विश्वविजेता

विवेक मराठी    31-Aug-2023
Total Views |
@अनुजा देवस्थळी
जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा याने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. यापूर्वी नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं आणि देशभरात त्याचं नाव चर्चेत आलं.. 2018मध्ये राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. नीरजने ते साध्य करून दाखवलं. ह्याचं एकमेव कारण म्हणजे खेळातील सातत्य, या विश्वविजेत्याकडून अशीच कामगिरी होत राहो, यासाठी त्याला शुभेच्छा!
niraj
 
हा ऑगस्ट महिना क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच ठरला. तिरंदाजी, नेमबाजी, पॅरागेम्स, बुद्धिबळ, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स अशा विविध स्पर्धा ह्या महिन्यात पार पडल्या. तिरंदाजीतली जगज्जेतेपदं, प्रज्ञानंदची बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीतली उपस्थिती आणि पुढे उपविजेतेपद, बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये प्रणॉय एचएस.ला मिळालेलं कास्यपदक ह्यानंतर उत्सुकता होती जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची.
 
 
अ‍ॅथलेटिक्सअंतर्गत खेळल्या जाणार्‍या विविध क्रीडाप्रकारांमध्ये भारत नेहमीच पिछाडीवर असतो, राष्ट्रीय किंवा आशियाई पातळीवर पदकं मिळवणारे खेळाडू जागतिक स्पर्धांमध्ये मात्र खूप मागे पडतात. ह्या वर्षीही परिस्थिती वेगळी नव्हती. किमान अंतिम फेरी गाठतील अशी आशा असलेले काही खेळाडू सुरुवातीलाच गारद झाले होते. शेवटी पुन्हा एकदा सगळ्या आशा एकाच नावाभोवती एकवटल्या, ते नाव होतं नीरज चोप्रा.
 
 
नीरजची ऐतिहासिक कामगिरी
 
25 ऑगस्टला भालाफेक खेळाची पात्रता फेरी होती. थेट पात्रतेसाठी अंतर होतं 83 मीटर. नीरजने पहिल्याच प्रयत्नात भाला 88. 77 मीटर अंतरावर फेकून अंतिम फेरीत अगदी सहज प्रवेश केला. ही त्याची ह्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. 27 तारखेला अंतिम फेरी होती. गेल्या वर्षी ह्याच स्पर्धेत त्याला रौप्यपदक मिळालं होतं. गतविजेता अँडर्स पीटर्सन ह्या वेळी अंतिम फेरी गाठू शकला नव्हता, मात्र तरीही स्पर्धा अटीतटीची होती. झेक प्रजासत्ताकचा याकूब वादलेह, जर्मन खेळाडू ज्युलियन वेबर आणि ह्यांच्या बरोबरीने पाकिस्तानचा अर्षद नदीम हे सगळेच पदकासाठी आटोकाट प्रयत्न करणार होते. अंतिम फेरीत दुसर्‍या प्रयत्नात नीरजने 88.17 मीटरची भालाफेक केली. 87.82 मीटरची जोरदार फेक करणारा अर्षद रौप्यपदकाचा मानकरी ठरला, तर कास्यपदक याकूबला मिळालं. वेबर पुन्हा एकदा पदक मिळवण्यात अपयशी ठरला आणि चौथ्या क्रमांकावर राहिला.
 

niraj 
 
ऑलिम्पिकपूर्व आणि ऑलिम्पिकपश्चात
 
 
नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं आणि देशभरात त्याचं नाव चर्चेत आलं, त्याच्या नावाचे हॅशटॅग ट्रेंडिंग हॅशटॅग म्हणून सगळीकडे दिसू लागले. त्याचं गाव, घर, आईवडील, सैन्यातील पद आणि इतर विविध गोष्टींबद्दल बोललं जाऊ लागलं. ऑलिम्पिक पदक हा नक्कीच त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला, पण त्याआधीही त्याने नेहमीच सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन केलं होतं. युवा गटातील विश्वविक्रम आजही त्याच्याच नावावर आहे. नीरज पुढे युवा विश्वविजेता झाला, 2018मध्ये राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. क्रिकेटवेड्यांच्या देशात वेगळा खेळ खेळून नावारूपाला येणं थोडंसं अवघडच आहे, पण नीरजने ते साध्य करून दाखवलं. ह्याचं एकमेव कारण म्हणजे खेळातील सातत्य.
 
ऑलिम्पिक पदकानंतर जवळजवळ वर्षभर तो स्पर्धांपासून दूर होता. ह्यादरम्यान त्याने अनेक कंपन्यांशी जाहिरातीचे करार केले आणि त्यामुळे मैदानात नाही, पण टीव्हीवर मात्र तो दिसत राहिला. मोठमोठ्या ब्रँड्ससाठी आता नीरज हा आवडता चेहरा झाला होता, हे बघून सामान्य चाहते मात्र काहीसे चिंतातुर झाले होते. एखाद्या स्पर्धेने प्रसिद्धी मिळाल्यावर, जाहिरातीतून प्रचंड कमाई सुरू झाल्यावर खेळातलं लक्ष उडाल्याची अनेक उदाहरणं समोर आहेत, त्यामुळेच थोडी काळजी वाटत होती. नीरज मात्र अपवाद ठरला. मोठ्या विश्रांतीनंतर एका डायमंड लीगसाठी मैदानात उतरला आणि उपविजेता ठरला. त्यानंतरही भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत विजयी किंवा उपविजयी होऊनच तो बाहेर पडत होता. इतकं सातत्य भारतात क्वचितच कुणी दाखवलं असेल. भारतीयांना ह्या गोष्टीची सवयच नाही असं म्हटलं, तर त्यात अजिबात अतिशयोक्ती वाटणार नाही.
 
 
डायमंड लीग विजेतेपद
 
डायमंड लीग ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सगळ्यात शेवटी डायमंड लीग फायनल होते. नीरजने ही शेवटची स्पर्धाही जिंकली आणि ऑलिम्पिकनंतरचं आणखी एक मोठं विजेतेपद स्वत:कडे आणलं. ही कामगिरी करणारा नीरज पहिलाच भारतीय खेळाडू होता, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
 
जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा
 
 
अंजू बॉबी जॉर्जने 2003मध्ये लांब उडीत जागतिक स्पर्धेत कास्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर भारताच्या नशिबी केवळ वाट पाहणंच आलं. ही प्रतीक्षा संपवली नीरज चोप्रानेच. गेल्या वर्षी त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती. ह्या वर्षी पदकाचा रंग सोनेरी झाला आणि आणि अशा प्रकारे ऑलिम्पिक विजेता नीरज जगज्जेताही झाला. आता सगळी महत्त्वाची पदकं त्याच्या खात्यात जमा झाली आहेत.
 

niraj 
 
भारतीय अ‍ॅथलेटिक्समधील सकारात्मक बदल
 
अ‍ॅथलेटिक्समध्ये लांब उडी, उंच उडी, ट्रॅकवरील विविध प्रकारच्या स्पर्धा, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक असे अनेकविध प्रकार सामावलेले आहेत. आणि आधी म्हटल्याप्रमाणे ह्या खेळांमध्ये काही अपवाद वगळता भारतीय खेळाडू नेहमीच पिछाडीवर राहिलेले दिसून येतात. नीरजचं एक ऑलिम्पिक पदक अनेक उदयोन्मुख खेळाडूंच्या मनात आशा निर्माण करणारं ठरलं. जागतिक स्पर्धेत नाही, पण राष्ट्रकुल स्पर्धेत ह्याचा अनुभव येऊन गेला आहे. नीरज खेळत असलेल्या भालाफेकीबद्दलच बोलायचं म्हटलं, तरी आज भारतात 4-5 खेळाडूंची दुसरी फळी सज्ज आहे, जी 80 मीटरच्या आसपास भालाफेक करू शकते. ह्या वर्षी नीरजबरोबरच डी.पी. मनू आणि किशोर जेना हे आणखी दोन खेळाडू खेळत होते. आपले हे तिन्ही खेळाडू अंतिम फेरीत म्हणजेच पहिल्या 12 खेळाडूंमध्ये समाविष्ट होते. मनू आणि किशोर यांना पदक मिळालं नसलं, तरी दोघांनीही त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन केलं. किशोर पाचव्या आणि मनू सहाव्या स्थानी राहिला, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. ह्या खेळात भारताचं भविष्य उज्ज्वल असल्याची हमी ह्या जागतिक स्पर्धेने दिली आहे. आता पुढच्या महिन्यात आशियाई खेळ खेळले जातील. त्यातही पुन्हा ह्या तिघांना चांगली संधी आहे. रोहित यादव हा आणखी एक भालाफेकपटू जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता, मात्र दुखापतीमुळे तो भाग घेऊ शकला नाही.
 
 
नीरज चोप्रा - मैदानात आणि मैदानाबाहेर
 
 
नीरजबद्दल सांगण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा आत्मविश्वास. तो मैदानात उतरतो, तेव्हाच त्याच्या देहबोलीतून तो जाणवतो. भाला फेकून होताक्षणी त्याची ती नेहमीची गर्जना दिसली की प्रेक्षकांना समजतं - हा भाला खूप अंतर गाठणार आहे. त्याच्या खेळात काही प्रमाणात आक्रमकता दिसते, पण मैदानाबाहेर तो तितकाच शांत दिसतो. अगदी जगज्जेता झाल्यावरही नीरजचं म्हणणं हेच होतं, की आमच्या खेळात अंतराची कमाल मर्यादा नाहीच, त्यामुळे खेळत राहणं, जिंकण्याचा प्रयत्न करणं, जास्तीत जास्त अंतर पार करणं हे सतत चालूच राहणार. तो स्वत:ला ॠजअढ (सीशरींशीीं ेष रश्रश्र ींळाश) म्हणवून घेण्यासही तयार नाही. आणखी बरीच मजल गाठणं शिल्लक आहे, बर्‍याच स्पर्धांमध्ये भारताचा झेंडा फडकवायचा आहे हे तो सतत सांगतो. शिवाय बहुप्रतीक्षित 90 मीटरचा आकडा गाठण्यातही अजून त्याला यश आलं नाही. पॅरिस ऑलिम्पिक-2024 आता फार दूर नाही, त्यामुळे तंदुरुस्ती राखणं आणि टोकियोतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणं हेच त्याच्यासमोरचं लक्ष्य असेल. मधल्या काळात एशियाड, डायमंड लीग अंतिम फेरी ह्याकडेही त्याचं आणि देशातल्या क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल. नीरज चोप्रा खर्‍या अर्थाने सर्वच क्षेत्रांतील तरुणांनी आदर्श घ्यावा असा खेळाडू आहे.
 
 
त्याच्या ऑलिम्पिकमधील यशाने अनेक सकारात्मक बदल घडले. अन्य खेळाडूंना प्रेरणा मिळाली हा एक भाग, त्याच वेळी भालाफेक बघण्यासाठी रात्री 12-1पर्यंत जागं राहण्याचीही लोकांना सवय लागली. ह्याआधी फक्त टेनिस, फुटबॉल, क्रिकेट अशा खेळांसाठीच अशी जागरणं होत असत, आता इतर खेळ आवडीने बघणार्‍यांचीही संख्या वाढली आहे. ‘खेलो इंडिया’सारख्या स्पर्धांमधून नवनवीन खेळाडू पुढे येत आहेत, तर ‘टॉप्स’सारख्या योजनांमधून सरकारकडून खेळाडूंसाठी आर्थिक तरतूद आणि अन्य साहाय्यही केलं जात आहे. हे सगळेच बदल भारताच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक म्हणता येतील. नीरजला भविष्यातील त्याच्या यशस्वी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!