@प्रतिनिधी

सांगलीच्या गणेशोत्सव आणि संस्थान गणपतीची पाचव्या दिवशीची विसर्जन मिरवणूक संपूर्ण जिल्ह्यासाठीचे आकर्षण असते. गणपतीबाप्पांसाठी मोदकाचा घरोघरी नैवेद्य दिला जातो. मात्र सांगलीतल्या विसर्जन मिरवणुकीशी एका मिठाईचे नाते म्हणजे चिरमुरे आणि भेंड बत्ताशे. मंदिराजवळच अजूनही रंगीत साखरेपासून तयार केलेल्या हत्ती, उंट, वाघ अशा विविध प्राण्यांच्या मूर्तीची दुकाने उत्सवकाळात लागतात. जुन्या सांगलीकरांच्या नजरेसमोर ती नक्की तरळतील. आता ही दुकाने अगदीच कमी असली, तरी अजूनही आहेत. भेंड बत्ताशे आणि सांगलीचे कुरकुरीत चिरमुरे हीच सांगलीकरांची मिठाई. मात्र आता काळाच्या ओघात प्रांतोप्रांतीच्या नवनव्या मिठाईची सांगलीकरांना चटक लागली आहे.
सांगलीच्या आयर्विन पुलावरून हरभट रस्त्याने सांगलीत प्रवेश केला की समोर पालिकेची इमारत आणि तिथे समोरच भगवानलाल कंदी मिठाई भांडार आहे. तेथे मलईदार पेढे, कलाकंद आणि मसाल्याचे दूध आजही मिळते. मात्र गणेशोत्सवात कंदी पेढ्यांना मागणी सर्वाधिक. 1946मध्ये राजकवी साधूदास यांच्या सल्ल्यावरून राजे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या प्रोत्साहनाने ‘हरभट मिठाई भांडार’ सुरू झाले. राजेसाहेबांनीच भगवानलाल यांच्या ‘मोदी’ आडनावाचे ‘कंदी’ असे नामांतर केले. तेच नाव पुढे दुकानाला लागले. पेढ्यासाठी खवा भाजताना त्याला जो तांबूस-किरमिजी केशरी असा रंग येतो, त्या रंगाचे नावही पुढे ‘कंदी कलर’ असे झाले. एखाद्या मिठाईचा यापेक्षा मोठा गौरव तो कोणता? आता भगवानलाल यांच्या पुढच्या पिढ्या त्याच कंदी पेढ्यांची आजही विक्री करीत आहेत.
सांगलीत लांजेकरांची मिठाईची किमान पाच-सहा दुकाने आहेत. यांचे मूळपुरुष धोंडिराम महादेव लांजेकर. सुमारे साठ-सत्तर वर्षांपूर्वी ते कोकणातून भगवानलाल कंदीकडे कामाला आले. पुढे सांगलीत त्यांनी स्वतंत्रपणे स्वत:च्या नावाने मिठाई दुकान सुरू केले. आता सांगलीत मारुती रस्ता, बालाजी चौक, विश्रामबाग चौक येथे त्यांच्या कुटुंबाची पाच-सहा दुकाने आहेत. गुलाबजाम आणि खव्याचे मोदक, कलाकंद यांना गणेशोत्सवात मागणी वाढते, असे किशोर लांजेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, “उत्सवकाळात मोदक आकारातील विविध प्रकारची मिठाई तयार करतो. बाप्पांच्या प्रसादासाठी बुंदी लाडवांना मोठी पसंती असते. त्यामुळे रोज बुंदी लाडू तयार करण्याची घाई सुरू आहे. उत्सवाच्या आठ दिवसांत रोज पन्नास ते साठ किलोंचा खप होतो. गुलाबजामला आणि खव्याच्या मोदकांना बाहेरून मागणी वाढते. तशी उत्सवकाळात ती सर्वांचीच पसंती असते. दूध दरात गेल्या महिन्याभरात लीटरला सहा रुपये दर वाढला आहे. साहजिकच सर्वच मिठायांचे दर वाढले आहेत. गतवर्षी प्रतिकिलो 480 रुपये खव्याच्या मोदकांचा दर होता. तो या वर्षी सहाशे रुपयांवर पोहोचला आहे. दूध दरातील वाढीमळे दरवाढ करणे भाग पडते आहे.”
मारुती चौकातील मंगल मिठाई भांडार सर्वांच्याच परिचयाचे. अगदी पाच बाय दहाच्या छोट्या दुकानात संजय आणि वैशाली रणभोर दांपत्य इथे दिवसभर पेढे आणि कलाकंद करण्यात बारा महिने व्यग्र असते. 1958मध्ये त्यांचे वडील रामचंद्र यांनी हे दुकान थाटले. इथले आंबा मोदक खास गणेशोत्सवातील आकर्षण असते. सांगलीतील बालाजी चौकातून महात्मा गांधी रस्त्यावरून पुढे जाताना चव्हाण बंधू मिठाईवालेंचे दुकान आहे. उत्सवकाळात जिल्हाभरातून येणारे भाविक चव्हाण बंधूंच्या दुकानासमोर जिलेबीची चव चाखायला हमखास थांबतात.
खिलारे बंधूंची सांगलीकरांना ओळख आहे ती शुद्ध शाकाहारी खानावळवाले म्हणून. खिलारे बंधूूंचे मारुती रस्त्यावरील मिठाई भांडार म्हणजे अनुपम स्वीट्स. खिलारे बंधूंची चवीची परंपरा मिठाईतून पुढे नेणारे अभिषेक खिलारे यांनी खास उत्सवासाठी खवा, मलई आणि गुलकंदाचे मोदक तयार केले जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “उत्सवकाळात प्रतिकिलो पाचशे साठ रुपये दराने विक्री असेल. 21 मोदकाचे खास उत्सवातील पॅकेट असेल. त्याची किंमत 140 रुपये असेल. गौरीसाठी अनारसे, करंजी आणि चकलीही आहे. बुंदी तसेच तुपातील बेसन लाडू तयार केले जात आहेत.”

शतकी परंपरेचे मिरजेतील मिठाई भांडार म्हणजे ‘बसाप्पा हलवाई’. मिरजेत पेढा म्हटले की बसाप्पाचाच असे समीकरण रूढ झाले आहे. त्यामागे आहे पिढ्यांची व्यवसायाप्रती असलेली निष्ठा. मिरजेच्या वैभवशाली परंपरेचे साक्षीदार असलेल्या लक्ष्मी मार्केटमध्ये 100 वर्षांपूर्वी बसाप्पा यांनी ग्राहकसेवेचे व्रत सुरू केले. त्यांची चौथी पिढीही त्याच जोमाने हेच व्रत पुढे चालवीत आहे. बसप्पा, मल्लाप्पा, शंकरराव आणि आता चौथी पिढी या व्यवसायात तितक्याच ताकदीने पाय रोवून उभी आहे. मयूर व नितीन चौगुले यांनी यात आधुनिकता आणली आहे. सांगलीत गावभागात मारुती चौकात आणि विश्रामबागला क्रांतिसिंह चौकात त्यांच्या बसाप्पा हलवाई ब्रँडची दुकाने सुरू झाली आहेत. इथे नव्याने तुपातील अरेबिक स्वीट्स म्हणजेच बकलावा मिळतो. उत्सवासाठी बाहेरगावाहून येणार्यांसाठी चिवड्याचे विविध प्रकार, पारंपरिक पदार्थांचे प्रकार, शेवेचे प्रकार, लाडूचे विविध प्रकार, साजूक तुपातील फराळाचे जिन्नस, मिठाईचे विविध प्रकार, काजू मिठाईचे विविध प्रकार, बर्फीचे प्रकार आणि पेढ्यांचे विविध प्रकार आवर्जून उपलब्ध करून दिले जातात. ही चव घेऊन पाहुणे बाहेरगावी जातात.

सांगलीत संस्थानकाळापासून राजस्थानी, मारवाडी, गुजराती समाज स्थायिक झाला आहे. त्यामुळे सांगलीत त्यांचीही खाद्यसंस्कृती खूप आधीपासून रुजली आहे. विशेषत: वखार भागातील अनेक मिठाईची दुकाने राजस्थानी, गुजराती खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. अलीकडे राजपुरोहित नावाने मिठाईची दुकानेही सुरू झाली आहेत. त्यांनी रसमलई, काजूकतली आणि राजस्थानी खाद्यसंस्कृतीतील विविध प्रकारच्या मिठाईची गोडी सर्वांना लावली आहे. एस.टी. स्टँड परिसर, मारुती रस्ता, राम मंदिर चौक, कॉलेज कॉर्नर आदी अनेक ठिकाणी त्यांची ही मिठाई दुकाने आता चांगला जम बसवून आहेत. त्यांना महाराष्ट्रीय मंडळींची एक सवय लागली आहे, ती म्हणजे ‘आमची कुठेही शाखा नाही’ असे फलक ते आवर्जून लावतात. गेली पन्नास वर्षे येथील राम मंदिर चौकात रमणिकलाल दामोदर शहा यांचे छोटेखानी दुकान आहे. गुजराती फाफड्याची, कचोरीची अस्सल चव चाखण्यासाठी खवय्ये इथे येतात. गणेशोत्सवात खास गुजराती पद्धतीने केलेला मोदकाच्या आकारातील बुंदी लाडू सर्वांचे आकर्षण असतो. याच चौकात बेकरी पदार्थांसाठी सांगलीत प्रसिद्ध असलेली परिवार बेकरी आहे.