गौरव प्रयोगशील शिक्षिकेचा

विवेक मराठी    11-Sep-2023
Total Views |
@सायली शिगवण
 पुणे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव, महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना 2023चा भारत सरकारचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातून राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या त्या एकमेव शिक्षिका आहेत. त्या राबवत असलेल्या विविध उपक्रमांचा आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.

vivek
 
प्राचीन भारतात गुरुकुल शिक्षण पद्धती प्रचलित होती. गुरूच्या घरी राहून विद्या संपादन करण्याबरोबरच गुरूकडे असणार्‍या सकारात्मकतेचाही शिष्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उपयोग होत असे. कारण विविध विषयाचे ज्ञान मिळवण्याची इतर साधने तेव्हा उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे आपल्याकडे आलेल्या शिष्याला उपलब्ध असलेला माहितीचा साठा पुरवणे, हे गुरूचे कर्तव्य होते.
 
 
आता ही परिस्थिती काहीशी बदललेली असली, तरी विद्यार्थ्यांना सक्षम नागरिक म्हणून घडवण्यासाठी शिक्षक आजही फार मोलाची कामगिरी बजावतात. आपली शाळा, आपले विद्यार्थी विविध स्तरांवर झळकावे, अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते आणि हीच इच्छा पूर्णत्वास नेत असताना त्यांच्या हातून शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त असे काही मोलाचे बदल घडून येतात. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव, महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांनी हाच मोलाचा वाटा उचलला आणि त्यासाठी त्यांना 2023चा भारत सरकारचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातून राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या त्या एकमेव शिक्षिका आहेत. यापूर्वी त्यांंना 2019 सालाच्या राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्काराने आणि 2022 सालाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
 
 
पुस्तकी ज्ञानाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन-अध्यापन पद्धती अधिक प्रभावी कशी करता येईल, यावर त्यांनी भर दिला. व्हर्चुअल शिक्षण, गेमीफिकेशन इन एज्युकेशन, R-VRचा वापर असे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. एखाद्या विषयाचा अभ्यास करताना आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर तर आपण केलाच पाहिजे; पण इतर शाळांमधील विद्यार्थी कसे शिक्षण घेतायत, हे जाणून घेण्याचा उद्देश ठेवून त्यांनी देशातील इतर शाळांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद घडवून आणला.
 
 
त्यांनी ऑनलाइन शिक्षण, वेबसाइट मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण आणि कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षणसुद्धा दिले. सन 2019-2020 या वर्षात उत्तर प्रदेशमधील नवोदय विद्यालयासाठी त्यांच्या शाळेतील 6 विद्यार्थी पात्र ठरले, तसेच इयत्ता पाचवीमधील 17 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. पंतप्रधान विद्या वाहिनीवर शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर सत्रामध्ये केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET) आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (NCERT) तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले.
 
 
हे सर्व करत असतानाच शिक्षक म्हणून त्यांनी त्यांचे दायित्व कायम डोळ्यांसमोर ठेवत विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने काम केले आणि त्यांच्या या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करून मायक्रोसॉफ्टच्या सी.ई.ओ. सत्या नडेला यांनी दिल्ली येथे त्यांचा सन्मान केला. अशा उपक्रमशील शिक्षिकेला हा सन्मान मिळून त्यांच्या एकूण शैक्षणिक वाटचालीचे सार्थक झाले, असेच म्हणावे लागेल.