी, ज्या गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत, त्यांचा उत्साहाने प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.
हे हेतू साध्य करण्यासाठी राष्ट्रीय सिख संगत सक्रियपणे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवत आहे. यातील उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे या संघटनेतर्फे श्री पटना साहिब ते श्री आनंदपूर साहिबदरम्यान ऐतिहासिक ’खालसा श्रीजन यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. पंजाबातील आणि भारतातील अनेक धार्मिक स्थळांकडून व गुरुद्वारांकडून या यात्रेचे स्वागत करण्यात आले आणि यातून सदिच्छा आणि विश्वासाचे वातावरण तयार होण्याला चालना मिळाली.


Sikh Sangat 
याव्यतिरिक्त गुरुद्वारांद्वारे राबविण्यात येणारे उपक्रम आणि विविध भागांमध्ये शीख तत्त्वांचा प्रसार करण्यात या संघटनेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. श्री गुरू ग्रंथ साहिबचा 400वा वर्धापनदिन आणि गुरू ग्रंथ साहिबचे 300व्या गुरता गद्दी वर्षाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमांचे आणि अनेक सत्रांचे व प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
राष्ट्रीय सिख संगततर्फे वैद्यकीय शिबिरे, लंगर असे अनेक मानवतावादी उपक्रम राबविण्यात आले. विविध समुदायांतील हजारो लोकांना या उपक्रमांचा लाभ झाला. श्री गुरू ग्रंथ साहिबच्या 300व्या गुरता गद्दी वर्षाच्या निमित्ताने 2008मध्ये नांदेड येथे ’भाई लालो जी’ या लंगरचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनामध्ये सिख संगतचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होते, शेकडो जणांनी आर्थिक मदत केली आणि या भव्य लंगरमधून हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
त्याचप्रमाणे, राष्ट्रीय सिख संगतने अनेक संप्रदायांशी, संतांशी आणि समाजातील मागासवर्गाशी आध्यात्मिक व सहकारी संपर्क स्थापित केला आहे. शीख तत्त्वज्ञानात जात मानत नाहीत, सामाजिक समरसतेसाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात आले. शीख समाजातील शिकलगार व बंजारा समुदायांशी नियमितपणे संपर्क स्थापित करण्यात आला आणि कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.


vivek

शिखांच्या इतिहासात असंख्य व्यक्तींनी केलेल्या त्यागाचे दाखले मिळतात. ज्या व्यक्तींनी इस्लाममध्ये धर्मांतर करणारी जिहादी मागणी मान्य न करता मृत्यू पत्करला, अशा महान व्यक्तींच्या चित्रांचे प्रदर्शन राष्ट्रीय सिख संगतने तयार केले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आणि धर्मरक्षणासाठी आपल्या पूर्वजांनी केलेल्या महान त्यागाची माहिती बहुजनांना देण्यात या प्रदर्शनाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. बलिदानाच्या या चित्ररूपी प्रदर्शनाचा तरुणांवर खूप प्रभाव पडला.
आतापर्यंत या संघटनेला राजकीय नेते, संत आणि सामाजिक कार्यकर्त्यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचे साहाय्य आणि आशीर्वाद लाभले आहेत. राष्ट्रीय सिख संगतने राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेली अधिवेशनांसाठी व कार्यक्रमांसाठी ते उपस्थित राहिले आहेत आणि एकता, सहअस्तित्वाची भावना आणि आदर यांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी या संघटनेतर्फे करण्यात येणार्‍या प्रयत्नांना त्यांनी पाठबळ दिले आहे.
सर्व महत्त्वाच्या शीख कार्यक्रमांना राष्ट्रवादाची झालर असते, म्हणून राष्ट्रीय सिख संगत हे सर्व कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरे करते. श्री गुरू ग्रंथ साहिबचे पहिले संकलन 1604मध्ये करण्यात आले; 400वे वर्ष 2004मध्ये साजरे करण्यात आले. या सोहळ्यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 1708मध्ये गुरू गोविंद सिंगजी यांनी ग्रंथ साहिबला गुरूचा दर्जा दिला होता. गुरता गद्दीचे 300वे वर्ष संगततर्फे भारतभर अत्यंत भक्तिभावाने साजरे करण्यात आले.
श्री गुरू गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीच्या निमित्ताने विविध ठिकाणी कीर्तन दरबारांचे आयोजन करण्यात आले होते. किंबहुना, अनेक राज्यांमधील राज्यपालांनी संबंधित राजभवनांमध्ये कीर्तन आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि या उपक्रमासाठी संगतने पुढाकार घेतला होता.
अलीकडील काळात, या संघटनेतर्फे श्री गुरू नानक देवजी यांचे 550वे प्रकाश पर्व आयोजित करण्यात आले होते. गुरुजींच्या मानवतेच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी अनेक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. आयजीएनसीए आणि संगत यांनी संयुक्तपणे श्री गुरू नानक देवजींच्या संदेशांचा प्रसार करणारी कविसंमेलने आयोजित केली होती. संगतच्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरुजींवरील पुस्तके लिहिली आणि आयजीएनसीएने ती प्रकाशित केली.
शीख पंथाचे नववे गुरू श्री गुरू तेघ बहादुर, त्यांचे अनुयायी भाई सती दास, भाई मती दास आणि भाई दयाल यांनी धर्मरक्षणासाठी त्यांच्या प्राणांचे बलिदान दिले. 2021 हे त्यांचे जयंती वर्ष होते. या औचित्याने सिख संगततर्फे अनेक कीर्तन दरबारांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी एक कीर्तन महाराष्ट्रातील राजभवनमधील दरबार हॉलमध्येही आयोजित करण्यात आले होते.

 
श्री गुरू ग्रंथ साहिबजींमधील शिकवणींवर आधारित समाज व कुटुंबव्यवस्था उभारण्याचा राष्ट्रीय सिख संगतचा मानस आहे. यातून त्यांना शीख मूल्ये भक्कम करायची आहेत आणि सर्व धर्मांच्या सहअस्तित्वाला चालना द्यायची आहे. श्री अकाल तख्त साहिबचा सन्मान राखायचा आहे आणि एक राष्ट्र म्हणून भारताचे सबलीकरण आणि स्वाभिमान कायम ठेवण्यात योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. सर्वपंथसमभाव हे या संघटनेचे तत्त्व आहे आणि याच मूल्यांचा देशभर प्रसार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

 
गुरुबाणीने दाखविलेला मार्ग आणि ’सभै सांझीवाल सदाईण तू किसे न दीसै बाहरा जीऊ’ या त्यांच्या ब्रीदवाक्याचे खर्‍या अर्थाने पालन करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सिख संगततर्फे करण्यात येत आहे.
म्हणून सगळी मानवजात एकच आहे आणि कोणालाही ’बाहेरचे’ मानू नये.
Powered By Sangraha 9.0