@दत्ता जोशी
आर्थिक उलाढाल हा उद्योग विस्ताराचा एक महत्त्वाचा निकष असतो, त्याला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली की सारे संदर्भ बदलतात. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. ‘टाटा उद्योगसमूह’ हा जगभरात विश्वासाचे प्रतीक ठरला आहे. शतकोत्तर वाटचाल आणि तीन पिढ्यांच्या योगदानातून विस्तारलेल्या या उद्योगसमूहाचे आजचे नेतृत्व रतन टाटा समर्थपणे सांभाळत आहेत. या उद्योगसमूहाच्या गौरवपूर्ण वाटचालीचा हा संक्षिप्त वेध.
केवळ नफा कमावणे एवढा एकच उद्देश न ठेवता देशकारणासाठी समर्पित भावाने कार्यरत असलेला उद्योगसमूह म्हणजे ‘टाटा उद्योगसमूह’. सुमारे 150हून अधिक वर्षांचा संपन्न वारसा आणि समाजाधिष्ठित परंपरा अभिमानाने मिरविणार्या या उद्योगसमूहाच्या नेतृत्वाने - रतन टाटा यांनी 19 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारला, तेव्हा खर्या अर्थाने या पुरस्काराचाच गौरव झाला. हा पुरस्कार ‘रतन टाटा’ या व्यक्तीला नव्हता, तर ते ज्या उद्योगसमूहाचा वारसा घेऊन पुढे जात आहेत, त्या समूहाच्या आजवरच्या वाटचालीचा, कार्याचाच तो गौरव आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. उलाढालीत टाटांहून अधिक आकडेवारी गाठणार्या कंपन्या अनेक असू शकतील, पण मानवता या निकषावर टाटांना असलेले अग्रस्थान अढळ राहणार आहे.
खरीखुरी भारतीय ‘मल्टीनॅशनल’ कंपनी म्हणता येईल अशा या उद्योगाविषयी आजवर जेवढे लिहिले गेले आहे ते कमीच वाटावे, अशी ही उद्योजकीय परंपरा. ज्या उद्योगसमूहाच्या एकूण उलाढालीपैकी 60 टक्क्यांहून अधिक भाग भारताबाहेरून येतो, ती खरी ‘मल्टीनॅशनल’ म्हणता येईल ना! आर्थिक संपत्तीचे निर्माण करणे आणि निर्माण केलेल्या आर्थिक संपत्तीचा विनियोग करताना सामाजिक बांधिलकी मानत तिची समाजाला परतफेड करणे, अशा दोन्ही आघाड्या या समूहाने समर्थपणे पेलल्या. महत्त्वाचे म्हणजे, रूढ अर्थाने ‘सीएसआर’पुरते काम न करता त्या त्या परिसरातील खर्याखुर्या गरजा ओळखून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान, हे या समूहाचे वेगळेपण आहे.
जमशेदजी टाटा या द्रष्ट्या उद्योगपतीने सन 1868मध्ये त्यांच्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतरच्या पिढ्यांनी काळाची पावले ओळखत उद्योगांचा विस्तार केला. आजघडीला 10 वेगवेगळ्या ‘व्हर्टिकल्स’मध्ये कार्यरत 30 प्रमुख कंपन्या (आणि शंभरहून अधिक उपकंपन्या) असा टाटा उद्योगसमूहाचा व्याप आहे. टाटा कन्सल्टन्सी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा टी, टाटा केमिकल्स, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, टाटा कॅपिटल, टाटा पॉवर, टायटन, तनिष्क, इंडियन हॉटेल्स, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा डिजिटल, टाटा प्ले, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, टाटा हाउसिंग, एअर इंडिया/इंडियन एअरलाइन्स... नाव घ्या, त्या प्रत्येक क्षेत्रात ‘टाटा’चा विश्वासार्ह ठसा उमटलेला आहे. जिज्ञासूंनी शोध घेत ही यादी आणखीही वाढवायला हरकत नाही!
मागील आर्थिक वर्षाचा विचार केला, तर ‘टाटा समूहा’ने मिळून 9.6 हजार अब्ज रुपये (9.6 ट्रिलियन रुपये किंवा डॉलरमध्ये सांगायचे, तर 128 मिलियन डॉलर्स) उलाढाल नोंदविली आहे. (संदर्भ - टाटा समूहाची वेबसाइट.) समूहाने सर्व मिळून सुमारे साडेनऊ लाख जणांना विविध पदांवर रोजगार दिलेला आहे. हा थेट रोजगार झाला. ज्या उद्योगांकडून ‘टाटा समूह’ विविध सेवा घेतो, त्या सर्वांची संख्या मोजायची तर हा आकडा कोटींमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे जेव्हा ‘टाटा समूहा’चा विषय येतो, तेव्हा तो कोट्यवधी कुटुंबांच्या दैनंदिन रोजगाराशी थेट संबंधित असतो.
अशा या बलाढ्य उद्योगसमूहाचे मुख्यालय मुंबईत आहे आणि मुंबईतून - महाराष्ट्रातून समूहाची सूत्रे हलविली जातात, महाराष्ट्रात ठिकठिकाणी या उद्योगांचा मोठा विस्तारही आहे, हे सारे लक्षात घेता या पहिल्या पुरस्कारासाठी ही निवड सार्थ ठरते. पण त्याशिवायही या उद्योगसमूहाबद्दल सांगण्यासारखे खूप काही आहे. टाटा हा उद्योगसमूह नाही. तो ‘ब्रँड’ आहे. तो उत्क्रांत होत गेलेला आहे. या ब्रँडचे प्रणेते स्वत: उद्योजकीय मानसिकता आणि सामाजिक भान जपणारे राहिले. जेवणात लागणार्या चिमूटभर मिठापासून आकाश व्यापणार्या एअरलाइन्सपर्यंत सर्व क्षेत्रे व्यापत असताना या समूहाने निर्माण केलेली विश्वासार्हता सर्वात मोलाची आहे.
ही विश्वासार्हता रातोरात निर्माण होत नाही. त्यासाठी साधना करावी लागते. वेगळ्या प्रकारे सांगायचे, तर कुठल्याही ब्रँडची विश्वासार्हता रॉकेटसारखी नव्हे, तर विमानासारखी झेपावत जाते. रॉकेट एका क्षणी प्रचंड स्फोट करीत अवकाशात झेपावते आणि विमान जमिनीवरून तुलनेत सावकाशीने, तिरप्या रेषेत अवकाशात जाते आणि गंतव्यस्थानी पोहोचते. ‘टाटा’ जे बोलतात तसेच चालतात. विश्वासार्हतेचे हेही महत्त्वाचे लक्षण आहे. टाटांची कुठलीही उत्पादने वापरणार्या ग्राहकाच्या मताची दखल तातडीने घेतली जाते, गरजेप्रमाणे त्यात बदल होतात. बँडच्या प्रतिष्ठेला मारक ठरणारी कुठलीच गोष्ट टाटामध्ये खपवून घेतली जात नाही, हे आता अनेकवार सिद्ध झालेले आहे. ‘टाटा’ उत्पादनांबद्दल आणखी एक बाब ठळकपणे सांगता येते - टाटांची उत्पादने खरेदी करताना लोक नक्कीच ‘मेंदू’ वापरत असतील, पण ‘टाटा ब्रँड’ म्हणून विचार करताना ते हृदयपूर्वक विचार करतात. या ग्रूपची सामाजिक बांधिलकी, विविध वैद्यकीय व शास्त्रीय संस्थानांच्या उभारणीच्या माध्यमातून त्यांनी केलेली देशसेवा लक्षात घेतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, टाटा कॅन्सर हॉस्पिटल अशा संस्था समाजाच्या डोळ्यांसमोर सदैव असतात. शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, जलसंधारण आदी क्षेत्रांतील योगदान समाजासमोर असते. उद्योगसमूहाचा विस्तार असलेल्या देशभरातील विविध परिसरांच्या सर्वांगीण विकासात या समूहाने दिलेले योगदान आठवतात आणि त्यातून त्यांची ब्रँड व्हॅल्यू वाढत जाते. ती कधी खाली उतरत नाही. मुंबईत ताज हॉटेलवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यातून सावरताना या हॉटेलच्या नूतनीकरणासाठी आलेल्या निविदांमध्ये पाकिस्तानी कंपनीची निविदा सर्वात कमी रकमेची होती, तरीही टाटांनी ती नाकारली. त्यांचे हे देशप्रेमी पाऊल सामान्य माणसाला भावणारे ठरले.
पण ब्रँड केवळ भावनांवर विकसित होत नाहीत अथवा चालत नाहीत. त्यामागे रोकडा व्यवहारही सगळ्यात महत्त्वाचा असतो. टाटांनी सदैव आपला ‘एंड यूझर’ महत्त्वाचा मानला आहे. त्याचे मत कंपनीत विचारात घेतले जाते. त्यांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जाते. कंपनीकडून, शोरूममधून किंवा उत्पदनाबद्दल वाईट अनुभव आला, म्हणून संबंधितांकडे तक्रार केली, पण त्यांनीही लक्ष दिले नाही, अशा काही घटना थेट रतन टाटा यांच्यापर्यंत गेल्या आणि त्यानंतर त्यांवर तातडीने कार्यवाही झाली. त्या ग्राहकाला अशी कार्यवाही भावते आणि संभाव्य ग्राहकांच्या मनात उत्पादनांबद्दल, सेवेबद्दल विश्वास निर्माण करते. अशा पद्धतीने एकदा जोडलेला ग्राहक सहसा तुटत नाही. जागतिक बाजारपेठेत ग्राहकाला राजा म्हटले जाते. पण त्याला तसे वागवले जातेच, असे नाही. टाटांकडून ग्राहकांना याबाबत वेगळा अनुभव येतो.
टाटांच्या ब्रँडचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हा भारतात अंगवळणी पडलेला ब्रँड आहे. सामान्य माणसापर्यंत पोहोचलेला, घराघरात विस्तारलेला आहे. त्यांना या नावाची किंमत आणि योग्यता माहीत आहे. त्यामुळे सामान्य भारतीय ग्राहक त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण हाच ब्रँड परदेशात जातो, तेव्हा तेथे तो नवा असतो. त्यांना ‘टाटा’बद्दल फारसे माहीत असण्याची अपेक्षा ठेवणे गैर असते. पण तेथे ‘भारतीयत्वा’चा ब्रँड उपयोगाला येतो. ‘टाटा’ हा ‘भारतीय’ ब्रँड आहे आणि भारतीयांची असलेली वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये या ब्रँडमध्ये नक्कीच सामावलेली असणार, या विश्वासातून ‘टाटा’चा परकीय भूमीवर प्रवेश सुकर होतो. तेथून तो ‘ब्रँड’ म्हणून तेथील ग्राहकांच्या मनातही आपले स्थान निर्माण करू लागतो.
टाटा समूह सतत स्वत:ला दुरुस्त करण्यास तयार असतो. सहसा टाटा समूहात संप होत नाहीत. काही दशकांपूर्वी एकदाच ‘टेल्को’मध्ये तो झाला. चिघळला. त्यातून अनास्था प्रसंगही ओढवले. पण त्यानंतर टाटांच्या कुठल्याच समूहात कधीही अशा प्रकारचा असंतोष आढळला नाही. आपल्याकडे काम करणार्या कामगारांच्या भावना जपणे, त्यांना न्यायबुद्धीने वागविणे हे तर आधीपासून चालू होतेच, तसेच त्याच्या तक्रारींकडे अधिक संवेदनशीलतेने पाहायला हवे, हा धडा त्या प्रकारापासून घेतला गेला आणि त्यातून कामगारांत आणि समाजातही सकारात्मक संदेश गेला. कामगार, कर्मचारी, अधिकारी ही एकजूट ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादन व सेवा देण्यास बांधील ठरली.

टाटा काळाप्रमाणे बदलत गेले. नागपुरातील एम्प्रेस मिलमधील कापड उत्पादन, जमशेदपूरमध्ये लोखंडी सळ्यांचे उत्पादन, मुळशी परिसरात जलविद्युत अशी एक एक पावले पडत होती. पुढे विमानसेवा आणि ऑटोमोटिव्हमध्ये ते आले. काळ वेगाने बदलत होता. अशा स्थितीत त्या त्या ठिकाणी आलेले नवे तंत्रज्ञान तर या समूहाने तत्काळ स्वीकारलेच, त्याचबरोबर आयटी, कॅपिटल मार्केट, कन्स्ट्रक्शन, रसायने, दागिने अशा असंख्य क्षेत्रांतही त्यांनी यशस्वीपणे विस्तार केला. ‘वैश्विक प्रवाह’ कुठल्या दिशेला वाहत आहे, याचे अचूक भान राखत त्यांनी त्या त्या व्यवसायाची निवड तर केली, पण आपण कुठेही ‘प्रवाहपतीत’ होणार नाही याची काळजी मात्र अवश्य घेतली गेली. अनेकदा त्यांना सरकारी निर्णयांचे अनेक फटके बसले. नफ्यात असलेली एअरलाइन्स एका फटक्यात त्यांच्यापासून हिरावली गेली. सिंगूरमध्ये उभा राहिलेला ‘नॅनो’चा प्लँट रानटीपणाच्या सीमा ओलांडत बंद पाडला गेला. पण टाटा कुठेही अडले नाहीत किंवा त्यांचा तोल कधी सुटला नाही. त्यांनी पर्याय शोधले आणि ते देशहितासाठी वापरत गेले. त्यातून उद्योगसमूहाचा विस्तार झाला आणि समाजमान्यताही मिळाली.
टाटा कधी वादात पडले नाहीत. राजकारणी, समाजकारणी, उद्यमी वर्तुळ या सर्वांशी त्यांचे संबंध सलोख्याचे आणि सहकार्याचे राहिले. त्या माध्यमातून आपले उद्योग विश्व ते विस्तारत गेले, पण त्यांचे अंतिम लक्ष्य ‘औद्योगिक साम्राज्य’ उभे करण्याचे कधीच नव्हते. समर्थ व स्वतंत्र भारत घडविण्याच्या प्रेरणेने हा समूह सदैव कार्यरत राहिला. त्यांच्या या निष्ठा कधीच बदलल्या नाहीत. त्यामुळेच जमशेदजी टाटांकडून जेआरडी टाटांकडे आलेला हा वारसा पुढे रतन टाटा यांनी समर्थपणे सांभाळला. समाजाशी जुळलेली नाळ अधिकच घट्ट होत गेली. त्यांनी समूहाला जागतिक पातळीवर नेले. त्यातून देशाची प्रतिमाही उजळण्यास मदत झाली. सचोटी, विश्वासार्हता, सर्जनशीलता, उद्योगशीलता, समाजाभिमुखता, गुणवत्ता अशा वेगवेगळ्या गुणांचा समुच्चय असलेल्या या समूहाचा, त्यांच्या प्रणेत्यांचा सन्मान हा एक भारतीय म्हणून प्रत्येकासाठी अभिमानाचा विषय नक्कीच आहे.
..आणि लेखाच्या अखेरीस या शीर्षकाबद्दलचे काही शब्द. भारतात रंगीत दूरचित्रवाणीचे आगमन झाले. त्या वेळी अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी जाहिरातींतून वेगवेगळ्या पद्धतींनी आपला ब्रँड समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ‘हमारा बजाज’चे स्लोगन अशाच आक्रमक पण सर्वांगसुंदर जाहिरात मालिकेतून रुजले. टाटा समूहानेही, विशेषत: ‘टाटा स्टील’ने जाहिरातींसाठी त्या माध्यमाचा उपयोग केला, पण त्यांचा रोख पूर्णपणे वेगळा राहिला. टाटा समूहाच्या वतीने भारतभरात चालविले जाणारे वेगवेगळे उपक्रम, समाजावर त्यांचा होणारा सकारात्मक परिणाम यांचा तपशील मांडणारी ती जाहिरात असे आणि सगळ्यात शेवटी दीड-दोन सेकंदांत सांगितले जात असे, ‘इस्पात भी हम बनाते हैं’.. म्हणजे आम्ही लोखंडी सळयाही बनवतो! आपण ग्राहकोपयोगी उत्पादन बनवतोच, पण आपला मुख्य भाग समाजसेवेचा आहे, ही भावना रुजविण्यात तेथे ‘टाटा’ यशस्वी झाले. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे ‘टाटा’ ब्रँडचा विषय समोर आला की ग्राहकाच्या मेंदूत त्याची नोंद होते आणि हृदय त्या खरेदीसाठी संमती देते!