चंद्रावतरण

विवेक मराठी    25-Aug-2023
Total Views |
 @डॉ. बाळ फोंडके
 
आजवर अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनी चंद्रावर आपली यानं उतरवलेली आहेत. त्या दृष्टीने आपण चौथा देश ठरणार आहोत. पण कोणीही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी केली नव्हती. ती करणारे आपणच पहिले ठरत आहोत. चंद्राचा हा प्रदेश अधिक खडकाळ तसंच अतिशीत तापमानाचा आहे. त्यापायी ते आव्हान अधिकच गहिरं झालं आहे. चंद्राचा जो अर्धा भाग आपल्याला कधीच दिसत नाही, ज्याला ‘डार्क साइड ऑफ द मून’ असं म्हटलं गेलं आहे, त्यात त्याचा समावेश असल्याने त्या प्रदेशासंबंधी माहिती मिळवण्याच्या दृष्टीने तिथे जाणं महत्त्वाचं होतं. ते काम चंद्रयान 3 करणार आहे.
 
mission chandrayaan 3
संचलन करणार्‍या सैनिकांच्या तुकडीला शिस्तीत ठेवण्यासाठी त्यांचा कप्तान जी ‘लेफ्ट-राइट-लेफ्ट’ ही उद्घोषणा करतो, तिच्यासारखीच लयबद्धता असणारा ‘तेवीस-आठ-तेवीस’ हा दिनांक आपल्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, यात शंका नाही. वडिलांबद्दल आपल्याला धाकयुक्त आदर वाटत असतो, पण मामावर मात्र निखळ प्रेम.. म्हणूनच असावं, जीवनदात्या सूर्याकडे डोळे वर करून पाहण्याचीही हिम्मत न करणारे आपण चंदामामाच्या गळ्यात पडतो. चंद्राबद्दलची ही आपुलकी लहान वयापासूनच प्रस्थापित होत असते. ‘चांदोबा, चांदोबा भागलास का?’पासून सुरू झालेल्या जवळिकीचं रूपांतर त्यालाच साक्ष ठेवून तारुण्यात घेतलेल्या आणाभाकांपर्यंत होतं आणि त्या पहिल्या प्रीतीचा उमाळा ओसरल्यानंतरही उतारवयात ‘तोच चंद्रमा नभात’ म्हणत त्याच्याशी असलेलं नातं वृद्धिंगत करण्याचीच धडपड केली जाते.
 
 
 
‘स्टार ट्रेक’ या गाजलेल्या वेबमालिकेचं घोषवाक्य होतं ‘टु गो व्हेअर नो वन हॅज गॉन बिफोर’, तेच प्रत्यक्षात आणणारी चंद्रयान 3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची आजवरची सर्वात महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. चंद्रयान 2 हे अगदी शेवटच्या क्षणी चंद्रावर अलगद उतरू शकलं नाही. त्याला अपयश म्हणणं योग्य होणार नाही, कारण कोणताही वैज्ञानिक प्रयोग किंवा मोहीम कधीच अयशस्वी होत नसते. ती अपेक्षापूर्ती करू शकली नाही, असं म्हणणं अधिक वास्तव होईल. कारण त्या घटनेतूनही काही महत्त्वाचे संकेत मिळतात, काही मोलाचे धडे मिळतात. त्यांच्या मदतीने आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात मूल्यवान भर घालून पुढची मजल मारता येते. तेच चंद्रयान 3ने अधोरेखित केलं आहे.
 
 
चंद्रावर, आणि तेही त्याच्या दक्षिण ध्रुवावर, अलगद उतरणं हे तर या मोहिमेचं प्रमुख उद्दिष्ट होतंच. पण तेवढंच नाही. गेल्या मोहीमेतून चंद्रावर पाणी असल्याचे संकेत मिळाले होते. त्याचा पाठपुरावा करत त्यासंबंधीची अधिक सखोल माहिती मिळवणं, ते नेमकं कुठे कुठे आहे, द्रवरूपात म्हणजे वाहतं आहे की घनरूपात म्हणजे गोठलेलं आहे, याचा धांडोळा घेणं हेही उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. चंद्रावर जर मानवी वस्ती करायची असेल, तर ही माहिती कळीची असणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर आणि त्याच्या खालीही, अनेक उपयुक्त खनिजांचा खजिना असल्याचा कयास आहे. त्याचाही मागोवा घ्यायचा आहे. चंद्रावर तळ ठोकून सौरमालेतील मंगळ आदी इतर ग्रहांकडे कूच करण्याच्या दृष्टीने वेध घेण्यावरही लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.
 
 
mission chandrayaan 3
 
चंद्रयान 3ने गेल्या जुलै महिन्यात श्रीहरीकोटा येथून प्रस्थान केलं. चाळीस दिवसांचा प्रवास करून ते आपल्या मुक्कामाला पोहोचण्याचं वेळापत्रक आखलं गेलं होतं. त्यासाठी प्रथम पृथ्वीभोवतीच लंबवर्तुळाकार कक्षेत त्याची स्थापना करण्यात आली. त्या लंबवर्तुळाकार कक्षेचा परीघ त्यानंतरच्या साडेतीन आठवड्यात वाढवण्यात आला. थोडक्यात ते पृथ्वीपासून अधिकाधिक दूरवर नेण्यात आलं. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार त्या बलाची ओढ पृथ्वीपासूनच्या अंतरानुसार कमी कमी होत जाते. जर अंतर दुपटीने वाढलं, तर ओढ चौपटीने घटते. अंतर तिपटीने वाढलं, तर गुरुत्वाकर्षणाची ओढ नऊ पटीने कमी होते. ती कमी झाली की तिच्यातून सुटका करून घेत चंद्राच्या दिशेने त्याला हाकारणं सोपं होतं. ती पायरी ओलांडून ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या टप्प्यात आलं की त्या उपग्रहाभोवतीच्या कक्षेत ते भ्रमण करू लागतं. तिथेही कक्षा लंबवर्तुळाकारच असते. तिचा परीघही यानावरची बूस्टर इंजिनं कार्यान्वित करून हळूहळू कमी केला गेला. त्या कारवाईपोटी ते चंद्राच्या जवळ पोहोचलं. त्याची शेवटची कक्षा शंभर गुणिले तीस किलोमीटर होती. म्हणजे त्या कक्षेत एका क्षणी ते चंद्रापासून केवळ तीस किलोमीटर अंतरावर होतं, तर इतर वेळी शंभर किलोमीटर दूरवर होतं. ज्या क्षणी ते चंद्रापासून किमान अंतरावर होतं, त्या क्षणी त्या यानातील अवतरणयान विक्रम आणि कांगारूप्रमाणे त्याच्या पोटात असलेलं प्रज्ञान हे संचारयान विलग करण्यात आलं. नवशिक्याला सायकल शिकवताना जसा एका क्षणी त्या वाहनावरचा हात सोडून देत स्वाराला स्वबळावर पुढे चालण्याची दीक्षा दिली जाते, तशातलाच हा प्रकार. विक्रम आता आपल्या पोटातल्या बाळासहित पुढचा प्रवास स्वबळावर करत होतं.
 
 
या पुढचा टप्पा हा अतिशय आव्हानात्मक होता. इस्रोचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ यांनी त्या अखेरच्या पंधरा मिनिटांचं वर्णन ‘मोमेन्ट्स ऑफ टेरर’ - ‘धडकी भरवणारे क्षण’ असंच केलं होतं. कारण त्या अल्प कालावधीतच चंद्रयान 2मधील अवतरणयान चंद्रावर हलक्या पावलांनी उतरण्याऐवजी कोसळलं होतं, त्याचे पाय मोडले होते आणि निरुपयोगी ठरलं होतं.
 
 
 
पण त्याची कारणं शोधून चंद्रयान 3मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या. चंद्रापासून आपण किती उंचीवर आहोत याचं मोजमाप करण्यासाठीच्या त्या वेळच्या यंत्रणेने घात केला होता, हे समजल्यावरून ती अधिक बळकट करण्यात आली होती. तसंच विक्रमचा वेग अधिक अचूकपणे मोजणारी व्हेलॉसीमीटरही अंतर्भूत करण्यात आली होती. त्यांना लेझर संवेदकाची जोड देऊन त्यात कोणतीही चूक होणार नाही याची तजवीजही करण्यात आली होती. यात झालेल्या गफलतीपायीच चंद्रयान 2च्या अवतरणयानाला आपला वेग आवरता आला नव्हता. तसंच उतरण्यापूर्वी त्या परिसरातल्या चंद्राच्या पृष्ठभागाचं सटीक अवलोकन करून वाटेत कोणताही अडथळा नाही, याची खात्री करून घेतली जाणार होती.
 
mission chandrayaan 3 
 
अवतरण अतिशय आव्हानात्मक होतं, यात शंकाच नाही. आपल्या अंतराळ वैज्ञानिकांची कसोटी पाहणारी ती प्रक्रिया होती. ज्या वेळी अवतरणयान मुख्य यानापासून वेगळं झालं, तेव्हा त्याचा वेग ताशी 6000 किलोमीटर होता. त्यात चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीचीही भर घातली गेली होती. त्यानंतर विक्रमवरील वेग कमी करणारे अग्निबाण, डी बूस्टर कार्यान्वित करून उतरण्याच्या क्षणी तो वेग जवळपास शून्यावर आणावा लागणार होता. तीस किलोमीटर अंतरावर आल्यानंतर आणखी अग्निबाण वापरून वेग आणखी कमी करण्यात आला. ते करत असतानाच विक्रमवरील कॅमेर्‍यांसारखी वेधयंत्रणा चंद्राच्या त्या प्रदेशातील परिसराची पाहणी करत होती. त्यातूनच मग उतरण्यासाठीची नेमकी जागा निश्चित केली गेली. चंद्राकडे वाटचाल करताना ते चंद्रभूमीला समांतर म्हणजे आडवं होतं. त्यामुळं आता ते उभं करण्यासाठी, चंद्राच्या पृष्ठभागाला काटकोनात आणण्यासाठी, 90 अंशातून फिरवलं गेलं. त्याच वेळी यानावरच्या थ्रस्टरनी आपलं काम करायला सुरुवात केली. नववधूला हाताने धरून उंबर्‍यावरचं माप ओलांडून आत प्रवेश करायला मदत करावी, तसं या थ्रस्टरनी विक्रमला चंद्रावर उतरवलं. त्यानंतर मग प्रज्ञान हे संचारयान विक्रमची साथ सोडून चंद्रावर फेरफटका मारायला सिद्ध झालं.
 
 
या सर्व प्रक्रियेत चंद्राच्या पृष्ठभागावरची धूळ डोकेदुखी वाढवण्याची शक्यता होती. कारण विक्रमच्या इंजिनापायी उडणारा झोत त्या धुळीलाही उडायला उद्युक्त करणार होता. हेलिकॉप्टर उतरताना त्याच्या पंख्याच्या वार्‍यापायी जमिनीवरची धूळ उडते. त्यासारखीच ही परिस्थिती होती. नासाने धाडलेल्या अपोलो 15च्या अवतरणाच्या वेळी ती धूळ कशी पसरली होती, याची चित्रफीत उपलब्ध आहे. ती धूळ दृश्यमानतेत बाधा आणण्याची शक्यता होती. खालचा पृष्ठभाग नीटसा दिसणार नव्हता. ते टाळण्यासाठीही शक्तिवान कॅमेरे बसवण्यात आले. तसंच विक्रमचे पायही अधिक मजबूत करण्यात आले. उतरण्याच्या क्षणी बसलेला धक्का ते सहन करतील आणि ताठ उभे राहतील, अशीच अपेक्षा होती.
 
मोहीम यशस्वी करण्यात इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ यांच्यासह संपूर्ण टीमचं मोठं योगदान

mission chandrayaan 3 
 
रशियानेही याच वेळी आपलंही ल्यूना 25 हे यान धाडलं होतं. त्याची जणू आपल्या यानाशी शर्यतच आहे, असा प्रसारमाध्यमांनी समज करून दिला होता. तो बरोबर नाही. अशी कोणतीही शर्यत लावण्याचा वा ती जिंकण्याचा मानस इस्रोने व्यक्त केलेला नाही. तरीही या दोन यानांची तुलना आपल्या नागरिकांच्या मनात केली जात होतीच. ल्युनाचं वजन, त्यावरील प्रयोगांच्या सामग्रीसह 1780 किलोग्रॅम होतं. आपलं यान त्याच्या दुपटीहून अधिक वजनदार, 3800 किलोग्रॅम आहे. जे निरनिराळे प्रयोग आणि सर्वेक्षणं अपेक्षित आहेत, त्यांची संख्याही जास्त आहे. तसंच ल्युनामध्ये केवळ अवतरणयानाचाच समावेश होता. चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करून माहिती मिळवणारं प्रज्ञानसारखं कोणतंही यान त्यात अंतर्भूत नव्हतं. ल्युनाने काय किंवा आजवर चंद्रावर उतरवलेली अमेरिका, रशिया आणि चीन आदी देशांच्या यानाने पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर चार-पाच दिवसांमध्येच पार केलेलं असताना आपल्या यानाने त्याच्या दसपटीने वेळ का घ्यावा? हाही प्रश्न अनेकांना छळत होता. त्याची दोन प्रमुख उत्तरं आहेत. आपल्या वजनदार यानाला थेट चंद्राकडे धाडण्यासाठी आवश्यक असलेलं ताकदवान प्रक्षेपकास्त्र आपल्याकडे नाही. ज्या जिओस्टेशनरी सॅटलाइट लॉन्च व्हेइकलच्या जीएसएलव्हीच्या साहाय्याने चंद्रयानाचं उड्डाण केलं गेलं, त्याची तेवढी क्षमता नाही. म्हणूनच आपण आडवळणाचा मार्ग स्वीकारला होता. माथेरानसारख्या तुलनेने लहानखुर्‍या टेकडीवर आगगाडी चढतानाही थेट तिथपर्यंत जात नाही. त्या टेकडीला प्रदक्षिणा घालतच घालतच ती वर वर चढत जाते. चंद्रयानानेही तोच पर्याय स्वीकारला होता. यानाला पृथ्वीभोवतीच प्रदक्षिणा घालायला लावून ते विवक्षित ठिकाणी पोहोचलं की गोफणीतून चेंडू दूरवर फेकावा तसं यान चंद्राकडे धाडलं गेलं. त्याला स्लिन्गशॉट म्हटलं गेलं आहे. तसं केल्याने इंधनाचीही मोठ्या प्रमाणावर बचत झाली. कारण यानाला पृथ्वी आणि चंद्र या दोघांच्याही गुरुत्वाकर्षणाचा चांगलाच हातभार लागला. पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणा कक्षांचं अंतर टप्प्याटप्प्याने वाढवत एका क्षणी त्याला चंद्राच्या दिशेने धाडणं आणि ते चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थानापन्न झाल्यानंतर त्याचं अंतर कमी करत जाणं हा सोईचा मार्ग आखला गेला. साहजिकच यासाठी अधिक वेळ लागणारच! त्यापायी मोहिमेच्या एकूण खर्चातही भरीव बचत झाली आहे.
 
 
आजवर अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनी चंद्रावर आपली यानं उतरवलेली आहेत. त्या दृष्टीने आपण चौथा देश ठरणार आहोत. परंतु यापैकी सर्वच यानं चंद्राच्या विषुववृत्ताच्या आसपासच उतरली होती. कोणीही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी केली नव्हती. ती करणारे आपणच पहिले ठरत आहोत. अर्थात ते ध्येय ठेवण्यामागे नेमकं कोणतं प्रयोजन आहे, असा सवालही अनेकांच्या मनात फडा काढून उभा आहे. तो रास्तही आहे. कारण चंद्राचा तो प्रदेश अधिक खडकाळ तसंच अतिशीत तापमानाचा आहे. त्यापायी ते आव्हान अधिकच गहिरं झालं आहे. तरीही चंद्राचा जो अर्धा भाग आपल्याला कधीच दिसत नाही, ज्याला ‘डार्क साइड ऑफ द मून’ असं म्हटलं गेलं आहे, त्यात त्याचा समावेश असल्याने त्या प्रदेशासंबंधी माहिती मिळवण्याच्या दृष्टीने तिथे जाणं महत्त्वाचं होतं. अमेरिकेने आर्टेमिस मोहीम त्याच उद्देशाने आखली आहे. पण ती कार्यान्वित होण्यासाठी 2025ची वाट पाहावी लागेल.
 
 
या प्रदेशात एक विराट विवर आहे. त्याच्यामध्ये आणि एकंदरीतच त्या ध्रुवीय प्रदेशामध्ये भूगर्भशास्त्रीय माहितीचा खजिना असल्याचं अनुमान वैज्ञानिकांनी काढलेलं आहे. तिथे सापडण्याची शक्यता असलेल्या पदार्थांमधून चंद्राच्या जन्माचं गूढ उकलण्यास मदत होणार आहे. तिथल्या अतिशय शीत अवस्थेपायी गोठलेल्या पाण्याचा साठा तिथे मोठ्या प्रमाणावर असावा, असा अंदाज केला गेला आहे. प्रज्ञानकडून त्याचीही छाननी होणं अपेक्षित आहे.
 
 
 
तरीही हा अव्यापारेषु व्यापार आपण का करत आहोत? यातून देशाचा नेमका कोणता फायदा होणार आहे? अशा शंका काढल्या जातच आहेत. या मोहिमेतून आपलं अंतराळ तंत्रज्ञान किती विकसित आहे, याची आपण जगाला जाहीर ग्वाही देणार आहोत. आज या तंत्रज्ञानाचा, खासकरून त्याच्या दूरसंवेदन प्रणालीचा, रिमोट सेन्सिंगचा वापर करत आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या आणि त्याच्या खाली दडलेल्या नैसर्गिक, मानवनिर्मित सामग्रीची अचूक आणि यथार्थ माहिती मिळवीत आहोत. तिला जगभरातून मागणी असल्यामुळे त्याचा व्यापारही करत आहोत. त्यातून आपल्याला अमूल्य परकीय चलन मिळत आहे. आपल्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यांची जाणीव या व्यापाराला अधिक चालना देण्यात यशस्वी होईल, यात काय शंका!
 
 
यानंतरही दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आपण केली आहे. ‘गगनयान’ या मोहिमेतून भारतीय अंतराळवीरांना आपण अवकाशात पाठवण्याचं ध्येय ठेवलं आहे. तसंच ‘आदित्य’ मोहिमेतून सूर्याविषयी अधिक ज्ञान मिळवण्याचं उद्दिष्टही आहे. या मोहिमांना चंद्रयान मोहिमेतून मिळालेल्या विदेचा भक्कम पाठिंबा प्राप्त होईल.
 
 
‘हम भी कुछ कम नही’ हे जगाला ठणकावून सांगत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचं कार्य चंद्रयान पार पाडत आहे, याचा अभिमान आपण बाळगायला हवा.