भारत जागा होत आहे.

29 Aug 2023 10:42:49

vivek
 
मागच्या आठवड्यात आपल्या देशाचा झेंडा चंद्रावर फडकला. चंद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावर उतरले आणि देशभर चैतन्याची लाट निर्माण झाली. सर्वसामान्य माणूस ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वानी हा आनंदाचा क्षण अनुभवला. मात्र कावीळ झालेले काही नतद्रष्ट या आनंदात सहभागी न होता आकलेचे तारे तोडत आहेत. अशा व्यक्तींना समाजमन कळत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चंद्रयान 3च्या यशापेक्षा त्यांना झालेली विद्वेषी कावीळ त्यांना महत्त्वाची वाटत असेल, तर आपण काय करू शकतो?
इस्रोने पाठवलेले चंद्रयान 3 गेल्या आठवड्यात 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वीपणे उतरले. ज्या ठिकाणी यान उतरले, त्या ठिकाणाची नोंद यापुढे ‘शिवशक्ती’ अशी घेतली जाईल. चंद्रयान 3चे यश हे भारताला जागतिक पातळीवर अव्वल स्थान प्राप्त करून देणारे आहे, त्याचप्रमाणे अंतरिक्ष विज्ञानात आगामी काळात भरघोस संशोधनाची नांदी या यशाने घालून दिली आहे. अथक परिश्रम व काटेकोर नियोजन यामुळे हे यश मिळाले आहे. चंद्रयान 2च्या अपयशाचे दडपण मनावर न ठेवता आपल्या शास्त्रज्ञांनी अल्पावधीतच हे यश संपादित केले, त्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
 
मात्र याच काळात द्वेषाची कावीळ झालेले लोक जमेल तिथे आणि जमेल तशी आपली मळमळ बाहेर काढत आहेत. त्याला प्रथितयश वृत्तपत्रे अपवाद नाहीत. सोशल मीडियावर तर अशा मळमळीचा पूरच आला होता. स्वयंघोषित विचारवंत, ‘निर्भय बनो’चा नारा देणारे विश्वंभर चौधरी हे त्यापैकीच एक आहेत. चंद्रयान 3ची टिंगल करताना त्यांनी लिहिले की, हायवेवरील एका Proud to be associated with Chandyana-3 असा बोर्ड दिसला. उत्सुकतेने टपरीवाल्याला विचारले, “हा काय प्रकार आहे?” तो म्हणाला, “चंद्रयानवर वापरला जाताना मोठा सिलिंडर ज्या ट्रेलरवर वाहून नेला, त्या ट्रेलरचे ड्रायव्हर आणि क्लीनर एकदा आमच्या टपरीवर चहा प्यायला थांबले होते.” चौधरी म्हणतात तसा बोर्ड हायवेवरील कोणी टपरीवाल्याने लावला असेल, तर त्याचे कौतुक करावे लागेल. कारण त्या टपरीवाल्याच्या रूपाने भारत जागा होताना दिसतो आहे. सोशल मीडियावर आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन मांडणार्‍या चौधरींना जागे होणार्‍या भारताची अनुभूती मिळणे अवघडच आहे. पण आपला देश जागृत झाला आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. सोशल मीडियावर अनेक प्रकारे चर्चा झाली, त्यात ‘चंद्रयान पाठवून महागाई कमी होणार का?’पासून ते ‘इतक्या वायफळ खर्चाची गरज आहे का?’ असे टोकाचे दोन प्रश्न उपस्थित केले गेले. या प्रश्नांच्या मागे अज्ञान, माहितीचा अभाव या गोष्टी आहेत. मात्र चौधरींचे तसे नाही. त्यांनी ठरवून लिखाण केले आहे. विद्यमान केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विरोधात व्यक्त होण्याची त्यांनी शपथ घेतली आहे आणि म्हणूनच त्यांनी हायवेवरच्या टपरीवाल्याला हिरो केला आहे. विरोध करताना बर्‍याच वेळा आपण काय करतो, याचे भान राहत नाही. बहुधा चौधरींची ती स्थिती झाली असावी. चौधरींची ती पोस्ट वाचली आणि मला रामायणातील एक छोटी कथा आठवली.
 
 
समुद्रात जेव्हा सेतू बांधण्यात येत होता, तेव्हा एक छोटी खार वाळूत लोळत होती आणि बांधकाम चालू असलेल्या सेतूवर येऊन अंगाला चिकटलेली वाळू झाडत होती. त्या खारीचे हे काम पाहून तिला विचारले की, “तुझ्या चिमूटभर वाळूने हा सेतू बांधला जाणार आहे का?” तेव्हा खारीने उत्तर दिले की, “माझ्या चिमूटभर वाळूने हा सेतू पूर्ण होणार नाही, हे मला माहीत आहे; पण जेव्हा या सेतूचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा सेतू बांधणार्‍यांमध्ये मी होते, याची नोंद नक्की होईल.” चौधरींना भेटलेला टपरीवाला या काळातील खार आहे, असे आपण नक्की म्हणू शकतो. अशा अनेक खारींनी चंद्रयान 3साठी आपले योगदान दिले, म्हणून ते यशस्वी झाले आहे, हे चौधरींच्या लक्षात येत नाही. ‘मी देशाचा, देश माझा’ हा भाव जागृत झाला आहे आणि चौधरींसारख्या मंडळींना त्याच गोष्टीचे वावडे आहे.
 
 
चौधरींसारख्या मंडळीचा फार विचार न करता सर्वसामान्य माणूस चंद्रयान 3च्या यशाकडे कशा प्रकारे पाहतो, हे समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल की भारत जागा होत आहे. मुंबईसारख्या गतिमान शहरात 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून शुकशुकाट होता. एरवी तुडुंब भरून धावणार्‍या रेल्वे गाड्या मोकळ्या होत्या. प्रत्येक व्यक्तीला चंद्रयान चंद्रावर उतरताना पाहायचे होते. संध्याकाळी सहा वाजता अंधेरी स्टेशनवर पश्चिम दिशेला लावलेल्या स्क्रीनसमोर हजारो माणसे उभी होती. एरवी जात, धर्म, पंथ अशा विविध प्रकारांनी ओळखला जाणारा हा समाज त्या ठिकाणी केवळ भारतीय म्हणून उभा होता आणि ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देत होता. जात, धर्म, संप्रदाय, प्रांतवाद, भाषावाद या सर्वांचा विसर पाडणारा तो क्षण होता. नेहमी घाईगडबडीत आपले जीवन जगणार्‍या त्या समूहाला चंद्रयान 3चे यश आपले वाटले, यामागे काय कारण आहे? हे चौधरी आणि मंडळींनी शोधले पाहिजे. चौधरींनी डोळ्यावर बांधलेली द्वेषाची पट्टी सोडली, तर त्यांच्या लक्षात येईल की भारत जागा होत आहे.
Powered By Sangraha 9.0