स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाहेब कांबळे. देशाच्या रक्षणार्थ उद्याच्या सैनिकांची पिढी तयार करण्यासाठी सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील तांबोळे (आढेगाव) या गावी वडिलांनी घेतलेल्या सहा एकर माळरानावर त्यांनी ’श्रीमंत बाजीराव पेशवा सैनिकी विद्यालय’ या नावाने निवासी शाळा सुरू केली. त्यांच्या या कामाचा परिचय देणारा हा लेख.

राष्ट्रप्रेमाने भारावलेला एक युवक सैन्यात भरती होऊन देशसेवेची प्रचंड स्वप्न बाळगत होता. मात्र हलाखीची परिस्थिती असल्याने सैनिकी शाळेत प्रवेश नाकारला गेला. तरीही निराश अन् हताश न होता त्याने मनाशी खूणगाठ बांधत स्वत:ची सैनिकी शाळा उभारण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात साकारला. आबासाहेब कांबळे असे या युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे या सैनिकी शाळेला ‘श्रीमंत बाजीराव पेशवा सैनिकी विद्यालय’ असे नाव दिलेय.
संपर्क : आबासाहेब कांबळे - 8830202063
सोलापूर जिल्हा हा हुतात्म्यांची नगरी म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यापूर्वी 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगलेला जिल्हा आहे. त्यामुळे देशभक्ती, सामाजिक समरसता हे गुण येथील प्रत्येक माणसात पाहायला मिळतात. हाच वारसा पुढे घेऊन जाण्याची तळमळ असलेले आबासाहेब कांबळे यांचे सैन्यात भरती होऊन लेफ्टनंटपदावर काम करण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांना एनडीएमध्ये अर्थात राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश घेणे गरजेचे होते. काही वरिष्ठ लष्करी अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार या एनडीएमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी दोन वर्षे सैनिकी शाळेत शिक्षण घेतल्यास त्याचा अधिक फायदा होतो. त्याप्रमाणे आबासाहेबांनी सर्व तांत्रिक गोष्टी पूर्ण करत एका नामवंत सैनिकी शाळेत प्रवेशापर्यंतची मजल गाठली. मात्र शारीरिक आणि बौद्धिक क्षमता असूनही आर्थिक कुवत नसल्याने त्यांना प्रवेश नाकारला गेला.
मदत करा.
Name :— Shaurya, Krida, Krushi Pratishthan
Account No. :- 60255209889
IFSC code :- MAHB0000488
Bank Name:—Bank Of Maharashtra
Branch:— Takali Sikandar Gpay no -8830202063
मोहोळ-पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या टाकळी सिकंदर गावातील कांबळे कुटुंबाचा, सुतापासून दोरी बनविण्याचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे परिस्थिती बेताचीच होती. तरीही आबासाहेबांचे वडील गिना कांबळे यांनी घरातील दोन-तीन गाई-म्हशी विकण्याचा निर्णय घेतला. कारण सैनिक शाळेच्या प्रमुखांनी सैनिकी शाळेची फी 1 लाख 36 हजार रुपये आणि वसतिगृहाची फी 45 हजार असे एकूण 1 लाख 81 हजार रुपये एकरकमी भरण्याची अट घातली. मात्र परिस्थिती नसल्यामुळे आबासाहेबांनी फी भरण्यासाठी किमान दोन टप्पे देण्याची विनंती केली. मात्र संस्थेने त्याबाबत असमर्थता दाखवत प्रवेश नाकारला. या घटनेमुळे आबासाहेब कांबळे काहीसे खचले आणि त्यामुळे त्यांचे लेफ्टनंटपदाचे स्वप्न अधुरे राहिले.
त्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील बाबासाहेब फडतरे कॉलजमध्ये डिप्लोमा इन ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगला प्रवेश घेत शिक्षण पूर्ण केले. गावी परतल्यानंतर आबासाहेबांनी मोटारीच्या सुट्या भागाचे दुकान सुरू केले. मात्र असे असले, तरी त्यांच्या मनात लष्करातील लेफ्टनंटपदाची सल कायम होती. दरम्यान त्यांचे छोटे बंधू किरण कांबळे लष्करात भरती झाले. त्याला सोडण्यासाठी ते जेव्हा मोहोळ स्टेशनवर गेले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. भावालाही गहिवरून आले. त्या वेळी छोट्या भावाने आबासाहेबांना सांगितले, “आबा, आपण आता एक सैनिकी शाळा सुरू करू. तुमचे जे स्वप्न अपूर्ण राहिले, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आपण ही शाळा सुरू करू.” छोट्या भावाने अगदी मनातले ओळखल्याने आबांच्या मनात एक विलक्षण उत्साह संचारला होता. त्याच वेळी त्यांनी आपण स्वत:च सैनिकी शाळा सुरू करण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतली.
शेतकर्याचा आणि कामगाराचा मुलगा पैशाअभावी सैन्यात भरती होण्यापासून थांबता कामा नये, असा चंग बांधला. सैनिकी शाळांचे व्यवस्थापन पाहण्यासाठी आपल्या मोडक्यातोडक्या दुचाकीवर महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र अनेकांनी आबासाहेबांचा अवतार आणि परिस्थिती पाहून याबाबत माहिती देणे तर दूरच, पण शाळेत प्रवेशही दिला नाही; तर काहींनी शाळा पाहू दिली, पण सैनिकी शाळा काढणे हे काही पोरा-सोराचे काम नाही असे म्हणत हेटाळणीही केली. ही सर्व हेटाळणी, अपमान पचवत आबासाहेबांनी आपल्या ध्येयावरचे लक्ष जराही विचलित होऊ दिले नाही.
सर्व मंथन केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. मोहोळ तालुक्यातील तांबोळे या गावी वडिलांनी घेतलेली सहा एकर शेती होती. कसलाही विचार न करता त्यांनी त्या माळरानावर आपली निवासी सैनिकी शाळा सुरू करण्याचे योजले. वडिलांनी आणि भावांनीही त्यांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी पाठिंबा देत मान्यता दिली. त्यानंतर 2016 साली ’शौर्य क्रीडा कृषी प्रतिष्ठान’ नावाने संस्था स्थापन करून धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली. अथक परिश्रम आणि बुद्धीचा कस लावून, बाजीराव पेशवे यांचे नववे वंशज उदयसिह पेशवा यांच्या हस्ते 9 जून 2018 रोजी सैनिकी शाळेचे उदघाटन करण्यात आले.
या सैनिकी शाळेला ’श्रीमंत बाजीराव पेशवा सैनिकी विद्यालय’ असे नाव देण्यात आले. हे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया मात्र चांगल्याच उंचावल्या. कांबळे नावाच्या एका युवकाने आपल्या सैनिकी शाळेला श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे नाव दिल्याने तो पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला. याबाबत आबासाहेब कांबळे यांना विचारले असता ते म्हणतात, “बाजीराव पेशवे हे दिल्लीहून पुण्याला 8 तासात घोडेस्वारी करत यायचे, असे ऐकले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक कुतूहल होते. ओसामा बिन लादेन या कुविख्यात दहशतवाद्याला अमेरिकेच्या ’सील कमांडो’ या विशेष प्रशिक्षित तुकडीने ठार केले. त्याच तुकडीला प्रशिक्षणाच्या वेळी बाजीराव पेशव्यांनी लढलेल्या पालखेडच्या लढाईचा अभ्यास शिकवला जातो. एवढा महान योद्धा असेल, तर त्याचे नाव या शाळेला द्यावे म्हणून हे नाव दिले.”
या सैनिकी शाळेत सुरुवातीला एक विद्यार्थी होता. आता 53 विद्यार्थी सैनिकी शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र या शाळेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या शाळेत केवळ शेतकरी आणि कामगार यांच्याच मुलांना प्रवेश दिला जातो. त्याव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नाकारला जातो. 2018 साली सुरू झालेली शाळा कोविड काळात बंद झाली होती. त्या काळात आबासाहेब कांबळे यांनी रस्त्यावर भाजी विकण्यापासून सर्व कामे केली. 2021 साली शाळा पुन्हा सुरू केली. पुनश्च हरिओम् म्हणत पुन्हा नव्या जोमाने कार्याला सुरुवात केली.
शाळेतील विद्यार्थ्यांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू होतो. त्यानंतर 5:30 ते 7पर्यंत शारीरिक व्यायाम केले जातात. त्यानंतर अभ्यास आणि शाळा असे दिवसभराचे शेड्युल असते. सायंकाळी पुन्हा 6पासून परेड, कवायत, मिल्ट्री ट्रेनिंग हे 7पर्यंत चालते. त्यानंतर जेवण आणि 8 वाजता प्रेरणादायक पुस्तकाचे सामूहिक वाचन केले जाते. पुढे 8:30 ते 10पर्यंत अभ्यास आणि विश्रांती असा दिनक्रम असतो.
शाळेतील अनेक विद्यार्थी कामगार आणि शेतकरी कुटुंबातले आहेत. त्यांच्याकडून एनडीए भरतीच्या दृष्टीने तयारी करून घेतली जाते. शाळेतच एक स्पेस जंक्शनदेखील उभारण्यात आले आहे. आपल्या मुलांनी केवळ पुस्तकातील धडे न घेता ते प्रत्यक्षात अनुभवलेदेखील पाहिजेत, या दृष्टीने त्यांनी विविध प्रयोग राबवले आहेत. छोटासा अविष्कार म्हणजे शाळेतील मुलांनी, इन्व्हर्टरच्या माध्यमातून 350 फूट खोल बोअरवेलमधून पाणी काढण्याचा प्रयोग यशस्वी केलाय. विविध ग्रहांचा अभ्यास ते आपल्या शाळेतील स्पेस स्टेशनवरून करत असतात. निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातील स्वार्थ कमी होऊन त्याबद्दल आत्मीयता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इथला प्रत्येक नियम विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी असल्याचे आबासाहेब कांबळे आवर्जून सांगतात.
आबासाहेब कांबळे यांच्यावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. त्यांच्या मते भारतातील सर्वात पुरोगामी व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आहेत, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीतील आपल्या वास्तव्यात घरातील कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी, सर्वात अधी दलित वस्तीतील महिलांना हळदी-कुंकवाला बोलवा असा आग्रह करीत. त्यामुळे जे सावरकरांना जातीयवादी संबोधतात त्यांच्यासाठी ही गोष्ट डोळ्यात अंजन घालणारी आहे. सावरकरांनी अनेक संकल्पना मांडल्या आहेत. सैनिकी शिक्षण ही त्यांची त्यापैकीच एक संकल्पना आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी ही सैनिकी शाळा सुरू केली. मुलींना सैनिकी शिक्षण देण्याचा माझा संकल्प असल्याचे ते सांगतात.
दरम्यान त्यांनी लावलेल्या ’श्रीमंत बाजीराव पेशवा सैनिकी विद्यालया’च्या बीजाला आता अंकुर फुटू लागलाय, मात्र त्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी आबासाहेब कांबळे यांना काही अंशी आर्थिक पाठबळाची गरज आहे. लष्करातील अनेक अधिकारी त्यांच्या या कार्यावर खूश होऊन काही निधी देत आहेत. मात्र सध्या कांबळे कुटुंबीय स्वत:च्या खिशातून पैसे घालून हा सर्व डोलारा संभाळत आहेत. त्यांना आर्थिक मदतीबरोबरच वस्तुरूपी मदतीची गरज आहे. समाजातील दात्यांनी जर सढळ हाताने मदत केली, तर शेतकरी-कामगारांची ही मुले उद्या राष्ट्राच्या रक्षणासाठी अधिक ताकदीने सज्ज होतील. त्यांच्या राष्ट्रीय कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!