कुटुंबप्रबोधन - उद्याचा भारतीय नागरिक घडविण्यासाठी

विवेक मराठी    12-Aug-2023
Total Views |
संजय कुलकर्णी
। 9766626040
 
 
kutumb prabodhanग्लोबलायझेशन, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, सोशल मीडियाचा अतिरेक, उपभोगवाद, स्वकेंद्री मानसिकता इ. गोष्टी भारतीय कुटुंबव्यवस्थेला हानी पोहोचवणार्‍या आहेत. भारतीय संस्कृतीतील आदर्श कुटुंबपद्धतीच्या विरोधात असलेल्या या बदलांच्या गतीचा वेग अधिक आहे, हे ध्यानात आल्याने संघाने ‘कुटुंबप्रबोधन’ या गतिविधीची सुरुवात केली आहे. देशाचा प्राधान्याने विचार करणारा उद्याचा भारतीय निर्माण करणे हा कुटुंबप्रबोधन गतिविधीचा उद्देश आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेत ‘संघटन श्रेणी’ आणि ‘जागरण श्रेणी’ असे कामानुसार भाग केलेले असतात. संघशाखेच्या दैनंदिन कामाला ‘संघटन श्रेणी’ असे म्हणतात आणि संघाच्या विविध क्षेत्रांतील कामाला ‘जागरण श्रेणी’ असे म्हणतात. प्रसिद्धी, प्रचार, संपर्क आणि गतिविधी असे उपविभाग जागरण श्रेणीत असतात. भविष्यात येणार्‍या समस्यांचा विचार करून, समाजातील सज्जनशक्तीच्या साहाय्याने संघाने अनेक गतिविधी सुरू केलेल्या आहेत. गतिविधीमध्ये समरसता गतिविधी, गोसेवा गतिविधी, धर्मजागरण, पर्यावरण, धर्माचार्य संपर्क, सद्भावना गतिविधी आणि कुटुंबप्रबोधन गतिविधी अशा विविध क्षेत्रांत काम केले जाते.
 
 
संघ शताब्दीकडे वाटचाल करीत असताना सर्व समाजातून सज्जनशक्तीने प्राधान्याने सामाजिक समरसता, पर्यावरण आणि कुटुंबप्रबोधन या गतिविधींचे काम करावे, असे आवाहन केलेले आहे. कुटुंबप्रबोधन गतिविधीचा शुभारंभ सन 2008मध्ये झाला.
 
 
14 August, 2023 | 12:47
 
हजारो वर्षांपासून आदर्श असलेल्या भारतीय संस्कृतीमध्ये ’कुटुंबव्यवस्थेला’ अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण सत्कृतीची वारंवारिता संस्कारात रूपांतरित होते, अशा संस्कारित व्यक्तींचा समूह संस्कृती बनवत असतो आणि संस्कार करण्याची, पर्यायाने ’सुसंस्कृत व्यक्ती’ निर्माण करण्याची 24ु7 व्यवस्था म्हणजे कुटुंब आहे. थोडक्यात सांगायचे तर, उद्याच्या भारताचा आदर्श नागरिक बनवण्याचे दायित्व कुटुंबव्यवस्थेवर आहे. ही नव्याने आलेली संकल्पना नाही, तर 2000 वर्षांपूर्वीच्या ‘थिरूकुरल’ या तमिळ ग्रंथाचे इंग्लिशमध्ये आता भाषांतर झालेले आहे, त्या ग्रंथामध्ये कुटुंबव्यवस्थेबद्दल लिहिताना ऋषी म्हणतात - The duty of parents to children is to groom them as leaders of elite assemblies. समाजाचे नेतृत्व घडवण्याची जबाबदारी कुटुंबव्यवस्थेची आहे.
 
 
भारतीय कुटुंबव्यवस्थेमध्ये वाढत्या वयात सहजगत्या संस्कार करणारी, जीवनमूल्य रुजवणारी एक अंगभूत व्यवस्था आहे; उदाहरणार्थ, एक-दीड वर्षाचे लहान बाळ चालताना केरसुणीला त्याचा पाय लागला, तर घरातील कोणीही मोठी व्यक्ती लगेच बाळाला, “केरसुणीला नमस्कार कर, ती लक्ष्मी असते” असे सांगते आणि नुसते सांगत नाही, तर जवळ जाऊन केरसुणीला नमस्कार करायला लावते. वास्तविक केरसुणी म्हणजे काय, त्याला पाय लागला म्हणजे काय झाले, ‘नमस्कार कर’ म्हणजे काय आणि ‘ती लक्ष्मी असते’ म्हणजे काय असते, यातील त्या बाळाला काहीही समजलेले नसते. परंतु या कृतीतून त्या निर्जीव केरसुणीविषयी कृतज्ञतेचा भाव मनामध्ये रुजवण्याची सुरुवात होते. नंतर येणार्‍या दिवाळीत लक्ष्मीपूजनात केरसुणी पाहून त्या लहान मुलाला कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धतही समजते.. जीवनमूल्य रुजवणारे असे असंख्य संस्कार दैनंदिन व्यवहारात करण्याची रचना कुटुंबव्यवस्थेमध्ये आहे. हजारो वर्षांपासून असंख्य परकीय आक्रमणांना तोंड देत, आजपर्यंत ही व्यवस्था कालपरिस्थितीनुसार कमी-अधिक प्रमाणात प्रभावीरित्या काम करत आहे. असे असताना, संघाला ’कुटुंबप्रबोधन’ गतिविधीची आवश्यकता का भासली? असा प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतो.
 

kutumb prabodhan 
 
उद्याचा भारतीय नागरिक घडवण्याची कुटुंबातील ही प्रक्रिया आपल्या पूर्वापार गतीनुसार काम करतच आहे, परंतु ’कुटुंबकेंद्रित’ भारतीय समाजरचनेला नामशेष करून ’व्यक्तिकेंद्रित’ समाजरचना निर्माण करण्याचा पाश्चात्त्य देशांचा प्रयत्न ब्रिटिश काळापासून आजतागायत सातत्याने सुरू आहे आणि ग्लोबलायझेशनपासून बदलत्या परिस्थितीत दूरदर्शनच्या, सोशल मीडियाच्या अतिरेकी प्रभावामुळे त्याचे दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत. व्यक्तीच्या दृष्टीकोनात आणि विचार करण्याच्या पद्धतीत वेगाने बदल होताना जाणवत आहेत, जे बदल भारतीय संस्कृतीला सुसंगत नाहीत आणि या नकारात्मक स्वकेंद्रित व्यक्ती निर्माण करण्याचे षड्यंत्र कुटुंबातील संस्कार करण्याच्या क्षमतेपेक्षा वेगाने काम करते आहे, हे ध्यानात आल्याने संघाने ’कुटुंबप्रबोधन’ या गतिविधीची सुरुवात केली आहे.
 
 
आज समाजजीवनात राजकारणानंतर कुटुंब हा विषय सर्वाधिक चर्चेत असतो, असे वाटते. याचा अर्थ कुटुंबव्यवस्थेत कुठेतरी काहीतरी बिघाड झाला आहे आणि ते सुरळीत करण्यासाठी विवेकशील मनुष्याची हालचाल सुरू झाली पाहिजे, म्हणून ’कुटुंबप्रबोधन’ या गतिविधीची सुरुवात केली आहे.
 
14 August, 2023 | 12:47
 
 
 
संसार म्हटला की भांड्याला भांडे लागणार, ठणठणाट होणार, हे आपल्या पूर्वजांनी गृहीत धरले होते. सहनशीलता व तडजोड या सद्गुणांना अंगी धारण करून कुटुंबाचे पालनपोषण करण्याचा सुखद अनुभव त्यांनी घेतला होता. आमच्या ऋषिमुनींनी मानवाच्या मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्या निरामय जीवनयात्रेसाठी ब्रह्मचर्य - गृहस्थ - वानप्रस्थ - संन्यास ही त्रिकालाबाधित संकल्पना केंद्रस्थानी ठेवून, संपूर्ण वैज्ञानिक दृष्टीकोनातून अमृततुल्य आनंददायक जीवनपद्धती विकसित केली.
 
 
आज भारतविरोधी दुष्ट शक्तींनी कुटुंबव्यवस्था नामक भारताच्या प्राणशक्तीवर कुठाराघात करण्याचे षड्यंत्र रचले आहे, त्याबरोबरच आपल्या आंतरिक दुर्बलतेमुळे समाजातील युवा पिढीसहित मोठा वर्ग भोगप्रवण संस्कृतीच्या दुष्प्रभावाला बळी जात आहे.
 

kutumb prabodhan 
 
‘मी - माझे’ अशा संकुचित विचारातून समाजात एकटेपणा व त्यातून निर्माण होणार्‍या समस्या अकराळ-विकराळ रूप धारण करीत आहेत. बालक-बालिकांचे वर्तन हायपर - अतिचळवळे झाले आहे, एकाग्रता कमी होत आहे. करियरच्या अंध शर्यतीत अपयशी युवा आत्महत्या करीत आहे, उच्चविद्याविभूषित उत्कृष्ट पॅकेज असलेली नवविवाहित जोडपी आपल्या अहंकाराचे नियोजन करता न आल्याने, एक-दोन वर्षांच्या आतच घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेत आहेत. स्वतंत्र भारतात 767 कुटुंब न्यायालये कार्यरत आहेत. घरगुती हिंसाचार, वृद्धाश्रम वृद्धी आदी कुटुंबव्यवस्थेसमोर उभ्या असलेल्या समस्यांची सूची खूप मोठी आहे. आपल्याला हे आव्हान स्वीकारून त्यावर युगानुकूल उपाययोजना करायची आहे.
 
 
संस्कारक्षम आणि संवादक्षम कुटुंबव्यवस्था पुन्हा एकदा पहिल्या स्वरूपात कार्यान्वित करण्यासाठी प्रबोधन गतिविधी समाजातील सज्जनशक्तीला घेऊन काम करत आहे. विविध उपक्रमांच्या आधारे कुटुंबातील सदस्यांशी संवाद करीत प्रत्येक पिढीतील कुटुंबसदस्यांचा दृष्टीकोन सकारात्मक राहील आणि पुढील पिढ्यात भारतीय जीवनमूल्यांचे आचरण, संवर्धन आणि संक्रमण करण्याचे कार्य कुटुंबात अक्षय सुरू राहील, यासाठी प्रयत्न केले जातात.
 
 
यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या परिसंवादांचे आणि नवविवाहित जोडप्यांच्या संवादाचे उपक्रम आयोजित केले जातात. कुटुंबातील युवा शक्तीसाठी योग्य कार्यक्रमांची रचना, शालेय मुलांसाठी संस्कारवर्गांचे आयोजन, आपल्या सण-उत्सवामागील दृष्टीकोन आणि विज्ञान पुढच्या पिढीला समजावून सांगण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शाळांमध्ये, निवासी संकुलामध्ये, कार्यालयांमध्ये, पालकांच्या सभा घेतल्या जातात. ’मूल घडावे कसे.. आपण घडवू तसे’ अशा प्रकारच्या विषयांवर परिसंवादही होतात. अशा सर्व उपक्रमांची देशभर रचना करताना ढोबळमानाने काही समान सूत्रे अवलंबली जातात. आपल्या प्रत्येक कुटुंबात भजन, भोजन, भाषा, (वेष)भूषा, भवन आणि भ्रमण या किमान सहा गोष्टी आपल्या संस्कृतीला साजेशा असाव्यात, असा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा उपक्रमांमध्ये समाजातील सज्जनशक्तीला बरोबर घेऊन सहभागी करून घेऊन कुटुंबप्रबोधन गतिविधीचे काम चालते. जे कोणी या कामात सहभागी होतात, त्यांना ’कुटुंबमित्र’ असे संबोधले जाते. समाजातील ज्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल, त्या सर्वांनी ’कुटुंबमित्र’ म्हणून कुटुंबप्रबोधन गतीविधीच्या या कामात सहभागी व्हावे.
 

vivek 
 
भजन - कुटुंबातील सर्वांनी रोज घरात एकत्र आपल्या कुटुंबाच्या श्रद्धास्थानासमोर आरती-भजन-कीर्तन-नामस्मरण करावे, जेणेकरून कुटुंबामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. सकारात्मक विचारांसाठी, ऊर्जानिर्मितीसाठी सर्वांनी एकत्र महापुरुष-मातृशक्ती जीवनचरित्र अशा पुस्तकांचे वाचन करावे, एखादे देशभक्तिपर गीत गावे, ज्यातून सर्व कुटुंब एका विचाराने प्रेरित होऊन एकसंध राहील. स्वामी विवेकानंद म्हणाले, “आगामी पन्नास वर्षे आपली थोर भारतमाता हीच आपली आराध्य देवता असली पाहिजे. अन्य सर्व देव-देवता काही काळ आपल्या मनातून दूर राहू द्या. आपला समाज हेच एकमेव जागृत दैवत आहे. त्याचे हात, पाय सर्व ठिकाणी आहेत, त्याने सर्व काही व्यापले आहे. भोवताली पसरलेल्या विराट अशा साक्षात परमेश्वराला आपण पूजीत नाही, ज्या वेळी आपण ह्याची पूजा करू, त्या वेळी अन्य देवतांची पूजाही आपण करू शकू.”
 
 
भारतमाता हेच सर्वांचे आराध्य दैवत आहे, हा भाव कुटुंबात रुजवण्यासाठी कुटुंबप्रबोधन गतीविधीने पुढील वर्षी - म्हणजे 2024मध्ये 12 ते 26 जानेवारी या कालावधीत सर्व कुटुंबांमध्ये भारतमाता पूजन करावे, असे आवाहन केलेले आहे आणि जास्तीत जास्त कुटुंबांत भारतमाता पूजन होईल, यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.
 
 
भोजन - घरातील सर्वांनी शक्यतो रोज किंवा आठवड्यातून किमान दोन वेळा तरी एकत्र बसून भोजन करावे. भोजन करताना दूरदर्शन, मोबाइल इत्यादी सर्व गॅजेट्स दूर ठेवून कुटुंबातील सदस्यांनी आनंदी वातावरणात गप्पा मारत भोजनाचा आस्वाद घ्यावा. कारण विज्ञानाने हे सिद्ध केले की, ’आपण काय खातो यापेक्षा कोणत्या भावनेने खातो, याला अन्नपचनक्रियेत अधिक महत्त्व आहे.’ त्यामुळेच भोजनापूर्वी संकल्प करण्यासाठी भोजन मंत्र म्हणण्याची पूर्वापार पद्धत, सध्या अनेक कुटुंबात बंद होत चाललेली परंपरा पुन्हा एकदा प्रस्थापित करावी, यासाठी प्रबोधन केले जाते. उदाहरणार्थ, भोजन करण्यापूर्वी जर सर्वांनी अशा प्रकारचा भोजन मंत्र एकत्रित म्हटला, तर भोजनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि पानात अन्न टाकण्याची मानसिकता निर्माण होणार नाही.
 
 
मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार।
 
घडो माझिया हातुनी देशसेवा, म्हणोनी मिळावी मला शक्ती देवा॥
 
भाषा - शिक्षणाचे माध्यम म्हणून, एखाद्या परकीय भाषेचे ज्ञान असावे म्हणून, संवादाचे माध्यम म्हणून किंवा आवड म्हणून कोणतीही भाषा शिकणे चांगलेच आहे, परंतु दैनंदिन व्यवहारात मातृभाषेचा आग्रहपूर्वक वापर केला पाहिजे. आपल्या बोली भाषेमध्ये अनावश्यक इंग्लिश भाषेचा भेसळयुक्त वापर आग्रहपूर्वक थांबवला पाहिजे. देशभक्ती हा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असा साजरा करण्याचा सण नसून दैनंदिन जगण्याचा विषय असला पाहिजे. देशभक्ती जशी ‘असली’ पाहिजे, तशीच आपल्या बोली भाषेतून व्यवहारातून, आचरणातून ‘दिसलीही’ पाहिजे. त्यामुळे स्वभाषेचा आग्रह जपला पाहिजे. मातृभाषेचा आग्रह ही फार अवघड गोष्ट नाही. कुटुंबात, मित्रपरिवारात संवाद करत असताना आपल्या मातृभाषेचा आग्रह असला पाहिजे-दिसला पाहिजे. सार्वजनिक व्यवहारांमध्ये आपली स्वाक्षरी आपल्या मातृभाषेतच असावी, आग्रह असावा. मुळात स्वाक्षरी म्हणजे स्व-अक्षरी आहे, त्यातला ’स्व’ फार महत्त्वाचा आहे.
 
 
(वेष)भूषा - पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याच्या शर्यतीत देशातील तरुण पिढी विचित्र विक्षिप्त कपडे परिधान करू लागलेली दिसत आहे. आपल्या वेषभूषेत कालसुसंगत बदल करतानासुद्धा ती आपल्या संस्कृती-परंपरेशी सुसंगत असावी. कमीत कमी सणवार-उत्सवप्रसंगी भारतीय वेषभूषा परिधान करावी.
 
 
भवन - भवन म्हणजे आपले घर हे भारतीय संस्कृतीला आणि परंपरेला साजेसे असावे. घरात असणारी मानचिन्हे आपल्या परंपरेचे, संस्कृतीचे स्मरण येणारी असावीत. उदाहरणार्थ, प्रत्येक घरामध्ये भारतमातेची प्रतिमा असावी, आपल्या घराबाहेर (अथवा सोयीनुसार घरात) तुळस, रांगोळी, तोरण लावलेले असावे. घरामध्ये मोठ्यांना मान असावा, मोठ्यांचा सन्मान व्हावा. आपल्या घरातील वातावरण मंगलमय असावे.
 
 
भ्रमण - सध्याच्या बदलत्या आधुनिक जीवनशैलीमध्ये सुट्टीच्या दिवशी सर्व कुटुंबसदस्यांनी चैन करण्यासाठी मल्टिप्लेक्समध्ये अथवा मॉलमध्ये जाण्याची पद्धत रुजते आहे. हे सर्वार्थाने चुकीचे नसले, तरी सर्व कुटुंबातील सदस्य आनंद, विरंगुळा, स्थळदर्शन म्हणून प्रवास करत असतानासुद्धा आपल्या देशातील ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, प्रेरणादायक, प्रेक्षणीय वारसा स्थळांना आवर्जून भेट देण्याची परिवारातील सर्वांची मानसिकता असली पाहिजे. उदाहरणार्थ, कुटुंबातील सर्व सदस्यांनी ठरवून आपल्या परिसरातील मंदिरे, सेवा कार्य, सामाजिक संस्था पाहण्यासाठी अथवा आपल्या नात्यातील ज्येष्ठ-श्रेष्ठ कुटुंबीय यांना भेटण्यासाठी जावे.
 
 
आज संपूर्ण जगातील असंख्य देशांत भारतीय संस्कृतीचे अनुकरण होऊ लागलेले आहे, कारण अत्यंत शास्त्रशुद्ध दृष्टीकोनातून भारतीय जीवनशैलीची रचना केलेली आहे, हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. मृत्यूनंतर पुरण्याऐवजी शरीराचे दहन करणे म्हणजेच पंचतत्त्वातून निर्माण झालेले शरीर पंचतत्त्वात विलीन करणे, या भारतीय विचाराचे अनुकरण पाश्चात्त्य जगतात सुरू झालेले आहे. सर्व जगाने भारतीय योगसाधना मान्य करून जगातील 140 देश आंतरराष्ट्रीय योग दिनाला योगसाधना करू लागलेले आहेत. इस्कॉन, स्वामीनारायण, सिद्ध समाधी योग, चिन्मय मिशन, गीता परिवार यासारख्या असंख्य आध्यात्मिक-सांस्कृतिक संस्था-संघटनांच्या माध्यमातून समाज जगभरात हिंदू जीवनशैलीचे दर्शन आणि अनुकरण करू लागलेला आहे.
 
 
भारतात मात्र कालानुरूप बदलत्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करीत निघालेलो आहोत. या व्यक्तिकेंद्रित पाश्चात्त्य विचारातून पुन्हा एकदा कुटुंबकेंद्रित विचाराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीस समाजकेंद्रित विचारापर्यंत नेणे हेच कुटुंबप्रबोधन गतिविधीचे काम आहे.
 
 
कुटुंबातील अशा संस्कारक्षम दिनक्रमातून, समाजाचा आणि देशाचा प्राधान्याने विचार करणारा उद्याचा भारतीय निर्माण करणे हा कुटुंबप्रबोधन गतिविधीचा उद्देश आहे. त्यामुळेच कुटुंबप्रबोधनाच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने आणि सर्व कार्यक्रमांची सांगता ‘सर्वे भवन्तुसुखिन: सर्वे संतुनिरामया। सर्वे भद्राणिपश्यंतू माऽकश्चित दु:ख भाग भवेत॥’ या श्लोकाने होते.
लेखक पुणे येथे करियर काउन्सिलर आहेत.