हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विवेक मराठी    25-Aug-2023
Total Views |
@सागर शिंदे  8055906039
vivek
भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले, परंतु काही संस्थाने मात्र भारतात सामील झाली नाहीत. त्यातील एक मोठा भूप्रदेश व लोकसंख्या असलेले संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान. निजामाचे जुलमी वर्चस्व असलेल्या या प्रदेशातील जनतेने मात्र निजामाविरुद्ध स्वातंत्र्यासाठी मोठा लढा उभारला. या संघर्षात अनेक वीर हुतात्मा झाले. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात समाविष्ट झाले. हे वर्ष हैदराबादच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. आधुनिक भारताचे महान नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हैदराबाद संस्थान हा मोठा भूप्रदेश आणि तेथील जनता स्वतंत्र व्हावी, याकरिता मोठे योगदान दिले. हैदराबादच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात या स्वातंत्र्यलढ्याचे अनेक पैलू समजून घेणे महत्त्वाचे वाटते.
  
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ने निजामाला स्पष्ट विरोध दर्शवला होता. फेडरेशनचे तत्कालीन प्रांत अध्यक्ष स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब मोरे यांनी निजामाविरुद्ध दलित समाजाला उद्देशून एक पत्रक काढले होते. त्यात म्हटले होते की, ‘निजामाची पदच्युती व्हावी, लोकशाहीवर आधारलेली जबाबदार लोकशाही राज्यपद्धती निर्माण झाली पाहिजे, हे प्रत्येक आंबेडकर अनुयायाचे धोरण असावे, म्हणून अस्पृश्य जनतेने रझाकार संघटनेत जाऊ नये, तसेच मुसलमान धर्मातही प्रवेश करू नये.’ या आवाहनास अनुसरून मराठवाड्यात ठिकठिकाणी झालेल्या निजामविरोधी संघर्षात अनेक दलित बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
 
मक्रणपूर परिषद
 
निजामाच्या राज्यात भाषणस्वातंत्र्याला बंदी होती, त्यामुळे डॉ. आंबेडकरांनासुद्धा भाषण करण्यास बंदी असल्याने हैदराबाद राज्याच्या सरहद्दीलगत या सभा होत असत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठवाड्यातील दलित, वंचित घटकाला स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रेरणा देणारी व निजामविरोधी पहिली जाहीर परिषद दि. 30 डिसेंबर 1938 या दिवशी मक्रणपूर (डांगरा), ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे झाली. ही परिषद म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामातील ऐतिहासिक क्षण होता. या परिषदेत स्वातंत्र्यसेनानी व शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेते भाऊसाहेब बी.एस. मोरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाअगोदर जय भीम या घोषवाक्याचा नारा दिला. हेच घोषवाक्य पुढे अभिवादनाचे, संघर्षाचे प्रेरणादायक प्रतीक बनले. या सभेत डॉ. आंबेडकरांनी संस्थानातील शैक्षणिक सोयीचा अभाव, सामाजिक गुलामगिरी, वेठबिगारी व आर्थिक दुबळेपणा याचा आढावा घेतला. डॉ. आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, “1934 साली मी दौलताबादचा किल्ला पाहण्यास गेलो असता, तेथील किल्ल्याजवळील हौदातील पाण्याने माझ्या सहकार्‍यांनी हातपाय धुतले, तेव्हा हौद बाटला म्हणून तेथील लहानथोर मुसलमान लोकांनी व दहा-बारा वर्षे वयाच्या एका मुस्लीम मुलीने आम्हाला एक तास शिव्या देऊन आमच्या आयाबहिणींचा उद्धार केला.” निजामाच्या काळात मुस्लिमांकडून अस्पृश्यता पाळली जात असल्याचा अनुभव खुद्द डॉ. आंबेडकर व त्यांच्या सहकार्‍यांना घेतल्याचे लक्षात येते. बाबासाहेब त्यांच्या भाषणात पुढे म्हणतात, “दुसरे म्हणजे मी मुंबई व सी.पी. इलाख्यात अडचणीच्या वेळी मुसलमानांना मदत करतो, तेव्हा निजाम सरकारने व मुसलमानांनी आम्हाला मदत करावयास पाहिजे; पण असे होत नाही, उलट त्यांनी आम्हास सभाबंदी घालावी, हे लाजिरवाणे आहे. या संस्थानात अस्पृश्यांसाठी शाळा नसाव्यात ही आश्चर्याची गोष्ट आहे. संस्थानात एकच अस्पृश्य मुलगा बी.ए. झाला आहे. पण सर अकबर हैदरी यांना शिफारस पत्र देऊनही व त्यांची स्वत: भेट घेऊनही त्यास नोकरी मिळाली नाही. निजाम सरकारची शिष्यवृत्ती घेऊन या संस्थानातील अनेक विद्यार्थी लंडनला शिक्षणासाठी गेले. पण त्यामध्ये केवळ एकच अस्पृश्य विद्यार्थी होता. कोल्हापूर व बडोदा संस्थानांप्रमाणेच हे संस्थान अस्पृश्यांना शिष्यवृत्ती देऊन लंडनला शिक्षणासाठी पाठवील, ही माझी आशा फोल ठरली.” दलितांना उद्देशून बाबासाहेब पुढे म्हणाले, “तुमच्यावर अनंत बंधने आहेत. तुम्हाला भाषणस्वातंत्र्य व मिरवणूक स्वातंत्र्य नाही. तेव्हा मी तुमची दु:खे नाहीशी करण्याचा प्रयत्न करीन. येथील राज्य करण्याची पद्धत सदोष असल्यामुळे तुम्ही आतून काही करू शकत नाही, पण मी बाहेरून जरूर करीन, या परिषदेत पास झालेले सर्व ठराव सर अकबर हैदरी यांच्याकडे पाठवीन.”
 
vivek 
 
मक्रणपूर परिषदेनंतर धाराशिवजवळील व सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील तडवळा ढोकी येथे 23 फेब्रुवारी 1941 रोजी मराठवाड्यातील महार मांग वतनदारांची परिषद आयोजित करण्यात आली. भालेराव गुरुजी हे या परिषदेचे संयोजक होते. तडवळा ढोकीचे दीवचंद कदम हे अध्यक्ष होते, तर बाबूराव बनसोडे हे स्वागताध्यक्ष होते. ही शैक्षणिक परिषद होती. या परिषदेत बाबासाहेबांनी दलितांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक व शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेऊन दलितांना मार्गदर्शन केले. ते आपल्या भाषणात म्हणाले, “हैदराबाद संस्थान देशात श्रीमंत व मोठे संस्थान असूनही येथे अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय नाही. या ठिकाणी लाखो एकर जमिनी पडीक असूनही निजामाने त्या दलितांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दलितांचे कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. आपले प्रश्न सरकारच्या कानावर घालण्यासाठी तुम्ही संघटित झाले पाहिजे. बावन हक्क, गावकीची कामे व वेठबिगारी करणे बंद करा, मृत मांस खाऊ नका, आपल्या मुलामुलींना शाळेत पाठवा.” निजामाच्या राज्यात दलितांची काय स्थिती होती, हे बाबासाहेबांच्या तत्कालीन भाषणांमधून लक्षात येते. हैदराबाद संस्थानात ‘हैदराबाद शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ ही संघटना कार्यरत होती. या संघटनेचे नेते होते जे.एच. सुबैय्या. डॉ. आंबेडकरांच्या मार्गदर्शनाने ही संघटना सक्रिय होती. संस्थानातील दलित वर्गाच्या समस्यांविषयी संघटना कार्यरत होती. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन व्हावे, ही मागणी या संघटनेने शेवटपर्यंत लावून धरलेली होती.
 
 
दलित वर्गास बाबासाहेबांचे आवाहन
 
 
पाकिस्तानातील आणि हैदराबाद संस्थानातील दलितांच्या स्थितीबद्दल आणि मुस्लिमांकडून होत असलेल्या छळ आणि धर्मांतराबाबत डॉ. आंबेडकर अतिशय जागृत आणि चिंतित होते. याविषयी धनंजय कीर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चरित्र ग्रंथात पुढीलप्रमाणे माहिती देतात - ‘मुसलमानांची संख्या वाढावी, म्हणून निजामाच्या हैदराबाद संस्थानामध्येदेखील दलित समाजातील लोकांना मुसलमान धर्माची दीक्षा दिली जात आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले. त्यामुळे आंबेडकरांनी आपल्या लोकांस असा उपदेश केला की, ’पाकिस्तानमध्ये पेचात सापडलेल्या दलित समाजाने सापडेल त्या मार्गाने व साधनाने हिंदुस्थानात यावे, असे मी सांगू इच्छितो. दुसरी एक गोष्ट मला सांगावयाची आहे ती अशी की, पाकिस्तान किंवा निजामचे हैदराबाद संस्थान यांतील मुसलमानांवर किंवा मुस्लीम लीगवर विश्वास ठेवण्याने दलित समाजाचा घात होईल. दलित वर्ग हिंदू समाजाचा तिरस्कार करतो म्हणून मुसलमान आपले मित्र आहेत, असे मानण्याची वाईट खोड त्यांना जडली आहे. ती अत्यंत चुकीची आहे.’ पाकिस्तानातल्या आणि हैदराबादमधल्या दलित समाजाने केवळ जीव वाचवण्याच्या हेतूने इस्लाम धर्माच्या दीक्षेला बळी पडू नये, असा आंबेडकरांनी त्यांना सल्ला दिला. ज्यांना बळजबरीने पाकिस्तानात किंवा हैदराबादमध्ये इस्लाम धर्माची दीक्षा दिली होती, त्या दलित लोकांना त्यांनी असे आश्वासन दिले की, त्यांचे धर्मांतर होण्यापूर्वी त्यांना जसे वागवण्यात येई, तशीच त्यांना येथे आल्यावर पुन्हा स्वीकृत करून घेऊन बंधुभावाची वागणूक मिळेल. हिंदूंनी त्यांचा कितीही छळ केला, तरी त्यांनी आपले मन कलुषित करून घेऊ नये. हैदराबादमधील दलित वर्गांनी निजामाची - जो उघडउघड हिंदुस्थानचा शत्रू आहे - त्याची बाजू घेऊन आपल्या समाजाच्या तोंडाला काळिमा लावू नये.’ असा त्यांनी अस्पृश्य वर्गास इशारा दिला. पाकिस्तानमधील दलितवर्गीय लोकांना हिंदुस्थानात आणण्याची भारत सरकारने त्वरित व्यवस्था करावी, अशी त्यांनी भारताचे पंतप्रधान नेहरू यांच्याकडे मागणी केली. निजामाच्या हैदराबाद संस्थानाविरुद्ध भारतीय सरकारने जेव्हा दोन वर्षानंतर पोलीस कारवाई केली, तेव्हा आंबेडकरांनी त्या कारवाईचे प्रमुख गृहमंत्री सरदार पटेल यांना मोठ्या नेटाचा पाठिंबा दिला. (संदर्भ - धनंजय कीर लिखित ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चरित्र, पॉप्युलर प्रकाशन, पृ. क्र. 443)
 
 
हैदराबाद संस्थानात धर्मांतराची मोहीम
 
हैदराबाद संस्थानात धर्मांतराची मोहीमच सुरू होती. लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांच्या ‘कर्मयोगी संन्यासी’ स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील लिहिलेल्या ग्रंथात याबाबत माहिती दिली आहे. बहादूरखान याने 1927मध्ये हैदराबादेत ‘तबलीग’ म्हणजेच शुद्धीकरणाची मोहीम सुरू केली. शुद्धीकरणाचा सरळ अर्थ इतर धर्मीयांना मुस्लीम करणे असा होता. या बहादूरखानला निजाम उस्मान अलीने ‘नवाबबहादूरयारजंग’ असा खिताब दिला व जहागीरही दिली. बहादूरखानने धर्मांतराची मोहीम जोरकसपणे चालवली आणि निजाम नोकरदारांनी त्याला त्यासाठी मदत केली. शेकडो पगारी धर्मप्रचारकांची नेमणूकसुद्धा करण्यात आली होती. ब्रिटिश रेसिडेंटने 1 सप्टेंबर 1936 रोजीच्या त्यांच्या पाक्षिक अहवालात लिहिले आहे की, गेल्या दशकात 20,000हून अधिक दलितांना इस्लाम धर्माची दीक्षा देण्यात आली आहे. 1936 साली धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या एकाच दौर्‍यात बहादूरयार जंग याने 550 दलितांना मुस्लीम बनवले होते. ही आकडेवारी पाहता धर्मांतराची चळवळ किती व्यवस्थित सुरू होती, हे लक्षात येते. धार्मिक, राजकीय हेतूने ही धर्मांतर चळवळ सुरू होती.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी
 
 
प्रचंड अभ्यास आणि दूरदृष्टी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वर्गाला स्पष्ट आवाहन करताना दिसतात, कारण मुळात इस्लाम आणि इस्लामी राजवटी याबद्दल बाबासाहेबांचा सखोल अभ्यास होता. इस्लामी पाकिस्तानात किंवा निजामी हैदराबादमध्ये दलितांचे तसेच गैरमुस्लिमांचे कल्याण होऊ शकणार नाही, हे स्पष्टच होते. इस्लामच्या संदर्भात बाबासाहेबांनी Pakistan or the Partition Of India या ग्रंथात विस्तृत आणि तथ्यपूर्ण लिखाण केले आहे व DR. Babasaheb Ambedkar Writings And Speeches या प्रकल्पाअंतर्गत जे विविध खंड आहेत, त्यातील 8व्या खंडामध्ये हा ग्रंथ समाविष्ट केलेला आहे. इस्लामी आक्रमणांच्या हेतूबद्दल बाबासाहेब लिहितात - ‘ही मुस्लीम आक्रमणे केवळ लूट किंवा विजयाच्या लालसेपोटी केलेली नव्हती. त्यांच्यामागे आणखी एक हेतू होता... हिंदूंच्या मूर्तिपूजेवर व अनेकेश्वरवादावर प्रहार करणे आणि भारतात इस्लामची स्थापना करणे, हीदेखील या मोहिमेची उद्दिष्टे होती, याबद्दल मुळीच शंका नाही.’ (संदर्भ - खंड 8, पृ.क्र. 55.) इस्लामचे तत्त्व व त्यानुसार मुस्लिमांच्या निष्ठा याबाबत बाबासाहेब लिहितात - ‘इस्लाम हा मानवांमध्ये अगदी कठोर विभागणी करतो. इस्लाम हे एक बंदिस्त मंडळ आहे आणि मुस्लीम व गैर-मुस्लीम यांच्यात तो जो फरक करतो, तो एक अतिशय वास्तविक व पराकोटीचा फरक आहे. इस्लामचे बंधुत्व हे मानवतेचे वैश्विक बंधुत्व नाही. ते केवळ मुस्लिमांसाठी मुस्लिमांचे बंधुत्व आहे. त्यात बंधुत्व आहे, पण इस्लामी मंडळातील लोकांपर्यंत त्याचा फायदा मर्यादित आहे. जे लोक या मंडळाच्या बाहेर आहेत, त्यांच्यासाठी अवहेलना व शत्रुत्वाशिवाय काहीही नाही. इस्लामचा दुसरा दोष असा आहे की ती एक सामाजिक स्वयंशासनाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था स्थानिक भूमीतील शासनसंस्थेशी सुसंगत नाही, कारण मुस्लिमाची निष्ठा त्याच्या निवासी देशावर नाही, तर त्याच्या धर्मावर असते. पोषण करणारी भूमी हाच माझा देश हा विचार मुस्लिमांसाठी अकल्पनीय आहे. त्यांच्यासाठी जिथे इस्लामची राजवट आहे तो त्यांचा देश आहे. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, इस्लाम खर्‍या मुस्लिमाला भारताला आपली मातृभूमी म्हणून स्वीकारण्याची आणि हिंदूला आपले भाऊबंद मानण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्यामुळेच बहुधा एक महान भारतीय पण सच्चा मुस्लीम असलेल्या मौलाना मोहंमद अली यांनी स्वत:ला भारतात दफन करण्याऐवजी जेरुसलेममध्ये दफन करणे पसंत केले असावे.’ (संदर्भ - खंड 8, पृ.क्र. 331.)
 
 
पोलीस अ‍ॅक्शन आणि डॉ. आंबेडकर
 
भारत सरकारने हैदराबाद संस्थानावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सरदार पटेल यांनी तत्कालीन कायदा मंत्री डॉ. आंबेडकरांशी सविस्तर चर्चा केली होती. डॉ. आंबेडकरांचे मत असे होते की, आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची युनोमध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले असे अनेक अर्थ निघू शकतील. डॉ. आंबेडकरांनी सूचना केली की, आपण सैन्य पाठवू, पण या कारवाईला ‘पोलीस अ‍ॅक्शन’ असे नाव देऊ.” सरदार पटेल यांनी डॉ. बाबासाहेबांच्या सूचनेचा स्वीकार केला. त्याअगोदर आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोमध्ये हैदराबाद संस्थानाची बाजू मांडावी, म्हणून निजामाने डॉ. आंबेडकरांना विनंती केली होती. मात्र निजामाची विनंती धुडकावून लावत निजामाला युनोमध्ये प्रतिवाद करण्यासाठी यत्किंचितही जागा राहणार नाही, अशा रितीने आंतरराष्ट्रीय कायद्याचा मागोवा घेत कायदेशीर बाजू सांभाळण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. सप्टेंबर महिन्यात भारताने सैन्य पाठवले, त्यापुढे निजामाचा टिकाव लागला नाही आणि निजाम शरण आला. 17 सप्टेंबर 1948 या दिवशी हैदराबाद संस्थान निजामाच्या जुलमी वर्चस्वातून मुक्त झाले.
 
समारोप
 
निजामाची राजवट संपली असली, तरी त्या धर्मांध मानसिकतेच्या फुटीर शक्ती आजही टिकून आहेत व सक्रियसुद्धा आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातली. या संघटनेच्या अनेक म्होरक्यांना मराठवाड्यातून अटक झाली आहे. अनेक दंगली, हिंसक घटना व देशविघातक कारवायांमध्ये या संघटनेचे लोक कार्यरत आहेत. AIMIM हा पक्ष आणि त्यांचे नेते मुक्तिदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे टाळतात. 17 सप्टेंबरला दर वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम होत असतो. छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील हे लोकप्रतिनिधी असूनही ते या कार्यक्रमाला गैरहजर राहताना दिसतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश देताना दिसत नाहीत. डॉ. आंबेडकरांचा वारसा सांगणारे प्रकाश आंबेडकर यांनी 2029च्या लोकसभा निवडणुकीत AIMIMशी युती केल्याने इम्तियाज जलील खासदार झाले. परंतु प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले असताना दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचे विधान केले की, ‘मुस्लीम मते न मिळाल्यानेच आमचा पराभव झाला.’ त्यानंतर त्यांनी युती तोडली. नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी अत्याचारी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली व एक अर्थाने औरंगजेबाचे उदात्तीकरण केले. यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्रामात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती, हे समजून घेणे आजही तितकेच महत्त्वाचे आहे. भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी धर्मांध निजामाला तसेच दलित, वंचित समाजाच्या होत असलेल्या इस्लाम धर्मांतराला विरोध केला. मराठवाड्यातील दलितांची स्थिती बिकट होती. निजामाकडून होत असलेले जुलूम, पिळवणूक, तसेच गरिबी, शिक्षणाचा प्रचंड अभाव आणि जातीय विषमता, भेदभाव अशी ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक होते. डॉ. आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर शहरात शिक्षण संस्था सुरू केली. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या संघर्षात अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राणांची आहुती दिली. डॉ. बाबासाहेबांच्या निजामविरोधी स्पष्ट भूमिकेमुळे अनेक दलित बांधवांनी या मुक्तिसंग्रामात सहभाग नोंदवला. स्वामी रामानंद तीर्थ, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे धर्मांध निजामाच्या तावडीतून मराठवाडा स्वतंत्र झाला. भारत एक राहिला व येथील जनतेसाठी विकासाची दारे खुली झाली.
 
संदर्भसूची -

1. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, लेखक - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन.
2. DR. Babasaheb Ambedkar Writings And Speeches - Volume No. 8.
3. ‘कर्मयोगी संन्यासी’, लेखक - नरेंद्र चपळगावकर, मौज प्रकाशन.
4. ‘बाबासाहेबांच्या चरित्र लेखांतील उणीवा’, लेखक - ज.वि.पवार, अस्मिता कम्युनिकेशन प्रकाशन.
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा, लेखक - डॉ.सुधाकर नवसागर, सौरव प्रकाशन.
6. लेख - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम’, लेखक - डॉ. अनिल मुरलीधर कठारे.
 
7. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम’, संकलक - भरत आमदापुरे, मर्वेन टेक्नोलॉजी.