भात हे कोकणासह विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांतील मुख्य पीक. भात पिकावर करपा, गादमाशी, लष्करी अळी इत्यादी रोग व अळी यांचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. त्यांचे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे, याविषयी माहिती सांगणारा लेख.
खरीप हंगामात भात हे आपल्याकडील महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात 15.55 लाख क्षेत्र भात पिकाखाली असून उत्पादकता 22.38 क्विंटल एवढी आहे. भात पिकाची उत्पादकता वाढण्याची क्षमता अधिक असली, तरी मुख्यत: कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल माहितीचा अभाव असणे हे कारण त्यामागे आहे. कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन सुमारे 20 ते 25 टक्के घटते. त्यामुळे वेळीच रोगांचे व किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. दमट हवामान, आर्द्रता, खाचरात साठून राहणारे अतिरिक्त पाणी, अनियमित पाऊस यामुळे कीड व रोग वाढीस अनुकूल वातावरण तयार होऊन प्रादुर्भाव वाढतो. भात पिकावर करपा, कडा करपा, शेंडे करपा, पर्णकोष करपा, आभासमय काजळी, उदबत्ता आणि तपकिरी ठिपके हे रोग प्रामुख्याने आढळून येतात.
करपा - पीकवाढीच्या सर्व अवस्थांमध्ये या बुरशीजन्य रोगाची लक्षणे दिसून येतात. रोपवाटिकेत कोवळ्या रोपांवर जांभळ्या रंगाचे ठिपके पडतात. रोप मोठे होताना ठिपक्याचे आकारमान वाढते. प्रत्येक रोपावर असंख्य ठिपक्यांमुळे पाने करपतात आणि रोपे मरतात. दाणे भरण्याच्या अवस्थेतही या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगग्रस्त दाण्यांवर काळपट रंगांचे ठिपके दिसतात. लोंबी येण्याच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास लोंबीच्या देठांवर बुरशीची वाढ होऊन तो भाग काळा पडून कुजतो. मोडलेल्या लोंबीत दाणे अपरिपक्व असतात. काही वेळा दाणे भरण्याच्या प्रक्रियेत रोगाचा अडथळा निर्माण होऊन दाणे पोचट होतात.
करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायसायक्लाझोल (75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम किंवा आयसोप्रोथीओलेन (40 टक्के प्रवाही) 10 लीटर पाण्यात 10 मि.ली. यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. रोगाची लक्षणे दिसून येताच बुरशीनाशकाची पहिली फवारणी घ्यावी, तर त्यानंतरच्या दोन फवारण्या 21 दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.
कडा करपा - विशेषत: रायगड, ठाणे व पालघर या जिल्ह्यांत या जीवाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. या रोगामुळे शेंडे आणि कडा पिवळसर रंगाच्या होतात. पाने करपल्यामुळे या रोगास कडा करपा असे म्हणतात. या रोगामुळे चुडातील सर्व रोपे पिवळी पडून वाळतात.
रोगाची लक्षणे दिसताच प्रतिहेक्टरी सुडोमोनास प्लायरोसल्स 500 लि. पाण्यातून 15 दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
शेंडे करपा - ओरायझी बुरशीमुळे होणारा रोग मुख्यत्वे फुटवे येण्याच्या अवस्थेत होतो. रोगामुळे पानांचे शेंडे वाळून त्या भागावर कातरलेल्या सुपारीसारखी नक्षी दिसून येते. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पाने वाळून जातात आणि रोप कमकुवत बनते.
आभासमय काजळी - या रोगामुळे भाताच्या लोंबीतील दाण्याचे रूपांतर काळसर हिरव्या रंगाच्या गाठीमध्ये होते. दाणे रोगग्रस्त होतात. योग्य जातीची निवड आणि बुरशीनाशकाची नियमित फवारणी केल्यास या रोगाचे व्यवस्थापन करता येते.
उदबत्ता - या रोगामुळे लोंबीतील दाणे एकमेकांस घट्ट चिकटून लोंबीचा आकार उदबत्तीसारखा होतो. या रोगामुळे लोंबीतील सर्व दाणे पोचट बनतात.
भातावरील रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना
पीक कापणीनंतर शेतातील धसकटे काढून नष्ट करावीत.
पेरणीपूर्वी भात खाचरातील तण काढून टाकावे.
भात खाचराची बांधबंदिस्ती करावी.
जमिनीची खोल नांगरट करावी.
लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा.
पेरणीपूर्वी बियाणावर बीजप्रक्रिया करावी.
पीक बहरात असताना काजळी रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रोपीकोन्याझोल किंवा हेक्झाकोन्याझोल यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
संतुलित खतांचा वापर करावा.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लाझोल 1 ग्रॅम 1 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लावणीनंतर शेतात एडिफेनॉस 1% किंवा मॅनकोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 25 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. आवश्यकतेनुसार 10 ते 12 दिवसांच्या अंतराने आणखी दोन फवारण्या कराव्यात.
किडीचे व्यवस्थापन
खोडकिडा - खोडकिडा ही भात पिकावरील मुख्य कीड आहे. भाताच्या पानाच्या टोकाकडे वरच्या पृष्ठभागावर मादी पुंजक्याने अंडी घालते. प्रथम अळी कोवळ्या पानावर उपजीविका करते आणि नंतर खोडाचा आतील भाग खाते. पीक पोटरीवर येण्याअगोदर किडीचा प्रादुर्भाव झाला, तर मधला भाग वरून खाली सुकत जातो, याला ‘गाभा मर’ असे म्हणतात; तर जर पोटरीवर आल्यानंतर कीड पडली, तर दाणे न भरलेल्या पांढर्या लोंब्या बाहेर पडतात. त्याला ‘पळीज’ म्हणतात. खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.
सुरुवातीची भात पीक कापणी जमिनीलगत करावी. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वैभव विळा वापरावा.
किडीला प्रतिकार करणार्या भाताच्या जातीची लागवड करावी
जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा जॅपोनिकम या मित्र कीटकांची 50000 अंडी प्रतिहेक्टर 10 दिवसांच्या अंतराने सोडावीत.
खोडकिडीच्या नियंत्रणासाठी भात खाचरातील बेडकांचे संवर्धन करावे.
रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी हेक्टरी 3 टक्के दाणेदार कार्बोप्यूरॉन 16.5 किलो किंवा 15 किलो क्विंनोलफॉस यापैकी कोणत्याही एक दाणेदार कीटकनाशकाचा वापर करावा.
शेतातील खोडकिडीचे अंडीपुंज काढून नष्ट करावेत. या किडीच्या नियंत्रणासाठी भात शेतात 20 ते 25 मीटर अंतरावर हेक्टरी 20 याप्रमाणे गंधसापळे लावावेत.
गादमाशी - गादमाशीची अळी रोपच्या आत शिरून अंकुर कुरतडते. त्यामुळे अंकुराचा भाग फुगून त्यांची कांद्याच्या पातीसारखी नळी तयार होते. याला नळ किंवा पोंगा म्हणतात. या किडीच्या नियंत्रणासाठी लावणीनंतर 10 दिवसांनी दाणेदार फिप्रोनिल 25 किलो या प्रमाणात टाकावे. बंधावरील तण काढावे.
तपकिरी तुडतुडे - पाण्याचा योग्य निचरा होत नाही अशा ठिकाणी आणि नंतर खतांचा वापर जास्त झाल्यास ही कीड आढळून येते. तुडतुडे भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी भाताची पाने पिवळी पडतात आणि नंतर वाळतात. लोंब्या बाहेर पडत नाहीत, पडल्याच तर दाणे पोचट असतात. या किडीच्या नियंत्रणासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा. नत्र खत वाजवी प्रमाणात द्यावे. अॅसिफेट किंवा फिप्रोनिल किंवा इमिडाक्लोप्रीड या रासायनिक औषधाची फवारणी करावी.
निळे भुंगेरे - किडीची अळी आणि प्रौढ अवस्था पिकाला हानिकारक असते. ही कीड पानाचा हिरवा भाग खरवडून खाते. परिणामी पानांवर पांढरे डाग दिसून येतात. पाणथळ जमिनीत या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी बांधावरील गवत काढून टाकावे. पाण्याचा योग्य निचरा करावा. किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिहेक्टरी 500 लीटर पाण्यातून क्विंनोलफॉस 25 टक्के 2000 मि.ली. किंवा लॅमडासायहॅलोत्रीन 5 टक्के 25 मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
लष्कर अळी - या किडीच्या अळ्या दिवसा रोपांच्या फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्री पाने कडेपासून मध्यशिरेपर्यंत खातात. पीक पक्व होण्याच्या वेळी या किडीचा उपद्रव होतो. किडीच्या अळ्या लोंब्या कुरतडतात, त्यामुळे दाणे गळतात.
या किडीच्या नियंत्रणासाठी 1.5 टक्के क्लोरोपायरीफॉस प्रतिहेक्टरी 25 किलो याप्रमाणे सायंकाळी किंवा सकाळी लवकर वारा नसताना धुरळणी करावी. तसेच अंडीपुंज आणि अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. शेतात 1 ते 2 दिवस पाणी बांधावे. शेतात पक्षी थांबे उभारावेत.
पाने गुंडाळणारी अळी - ही अळी पानाच्या दोन्ही कडा एकत्र चिटकवून पानाची गुंडाळी करते व त्यात राहते आणि आतील पानातील हरितद्रव्य खाते. पानाच्या बाहेरील बाजूस पंधरा चट्टा दिसतो. नुकसान जास्त असल्यास पीक निस्तेज पडते. किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिहेक्टरी 500 लीटर पाण्यातून क्विंनोलफॉस 25 टक्के 2000 मि.ली. किंवा लॅमडासायहॅलोत्रीन 5 टक्के 25 मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
अशा प्रकारे रोगाचे आणि किडीचे व्यवस्थापन वेळीच केल्यास भात पिकाचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल.
- डॉ. विलास महादेव जाधव
वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
। 8552882712
- प्रा. उत्तम सहाणे
पीक संरक्षण शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
। 7028900289