आधुनिक काळातील हिंदुत्वाचे पहिले पुरस्कर्ते - ऋषी राजनारायण बसू

विवेक मराठी    18-Sep-2023
Total Views |
@मिलिंद सबनीस। 9422881783
हिंदू धर्म सुमारे 175 वर्षांपूर्वी जातिभेद, वंशभेद, रूढी-परंपरा यांनी झाकोळलेला होता. अशा वेळी आपल्या वाणीतून, लेखणीतून आणि प्रत्यक्ष कृतीतून नवसंजीवनी मिळवून देणार्‍या राजनारायण बसूंसारख्या ऋषितुल्य व्यक्तीचे महत्त्व आजही तितकेच जाणवते आहे. हिंदूंची जागृती करणार्‍या ’हिंदू मेळा’ या प्रथम संस्थेची स्थापना त्यांनी केली होती. आपल्या स्वत:च्या धर्माविषयी लोकांच्या मनातील न्यूनगंड दूर करीत हिंदुत्वाचे श्रेष्ठत्व सांगणार्‍या राजनारायण बसूंच्या 125व्या स्मृतिवर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने केलेले हे स्मरण !

vivek
 
एकोणिसाव्या शतकाच्या चौथ्या-पाचव्या दशकात भारतात सामाजिक सुधारणांचे वारे नवशिक्षितांमध्ये पसरू लागले होते. इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव वाढवताना भारतीय मूळ शिक्षणपद्धतीला नष्ट करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांकडून चालवला जाऊ लागला होता. अशा वेळी इंग्रजी शिक्षण घेऊनही आपली संस्कृती आणि विशेषत: हिंदू धर्माचे स्थान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार्‍या ऋषितुल्य व्यक्तींमध्ये राजनारायण बसू यांचे नाव प्रामुख्याने घेतले पाहिजे. त्यांच्या निधनाला 124 वर्षे पूर्ण झाली. आज हिंदू धर्माच्या पुन:जागृतीसाठी प्रयत्न करणार्‍या संस्था मोठ्या प्रमाणावर असल्या, तरी हिंदूंचे जनजागरण करणार्‍या ’हिंदू मेळा’ या प्रथम संस्थेची स्थापना करणार्‍या राजनारायण बसूंना आपण विसरलो आहोत.
 
 
7 सप्टेंबर 1826 रोजी बंगालच्या 24 दक्षिण परगणा येथील बोलार या गावी नंदकिशोर बसू यांच्या पोटी राजनारायण यांचा जन्म झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कलकत्त्यात पूर्ण केले. बंगालमध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणार्‍या हेयर यांच्या विद्यालयात त्यांनी इंग्लिशचा आणि लॅटिनचा अभ्यास केला.
 
 वयाच्या 22व्या वर्षी केनोपनिषद, अथोपनिषद, मंडुकोपनिषद आणि श्वेताश्वतरोपनिषद या चार उपनिषदांचा त्यांनी इंग्लिशमध्ये अनुवाद
 
वयाच्या 22व्या वर्षी केनोपनिषद, अथोपनिषद, मंडुकोपनिषद आणि श्वेताश्वतरोपनिषद या चार उपनिषदांचा त्यांनी इंग्लिशमध्ये अनुवाद केला होता. अत्यंत तरुण वयात अभ्यासपूर्ण लेखनामुळे एक विद्वान म्हणून त्यांचा लौकिक वाढू लागला. 1848मध्ये आपले शिक्षक हेयर यांच्या स्मृतिसभेत स्वदेशी भाषांच्या उन्नतीसाठी केलेल्या भाषणात ते म्हणाले, “राष्ट्राची उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय भाषेतील साहित्याचे योगदान निश्चितच मोठे असते.”
 
 
1851पासून ते मिदनापूर कॉलेजिअर स्कूल या सरकारी शाळेचे पहिले प्राचार्य झाले. 1857चे स्वातंत्र्यसमर त्यांनी अनुभवले. त्यामुळे इंग्रजांच्या प्रशासकीय सेवेत वरिष्ठ पदावर आमंत्रित होऊनसुद्धा त्यांनी ती संधी धुडकावून लावली. महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या सहवासामुळे ते ब्राह्मो समाजाचे अनुयायी झाले. परंतु ब्राह्मो समाजाचे विचार हिंदू समाजाच्या मूळ स्रोताच्या जवळचे असावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मूळ हिंदू धर्माचे विचार काहीसे मागे पडत चालले आहेत, याची त्यांना जाणीव झाली. सामाजिक सुधारणा आणि पूर्ण राजकीय स्वातंत्र्य यांच्याबरोबर हिंदू धर्मातील आदर्श विचारांचा सुयोग्य मेळ पहिल्यांदा राजनारायण बसूंनीच घातला. 1857च्या असफलतेनंतर त्यांनी गुप्त क्रांतिकारक संघटनाही सुरू केली होती. परंतु सर्वसमावेशक अशी हिंदू संघटना असावी, यासाठी ’राष्ट्रीय गौरवेच्छा संपादनी सभा’ या संस्थेची स्थापना केली.
 
 
सशस्त्र मार्गाप्रमाणे वैचारिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. इंग्रजांचे राज्य ही ईश्वराची कृपा वाटणार्‍यांची संख्या जास्त होती. अशा वेळी ब्रिटिश संस्कृती आणि भारतीय संस्कृती यातील तफावत, इथल्या भूमीला असलेली प्राचीन संस्कृतीची देणगी हे सत्य मांडण्याचे काम जे विचारवंत करत होते, त्यात राजनारायण बसू अग्रक्रमी होते. ’हिंदू धर्मेर श्रेष्ठत्व’, ’वृद्धी हिंदूर आशा’, ’जातीय गौरव प्रसारिणी सभा’ अशा अनेक लेखांमधून राजनारायण बसू यांनी युवकांमध्ये स्वदेशप्रेम जागृत करण्यास सुरुवात केली. ’जातीय गौरवेच्छा संचालित सभा’ या संस्थेमधून ’हिंदू मेळा’ या संघटनेची स्थापना झाली. राजनारायण बसूंबरोबर नवगोपाल मित्र हे तिचे संस्थापक होते.
 
  
पहिल्या पाच-दहा वर्षांच्या काळातच ’हिंदू मेळा’ संघटनेच्या माध्यमातून राजनारायण बसूंनी एका अतिशय मोठ्या पुन:जागृतीला सुरुवात केली. 12 एप्रिल 1867 या दिवशी कलकत्त्यात हिंदू मेळ्याचे पहिले अधिवेशन झाले. पुढे एक वर्षाने 11 एप्रिल 1868 या दिवशी दुसरे अधिवेशन झाले. या दुसर्‍या अधिवेशनात रवींद्रनाथांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ ठाकूर यांची ’मिले सब भारत संतान, एक तान मन प्राण। गाओ भारतेर यशोगान॥’ ही कविता विलक्षण गाजली. ’हे महागीत अखिल राष्ट्राचे गीत बनो’ असा आपल्या बंगदर्शनच्या अंकातून बंकिमचंद्रांनी याचा गौरव केला होता.
  
हिंदू मेळ्याची अधिवेशने चैत्र महिन्यात होत, त्यामुळे यास ’चैत्र मेळा’ असेही म्हटले जाई. या मेळ्याचे सहा मुख्य उद्देश होते. त्या प्रत्येक उद्देशासाठी एक एक समिती होती. या मेळ्याच्या कार्यामध्ये कुस्ती, व्यायाम, लाठीकाठी अशा मर्दानी खेळांना महत्त्व दिले होते. गोरक्षण आणि संस्कृत भाषेचे शिक्षण याचा राष्ट्रैक्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न हिंदू मेळ्यात होता. विशेष म्हणजे स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग असणारी आधुनिक काळातली ही पहिलीच संघटना असावी. हिंदू मेळ्यांमधून स्त्रियांना शिवणकामासारख्या उद्योगाचे शिक्षण दिले जात होते. या काळातील अनेक साहित्यिक, संगीत क्षेत्रातील व्यक्ती यांना हिंदू मेळ्यानेच प्रेरणा दिली. प्रोत्साहन दिले, लोकांना विचारप्रवृत्त केले, संघटित केले. सामाजिक क्षेत्रातले अनेक सुधारणावादी विचार करणारे कार्यकर्ते त्यांनी तयार केले. संस्थेत सहभागी होणार्‍या लोकांवर भारतीय पोशाखाचीच सक्ती असे. इंग्लिश शब्दांचा वापर करणार्‍यास दंड केला जाई. अनेक कलापूर्ण वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले जाई. बुद्धिमत्ता, कला-कौशल्य यांना प्रोत्साहन देण्याची राजनारायण बसूंची भूमिका असे. जीवनाच्या सर्व अंगांनी आपले व्यक्तिमत्त्व फुलवत राष्ट्रीय विचारसरणी अंगी बाणवावी, हा हिंदू मेळ्याच्या आयोजनाचा उद्देश त्यांनी कायम ठेवला. अशा प्रकारचे संघटन करण्याचा राष्ट्रीय पातळीवरचा हा पहिलाच प्रयत्न होता.
 
 
1885मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. सुशिक्षित विचारवंतांच्या राजकीय मतप्रणालीला व्यासपीठ मिळाले. संघटितपणे व सनदशीर मार्गाने इंग्रज राजवटीला विरोध करण्याचे काम राष्ट्रीय सभेने सुरू केले. वास्तविक राजनारायण बसू यांनी कलकत्त्यात सुरू केलेला हिंदू मेळा हे वैचारिक दृष्टीने राष्ट्रीय सभेचे पूर्व स्वरूपच मानले पाहिजे. राजनारायण बसूंनी हिंदू धर्माचा केवळ धार्मिक अंगाने विचार केला नाही, तर त्याला व्यावहारिकतेची जोड दिली. गरीब हिंदूंसाठी व्यावसायिक शिक्षण देण्याचा त्यांनी आग्रह केला. हिंदू तीर्थस्थानांचे संरक्षण हा हिंदू मेळ्यातील शिकवणीचा एक भाग होता. राजनारायण बसू यांचे ’हिंदू धर्म की श्रेष्ठता’ हे छोटे पुस्तक त्यातील विचारांमुळे खूप गाजले होते. राजनारायण बसू आपल्या देशाला हिंदू राष्ट्र याच नावाने संबोधतात. प्रत्येक गावात महा हिंदू समितीचे एक कार्यालय असावे, ज्याच्यात हिंदू संस्कृतीच्या मानचिन्हांना भारताच्या नकाशाला महत्त्वाचे स्थान असावे. महा हिंदू समितीच्या कार्यक्रमाची सुरुवात ’जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी’ या संस्कृत श्लोकाने, उच्चारणाने होत असे व मग त्यानंतर प्राचीन हिंदू राजे, वीरांगना, कवी, विचारवंत यांची महती सांगणार्‍या रचना गायल्या जात.
 
 
भारताचे भविष्य रेखाटताना ते म्हणतात की ‘मी पाहतो आहे की, आपले राष्ट्र पुन्हा एकदा ज्ञान, धर्म आणि संस्कृती या आधाराने उज्ज्वल स्थानावर राहून पृथ्वीला सुशोभित करेल. हिंदू राष्ट्राची कीर्ती पुन्हा एकदा पृथ्वीवर विस्तारित होईल.’
 
 
1868मध्ये ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. काही काळ कलकत्ता येथे व नंतर बिहारमधील देवघर या गावी ते स्थायिक झाले. डॉक्टर कृष्णघन घोष यांच्याबरोबर आपली मुलगी स्वर्णलतादेवी हिचा विवाह करून दिला. त्या वेळी बंगालमधील एक अतिशय मोठे आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व विजयकृष्ण गोस्वामी हे आचार्यगण म्हणून उपस्थित होते. केशवचंद्र सेन, अयोध्यानाथ पाकडाशी हेही या लग्नात पुरोहित होते. या वेळी राजनारायण बसूंनी ’धर्मतत्त्व दीपिका’ हे आपले पुस्तक जावयास अर्पण केले. तेव्हा त्यांनी लिहिले होते की ‘माझी स्वत:ची ज्येष्ठ कन्या हिच्याबरोबर माझी मानसकन्या असलेले ’धर्मदीपिका’ हे पुस्तक तुम्हास अर्पण करत आहे. कुठल्याही धर्मात असे दोन एकत्रित विवाह निषिद्ध नाहीत.’ याच डॉ. कृष्णघन घोष आणि स्वर्णलतादेवी यांच्या पोटी जन्माला आलेल्या अरविंद घोष यांनी प्रथम भारतीय राष्ट्रवाद व उत्तरायुष्यात तत्त्वज्ञान, अध्यात्म यात उच्चतर स्थान मिळवून राजनारायण बसू या आपल्या आजोबांची परंपरा एका सर्वोच्च स्थानावर नेली. 1894मध्ये श्रीअरविंद परदेशातील शिक्षण संपवून भारतात आल्यावर काही काळ आजोबांच्या सहवासात राहिले होते. आजोबांच्या आध्यात्मिक आणि राष्ट्रीय वृत्तीचा अनुभव त्यांच्या मनावर कोरला गेला होता.
 
 
देवघरच्या वास्तव्यात वृद्धावस्थेतही त्यांचे लिखाण, हिंदू धर्माविषयीचे चिंतन कायम चालू राहिले. 18 सप्टेंबर 1899 या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही देवघरमधील त्यांचे घर, त्यांची पुस्तके, त्यांचे साहित्य, विचारवंतांचे आणि क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान राहिले आहे, असे म्हणतात. 18 जानेवारी 1908 रोजी भारतातला पहिला बाँब देवघरमधल्या या वास्तूच्या परिसरातच बनला होता.
 
 
सुमारे 175 वर्षांपूर्वी जातिभेद, वंशभेद, रूढी-परंपरा यांनी झाकोळलेल्या हिंदू धर्माला आपल्या वाणीतून, लेखणीतून आणि प्रत्यक्ष कृतीतून नवसंजीवनी मिळवून देणार्‍या राजनारायण बसूंसारख्या ऋषितुल्य व्यक्तीचे महत्त्व आजही तितकेच जाणवते आहे. आपल्या स्वत:च्या धर्माविषयी लोकांच्या मनातील न्यूनगंड दूर करीत हिंदुत्वाचे श्रेष्ठत्व सांगणार्‍या राजनारायण बसूंच्या 125व्या स्मृतिवर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने केलेले हे स्मरण !