ऑनलाइन जुगार छुपा सामाजिक कॅन्सर

विवेक मराठी    19-Aug-2023
Total Views |
@सौरभ वीरकर। 8007653939
 
 
online rummy
आयपीएल मॅचेससाठी ऑनलाइन टीम तयार करून त्यावर बेटिंग करण्यापासून सुरू झालेला ऑनलाइन जुगाराचा प्रवास आता तीनपत्ती, रमी इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. अभिनेते, क्रिकेटर यांनी सर्वच माध्यमांतून केलेल्या जाहिरातींना बळी पडून सर्वसामान्य लोकसुद्धा या क्विक मनीच्या नादी लागून कर्जबाजारी होत आहेत, त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन याला पायबंद घातला पाहिजे.
महाभारत महाकाव्यामध्ये सर्व प्रकारच्या मानवी भावविश्वाचे विश्लेषण केले आहे. द्यूत खेळून आपले सर्वस्व हरणारे पांडवदेखील आपण महाभारतात बघितले. त्यानंतरच पांडवांना वनवास आणि अज्ञातवास घडला. इतकेच काय, या द्यूताच्या खेळात त्यांना आपली पत्नी द्रौपदी हिलादेखील दाव्यावर लावावे लागले. पुढे घडलेले महाभारत आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. दुर्दैवाने आपला समाज मात्र यातून काहीच शिकला नाही, असेच म्हणावे लागेल.
 
 
जुगार खेळून कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त माया जमवावी ही भावना महाभारताइतकी आदिम आहे. दुष्परिणामांची कल्पना असूनसुद्धा माणूस त्याच्या आहारी जातो आणि बहुतेक वेळा आपले सर्वस्व गमावून बसतो. सद्य परिस्थितीत तंत्रज्ञानाच्या असीम प्रगतीमुळे जुगार आता बोटाच्या एका क्लिकवर अनिर्बंध खेळता येतो. जुगाराचे व्यसन, त्यातून होणारे वाढते कर्ज याचे दुष्परिणाम आता अनिर्बंध वाढू लागले आहेत अणि म्हणूनच या बाबतीत योग्य ते मार्गदर्शन नसताना सामाजिक भान जागृत करण्याची गरज वाटते.
 
 
जुगाराचा मालक कधीच तोट्यात जात नाही. इतरांना पैसे द्यायचे असले, तरीही तो तोट्यात जात नाही.. किंबहुना जुगाराला चालना देण्यासाठी म्हणून विविध मार्गांनी लोकांना सवय आणि पर्यायाने व्यसन लावण्याचा त्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून जास्तीत जास्त व्यक्ती जुगार खेळतील आणि त्याचा नफा वाढेल.
 
मोबाइल क्रांती होण्याच्या अगोदरदेखील समाजात जुगार अस्तित्वात होता. परंतु जुगार खेळणे, लॉटरी या गोष्टी आत्ताइतक्या सहज होत नव्हत्या. घरातून बाहेर पडून एका ठरावीक ठिकाणी जाऊन हे सर्व करता येत असे. जुगार खेळण्यात सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. अशा व्यक्तीकडे समाज फार काही कौतुकाने बघत नसे. परंतु दुर्दैवाने हे चित्र आता बदलत आहे. इतरत्र बारीक नजरेने लक्ष ठेवले, तर आपल्या आजूबाजूला ऑनलाइन जुगार खेळणार्‍या अनेक व्यक्ती दिसून येतील, इतकी ही सहज गोष्ट झाली आहे. आयपीएल मॅचेससाठी ऑनलाइन टीम तयार करून त्यावर बेटिंग करण्यापासून सुरू झालेला ऑनलाइन जुगाराचा प्रवास आता तीनपत्ती, रमी इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. एकेकाळी उन्हाळी सुट्टीत म्हणून आवर्जून खेळला जाणारा बोर्ड गेम ’ल्युडो’ हादेखील आता ऑनलाइन जुगाराच्या कक्षेत आलेला आहे.
 
 
जुगाराचा धंदा चालविण्याचे एक तंत्र आहे. जुगाराचा मालक कधीच तोट्यात जात नाही. इतरांना पैसे द्यायचे असले, तरीही तो तोट्यात जात नाही.. किंबहुना जुगाराला चालना देण्यासाठी म्हणून विविध मार्गांनी लोकांना सवय आणि पर्यायाने व्यसन लावण्याचा त्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून जास्तीत जास्त व्यक्ती जुगार खेळतील आणि त्याचा नफा वाढेल. अशा परिस्थितीत एखादाच कुठेतरी, कधीतरी पैसे जिंकतो. इझी मनीच्या स्वप्नातून लागणारे हे व्यसन आहे. ऑनलाइन जुगाराच्या बाबतीत अगदी हीच पद्धती लागू होते.
 
 
online rummy
 
अशा अ‍ॅप्सवर नोंद केल्यानंतर प्रथम भरीव कॅश बोनस दिले जातात. जुगार खेळणारे खेळाडू सुरुवातीला काही पैसे जिंकतातदेखील. हे जिंकलेले पैसे थेट त्याच्या खात्यात येतात. ऑनलाइन जुगाराची सवय लागते. त्याची परिणती व्यसनात होते. इझी मनीची सवय लागते. मग हळूहळू खेळाचे ’अल्गोरिदम’ बदलत जातात. आधी सहजरित्या मिळणारे पैसे एकाएकी थांबतात. जुगाराच्या नादी लागलेल्या व्यक्ती गेलेले पैसे जिंकण्यासाठी म्हणून आणखी खेळत राहतात आणि आणखी पैसे हरतात.
 
इझी मनीच्या व्यसनात व्यक्ती कधी कर्जबाजारी होते ते लक्षातदेखील येत नाही.. आणि मग सुरू होते ते कर्जवसुलीचे सत्र. या दुष्टचक्रात अडकून कित्येक व्यक्तींनी आत्महत्या केल्या असतील, याची गणती नाही. या दुष्टचक्रात पुरुषांबरोबरच कॉलेजवयीन तरुण-तरुणी, विवाहित स्त्रिया, निवृत्त ज्येष्ठ नागरिकदेखील अडकले आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
 
जुगाराच्या या टप्प्यावर मग खेळण्यासाठी म्हणून ऑनलाइन पैसे उधार मिळण्याची सोय होते. क्विक ऑनलाइन पैसे देणार्‍या अ‍ॅप्सच्या जाहिराती दिसत राहतात. माणूस आणखी जुगार खेळून आणखी पैसे हरत राहतो आणि बघता बघता या व्यसनापायी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकून पडतो. हे ऑनलाइन कर्जाचे प्रकरण इतके पुढे गेले आहे की काही अ‍ॅप्सवर जुगाराच्या प्लॅटफॉर्मवरच कर्जाने पैसे मिळण्याची सोय केलेली आहे. अगदी नाममात्र कागदपत्रे देऊन असे कर्ज मिळते. इझी मनीच्या व्यसनात व्यक्ती कधी कर्जबाजारी होते ते लक्षातदेखील येत नाही.. आणि मग सुरू होते ते कर्जवसुलीचे सत्र. या दुष्टचक्रात अडकून कित्येक व्यक्तींनी आत्महत्या केल्या असतील, याची गणती नाही. या दुष्टचक्रात पुरुषांबरोबरच कॉलेजवयीन तरुण-तरुणी, विवाहित स्त्रिया, निवृत्त ज्येष्ठ नागरिकदेखील अडकले आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
 
 
 
याची दुसरी खटकणारी बाजू अशी आहे ही की या सर्व प्रकाराला काहीही सामाजिक आणि राजकीय धरबंध नाही. अशा दुष्टचक्रात अडकलेल्या व्यक्ती सर्व समाजाच्या डोळ्यादेखत अडकवू दिल्या जात आहेत, असाच याचा अर्थ आहे. प्रतिष्ठा पावलेले प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री या ऑनलाइन जुगाराची जाहिरात अगदी राजरोसपणे करताना दिसतात.
 
 
जंगली रमीच्या सोशल मीडियावरच्या जाहिरातीमध्ये एका मराठी अभिनेत्रीने काम केले आहे. त्या जाहिरातीत ती म्हणत आहे की तिने रमीची अनेक अ‍ॅप्स ट्राय करून पाहिली आणि जंगली रमी हे अ‍ॅप सर्वोत्तम आहे.. वगैरे वगैरे. याच जाहिरातीच्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये एकूण एक कॉमेंट्स तिचा धिक्कार करणार्‍या आहेत, कारण या ऑनलाइन जुगारामुळे कर्जबाजारी होऊन अनेक जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत घडून गेल्या आहेत. तिला बोल लावणारे हे सर्वसामान्य लोक आहेत. त्यात एखाद-दुसरा स्वत: या दुष्टचक्रात अडकला असण्याची शक्यता आहे, असे त्यांच्या कॉमेंटवरून वाटते. एका ठिकाणी खुद्द तिला टॅग करण्यात आले आहे, म्हणजे आपल्याविषयी आपले प्रेक्षकच तिथे काय म्हणत आहेत हे तिने स्वत: बघितले असावे.
 
online rummy 
 
अर्थात अशा अनेक जाहिरातींमधून अनेक मराठी कलाकार भरघोस मोबदला घेऊन काम करतात. वाईट बातमी घेऊन येणार्‍या दूताला शिक्षा होऊ नये असा दंडक आहे, म्हणून पैशासाठी या जाहिरातींमध्ये काम करणार्‍या अभिनेत्यांना जबाबदार धरू नये असे एकवेळ म्हटले, तरीही इतर वेळेस सामाजिक समस्यांवर प्रगल्भपणे व्यक्त होणार्‍या याच मराठी अभिनेत्यांना या संदर्भात मात्र अनभिज्ञता असावी, याचे विशेष वाटते. पैशाची इतकी निकड आहे का की लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या या जुगाराच्या जाहिराती कराव्या लागतात? प्रत्यक्ष जुगाराच्या अड्ड्यावर दलाली करणारे आणि जाहिराती करणार्‍या व्यक्ती यात काय फरक, असे उद्वेगाने विचारावे असे वाटते.
 
 
महाराष्ट्र सरकारने अजून या ऑनलाइन जुगारावर कायद्याने बंदी घातलेली नाही. ते जेव्हा व्हायचे तेव्हा होईल. पण किमान प्रसिद्ध व्यक्ती म्हणून आपले काही सामाजिक दायित्व आहे की नाही, हा विचार या लोकांच्या मनाला शिवत नसेल का? असे वाटत राहते. यात दोन गोष्टी आहेत - एक म्हणजे यांना खरेच तशी सामाजिक जाणीव नसावी; दुसरे म्हणजे या जुगारामागचे वास्तव किती भयानक आहे, हे समजून घेण्यासाठी जे वास्तवाचे भान लागते, समाजाशी नाळ जोडलेली असावी लागते.. ते नसावे. तरीही इतक्याइतक्यात या जुगारापायी आत्महत्या केलेल्या कित्येक केसेस माध्यमांमधून पुढे आल्या आहेत. मग हे अभिनेते-अभिनेत्री कदाचित बातम्याही वाचत-ऐकत नसावेत का?
 
 
या ऑनलाइन जुगारामागचे चित्र फार विदीर्ण आणि भीषण आहे. माफक पगारावर नोकरी करणारा माझा एक दूरचा नातेवाईक या जुगारामुळे कर्जात पूर्ण बुडून गेला. भरपूर कर्ज झाल्यावर जेव्हा मला दुसर्‍या कुणाकडून ही गोष्ट कळली, तेव्हा या बाबतीत त्याच्याशी बोलणे झाले. त्यानेदेखील एका वळणावर आत्महत्येचा विचार केला होता. या व्यसनापायी त्याची बायको, त्याचे कुटुंब, तो स्वत: भयानक परिस्थितीतून गेले आहेत. अशी किती कुटुंबे देशोधडीला लागली असतील, याची गणती नाही.
 
 
या जुगारासाठी झटपट पैसे देणारे ऑनलाइन अ‍ॅपदेखील खरोखर तितकेच झटपट पैसे देतात आणि वसुलीसाठी तितकेच झटपट दारात उभे राहतात. ही वसुलीसुद्धा काही नॉर्मल पद्धतीने होत नाही. दारात उभे राहून चार शिव्या घालूनच ही वसुली होते. वसुलीवाले त्यांचे कर्तव्य करत असले, तरीही सर्व प्रकार अनुभवून माणूस हबकून जातो. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात बाकी काय परिस्थिती होत असेल, हे वेगळे लिहायची गरज नाही.
 
 
 
 
या ऑनलाइन जुगार, कर्ज देणार्‍या अ‍ॅपमधून सुरक्षा व्यवस्थेलासुद्धा मोठा धोका निर्माण होतो. यातील बहुतांश अ‍ॅप्स शत्रुदेशाच्या सर्व्हरवरून चालवली जात असण्याची शक्यता आहे. त्याद्वारे इथला बहुसंख्य लोकांचा डेटा बाहेर देशात जात आहे. सायबर हल्ल्यासारखे धोके अशाच सर्व्हरवरून उद्भवतात. नुकत्याच एका घटनेमध्ये पबजी या ऑनलाइन खेळामधून ओळख आणि परिणामी प्रेम जडल्यामुळे एक पाकिस्तानी स्त्री आपल्या देशात कशा प्रकारे घुसली आहे, याबाबत आपण वाचले असेलच. या संदर्भात सध्या तपास चालू आहे. तपासाअंती काही वेगळेच सत्य समोर आल्यास त्याविषयी आश्चर्य वाटू नये. आपले शत्रुदेश अशा विविध मार्गांनी आपल्या सुरक्षा यंत्रणेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
 
मध्यंतरी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन जुगारावर बंदी घालणारा कायदा करण्याचे विधानसभेत सूतोवाच केले आहे. सरकार त्यांचे काम करेल. सरकारने सर्वात आधी या अ‍ॅपच्या ऑनलाइन/टीव्ही जाहिरातींवर बंदी घालण्याचा विचार करावा. सरकारने हेही लक्षात घ्यावे की तेलंगण, तामिळनाडू अशा राज्यांमधून अशा ऑनलाइन खेळांवर आधीच बंदी घातली आहे. तर दुसरीकडे मराठी अभिनेत्यांनीदेखील आपण कुणासाठी, कसली जाहिरात करत आहोत हे जाणून घ्यावे.
 
online rummy
 
 
मराठी चित्रपट आणि कला क्षेत्राची परंपरा थोर आहे. किंबहुना भारतात चित्रपट आणणारे दादासाहेब फाळके मराठी होते. अनेक सामाजिक विषयांमध्ये मराठी चित्रपटांचे आणि कलाकारांचे भरीव योगदान आहे. ‘एकच प्याला’सारख्या नाटकांमधून समाजविघातक विषयांवर परखडपणे बोलणारी मराठी कलाक्षेत्राची परंपरा आहे.सध्याच्या मराठी कलाक्षेत्राने अगदी त्याच परंपरेला, स्मृतीला स्मरून राहावे अशी अपेक्षा आणि आवाहन करण्यासाठी हे लिहीत आहे. हेही मान्य आहे की कलाक्षेत्र हा व्यवसाय असल्यामुळे त्यात सध्या मंदी आहे, कामे मिळत नाहीत असे असण्याचीदेखील शक्यता आहे; परंतु म्हणून पुढचा-मागचा विचार न करता जे मिळेल ते काम घ्यावे, असेही असू नये.
 
 
जाहिरात केली म्हणून यातून उद्भवणार्‍या विषम स्थितीला हे अभिनेते सर्वस्वी जबाबदार धरता येणार नाहीत, हेदेखील मान्य. परंतु जे याला जबाबदार आहेत, त्याला आपण किंचितसा हातभार लावत आहात, हेही तितकेच सत्य आहे. सामाजिक जाणिवा जागृत असलेल्या जनतेला मराठी कलाकारांकडून ही अपेक्षा नक्कीच नाही.
 
 
दुसरी बाजू अशी की सर्वसामान्य जनतेनेसुद्धा या क्विक मनीच्या नादी न लागण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला, आपल्या ओळखीत, आपल्या नातेवाइकांमध्ये कोणी या नादाला लागले असल्यास त्यांना याच्या विदीर्ण बाजूची ओळख करून दिली पाहिजे. याविरोधात हर प्रकारे बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे.
 
 
या लेखासाठी संशोधन करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहिली. अभूतपूर्व डिजिटल क्रांती झाल्यानंतर जसे क्रांतीचे अगणित फायदे कळून आले, त्याचप्रमाणे या बाबतीतले तोटे आणि धोक्याचे इशारेदेखील कळून आले. परंतु त्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच आता वेळ अशी आली आहे की या संदर्भात माध्यमिक शाळा स्तरावर शिक्षण देण्याचा अगदी गंभीरपणे विचार व्हायला हवा. ‘डिजिटल इंडिया’ करण्याबरोबरच ‘डिजिटल लिटरसी’ वाढवण्याकडेदेखील ध्यान द्यायला हवे, असे वाटत राहिले. सरकारने याबाबत शालेय अभ्यासक्रमात ‘डिजिटल लिटरसी’संदर्भात एखादा विषय अधिकृतरित्या स्वीकृत केल्यास, ऑनलाइन दुष्टचक्रातून उद्भवणारे असे कित्येक सामाजिक आणि राष्ट्रीय धोके टाळता येतील.
एक गोष्ट नक्की की प्रत्येक वेळेस समाजात हतबल झालेल्या द्रौपदीसाठी कोणी कृष्ण धावून येईलच, असे होणार नाही. काही बाबतीत आपणच समजून घेऊन आपल्याला स्वत:च स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबासाठी, राष्ट्रासाठी लढावे लागेल.