काँग्रेसचे ‘गेहलोत अस्त्र’

विवेक मराठी    30-Aug-2023   
Total Views |

congress
असे म्हणतात की, काँग्रेस पक्षामध्ये कधीही कुणी थेट बोलत नाही. सर्व जण गांधी कुटुंबीयांसमोर मुजराच करीत असतात. 2014नंतर ही परिस्थिती बदलली आहे. गांधी कुटुंबीयांना आव्हान देणारे अनेक जण पक्षात तयारही झाले. पण हवे तसे बळ त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे मुजरा करणार्‍यांची संख्याच मोठीच आहे. इंडिया ही आघाडीवर करण्यास काँग्रेसने याच पद्धतीचा उपयोग तर केला नसावा? कारण दोन दिवसांपूर्वी गेहलोत यांनी “राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील ” असे एका चॅनलच्या मुलाखतीत म्हटले आहे. एखाद्या पाळीव संपादकाने किंवा कार्यकर्त्याने असे विधान केले असते, तर समजू शकलो असतो. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे याची दखल घेणे अपरिहार्य आहे.
पाटणा, बंगळुरू आणि आता 31 ऑगस्ट-1 सप्टेंबर या दिवसांत इंडियाची बैठक मुंबईत आहे. या बैठकीला काही तास उरलेले असताना, काँग्रेसच्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे जाहीर करणे ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. कारण इंडियाची ही तिसरी बैठक आहे. इंडियाचे बर्‍यापैकी एकत्रीकरण होताना काँग्रेस पक्षाला दिसत आहे. अशा वेळी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून इंडियासमोर एकदम राहुल गांधींचे नाव ठेवणे हे काँग्रेससाठी अवघड आहे. पण काँग्रेसची पद्धत आहे की, कोणत्याही पदाची मागणी करायची नसते, तर आपल्या मागणीसाठी आडवाटेने प्रयत्न करायचे असतात आणि ते आपली मागणी संबंधितांपर्यंत पोहोचवत असतात. सध्या काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीवर राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी ही पद्धत अवलंबल्याचे दिसून येत आहे. सध्या इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी, नितीशकुमार, केजरीवाल हे ताकदवान नेते समजले जात आहेत. त्यांनी आपल्या आपल्या राज्यात सत्ता राखली आहे. भाजपाला सत्तेपासून रोखले आहे. केजरीवाल वगळता ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार यांची राजकीय कारकिर्द मोठी आहे. त्यामुळे त्यांना आता पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत. पण समोर पंतप्रधान मोदींचे मोठे आव्हान आहे. त्यांना एकटे पराभूत करणे सोपे काम नाही. यासाठी काँग्रेस पक्षाचा टेकू घेऊन, निवडणूकपूर्व आघाडी करून भाजपाला पराभूत करायचे आणि मग आपले स्वप्न साकार करायचे, हेच त्यांचे धोरण आहे. आणि काँग्रेसला हा छुपा अजेंडा माहीत नाही एवढा तरी काँग्रेस पक्ष दुधखुळा नाही. पुढे जाऊन त्यांना मोठे करण्यापेक्षा आताच एक पाऊल पुढे टाकले तर काय हरकत आहे? त्यासाठी गेहलोत यांच्या मुखातून हे वदवले आहे, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
 
 
काहीही असले, तरी काँग्रेस पक्षासाठी ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट असेल. कारण युवराज राहुल गांधी पंतप्रधान मोदींसमोर दोन वेळा पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आता  लढण्यासाठी इंडिया आघाडीच्या रूपाने भात्यात आणखी बाण आलेले आहेत. यासाठी छुपे प्रयत्न करायला काय हरकत आहे? काही वाद झाले, तर ‘ती कार्यकर्त्यांची भावना आहे’ अशी भावना हल्ली सर्वत्रच दिसते. तशीच भावना आहे, असे स्पष्टीकरण देता येईल.. आणि घटक पक्षांच्याही मनातही त्यांचे नाव असेल, तर त्यामुळे ही उमेदवारीही मिळाली, हे त्यांच्यासाठी सोन्याहून पिवळे होईल.. पण अशी शक्यता फारच कमी आहे. इंडियातील सर्वच जण पंतप्रधान बनायला आले आहेत. परिवार वाचवायला आले आहेत. आणि ही त्यांच्यासाठीही शेवटची संधी आहे. अशा वेळी दोन वेळा अपयशी ठरलेला चेहरा घेऊन पुन्हा जनतेसमोर जायचे आणि आपल्या जागा कमी करणे यापेक्षा बिनचेहर्‍याचीच इंडिया ठेवणे किंवा आघाडीतून बाहेर पडणे त्यांना जास्त सयुक्तिक वाटेल. त्यामुळे गहलोत यांचे विधान इंडिया आघाडी किती गांभीर्याने घेते, याचे उत्तर या बैठकीतूनच मिळेल.