कार्यमग्न शामरावजी नाईक

विवेक मराठी    15-Sep-2023
Total Views |
@डॉ. दिवाकर कुलकर्णी
। 9822435531
‘कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती’ या गीताप्रमाणे शामरावजी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिले. तत्त्वनिष्ठ समरसून जगणे हा समाजात मोठा आदर्श घालून देणारे शामरावजी होते. अनेक संस्था उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. ‘राष्ट्रास्तव जे झिजले कण कण, तेच खरोखर विजयी जीवन’ या गीताच्या ओळी शामरावांच्या जीवनावरच आधारित आहेत, असे वाटते.
vivek
 
शामरावजी नाईक यांचे छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच दु:खद निधन झाले. कुठलाही मोठा आजार नाही. पंडित दीनदयाळ शिक्षण संस्थेच्या दर वर्षी होण्यार्‍या निवासी शिक्षक अभ्यासवर्गात ते उत्साहाने सहभागी झाले. सकाळी 6 ते रात्री 10पर्यंत सर्व कार्यक्रमांत त्यांनी भाग घेतला आणि अचानक दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी अगदी किरकोळ ताप येण्याचे निमित्त होऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला.
 
त्यांचे तत्त्वनिष्ठ समरसून जगणे हे समाजात मोठा आदर्श घालून देणारे आहे. निष्ठावान स्वयंसेवक, जलतज्ज्ञ, सात्त्विक बांधकाम व्यायसायिक, नि:स्वार्थी शिक्षण संस्थाचालक, अनेक सामाजिक संस्थांचे खंदे पाठीराखे, उदार आणि अतिशय विनम्र दान दाते, सर्वपंथ समन्वय विषयाचे खंदे समर्थक, रा.स्व. संघ, सामाजिक समरसता मंच, अभाविप, विहिंप, विश्व बौद्ध प्रदर्शनी, सर्वपंथसमादर मंच, डॉ. हेडगेवार रुग्णालय, पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था, महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, डॉ. हेडगेवार रुग्णालय, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, ॐकार बालवाडी, गुरुवर्य लहुजी साळवे, संत रोहिदास, संत गाडगेबाबा आरोग्य केंद्र, विहंग या आणि अशा सार्‍याच कामाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. या सार्‍यांच्या वाटचालीत शामरावजींचे योगदान अविस्मरणीय आहे.
 
1955 साली त्यांचे मोठे बंधू स्व. बाळकृष्ण नाईक उपाख्य बाळदादांनी त्यांना संघात आणले. स्वयंसेवक झाल्यापासून त्यांनी अनेक दायित्वे सांभाळली. छत्रपती संभाजीनगरात त्या काळी संघकामाचा प्रारंभ होऊन 7-8 वर्षे झाली होती. निझाम स्टेटचा प्रभाव असण्याचा तो काळ होता. पुंडलिकजी दानवे, द्वारकादासजी मंत्री यांच्याशी शामरावजींची खास मैत्री होती. घरी संघाला अनुकूल वातावरण प्रारंभीच्या काळात नव्हते, मात्र नंतर पिताही अनुकूल झाले. महावीर नगराचे माननीय संघचालक म्हणून शामरावजींनी काम केले. दिवाण देवडीतून सिडकोत विवेकानंद नगरातील घरी राहायला येईपर्यंत त्यांच्याकडे नगर संघचालक म्हणून दायित्व होते. उच्चशिक्षण घेऊन आपले जीवन उज्ज्वल करण्याची या परिवाराची आजोबांपासूनची परंपरा आजही अखंडित आहे. बाळदादा अमेरिकेतून परत आल्यानंतर आणि संघप्रचारक म्हणून त्यांनी गृहत्याग केल्यानंतर पिताश्रींनी तू अमेरिकेत जाऊन उच्चविद्याविभूषित व्हावे, असा शामरावजींनी सल्ला दिला. शामरावजींनी हा सल्ला नम्रपणाने नाकारत आजी, आई, वडील यांची सेवा करण्यासाठी इथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बी.ई.ला प्रवेश घेतला. पहिल्यापासून ते गुणवत्ता यादीत पहिल्या तीनमध्ये आले. अगदी शालेय शिक्षणापासूनच मेधावी विद्यार्थी म्हणूनच शामरावजींचा लौकिक होता. 
 

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ग्रंथ

संघ ग्रंथ नोंदणीसाठी 

vivek इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते शासकीय नोकरीत लगेच रुजू झाले. पैठणच्या जायकवाडी धरणाच्या निर्मितीचा तो काळ होता. शामरावजींनी 22 वर्षे शासकीय नोकरी केली.
 
शामरावजींना शेतीविषयी विशेष आकर्षण होते. त्यांची वडिलोपार्जित जमीन सिडकोने अधिग्रहित केली. ती करीत असताना मूळ जमीन मालकांवर प्रचंड अन्याय झाला. या सार्‍या अन्यायाच्या विरोधात शामरावजी जिद्दीने लढले. मुंबई, दिल्ली, उच्च न्यायालय, शासन अशा सार्‍या ठिकाणी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय नियम-अटींचा अभ्यास केला. जिंकले. शासनाकडून आणि सिडकोकडून जमीन परत मिळवली. त्यांच्या बाजूने लागलेल्या ह्या निकालाचा उपयोग करीत महाराष्ट्रात अनेकांनी त्यांच्या जमिनी परत मिळवल्या.
 

vivek 
 
शेतीची आवड असल्याने शामरावजींनी बिडकीनजवळ शेती घेतली. अतिशय आवडीने ते ती शेती करीत असत. मन्वर आणि मुन्ना हे सिडकोतील शेतीचे काम करीत असत. हे दोघे आणि त्यांचे कुटुंबीय बिडकीनची शेती गेली 65 वर्षे पाहत आहेत. शेतात जाणे, तिथे रमणे, काम करणे, शेतीत विविध प्रयोग करणे हा त्यांचा विलक्षण आवडीचा छंद होता. कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, कार्यकर्ते यांना शेतावर हुर्डा, दालबाटीच्या निमित्ताने आग्रहपूर्वक आमंत्रित करून ते अशा एकत्रीकरणाचा मनस्वी आनंद घेत असत. त्यांनी बिडकीन येथील शेतात विपश्यना ध्यानधारणा, अध्यात्म चिंतन आणि अध्ययन करण्याची सोय व्हावी, म्हणून ध्यान केंद्रही निर्माण केले.
 
मराठवाड्यात अभाविपची पहिली पूर्णवेळ विद्यार्थिनी म्हणून सांगलीची हेमाताई कुलकर्णी आली. तिची निवास व्यवस्था कुठे करावी असा प्रश्न उभा राहिला, तेव्हा शामरावजींचे घर निवडण्यात आले. हेमाताईला एक घर मिळाले. आजही हेमाताईचे विद्यार्थी चळवळीतील कार्य वाखाणले जाते. ते करण्याची ऊर्जा जशी तिला परिषदेमधून मिळाली, तशी या परिवारातूनही मिळाली. हेमाताई शामरावजींची आणखी एक बहीण आणि त्यांच्या चार मुलींची प्रिय हेमाआत्या झाली. शामरावजी एकदम रसिक. जुनी गाणी ऐकणे आणि गुणगुणणे हा त्यांचा आवडीचा छंद. सकाळचा पहिला चहा आणि खूपदा चारचा चहा तेच बनवणार, ही त्यांची खासियत. लाल परीचा - एस.टीचा प्रवास हा त्यांच्या आवडीचा आणखी एक विषय. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करण्याच्या लाभाविषयी त्यांचे स्वत:चे असे तत्त्वज्ञान होते. लोकसहवास अधिक मिळतो, म्हणून ते शेतावर बहुतेक वेळा लाल परीने जात असत. चारचाकीपेक्षा दुचाकी, लूना, स्कूटी, सायकल ही त्यांची आवडते वाहने होती. चतुर्थीला राजूरला जाऊन रांगेत उभे राहून दर्शन घेणे यात 40 वर्षे कधीही खंड पडला नाही. पाणी आणि जमीन या विषयाचे त्यांचे कार्य, अनुभव आणि सखोल अभ्यास हे अद्वितीय असेच होते. मराठवाड्याचा पाणी प्रश्न, समन्यायी पाणीवाटप, अनेक धरणे, त्या धरणांच्या अंतर्गत होत असलेले जलवितरण यासंबंधाने त्यांनी नोकरीत असताना जितके योगदान दिले, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक योगदान त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दिले.
 
पिताश्री अ‍ॅड. उत्तमराव यांची इच्छापूर्ती व्हावी, म्हणून शामरावजींनी शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे तपस्थळ असलेल्या श्री शूलिभंजन येथे श्री दत्तात्रेयाच्या मंदिरनिर्माणाचे आणि श्री नाथांच्या मंदिरनिर्माणाचे कार्य पूर्णत्वास नेले. श्री शूलिभंजन येथे सतत 12 वर्षे अनेक उपक्रम आयोजित करून त्यांनी हे उपेक्षित तीर्थक्षेत्र नावारूपास आणले. आता तिथे श्री दत्त जयंती आणि श्री नाथ महाराज जयंती, तसेच पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होते. दर वर्षी मोठा अखंड हरिनाम साप्ताह होतो. श्रीक्षेत्र शूलिभंजन आता एक पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्धी पावत आहे. सिल्लोड तालुक्यात वनवासी बांधवांसाठी काळदरीचे हनुमान मंदिर निर्माण करून दिले. आजोबा अ‍ॅड. रामचंद्र नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वत:च्या मालकीचा भूखंड दान करून तिथे उत्तम असे आदर्श शिक्षण केंद्र सुरू केले. या शाळेत आसपासच्या वंचित उपेक्षित आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण जीवन आकारास येत आहे.
 
नाईक परिवाराने आपल्या घरातील सण-उत्सव सामाजिक उपक्रमात परिवर्तित करून साजरे केले. त्यासाठी श्रद्धापूर्वक तन, मन, धन, वेळेसहित हातचे काहीही राखून न ठेवता समर्पित केले. अशा काही समारंभांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. 2004 साली श्री शामरावजींच्या एकसष्ठीपूर्तीच्या निमित्ताने वानप्रस्थी चेतना समारोह आयोजित करण्यात आला. परमपूजनीय सरसंघचालक सुदर्शनजी यांची उपस्थिती या कार्यक्रमास होती. त्या वेळी समाजाच्या विविध स्तरांत कार्य करणार्‍या 21 मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
 
2012 साली मातोश्री निर्मलाबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाईक परिवाराने‘ दरवळ मातृत्वाचा’ हा कार्यक्रम आयोजित केला. निर्मल सेवा न्यास आणि निर्मालोत्तम प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाईक परिवाराने अनेक सामजिक उपक्रम आयोजित केले. या दरवळ मातृत्वाचा कार्यक्रमात समाजातील मातृत्वभावाचा यथायोग्य सन्मान केला गेला. 2017 साली आदरणीय बाळदादांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे असेच मोठ्या सार्वजनिक स्वरूपात आयोजन करण्यात आले. त्यास वंदनीय आचार्य गोविंददेव गिरिजी, माननीय मधुभाई कुलकर्णीजी, वंदनीय हभप भास्कर गिरी महाराजजी, वंदनीय ह.भ.प. भगवान महाराज आनंदगडकर, तत्कालीन प्रांत संघचालक दादा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बाळदादांबरोबरच 81 तपोवृद्ध ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.
 
स्वामी विवेकानंद नगर हे शामराव नाईक यांनी उभारले. बांधकाम व्यावसाय त्यांनी नैतिकतेला सोडून कधीच केला नाही. केवळ एवढेच नाही, तर स्वामी विवेकानंद नगरात त्यांनी स्वामी विवेकानंद यांचा भव्य पुतळाही उभारला. या वेळी त्यांनी व्यक्त केलेले विचार त्यांची निर्मळ आणि तत्त्वनिष्ठ मनोवृत्ती दर्शवणारे होते.
 
2018मध्ये ‘भविष्यातील भारत’ या विषयावर दिल्ली येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेत प्रबोधनपर भाषणात विद्यमान सरसंघचालक परमपूजनीय डॉ. मोहनजी भागवत यांनी हिंदुत्व समजावून सांगताना शोषणमुक्त, बंधुभावयुक्त समरस समाज निर्माण करण्यासाठी स्वयंसेवक घडविण्याचे काम संघ करतो असे प्रतिपादन केले. याच भाषणात त्यांनी रवींद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रचनांचा संदर्भ देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार करतो, त्यावर प्रकाश टाकला. संघ असे विश्वकल्याणकारी हिंदुत्व जगणारे स्वयंसेवक आणि परिवार निर्माण करण्याचे काम करतो, असे ते म्हणाले. असे हिंदुत्व आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्षात आणणार्‍या स्वयंसेवक आणि परिवारापैकी एक स्वयंसेवक म्हणजे शामरावजी आणि त्यांचा परिवार! ‘कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती’ या गीताप्रमाणे शामरावजी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिले. त्यांना आदरपूर्वक साश्रू श्रद्धांजली.