@प्रा. व्यंकट शिंदे
। 9049388323
वाढत्या खाद्यान्न तेलामुळे व बाजारपेठेत मिळणारा भाव लक्षात घेता सोयाबीन हे सध्या राज्यात सर्वाधिक पसंतीचे पीक ठरले आहे. बदलत्या हवामानामुळे सोयाबीनवर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होऊन शेतकर्यांचे मोठे नुकसान होते. सोयाबीनवरील प्रमुख कीटक, रोग आणि त्यांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ या.
कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारे एक नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील या पिकाखालील क्षेत्राचा विचार करता मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. देशातील या पिकाखाली असणार्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास 35 ते 36 टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. आंतरपीक व दुबार पीकपद्धतीमध्ये सोयाबीन अतिशय उपयुक्त पीक आहे. पिकाच्या फेरपालटीमध्येही सोयाबीनला महत्त्वाचे स्थान आहे. पण अलीकडील काळात किडींमुळे आणि रोगांमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वेळेवर पीक संरक्षण केल्यामुळे या पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
सोयाबीनवरील कीड
खोडमाशी - खोडमाशी ही घरमाशीसारखी असते, परंतु आकाराने फक्त 2 ते 3 मि.मी. एवढी असते. ती चमकदार काळ्या रंगाची असते. प्रौढ माशी झाडाच्या देठावर व पानावर फिकट पिवळसर अंडी घालते. अंड्यातून 2 ते 7 दिवसांत अळी बाहेर पडून पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीला छिद्र करून आतील भाग पोखरून खाते. रोप अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येते. पेरणीपासून 10 ते 12 दिवसांत पिकांवर प्रादुर्भाव दिसून येतो. पिकाच्या नंतरच्या अवस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोप सुकत नाही. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीनचे दाणे भरत नाहीत. त्याचे वजन कमी होते. शेंगांची संख्याही कमी होते. अळीचे जीवनचक्र साधारणपणे 10 ते 12 दिवसांत पूर्ण होते. त्यापूर्वी ती खोडामध्ये छिद्र बनवते व खोडातच कोषामध्ये जाते. थोड्या दिवसांनंतर कोषामधून खोडावरील छिद्रातून बाहेर पडून पुन्हा आपले जीवनचक्र सुरू करते.
चक्री भुंगा - सोयाबीन पिकाची ही एक मुख्य हानिकारक कीड आहे. प्रौढ कीटक नारंगी रंगाचा असून त्याच्या पंखाचा खालचा भाग काळा असतो, अँटेना शरीराच्या लांबीएवढाच मागे वळलेला असतो आणि अळी पिवळ्या रंगाची असून 2 सें.मी. लांबीची असते. मादी भुंगा पानाच्या देठावर फांदीवर किंवा खोडावर दोन चक्राकार काप करते. यामध्ये मादी तीन छिद्रे करते आणि त्यापैकी एकामध्ये अंडी घालते. त्यामुळे चक्राच्या वरचा भाग वाळतो, यावरून किडीचा प्रादुर्भाव लक्षात येतो. थोड्या दिवसांनंतर अळी अंड्यातून बाहेर निघून खोडाच्या आतील भाग खाऊन रोपाला पोकळ बनविते. त्यामुळे झाडावर फुले-फळे लागण्यावर विपरीत परिणाम होतो.
हिरवी उंटअळी - या अळ्या हिरव्या रंगाच्या असून त्या चालताना पाठीत बाक काढत चालतात, म्हणून त्यांना उंटअळी म्हणतात. ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत या प्रौढ अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. उंटअळ्या प्रथम पानाचा हिरवा भाग खरडून खातात. त्यानंतर पानाचा सर्व भाग खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात. अळ्या फुलांचे व शेंगांचेही नुकसान करतात. 4 लहान अळ्या प्रतिमीटर एकाच ओळीत असल्यास ही परिस्थिती अळ्यांची आर्थिक नुकसान पातळी समजावी.
केसाळ आळी - सोयाबीनच्या झाडावर सुरुवातीस लहान अळ्या पुंजक्यांनी आढळतात व त्या छोट्या मळकट पिवळ्या रंगाच्या असतात. नंतर त्या लाल भुरकट रंगाच्या दिसू लागतात. अळ्यांच्या अंगावर नारंगी केस असतात. जुलै-ऑक्टोबर महिन्यांमध्ये यांचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. लहान अवस्थेत पानाच्या खालचा भाग खरडून खातात. त्यामुळे पानांचा पातळ पापुद्रा शिल्लक राहतो व पाने जाळीदार होतात. त्यानंतर मोठ्या अळ्या पूर्ण शेतात पसरतात व पूर्ण पाने खातात. यामुळे फुलांची, शेंगांची संख्या घटते, वजन कमी भरते व मोठे नुकसान होते. 10 अळ्या प्रतिमीटर ओळीत आढळल्यास ही आर्थिक नुकसान पातळी समजावी.
तंबाखूवरील पाने खाणारी अळी - ही बहुभक्षी कीड असून ती मुख्यत: सोयाबीन, उडीद, कापूस, एरंडी, मिरची, हरभरा, मका व तंबाखू या पिकांवर दिसून येते. प्रौढ पतंग मळकट भुरकट रंगाचा, 2 ते 3 सें.मी. आकारचा असतो. मादी पानावर समूहाने अंडी घालते. एका अंडीपुंजामध्ये साधारणपणे 80 ते 100 अंडी असतात. अंडीपुंजातून बाहेर पडल्यावर ही अळी फिकट हिरवी दिसते. या अळ्या पहिल्या दोन अवस्थांमध्ये समूहामध्ये पानांच्या मागील बाजूस राहून पानातील हरित द्रव्य खातात. त्यामुळे पाने पातळ कागदासारखी, जाळी झालेली दिसून येतात.
अळी भुरकट मळकट किंवा काळसर रंगाची असते. शरीरावर दोन फिकट पट्ट्या असून दोन्ही बाजूंनी काळ्या रंगाचे ठिपके दिसतात. मोठ्या अळ्या स्वतंत्रपणे पानांना मोठी छिद्रे पाडून खातात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या पाने अधाशीपणे खाऊन फस्त करतात. फुले, शेंगाही खातात. त्यामुळे 30 ते 70 टक्के एवढे नुकसान होण्याची शक्यता असते. दिवसा या अळ्या पानाखाली अथवा जमिनीत लपून राहतात व रात्रीच्या वेळी बाहेर पडतात.
सोयाबीनवरील रसशोषण करणार्या किडी - यामध्ये पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे यांचा, काही प्रमाणात लाल कोळीचासुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे सोयाबीनची वाढ कमी होऊन विषाणुजन्य व बुरशीजन्य रोग पसरविण्यास ही कीड कारणीभूत ठरते.
तुडतुडे - हे पानाच्या खालच्या बाजूस राहून पेशीतील रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पानांवर पिवळसर हिरवे चट्टे दिसू लागतात. सततच्या ढगाळ व पावसाळी हवामानामुळे याचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात 25 ते 35 टक्के घट येऊ शकते.
पांढरी माशी - ही कीड तीन प्रकारे सोयाबीन पिकास नुकसानकारक असते. पिल्ले, तसेच प्रौढ कीड पानाच्या खालच्या भागातील रस शोषण करतात. त्यामुळे रोपांची वाढ खुंटून फुले व शेंगा गळू लागतात. याबरोबरच ही कीड पिवळा मोझॅक रोगास कारणीभूत असणार्या विषाणूचा प्रसार करते.
फुलकीड - फुलकिडे हिरवट पिवळसर रंगाची निमुळत्या टोकाचे असतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ज्या वेळेस ऊबदार वातावरण तयार होते, त्या वेळेस त्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पीक फूल अवस्थेत असताना सोयाबीनकडे जास्त प्रमाणात आकर्षिली जातात. पानांना, फूलकळीला, देठांना खरडून खातात. रस शोषून घेतात. त्यामुळे फूलगळ होते, तसेच विषाणुजन्य रोगाचाही प्रसार होतो.
सोयाबीन पिकावरील रोगांचे व्यवस्थापन
बुंधा कूज (कॉलर रॉट) - हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत वास्तव्य करणार्या बुरशीमुळे होतो. या बुरशीच्या वाढीसाठी पीकवाढीच्या काळात उष्ण व दमट हवामान अनुकूल असते. जमिनीलगत असलेल्या खोडाच्या खालच्या भागाला केशरी, पांढर्या रंगाचे बुरशीचे डाग दिसू लागतात व नंतर पांढर्या रंगाचे कवक बीज आढळून येतात. खोडाचा हा भाग सडू लागतो व रोपे मरून पडतात. रोग व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणी, काडीकचरा वेचून नष्ट करावा, पेरणीपूर्वी बियाणास बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी. रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत. तसेच बुरशीनाशकाची आळवणी (ड्रेचिंग) करावी.
मूळ व खोड कूज - रोपअवस्थेमध्ये या रोगाची लागण जास्त दिसून येते. जमिनीलगतच्या खोडावर, तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी रोगाची लागण होते. खोडाची, मुळाची साल रोगग्रस्त झाल्याने रोपांना अन्य पुरवठा होत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात व नंतर रोपे जमिनीलगत कोलमडून मरून जातात. बीजप्रक्रिया करणे, तसेच पावसाचा खंड पडल्यास पाणी देणे हे उपाय करावेत.
तांबेरा - प्रामुख्याने कोल्हापूर-सातारा जिल्ह्यात हा रोग आढळून येतो. हा बुरशीजन्य रोग असून यामुळे सुरुवातीला जमिनीलगतच्या पानांच्या खालच्या बाजूला पिवळसर तांबूस चुपके दिसून येतात. नंतर ते वरील पानांवर दिसतात. काही वेळा खोडावरही कोवळ्या शेंगांवरही दिसून येतात. हवामान पोषक असल्यास सर्वच पाने तांबूस होऊन मोठ्या प्रमाणात पानगळ होते. त्यामुळे शेंगांत दाणे भरत नाहीत. रोग हवेमार्फत पसरतो. 50 ते 80 टक्के नुकसान होऊ शकते.
शेंगांवरील करपा - सोयाबीन पिकातील अतिशय महत्त्वाचा रोग असून याला ‘पॉडब्लाइट’ असे म्हटले जाते. यामध्ये पानांवर लालसर अथवा गडद तपकिरी ठिपके दिसून येतात. हे ठिपके नंतर गडद तपकिरी रंगाचे होऊन खोडावर व शेंगांवरही येतात. कालांतराने शेंगावर पुढे बुरशीचे काळे बीजाणू तयार होतात. अशा शेंगा तपकिरी/काळ्या पडतात. यामुळे बियाणे तयार होण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो.
पिवळा मोझॅक - हा विषाणूजन्य रोग असून पांढरी माशीद्वारे याचा प्रसार होतो. रोगट झाडांच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पानांच्या शिरांजवळ पिवळे डाग दिसतात.रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. पांढर्या माशीच्या नियंत्रणाकरिता आंतरप्रवाही कीटकनाशक वापरावे.
कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी