जागतिक मंचावर भारतद्वेष

विवेक मराठी    14-Sep-2023   
Total Views |
भारतात जी-20च्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या वेळेस, काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी युरोपच्या दौर्‍यावर गेले होते. तेथे ते ‘हिंदुत्वाचा कट्टर विरोधक’ असलेल्या क्रिस्ट्रॉफ जाफ्रेलॉट यांच्यासोबत होते. ही व्यक्ती भारताची, हिंदूंची बदनामी करत असते. जेव्हा सारे जग भारताची प्रशंसा करतेय, भारताचे नेतृत्व मान्य करतेय, तेव्हा अशा व्यक्तीसोबत बसण्याची काय आवश्यकता आहे? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
congress
 
नवी दिल्लीत झालेल्या जी-20 शिखर संमेलनाने एक इतिहास रचलाय. भारताने या कार्यक्रमासाठी सर्वोत्कृष्ट व्यवस्था केली म्हणून नाही किंवा कार्यक्रम प्रबंधनाचे (इव्हेंट मॅनेजमेंटचे) एक अत्यंत सफल मॉडेल भारताने जगासमोर ठेवले, म्हणूनही नाही. यापूर्वीच्या जी-20 शिखर संमेलनांमध्ये वेगवेगळ्या देशांनी कमी-अधिक प्रमाणात असेच व्यवस्थापन केले होते. भारताने थोडे अधिक आणि नियोजनबद्ध केले असेल इतकेच. मात्र इतिहास यासाठी रचला जातोय, तो भारताने जी-20ला सर्वसामान्य लोकांपर्यंत नेले, म्हणून. सगळ्यांच्या सहभागाचा पूर्ण प्रयत्न भारताने केला. हे असे याआधी कधीच घडले नव्हते. जी-20च्या निमित्ताने दिल्लीच्या याशिखर संमेलनापूर्वी, भारताच्या 60 शहरांमध्ये विविध विषयांवर 220 कार्यक्रम झाले. हा एक विक्रम आहे. यापूर्वी एकाही देशाने जी-20साठी असा उत्साह दाखवला नव्हता आणि संपूर्ण देशाचा, सगळ्या क्षेत्रांतील सहभागाचा असा प्रयत्नही केला नव्हता. त्याचबरोबर, जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारताच्या पुढाकाराने आशिया-युरोप कॉरिडॉर आणि बायोफ्युएलसारख्या अनेक योजना मांडल्या गेल्या. या योजना समूहातील सर्व देशांनी मान्य केल्या. या संमेलनात, जी-20च्या सगळ्या सहभागी देशांना भारताचे नेतृत्व मान्य आहे, असाही एक संदेश ठळकपणे समोर आला.
 
 
पण जेव्हा सारे जग भारताची प्रशंसा करतेय, भारताचे नेतृत्व मान्य करतेय, तेव्हा आपल्याच देशातील काही जबाबदार व्यक्ती, देश-परदेशात आपल्या देशाची प्रतिमा बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे.
 
 
जी-20च्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या वेळेस, काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे अघोषित उमेदवार राहुल गांधी हे युरोपच्या दौर्‍यावर गेले. हे थोडे विचित्र आहे. पण तरी हे मान्य करू की राहुल गांधींना जगभरातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान मोदींची केलेली प्रशंसा आवडत नसेल किंवा मोदींवर उधळलेली स्तुतिसुमने त्यांना बघवत नसतील, म्हणून ते भारताबाहेर गेले.
गेले तर गेले, पण भारताबाहेर युरोपात ते काय करत होते?
 
 
दि. 8 सप्टेंबरला त्यांनी पॅरिसमध्ये फॅकल्टी ऑफ सायन्सेसच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आता ‘राहुल गांधींना सायन्समधील किती आणि काय समजते?’ या प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष करू. परंतु या कार्यक्रमात ते क्रिस्ट्रॉफ जाफ्रेलॉटसोबत एका मंचावर होते.
आता हा क्रिस्ट्रॉफ जाफ्रेलॉट कोण आहे?
 
 
 
क्रिस्ट्रॉफ जाफ्रेलॉट हा एक फ्रेंच इंडॉलॉजिस्ट आहे. शिवाय राजनीतिशास्त्राचा विशेषज्ञ मानला जातो. परंतु याचा मूळ परिचय आहे ‘हिंदुत्वाचा कट्टर विरोधक’. हा सगळ्या मंचांवरून, सगळ्या माध्यमांमधून सातत्याने प्राणपणाने हिंदुत्वाचा आणि मोदींचा विरोध करत आला आहे. 59 वर्षांचा असलेल्या क्रिस्ट्रॉफने भारतावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. सगळी पुस्तके भारताचे नकारात्मक चित्र समाजापुढे उभे करतात. ’मोदीज इंडिया - हिंदू नॅशनॅलिझम अँड द प्राइज ऑफ एथनिक डेमोक्रसी’, ’आंबेडकर अँड अनटचेबिलिटी’, ’संघ परिवार’, ’हिंदू नॅशनॅलिझम’, ’बीजेपी अँड कंपल्शन ऑफ पॉलिटिक्स इन इंडिया’, ’रिलिजन, कास्ट अँड पॉलिटिक्स’ इत्यादी पुस्तके त्याने लिहिली आहेत. या पुस्तकांमध्ये, भारतात कशी विषमता आहे, मानवतेच्या विरोधात असलेली इथली जातिव्यवस्था कशी क्रूर आहे, संघ आणि मोदी कसे कट्टर राष्ट्रवाद पसरवत आहेत, असे सर्व विषय आहेत. जगभरातील माध्यमे त्याला ‘मोदी हेटर’ या नावाने ओळखतात. क्रिस्ट्रॉफने मालेगाव बॉम्बस्फोटाच्या वेळीसुद्धा अनेक आधारहीन वक्तव्ये केली होती. ‘कट्टर आणि अतिरेकी हिंदुत्व कसे सेक्युलॅरिझमला दाबून टाकत आहे’ हे त्याचे सूत्र होते.
अशा भारताच्या प्रतिमेला जगभरात बरबाद करण्याच्या मागे लागलेल्या क्रिस्ट्रॉफ जाफ्रेलॉटबरोबर एका मंचावर कार्यक्रम करताना, राहुल गांधी जगाला काय संदेश देऊ इच्छितात?
 
 
एवढेच नाही, तर राहुल गांधींच्या या दौर्‍यात, काही युरोपीय खासदारांबरोबर राहुल गांधींना भेटवण्याचे काम कोण करतेय? ती व्यक्ती आहे फाबीयोमासि योकास्टाल्डो. इटालियन राजकारणी. युरोपीय पार्लमेंटचा उपाध्यक्ष, जो पाकिस्तानच्या आय.एस.आय.साठी युरोपात काम करत आहे. योकास्टाल्डोचा भारतविरोध सगळ्यांनाच माहीत आहे. ब्रुसेल्समध्ये युरोपियन पार्लमेंट आहे. तिथे अशा भारतविरोधी काही निवडक राजकारण्यांना भेटून राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात राहुल गांधींनी उत्पादनाच्या क्षेत्रात चीनने जी आघाडी घेतली आहे, त्याचे कौतुक केले आणि उत्पादनाच्या बाबतीत भारताचे धोरण किती चुकीचे आहे, किती नियोजनशून्य आहे, हे आवर्जून सांगितले.
 

congress 
 
याला काय म्हणायचे? हे सर्व देशाच्या विरोधात नाही?
 
 
दुसरे उदाहरण आहे जी-20 संमेलन जिथे भरले होते, त्या ’भारत मंडपम’च्या माध्यम (वार्ताहर) कक्षाचे. फ्रान्सचे एक न्यूज चॅनेल आहे, ’फ्रान्स 24’. बर्‍यापैकी लोकप्रिय असलेल्या या चॅनलच्या सूत्रसंचालकाने (अँकरने) आय.आय.टी. दिल्लीच्या, साहित्य आणि दर्शनशास्त्र विषयाच्या साहाय्यक प्राध्यापिका दिव्या द्विवेदी यांना जी-20 कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया द्यायला बोलावले असताना त्यांनी म्हटले, ‘’हा भारत जो तुम्हाला मीडियाच्या नजरेतून दिसतो, तो तसा नाहीये. हा भारत जातिव्यवस्थेमुळे अत्यंत पोखरला आहे. इथे खालच्या स्तरातील लोकांवर भयानक अत्याचार होतात.”
 
 
तो सूत्रसंचालक सांगतोय, की “मागच्या दहा वर्षांत भारताने जबरदस्त विकास केलाय.” तो रिक्षावाल्यासोबतचा त्याचा संवाद ऐकतोय, की सरकारी धोरणांमुळे आणि योजनांमुळे त्या रिक्षावाल्याचे आयुष्य कसे सोपे झालेय. तरीही यावर दिव्याजी म्हणताहेत, ‘’असं नाहीये. भारत हा गेल्या तीन हजार वर्षांपासून जातिव्यवस्थेचा शिकार आहे. भारतात उच्च जातीच्या लोकांनी खालच्या जातीच्या लोकांचे जगणे अशक्य केले आहे. आर.एस.एस.सारख्या फॅसिस्ट संघटना, जी भाजपाची मातृसंस्था आहे, ते आता ‘भारत’ या शब्दाचा वापर करून/ प्रचार करून, कट्टर राष्ट्रवाद आणू इच्छित आहेत.”
 
 
अल जझिरा या वृत्तवाहिनीशी बोलताना अरुंधती रॉय म्हणाल्या की, ’‘या देशात मुसलमानांचं ‘मॉबलिंचिंग’ होतंय. मुस्लीम महिलांवर सामूहिक बलात्कार होताहेत. आणि आमचे पंतप्रधान, लाज कोळून प्यायल्यासारखे जी-20ची संमेलनं करताहेत..” हे सर्व काय आहे? दिल्ली विश्वविद्यालयाची प्राध्यापिका, बुकर पुरस्काराने सन्मानित लेखिका यासारखी मंडळी जेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमांवर, आपल्याच देशाबद्दल इतके खोटे आणि अनर्गल बोलतात, तेव्हा हा देशद्रोह नाहीये?
 
 
राहुल गांधीं, दिव्या द्विवेदी, अरुंधती रॉय यासारख्या लोकांचा मोदीविरोध समजू शकतो. त्यांचा संघाविषयीचा आकसही असू शकेल. संघाला आणि मोदींना विरोध करणे, हेही लोकशाही संमत आहे. यावर आक्षेप नाही. आक्षेप आहे तो या सर्वांनी देशाबाहेर तसेच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर भारताबद्दल जी नितांत खोटी वक्तव्ये केली आहेत, त्यावर.
 
 
आम्ही ’वयम पंचाधिकम शतम...’ मानणारे आहोत. बाह्य आक्रमकांपासून शंभर कौरवांचे रक्षण करताना पांडव म्हणाले होते, “आम्ही पाच नाही, शंभर नाही, आम्ही एकशे पाच आहोत.”
 
ही विचारधारा मानणारा आपला देश आणि याच देशात राहुल गांधी, दिव्या द्विवेदी यांसारखे लोक देशाच्या सन्मानाच्या ठिकर्‍या उडवत आहेत.
 
खरोखर हे अतिशय दुर्दैवी आहे!