प्रदीप पिंगळे
। 7499945016
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी लस बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनाकाळात कमी वेळात कोव्हिशील्ड लसीच्या निर्मितीत त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्याचबरोबर इतरही मोठ्या उद्योगांमध्येही जगभरात सक्रिय आहे. अशा या उद्योग समूहाची सरकारनेसुद्धा दखल घेऊन सायरस यांची पुढची पिढी असलेले अदर पूनावाला यांना ‘उद्योग मित्र’ पुरस्कार देऊन त्यांनी समाजाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल ऋण व्यक्त केले आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.
महाराष्ट्र शासनाने 2023मध्ये उद्योग क्षेत्रात प्रथमत:च विविध प्रकारचे पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना या वर्षीचा ’उद्योग मित्र’ पुरस्कार दिला. अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी लस बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. पुण्यातील मांजरी इथे 42 एकर परिसरात कंपनीचे अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेले युनिट आहे. इथे जागतिक आरोग्य संघटना, युरोप, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी अनेक जागतिक नियामक संस्थांनी निश्चित केलेल्या सर्वोच्च मानकांची पूर्तता केलेली आहे.
डॉ. सायरस पूनावाला यांनी 1966मध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली होती. 1974मध्ये सीरमने लहान मुलांच्या काही आजारांवर लसनिर्मिती सुरू केली. 1994मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून सीरमला मान्यता देण्यात आली.
जीवरक्षक इम्युनो-बायोलॉजिकल उत्पादनांमध्ये भारताला स्वावलंबी बनवणे असा ही कंपनी सुरू करण्यामागे त्यांचा उद्देश होता. भारतात या प्रकारच्या लसींची कमतरता होती. आपण लसींची उच्च किमतीत आयात करत होतो. याशिवाय दुसरे कारण म्हणजे सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी घोड्यांच्या रक्ताचा उपयोग केला जातो. यातूनच ते लसनिर्मितीच्या व्यवसायात उतरले व सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला. सायरस पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली सीरम कंपनीने भारतातील सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीत आणि मुबलक प्रमाणात अनेक जीवरक्षक लसींचे उत्पादन केले. परिणामी भारत टिटॅनस अँटी-टॉक्सिन आणि अँटी-स्नेक व्हेनम सीरम, डीटीपी (डिप्थेरिया, पर्टुसिस, टिटॅनस) अशा लसींच्या निर्मितीत स्वयंपूर्ण झाला. शिवाय पर्टुसिस आणि एमएमआर (गोवर, गालगुंड आणि रुबेला) लसींचा समूह यांच्या उत्पादनात सीरमने महत्त्वाचे योगदान दिले. सीरम इन्स्टिट्यूटकडून गेल्या 50 वर्षांत पोलिओ, डायरिया, हेपाटायटिस, स्वाइन फ्ल्यू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली गेली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भारतातील प्रथम क्रमांकाची बायोटेक्नॉलॉजी कंपनी म्हणून स्थान देण्यात आले आहे. जगभरात वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.
सायरस पूनावाला यांचे पुत्र अदर पूनावाला यांचे शिक्षण द बिशप स्कूल (पुणे) आणि सेंट एडमंड स्कूल कँटरबरी येथे झाले आणि त्यानंतरचे शिक्षण वेस्टमिन्स्टर विद्यापीठात झाले. विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर अदर पूनावाला 2001मध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये दाखल झाले. कंपनीत आल्यानंतर त्यांनी 35 देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करून, कंपनीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले. नवीन उत्पादनांचा परवाना घेतला आणि युनिसेफ आणि पी.ए.एच.ओ.सह संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींकडून, तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून पूर्व-पात्रता प्राप्त केली. 2015पर्यंत त्यांनी कंपनीला 140पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करण्याएवढी प्रगती प्राप्त करून दिली आहे. 2011मध्ये ते सीरमचे सीईओ बनले. 2012मध्ये, नेदरलँड-आधारित सरकारी लस उत्पादक कंपनी - बिथोव्हेन बायोलॉजिकलच्या अधिग्रहणात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. अदर पूनावाला हे जी.ए.व्ही.आय. अलायन्स या जागतिक लस युतीच्या बोर्डाचे सदस्य आहेत.
त्यांनी 2014मध्ये सुरू केलेली सीरम इन्स्टिट्यूटची ओरल पोलिओ लस ही कंपनीसाठी बेस्ट सेलर ठरली. त्याच वर्षी डेंग्यू, फ्लू आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसींचा समावेश करण्यासाठी त्यांनी उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करण्याची योजना आखून त्याची अंमलबजावणी केली.
2020मध्ये, सीरमने पूनावाला लस संशोधन इमारतीच्या निर्मितीसाठी निधी देण्यासाठी ऑक्स्फर्ड विद्यापीठाला 6 कोटी डॉलर्स इतकी मोठी देणगी दिली.
सीरम कंपनी आणि अदर पूनावाला यांची कोविड काळात खर्या अर्थाने जगाला ओळख झाली. डिसेंबर 2019मध्ये वुहान इथे पहिला कोविड रुग्ण मिळाला आणि पुढच्या सहा महिन्यांत कोविड साथ जगभरात पसरली. जगभरात कुठेही त्यावर उपचार उपलब्ध नव्हते, त्यामुळे संशोधन करण्यापासून ते निर्मितीपर्यंत मोठाच टप्पा जगाला पूर्ण करायचा होता. कुठल्याही लसींचे निर्मितिपूर्व संशोधन हे अतिशय वेळखाऊ काम असते. ते वर्षानुवर्षे चालते. पण कोरोना काळात जगभरात रुग्ण आणि मृत्यूचे आकडे दोन्ही वाढत असल्याने लसींचे संशोधन आणि उत्पादन लवकर करणे भाग होते. त्या वेळी ऑक्स्फर्ड विद्यापीठात कोविड संदर्भात संशोधन सुरू होते. त्यांनी व अॅस्ट्रॅजेनेकाने केलेल्या संशोधनानंतर भारतात त्यावर आधारित कोव्हिशील्ड लसींची निर्मिती करण्यात आली. सीरमने यात बरीच जोखीम पत्करली. शेवटी ऑक्स्फर्डच्या संशोधनाला यश आले आणि कंपनीचादेखील फायदा झाला.
देशात पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगाने पसरली आणि मृत्युदरातही वाढ झाली. त्यामुळे केंद्र सरकारने भारतातील सर्व नागरिकांसाठी कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सीरम कंपनीकडे लसींची मागणी करण्यात आली. भारतात सीरम कंपनी केंद्र सरकारला प्रति डोस 150 रुपये, राज्य सरकारांना 500 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपये दराने डोस पुरवत होती. मॉडर्नाच्या लसींच्या किमती प्रचंड होत्या, ज्या सर्वसामान्यांना परवडणार्या नव्हत्या. पण सीरम कंपनी केंद्र सरकारला एक डोस 150 रुपयांना देत. याबद्दल बोलताना अदर पूनावाला म्हणाले होते, “जरी आम्ही सध्या जास्त नफा मिळवत नसलो, तरी आम्ही तोट्यातही नाही आहोत. जो नफा मिळतो, त्यातून आम्हाला संशोधन आणि विकासावर खर्च करावा लागतो.” सीरमच्या या धोरणामुळे केंद्र सरकारला पर्यायाने सामान्य जनतेला याचा प्रचंड फायदा झाला, अन्यथा आपण इतर देशांकडून लसी घेत राहिलो असतो, तर अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला असता.
कोविड काळात तयार केलेली कोरोनाची लस ही प्रत्यक्ष औषध नसली, तरी रोगप्रतिकारक्षमता तयार करण्यासाठी तिचा उपयोग केला गेला. भारतात जानेवारी 2020मध्ये सीरम कंपनीनिर्मित कोव्हिशील्ड लस वापरण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने मान्यता दिली. त्यामुळे सीरम कंपनी जगातील सगळ्यात मोठी कंपनी बनली, कारण सगळ्यात जास्त लसींची आवश्यकता लोकसंख्या जास्त असल्यामुळे भारताला होती. भारताशिवाय इतर 100 देशांना सीरमने कोव्हिशील्ड या लसींचे डोस निर्यात केलें. सीरमने कोव्हिशील्डशिवाय अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्सबरोबर कोव्होव्हॅक्स हीदेखील लस बनवली आणि तीदेखील जगभर वापरली गेली.
कंपनीचे समाजसेवेचे व्रत निरंतर सुरू आहे आणि कंपनीच्या ध्येयधोरणातून आपल्याला त्याची प्रत्यक्ष प्रचिती येते. नवीन लसींच्या किमती - उदा., हेपाटायटिस-बी लस, कॉम्बिनेशन लस इत्यादींच्या किमती कमी करण्यासाठी त्याचा प्रसार करण्यात आला आहे, जेणेकरून केवळ भारतीयच नाही, तर जगभरातील सर्व वंचित बालकांना याचा फायदा होईल. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने जून 2022 रोजी नेदरलँड सरकारकडून बिथोव्हेन बायोलॉजिकल या बायोइंजीनियरिंग आणि फार्मास्युटिकल कंपनीचे अधिग्रहण करून पहिले आंतरराष्ट्रीय संपादन केले. अधिग्रहणामुळे आयपीव्ही (इंजेक्टिबल पोलिओ लस, साल्क) तयार करण्यासाठी तंत्रज्ञान आणि कौशल्य कंपनीला मिळेल, यातून अधिकाधिक संशोधन आणि नवनवीन आजारांवर लसींची निर्मिती करणे सीरमला शक्य होईल.
सायरस आणि अदर पूनावाला यांच्या नेतृत्वात सीरमची मालकी असणारा पूनावाला समूह हा हॉर्स ब्रीडिंग, बांधकाम व्यवसाय, अर्थसाहाय्य, हवाई क्षेत्र या व्यवसायांमध्येदेखील सक्रिय आहे. सीरमचा व्यवसाय वार्षिक पाच हजार कोटींच्यावर गेला आहे आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.
भारताच्या लस स्वावलंबनात सीरम या कंपनीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या कार्यामुळेच सायरस पूनावाला यांना भारत सरकारने 2005मध्ये ’पद्मश्री’, तसेच 2022मध्ये कोरोना लसींच्या निर्मितीत त्यांच्या कंपनीच्या योगदानाबद्दल ’पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. 2021मध्ये, ऑक्स्फर्ड-अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेली आणि सीरम इन्स्टिट्यूटने भारतात उत्पादित केलेल्या लसीचा - कोव्हिशील्डचा भारतात आणि जागतिक स्तरावर प्रचंड प्रमाणात पुरवठा करून कोविड-19विरुद्ध लढण्यात अतुलनीय योगदानासाठी इकॉनॉमिक टाइम्सने अदर पूनावाला यांना ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट उद्योजक’ म्हणून सन्मानित केले आहे. महाराष्ट्र सरकारनेदेखील सायरस यांची पुढची पिढी असलेले अदर पूनावाला यांना ’उद्योग मित्र’ पुरस्कार देऊन त्यांनी समाजाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल ऋण व्यक्त केले आहे.