शब्दसाधनेचा स्नेहगौरव

विवेक मराठी    25-Sep-2023
Total Views |
@उत्तमकुमार जैन
अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य विश्वातील मान्यताप्राप्त ‘स्नेहांजली पुरस्कार’ मराठी सारस्वतातील एका लेखकास व लेखिकेस दिला जातो. हे पुरस्काराचे 21वे वर्ष आहे. सुप्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला (रिसबूड) यांना जाहीर झाले आहे. या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते व लेखक उत्तमकुमार जैन यांनी सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्यावर लिहिलेला लेख.

Sumedh Vadawala  Risbud
 
2000 सालाच्या काही वर्षं आधी आणि काही वर्षं नंतर अशा अल्प कालखंडात कथा-कादंबरी लेखनावर नाममुद्रा उठवणारे सुमेध वडावाला (रिसबूड), नंतरच्या काळात आत्मकथा लेखनाच्या प्रांतात लौकिक मिळवत रमून गेले. आजवरच्या त्यांच्या एकूण 33 प्रकाशित पुस्तकांपैकी तब्बल 14 पुस्तकं आत्मकथांच्या शब्दांकनाची आहेत. बालवयात कोकणातल्या खेडमध्ये आणि नंतरची सारी वर्षं, मुंबईची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणार्‍या विलेपार्ल्यात त्यांचं वास्तव्य झालं. दीर्घकाळ माझगाव डॉकमध्ये नोकरी केली. कोकणाची निसर्गसंपन्न भूमी, महानगरातलं क्रूर, बकाल जिणं, झगमगाटी कॉर्पोरेट विश्वातले अकल्पित ताणतणाव यांची प्रतिबिंबं त्यांच्या कथा-कादंबर्‍यांतून दिसली आणि विलक्षण लेखनशैलीइतकीच लेखनातल्या अस्सलपणाचीही दर्दी वाचकांनी, समीक्षकांनी आरंभापासून दखल घेतली. 1992मध्ये वर्षातली सर्वोत्कृष्ट कथा म्हणून तत्कालीन ज्येष्ठ, नामवंत कथाकारांच्या कथांना मागे ‘दान’ या कथेची ठेवून निवड झाली आणि पहिलाच ‘शांताराम पुरस्कार’ दिला गेला. तो केवळ आरंभ होता. नंतर विषयांत वेगळेपण राखत लिहिल्या गेलेल्या त्यांच्या कथासंग्रहांना, कादंबर्‍यांना महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद यांसह अनेक प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार मिळत गेले. कथात्म साहित्यात उत्तम जम बसलेला असूनही, नावीन्याच्या वाटांचा शोध अथकपणे घेणार्‍या त्यांच्या लेखणीला जणू ‘वास्तव हे कल्पितापेक्षा अद्भुत असतं’ या विचाराचा मोह पडला आणि ते आत्मकथा लेखनात स्थिरावले. इथेही त्यांनी विषयांचं वेगळेपण कसोशीने जपलं. पोहण्यात विश्वविक्रम केलेल्या रूपाली रेपाळेची तरण कहाणी असो, मराठी उद्योजक घडवण्यासाठी ‘सॅटर्डे क्लब’ स्थापणार्‍या माधवराव भिड्यांची सत्यकथा असो, की दारू-गर्द आदी व्यसनांनी सडून गेलेल्या आयुष्यातही व्यसनमुक्तीनंतर उत्तुंग झेप घेणार्‍या दत्ता श्रीखंडेंची संघर्ष यशकथा असो..
 
 
 
वडावालांनी शब्दांकित केलेली प्रत्येक आत्मकथा जीवनाचे अज्ञात प्रदेश सुरसपणे, तरलपणे सांगणारी आहे. अपयश, अन्यायग्रस्तता, दैन्य आदी शापांतून मुक्ती मिळवण्यासाठी, ‘तू स्वत:च धडपडायला हवंस’ असा संदेश देणार्‍या त्यांच्या वास्तव कहाण्या या कुणाच्याही मनातली निराशा पुसून टाकणार्‍या आहेत. कथालेखनाच्या भक्कम पायामुळे त्यांनी शब्दबद्ध केलेली प्रत्येक आत्मकथा नाट्यदर्शी, उत्कंठावर्धक झाली.
 
 
‘इतर लेखक’ शब्दांकन करतात. पण वडावालांची लेखणी नायकाचं ‘मनांकन’ करते, असे ‘साहित्यसाधना’ पुरस्कार प्रदान करतेवेळी ज्येष्ठ लेखक भा. ल. महाबळ यांनीकाढलेले गौरवोद्गार त्यांच्या आत्मकथा लेखनाचं अचूक गुणमापन करणारे होते. वर्ण्य विषय ऐसपैसपणे मांडण्याच्या लेखणीच्या मूळ स्वभावाला कमीत कमी शब्द वापराची शिस्त लागावी, म्हणून वडावाला यांनी वृत्तपत्रीय स्तंभलेखनाचा जो मार्ग स्वीकारला, तिथेही वाचकांना त्यांची आशयझेप अनुभवायला मिळाली.
 
 
नानाविध लोकांच्या अनुभवांची त्यांची सदरं वर्षानुवर्षं वाचक पसंतीची ठरली. स्वत: प्रस्थापित, प्रथितयश झाल्यावर नवोदितांचा लेखनप्रवासही सुकर होण्यासाठी काही करावं याची जाणीव लेखनगुरू निरंजन घाटे यांनी मनात रुजवली. वडावाला यांनी कित्येक पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहून दिल्या. प्रभावी लेखनसेवेसाठी ‘युवक बिरादरी’ने दिलेल्या राष्ट्रीय पुरस्कारायोगे ‘साहित्यश्री’ सुमेध वडावाल्यांना ‘स्नेहांजली’ पुरस्कार दिला जाणं म्हणजे सदतीस वर्षांच्या निखळ, निर्मळ साहित्यप्रवासाचा ‘स्नेहगौरव’ होण्याचा आनंदयोग आहे.
 
लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.