@पल्लवी अकोलकर
‘पुणे तेथे काय उणे’ या उक्तीला साजेशी अशी दर्जेदार मिठायांची दुकानं पुण्यात हमखास पाहायला मिळतात. चितळे आणि पुणेकरांचं नातं सांगायलाच नको. तशीच पुणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवीणार्या आणि अगदी घरगुती चव देणार्या काही प्रसिद्ध पुण्यातील दुकानांची माहिती या लेखातून घेणार आहोत.

गणेशोत्सव जवळ येऊ लागला रे लागला की मिठाईची समस्त दुकानं सज्ज होतात. बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा, तर मग त्याचे दोनच प्रकार कशाला? चॉकलेटचे मोदक, ड्रायफ्रूट मोदक, खवा-मावा मोदक, पांढरे मोदक, केशरी मोदक, पंचरंगी मोदक, काजू फ्लेवरचे मोदक, अननसाच्या चवीचे मोदक, मिल्क चॉकलेटचे मोदक, अमुक पदार्थाचे मोदक, तमुक ढंगाचे मोदक इत्यादी प्रकारांची रेलचेल मिठाईच्या दुकानांतून दिसून येते. बाप्पाला 21 मोदक आवडतात, म्हणून 21 मोदक असलेला बॉक्स मिठाईच्या दुकानात तयार ठेवलेला असतो. कोणाच्या घरी त्यांच्या गणेशाचं दर्शन घ्यायला जाताना भेट घेऊन जायचा असल्यास खास 11 मोदकांचा ड्रायफ्रूटयुक्त मोदकांचा बॉक्स अशा प्रकारची उपलब्धता हे मिठाईचे मालक करुन देऊ लागतात. अशा बॉक्सवरचं नक्षीकामदेखील साधंसुधं नसतं. ’दर्जेदार पदार्थ आणि तोही आकर्षक पॅकिंगमध्ये’ ही अनेक मिठाईच्या दुकानांची खासियत होऊन बसली आहे.

पुणेकर म्हणजे अस्सल खवय्ये. पुणेरी माणसाची ही खवय्येगिरी चितळे बंधूंनी बरोबर हेरलेली आहे. सार्वजनिक गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांच्या जशा रांगा लागतात, तशाच रांगा त्याचा प्रसाद खरेदी करण्यासाठी चितळे बंधू मिठाईच्या दुकानासमोर लागतात. बाप्पाला विविध मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची चढाओढ भाविकरूपी खवय्यांमध्ये लागते आणि त्यांच्या मागण्या पुरवण्याचं काम चितळे सक्षमतेने करतात. आकर्षक पॅकिंग हे चितळे बंधूंचं वैशिष्ट्य आहे. पुण्यातल्या मानाच्या गणपतींप्रमाणेच ’चितळे बंधू मिठाई’ हे मिठाईच्या जगतात मानाचं दुकान म्हणून ओळखलं जातं. जिथे चितळे बंधूंची शाखा नाही, असा एकही भाग पुण्यात नाही. पुण्यातल्या कोणत्याही भागाचं नाव घ्या. ’चितळे बंधू मिठाई’ दुकान त्या भागात दिसणारच. नुसत्या महाराष्ट्रातच नाही, तर अगदी सातासमुद्रापारही चितळे बंधूंच्या मिठाईचं नाव पोहोचलेलं आहे. त्यामुळे चितळेंच्या दुकानात ग्राहकांची झुंबड उडणं ठरलेलं. गर्दीच्या दिवशी उशिरा गेल्यास तिथली मिठाई संपून जाणं हेही नित्याचंच.
चितळेंच्या बरोबरीने गणेशोत्सवात दर्जेदार खाद्यपदार्थ पुरवण्यात कटिबद्ध असलेलं कोथरुडातलं सुप्रसिद्ध दुकान म्हणजे ’हर्षद’. सचोटी, प्रामाणिकपणा, अपार कष्ट, दर्जा, सातत्य, ग्राहकांप्रति आपुलकी असं सगळं बघायचं असल्यास ’हर्षद’मध्ये चक्कर मारावी. बाप्पाच्या मोदकांबरोबरच पंचखाद्य किंवा चक्क खिरापतीसारखा पदार्थही येथे विक्रीसाठी ठेवलेला पाहायला मिळतो. या साध्यासुध्या पदार्थांनाही मागणी असल्याचं तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. पुरणपोळी करायला तुमच्याकडे वेळ नाहीये? पुरण आयतं तयार असेल तर बरं, असं तुम्हाला वाटत आहे? दिवाळीचा फराळ घरी बनवायचा नाहीये? आज बाप्पाला काय नैवेद्य दाखवू असा प्रश्न पडलाय? प्रवासात तोंडात टाकण्यासाठी काही हलकंफुलकं खायला हवं आहे? नवरात्रीत सोसायटीतल्या भोंडल्याला काय खिरापत नेऊ असा प्रश्न पडलाय? या आणि अशा सगळ्याच प्रश्नांची समाधानी उत्तरं हर्षदमध्ये त्वरित मिळतात. हर्षदमध्ये गेलात की तुमच्या लक्षात येईल - यांचा काउंटर कधीही रिकामा नसतो. इथले कर्मचारी सतत म्हणजे अगदी बारा महिने व्यग्र असतात.

हर्षदनंतर कोथरूडकरांच्या बोलण्यात दर्जेदार मिठाईसाठी एक नाव अलीकडे काही महिन्यांपासून येऊ लागलंय, ते म्हणजे ’दादूस’. दुकानाच्या नावाप्रमाणेच दादूसची मिठाईदेखील आगळीवेगळी आहे. मूळचं गाव हैदराबाद असलेल्या या दुकानाच्या बघता बघता पाच शाखा पुण्यात निघाल्या आहेत. गणेशोत्सवात थेट श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मानाच्या गणपतीच्या नैवेद्याची ऑर्डर दादूसने मिळवलेली आहे, यावरून दादूसची लोकप्रियता लक्षात येईल. चोखंदळ पुणेकरांच्या मनात घर करणं सोपं नाही. पण दादूस या कसोटीला उतरताना दिसतंय. या दुकानात शिरल्यावर इथेच अडकून पडावं असं वाटतं. काचेपलीकडचे मिठाईचे प्रकार बघताना आपले डोळे न दिपले, तरच नवल. इथल्या मिठाईचे दर जरा जास्त वाटू शकतात, पण ’दर आहेत म्हणजे दर्जाही आहेच, एकंदरीत जरा ’शाही’पणाकडे झुकलेलं दादूस पुणेकरांच्या पसंतीला उतरताना दिसतंय.
बाकी, ’पुणे तेथे काय उणे’ या उक्तीला दर्जेदार मिठाईतही दुजोरा देणारी दुकानं म्हणजे ’काका हलवाई’ आणि ’जोशी स्वीट्स’. काका हलवाई दुकान माहीत नसलेला पुणेकर सापडणं शक्य नाही. तीच गोष्ट ’जोशी स्वीट्समध्ये’ शिरलेल्या पुणेकराची. या दुकानात शिरल्यावर कोण जाणे, पण आपोआपच एक प्रकारची आपुलकी वाटू लागते. तुम्ही मिठाईच्या अनेक दुकानांतलं श्रीखंड खाल्लं असेल. पण यांच्या श्रीखंडाची चव तुम्हाला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती देते, हे निश्चित.
अशी ही पुण्यातली मिठाईच्या क्षेत्रातली काही दर्जेदार नावं. अर्थातच ही यादी एवढीच नाही. यात अनेक दुकानांची भर पडताना दिसत आहे. कोविडच्या काळात खरेदी-विक्रीची परिमाणंच बदलून गेली. कित्येकांचे व्यवसाय बुडाले, तर कित्येकांचे व्यवसाय नव्याने सुरू झाले. यादरम्यान घरगुती पद्धतीने बनवलेले फराळाचे पदार्थ विकणं, पुरणपोळ्यांची ऑर्डर घेणं, खव्याच्या पोळ्या बनवून देणं, उकडीच्या मोदकांची ऑर्डर घेणं, मागणीनुसार अधिकात अनारसे बनवून देणं असे घरगुती पातळीवर चालणारे व्यवसायदेखील जोमाने उभे राहू लागले. कोथरूडमधल्या वनदेवी मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर हॉटेल कोकण एक्स्प्रेसच्या गल्लीतल्या ’दातार’ कुटुंबीयांचादेखील असे सगळे उत्कृष्ट चवीचे अन्नपदार्थ बनवून देण्याचा बोलबाला होतोय. याखेरीज ’घे भरारी’सारखा मंचही असे सगळे पदार्थ ’घरपोच’ पोहोचवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतोय.
बाप्पाच्या प्रसादासाठी पंचखाद्य तर बनवायचंय, पण तेवढाही वेळ हाताशी नाहीये.. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी तर करायची आहे, पण त्यासाठी नोकरीतून जास्त सुट्टी मिळणं शक्य नाहीये.. रोजच्या रामरगाड्यात नारळ खोवून ठेवणं, पुरण शिजवणं, चक्का विकत आणून श्रीखंड बनवणं, नारळ-गुळाचं सारण करून ठेवणं, दूध आटवणं अशी जास्तीची कामं करण्यासाठी लागणारा वेळ आणि घरून आवश्यक असणारं मनुष्यबळ पुरेसं नाहीये.. साहजिकच मग मिठाईवाल्यांनी, हलवायांनी या परिणामांचा सखोल विचार करून आपलं कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे. आयता खोवलेला ओला नारळ दुकानातून बारा महिने मिळू लागला. इतकंच काय, तुमच्या घरचा नारळ खोवून देणार्या यंत्राची दुकानं ऐन गणेशोत्सवात चौकाचौकात दिसू लागली. मोदकांचे विविध प्रकार आयते मिळू लागले. उकडीच्या मोदकांच्या ऑर्डरी मिठाईच्या दुकानातून घेतल्या जाऊ लागल्या. अर्थार्जनासाठी बाहेर पडलेल्या महिलांना सणवाराच्या दिवशी गोड पदार्थ करायला पुरेसा वेळ नाही, हे ओळखून घरच्या तोडीचे दर्जेदार पदार्थ तयार करण्याचं काम मिठाईच्या दुकानांनी आपल्या शिरावर घेतलं आहे. हा बदल कालसुसंगत आहे. त्याचं स्वागत करायला हवं.