खलिस्तान - काँग्रेसने रुजवलेली विषवल्ली

(भाग 2)

विवेक मराठी    11-Aug-2023   
Total Views |
@शांभवी थिटे
खलिस्तान कॉन्स्पिरसी हे पुस्तक सामान्य जनतेपासून आजवर दडवल्या गेलेल्या सत्यावर अवलंबून आहे. गुप्तचर अधिकारी म्हणून खलिस्तान विषयात असलेला लेखकांचा अनुभव ह्या पुस्तकाचे प्रत्येक पान वाचनीय करतो.
काँग्रेसच्या हीन राजकारणामुळे आधीच औद्योगिक बाबतीत पिछाडीवर असलेला पंजाब आता आणखीनच मागे पडल्याचे दिसत आहे. युवा वर्ग एकतर देश सोडून बाहेर जाऊन स्थायिक होण्याच्या मार्गावर आहे आणि परिस्थितीशी लढू न शकणारे अमली पदार्थांच्या काळ्या गर्तेत खोल बुडाले आहेत.

vivek
 
मागील भागात आपण ‘खलिस्तान कॉन्स्पिरसी’ या जीबीएस सिद्धू यांच्या पुस्तकातील ऑपरेशन ब्लू स्टारच्या आधीच्या राजकीय परिस्थितीचा वेध घेतला. खलिस्तानी चळवळीच्या राजकीय अंतरंंंंगांवर भाष्य करताना हे पुस्तक वाचकांच्या मनात अनेक प्रश्नदेखील निर्माण करते. ऑपरेशन-2बद्दल माहिती देताना लेखक सर्वप्रथम कॅनडात आणि अमेरिकेत राहणार्‍या शिखांच्या बदलत्या राजकीय मानसिकतेवर प्रकाश टाकतात. इंदिरा गांधींच्या 1983च्या न्यूयॉर्क दौर्‍यानंतर काही दिवसांतच 5 ऑक्टोबरच्या रात्री बसमधून प्रवास करणार्‍या सहा हिंदूंची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे काँग्रेसचे मुख्यमंत्री दरबारा सिंग यांचे सरकार बरखास्त करून पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. साहजिकच पंजाबमधील घडामोडींचा अमेरिका आणि कॅनडामधील भारतीय स्थलांतरितांवरही गंभीर परिणाम झाला. लेखकांच्या मते, अमेरिका आणि कॅनडातील गुरुद्वारा हे कट्टर शिखांच्या नियंत्रणाखाली येत होते. परदेशात हिंदू आणि शीख यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्यात भारतीय संस्था कमी पडत होत्या. कॅनडात आणि अमेरिकेत स्थलांतर केलेल्या लेखकांच्या आप्त-परिचितांच्या मते राजकीय फायद्यासाठी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून भिंद्रनवाले यांना प्रोत्साहन दिले जात होते आणि ह्याचमुळे कॅनडातील आणि अमेरिकेतील खलिस्तान समर्थक घटक शीख तरुणांना त्यांच्या विचारसरणीकडे सहजरित्या आकर्षित करत होते.
 
 
लेखकाने पुढे ऑपरेशन सनडाउनचे काही महत्त्वपूर्ण तपशील वाचकांसाठी दिले आहेत. ऑपरेशनसाठी हेलिबोर्न कमांडोजनादेखील सहभागी करून घेण्यात आले होते. ह्या ऑपरेशनदरम्यान जर्नेलसिंग भिंद्रनवाले याला सुवर्ण मंदिर संकुलातील गुरू नानक निवास येथून लष्करच्या मदतीने ताब्यात घेण्यात येणार होते. परंतु ऐन बैसाखीचा दिवस असल्याने नागरिकांचा घातपात टाळण्यासाठी हे ऑपरेशन शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आले. परंतु लेखक सिद्धू ह्यांच्या मते, आधीच्या तीन वर्षांत अतिशय काळजीपूर्वक जोपासलेली भिंद्रनवालेची कट्टर प्रतिमा पाहता, त्याचा अंत हा साजेसा असायला हवा होता, जेणेकरून लोकांना लक्षात येईल की भिंद्रनवाले हा किती मोठा शत्रू होता आणि त्यामुळेच शस्त्रांच्या तस्करीकडे आणि अकाल तख्तच्या तटबंदीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, जेणेकरून ’अंतिम उपाय’ करण्याची वेळ आल्यावर भिंद्रनवाले शेवटच्या समर्थकापर्यंत लढत राहील. लेखकाच्या मताचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाल्यास, ‘ऑपरेशन ब्लू स्टार हे जितक्या निर्दयीपणे नागरिकांच्या जिवाची पर्वा ना करता राबवले गेले, त्यावरून ऑपरेशन सनडाउनला नकार देण्यामागे नागरिकांच्या जिवांपेक्षा भिंद्रनवालेला मोठा राक्षस दाखवणे ही कल्पना होती.’ भिंद्रनवालेच्या अटकेने, पंजाब तापले असते. त्याचबरोबर भिंद्रनवालेचे वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी संबंधदेखील उघडपणे समोर आले असते. त्याचबरोबर निवडणुकांच्या तोंडावर पंजाबमध्ये हिंदूंची कत्तल झाली असती, ज्यामुळे काँग्रेसच्या प्रतिमेला मोठा धक्का लागला असता. साहजिकच 1, अकबर रोडवरील गटाने मिळालेली संधी हातची जाऊ दिली नाही, म्हणूनच भिंद्रनवालेचे जाणे हा 1984च्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा डाव होता.
 
 
 
खलिस्तान कॉन्स्पिरसी या पुस्तकात पुढे जीबीएस सिद्धू पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी.सी. अलेक्झांडर, वरिष्ठ सल्लागार आर.एन. काओ आणि वरिष्ठ गुप्तचर अधिकारी बी. रमण यांच्या ऑपरेशन-2मधील भूमिकांचे विश्लेषण करतात. तीन वेगवेगळ्या कार्यशैली देशाच्या सुरक्षेवर कशा पद्धतीने परिणाम करतात, याचे सिद्धूंनी या पुस्तकात विस्तृत परीक्षण केले आहे. पंतप्रधानांच्या हलगर्जीपणामुळे अकाली दलाचे वरिष्ठ नेते त्रासले होते. त्यात भर म्हणून भिंद्रनवालेच्या उपस्थितीमुळे आणि अतिरेकी कारवायांमुळे सुवर्ण मंदिर संकुलात असाहाय्य आणि गुदमरल्यासारखे वाटत होते. शस्त्रास्त्रांची आणि दारूगोळ्याची गुप्त तस्करी सुरू असे. आणि मेजर जनरल शाहबेग याच्या देखरेखीत अकाल तख्तची तटबंदी केली होती. संबंधित सुरक्षा यंत्रणेकडून ह्या सगळ्या घडामोडींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात होते. लेखकाच्या मते, ह्याच संधीचा फायदा उचलून हरचंद सिंग लोंगोवाल याने 23 मे 1984 रोजी जाहीर केले की 3 जूनपासून पंजाबमधील अन्नधान्य इतर राज्यात जाऊ देणार नाही आणि शीख कर भरणार नाहीत. त्यात अकाल तख्त संकुलात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जमा झाल्यामुळे पंजाब पोलीसांची आणि निमलष्करी दलांची असमर्थता स्पष्ट झाली आणि सैन्याचा हस्तक्षेप अपरिहार्य झाला.
 
 
vivek
 
शीख गुरू अर्जुन देव ह्यांचा हौतात्म्यदिन साजरा करण्यासाठी 3 जून 1984च्या सकाळी अमृतसर येथील कर्फ्यू काही तासांसाठी शिथिल करण्यात आला होता. ह्याचाच फायदा घेऊन सुवर्ण मंदिर परिसरातून 200 शीख कट्टरतावाद्यांनी पलायन केले होते. भिंद्रनवालेने दिलेल्या पैशांसह कट्टरतावादी मंदिर परिसरातून बाहेर पडत होते. 4 जूनला यात्रेकरूंनी सुवर्ण मंदिर परिसर सोडावा म्हणून घोषणा करण्यात आल्या. पण ह्या घोषणा लोकांपर्यंत सुस्पष्टपणे पोहोचल्याच नाहीत. त्याचबरोबर ह्या घोषणा ऐकून एकही कट्टरतावादी शरण येण्यास समोर आला नाही. त्यामुळे लष्कराने आखलेल्या योजनेचा फज्जा उडाला. बहुतांश नागरिक आतच राहिले. लष्कर आणि कट्टरतावादी यांच्यामध्ये धुमश्चक्रीस सुरुवात झाली. 7 जूनच्या सकाळी अकाल तख्तमधील तळघरातून भिंद्रनवाले, अमरिक सिंग आणि थारा सिंग यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. लेखकाने दोन दिवस सुरू असलेल्या या संघर्षाचे तपशीलवार वर्णन पुस्तकात केले आहे. मृतांचा आकडा नक्की किती? त्याचबरोबर ऑपरेशननंतर लगेचच लोकांच्या मनात असलेल्या शंका, भिंद्रनवालेच्या गावी असलेली परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचे संपूर्ण योजनेचे नैतिक मूल्य आणि जबाबदारी ह्या सगळ्याच गोष्टींचे लेखकाने केलेले वर्णन मनाला चटका लावते.
 
 
खलिस्तान -काँग्रेसने रुजवलेली विषवल्ली ( भाग 1)
@शांभवी थिटे
https://www.evivek.com/Encyc/2023/8/4/The-Khalistan-Conspiracy-book.html

 
ह्यानंतर इंदिरा गांधींची हत्या आणि त्याची आधीच असलेली कुणकुण लेखक पुस्तकात व्यक्त करतात. एका प्रसंगात तर इंदिरा गांधी ह्या स्वत: सरदार स्वर्ण सिंग ह्यांच्याशी बोलताना आज किंवा उद्या आपण शीख कट्टरतावाद्यांच्या हातून मारले जाऊ पण मुलाच्या भविष्याचे काय? ह्या प्रश्नाने चिंतित असल्याचे लेखकाने म्हटले आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीतील लूट, जाळपोळ आणि हाणामारीच्या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव लेखकाने घेतल्यामुळे पुस्तकातील अनेक प्रसंग वाचताना मन सुन्न होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेला अनुभव लिहिताना लेखक म्हणतात की, ‘हिंदूंच्या मनात शिखांबद्दल इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर कोणताही राग नव्हता.’ पुढे ते संजय गांधी आणि राजीव गांधी ह्यांच्या जवळील व्यक्तींकडून दिल्लीत जाळपोळीला आणि शीख हत्याकांडाला कशी सुरुवात झाली, हे स्पष्ट करतात. लेखकांच्या मते, शीख हत्याकांडाची पूर्वकल्पना असूनही गृहमंत्री नरसिंह राव यांनी काँग्रेस पार्टीच्या आदेशांचे केलेले पालन म्हणजे नैतिकतेची नीचतम पातळी गाठणे होते. हे लिहिताना लेखक शिखांविरुद्ध हत्याकांडास जबाबदार असलेल्या व्यक्तींच्या भूमिकांविषयी अगदी नावांसकट तपशीलवार माहिती देतात. काँग्रेसचे खासदार कमलनाथ आणि पोलीस कमिशनर कौल ह्यांच्या उपस्थितीत दिल्लीत गुरुद्वाराबाहेर जिवंत जाळण्यात आलेल्या दोन शीख बंधूंच्या मृत्यूचे लेखकांनी केलेले वर्णन माणूस म्हणून वाचकाला अस्वस्थ करते. अशी अनेक भयावह उदाहरणे लेखकांनी ह्या पुस्तकात मांडली आहेत. लेखक सिद्धू ह्यांना गुप्तचर अधिकारी असूनही बाहेर सुरू असलेल्या हाहाकारामुळे हिंदू मित्राच्या घरी आसरा घ्यावा लागला होता. लेखकांना त्यांच्या रेडिओवरून पोलीस नेटवर्कवरील घडामोडी ऐकता येत असल्यामुळे शीख हत्याकांडाच्या वेळी पोलिसांनी घेतलेल्या बघ्याची भूमिकेविषयी वाचताना मनात अस्वस्थता निर्माण होते. लेखक पुस्तकात न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आणि शीख नरसंहाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या इतर आयोगांवर त्यांच्या अकार्यक्षमतेवरून प्रचंड टीका करतात. ह्या हत्याकांडात सहभागी असलेले ज्ञात गुंड आणि खुनी अजूनही बाहेर मोकाट फिरत असल्यामुळे आणि आजही कमलनाथसारखे शिखांचे गुन्हेगार राजकीय विशेषाधिकारांचा आनंद घेत असल्यामुळे शीख समुदाय न्यायापासून लांब राहिला आहे.
 
 
12 August, 2023 | 11:27
 
पुस्तकाचा शेवट करताना लेखक सिद्धू ह्यांनी इंदिरा गांधींची हत्या आणि शीख नरसंहारानंतर घडलेल्या घटनांचे वर्णन केले आहे. ऑपरेशन-2च्या माध्यमातून नेत्यांच्या पुढाकाराने खलिस्तानचे खोटे भूत तयार करण्यात आले. 1980च्या दशकाच्या सुरवातीला 1, अकबर रोड गटाकडून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन-2चा शेवट 1984च्या भीतिदायक घटनांनी झाला. आतापर्यंत अस्तित्वात नसलेल्या मुद्द्याचा जन्म खलिस्तानच्या रूपाने झाल्यामुळे काही देशांना आणि विशेषत: पाकिस्तानला भारताविरुद्ध अजेंडा पुढे नेण्यासाठी संधी मिळाली. बनावट चकमकींच्या माध्यमातून सुरू असलेला जखमांवर मलम लावायचा कार्यक्रमदेखील सिद्धू यांनी उदाहरणांसकट पुस्तकाच्या शेवटी मांडला आहे. 1971 साली बांगला देश मुक्तिसंग्रामानंतर पाकिस्तानने त्यांची भारताच्या पूर्वेला असलेली पकड गमावली. 1, अकबर रोड गटाने पंजाबमधील शांतता भंग करून पाकिस्तानच्या हातात आयते कोलीत दिले, जी आजही भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. राजीव गांधींच्या म्हणण्यानुसार शीख हत्याकांड हे इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर लोकांच्या मनात साठलेल्या रागामुळे उफाळून बाहेर आले. परंतु अशा वक्तव्यामुळे शिखांच्या मनात हिंदू समुदायाबद्दल कायमची अढी निर्माण झाली. काँग्रेसने सत्तेच्या हव्यासापोटी हिंदू व शीख समुदायांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण केले आणि त्याला हिंदू समुदायाच्या मनातील इंदिरा गांधींबद्दलचे प्रेम असे गोंडस नाव दिले.
 
 
 
खलिस्तान कॉन्स्पिरसी हे पुस्तक सामान्य जनतेपासून आजवर दडवल्या गेलेल्या सत्यांवर आधरित आहे. लेखकांचा गुप्तचर अधिकारी म्हणून खलिस्तान विषयात असलेला अनुभव ह्या पुस्तकाचे प्रत्येक पान वाचनीय करतो. ह्या देशात इंदिरा गांधींच्या काळात झालेले नीच पातळीचे राजकारण आजही देशविरोधी कारवायांच्या मुळाशी आहे. त्या चार वर्षांतील काँग्रेसच्या हीन राजकारणामुळे आधीच औद्योगिक बाबतीत पिछाडीवर असलेला पंजाब आता आणखीनच मागे पडल्याचे दिसत आहे. युवा वर्ग एकतर देश सोडून बाहेर जाऊन स्थायिक होण्याच्या मार्गावर आहे आणि परिस्थितीशी लढू न शकणारे अमली पदार्थांच्या काळ्या गर्तेत खोल बुडाले आहेत.
 
 
 
पुस्तकाचे शेवटचे वाक्य वाचताना माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला - एक पार्टी, एक घराणे आणि एकहाती सत्ता ह्या आततायी महत्त्वाकांक्षेपायी देशाचे भवितव्य अंधारात ढकललेल्या पक्षाला पंजाबी युवा सांविधानिक मार्गाने धारेवर धरेल का? शिक्षा करेल का?

शांभवी थिटे

सध्या जेएनयू येथे आंतराष्ट्रीय संबंध या विषयात पीएचडी करत आहेत. मागील पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणावर अध्ययन करत असून मध्य आशिया हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय घडामोडी विश्लेषक म्हणून कॉर्पोरेटमध्ये अनुभव. आशियाई राजकारणा सोबतच इतिहास अभ्यासाची विशेष आवड.