विश्वबंधुत्व दिन शिकागो सर्वधर्मपरिषदेची संकल्पना

09 Sep 2023 17:28:41
vivekanand
शिकागो सर्वधर्मपरिषदेत स्वामीजींनी विश्वधर्माची संकल्पना मांडली. याच शिकागोतील सर्वधर्मपरिषदेपासून पाश्चात्त्य देशांत स्वामीजींची कीर्ती पसरली. स्वामीजींनीच पाश्चात्त्य देशांत हिंदू धर्म, वेदान्त तत्त्वज्ञान सर्वदूर पोहोचविले, म्हणून हा दिवस विश्वबंधुत्व दिन म्हणून साजरा केला जातो.
अमेरिकेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रचंड आर्थिक विकास आणि प्रगती झालेली होती. त्या जोरावर अमेरिका देश एक जागतिक महासत्ता बनलेला होता. यासंबंधी अमेरिकेतील जनतेला प्रचंड अभिमान वाटत होता. हे यश साजरे करण्यासाठी एक समारंभ करावा, असा विचार अमेरिकेत चालू होता. ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावण्यास 1893 साली 400 वर्षे पूर्ण होणार होती. या निमित्ताने जगातील सर्वांना अमेरिकेतील सुबत्तेचे, प्रगतीचे दर्शन घडवावे, या हेतूने वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रदर्शने लावण्याचे ठरले. तसेच जगातील सर्व धर्मांमध्ये ख्रिस्ती धर्मच कसा श्रेष्ठ आहे, हे सगळ्यांच्या मनावर बिंबविण्याचा हेतू मनात ठेवून प्रदर्शन संयोजन समितीने सर्व प्रमुख धर्मांना बोलावून सर्वधर्मपरिषदेचे आयोजन करण्याचे ठरविले. सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी शिकागो येथे सर्वधर्मपरिषदेचे आयोजन होते आहे, ही बातमी सर्व देशांत पसरविली गेली.
 
 
स्वामी विवेकानंदांची सर्वधर्मपरिषदेत सहभागाची तयारी
 
स्वामी विवेकानंद जेव्हा परिव्राजक अवस्थेत भारतभ्रमण करत होते, तेव्हाच जुनागड संस्थानच्या महाराजांकडून त्यांना सर्वधर्मपरिषदेच्या आयोजनाची बातमी समजलेली होती. हिंदू धर्म, वेदान्त याविषयीचे स्वामीजींचे सखोल ज्ञान पाहता जे कोणी त्यांना भेटत, ते स्वामीजींनी सर्वधर्मपरिषदेसाठी अमेरिकेला जावे, असे सुचवत होते. यात म्हैसूरच्या महाराजांचा, तसेच रामनदच्या राजांचा आणि दक्षिणेतील काही विद्वानांचा समावेश होता. यात रामनदच्या महाराजांनी तसेच जुनागडच्या राजांनी त्यांचा अमेरिकेत जाण्यासाठीचा आणि तेथील सर्व खर्च करण्याचे सुचविले होते. पण स्वामी विवेकानंदांनी या सगळ्यांना नम्रपणे नकार दिला. सर्वप्रथम त्यांना अमेरिकेत जाण्यासाठी गुरूंची परवानगी, जगन्मातेचा कौल मिळावा अशी स्वामीजींची इच्छा होती. दुसरे कारण म्हणजे त्यांना या लोकांच्या खर्चाने जाणे म्हणजे त्यांचे प्रतिनिधी बनून जाणे मान्य नव्हते. तिसरे कारण म्हणजे अमेरिकेसारख्या देशात इतक्या दूर फक्त एका परिषदेसाठी जाणे त्यांना प्रशस्त वाटत नव्हते. तिथे जाऊन आपण काय कार्य करायचे, त्याची स्पष्टता त्यांना आलेली नव्हती.
 
 
यथावकाश त्यांना स्वप्नाद्वारे गुरू श्रीरामकृष्णांच्या परवानगीचे संकेत मिळाले. एवढ्या मोठ्या सागरी प्रवासास शारदामातांची परवानगी आणि जगन्मातेचा कौल असे सर्वच मिळाले. अमेरिकेतील प्रवासाचा खर्च उभा करण्यासाठी त्यांनी जनतेमध्ये विविध ठिकाणी वेदान्त तत्त्वज्ञान, हिंदू धर्म, भगवद्गीता यांवर व्याख्याने दिली. काही व्याख्यानांमधून त्यांनी अमेरिकेत जाऊन आपण काय कार्य करणार आहोत याची रूपरेखादेखील सगळ्यांना सांगितली. या व्याख्यानांच्या आयोजनास मान्यवर लोकांनी - म्हणजेच जुनागडचे राजे, म्हैसूरचे महाराज, रामनदचे राजे आणि अलासिंगा पेरुमल यासारख्या दक्षिणेतील शिष्यांनी खूप मोलाची मदत केली. स्वामीजी अमेरिकेतून परतल्यावर केलेल्या सत्कार सोहळ्यांना उत्तर देताना स्वामीजींनी या सगळ्यांचे आभार जाहीरपणे मानलेले होते. स्वामीजी या सर्व जनतेचे प्रतिनिधी म्हणून शिकागोला जाण्यासाठी सज्ज झाले.
 

vivekanand 
 
भारतात त्या वेळी ब्रिटिशांचे राज्य असल्याने या राजे-महाराजे लोकांना ब्रिटिश सत्तेचेदेखील भय होतेच. त्यामुळे त्यांनी थेट आर्थिक मदत न करता अतिशय सावधपणे व्याख्यानांचे आयोजन, त्यांचा प्रवासखर्च, त्यांच्या कपड्यांचा खर्च अशी टप्प्याटप्प्याने मदत केली, जेणेकरून ती मदत ब्रिटिशांच्या डोळ्यावर येणार नाही. स्वामीजी तर आपल्या बहुआयामी बुद्धिमत्तेमुळे सर्वदूर प्रसिद्ध झालेले होतेच. त्यामुळे त्यांचे मनोबलही खूप उंचावलेले होते. जहाजाने प्रवास करताना स्वामीजी मध्येच सिलोन, चीन, हाँगकाँग, जपान आणि शेवटी व्हँकुव्हर इत्यादी ठिकाणी उतरले. या प्रवासात त्यांनी सिलोन, चीन आणि जपानमधील संस्कृती आणि धर्म जवळून पाहिले. कँटन, क्योटो येथील प्राचीन मंदिरे पाहिली आणि हाँगकाँगमधील प्राणी बाजार, गरीब जनता यांचाही अनुभव घेतला. यामुळे त्यांचे भारताबाहेरील बौद्ध धर्माचे आकलनही वाढले. व्हँकुव्हर ते शिकागो हा प्रवास त्यांनी तीन दिवस आगगाडीने केला.
 
 
शिकागो सर्वधर्मपरिषदेतील सहभागापूर्वी आलेल्या अडचणी
 
 
स्वामीजी साधारणपणे जुलैच्या मध्यावर - म्हणजे सर्वधर्मपरिषदेच्या दीड महिना आधीच शिकागोला पोहोचले. त्यांनी तिथे मांडलेल्या सर्व प्रदर्शनांना हजेरी लावली. अमेरिकेची विज्ञान-तंत्रज्ञानामुळे झालेली भौतिक प्रगती पाहून त्यांना त्यातील सशक्तपणा जाणवला. काही दिवसांतच त्यांना वंशभेद आणि रंगभेददेखील अनुभवास आले. प्रदर्शनानिमित्त भरलेल्या बाजारांत वस्तूंच्या महागड्या किमतींबरोबरच त्यांच्याकडून अधिक पैसे घेऊन त्यांची लूट केली गेली. ख्रिस्ती धर्मच कसा सर्वश्रेष्ठ आणि अमेरिका कशी महासत्ता आहे याचे प्रदर्शन करण्यासाठी हे सगळे आयोजन होते, हे स्वामीजींच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. भारतातून शिकागोसाठी निघताना त्यांना सर्वधर्मपरिषदेतील सहभागास परिचयपत्र लागेल याची कल्पनादेखील नव्हती. जवळचे पैसे संपत आल्याने त्यांनी आपला मुक्काम महिन्याभरासाठी जवळच्या बॉस्टन शहरात हलविला. तिथेच श्रीमती सॅनबोर्न यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांच्यामार्फत त्यांनी बॉस्टन मॅसॅच्युसेट्स भागात भारतीय स्त्रियांचे जीवन, हिंदू तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती, वेदान्त, ब्रिटिश राजवटीचा भारतीयांवर अन्याय इत्यादी विषयांवर व्याख्याने दिली. यातूनच त्यांना अमेरिकन जनतेची नस सापडली. त्यांच्या अमोघ आणि विद्वत्तापूर्ण वक्तृत्वामुळे त्यांची प्रसिद्धी वाढत होती. श्रीमती सॅनबोर्न यांच्यामार्फतच हार्वर्ड येथील प्राध्यापक जॉन राइट यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्यामुळे सर्वधर्मपरिषदेतील सहभागाचे परिचयपत्र मिळाले, तसेच त्यांची शिकागोपर्यंतच्या प्रवासाची आणि सर्वधर्मपरिषदेच्या निवासाची व्यवस्था झाली. पण बॉस्टन ते शिकागो या प्रवासात स्वामीजींकडून सर्वधर्मपरिषदेच्या आयोजकांचा पत्ता हरवला. शिकागोत उतरल्यावर परमेश्वरी कृपेनेच ही अडचणही दूर झाली.
 
 
सर्वधर्मपरिषदेतील सहभाग
 
दि. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेचे उद्घाटन झाले. स्वामीजींनी पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात शेवटी शेवटी भाषण केले. स्वामीजींनी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्गारलेल्या “अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो” शब्दांनी संपूर्ण प्रेक्षागाराचे मन जिंकून घेतले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वामीजींच्या वक्तृत्वाची लोकप्रियता तेथील अमेरिकी जनतेमध्ये पसरलेली होती. शिकागोत असताना प्रत्यक्ष परिषदेतील व्याख्याने, विज्ञानसत्रातील व्याख्याने, स्वागतास उत्तर म्हणून दिलेली व्याख्याने याशिवाय काही स्वागत समारंभांमध्ये दिलेली व्याख्याने अशी मिळून जवळजवळ 20 व्याख्याने दिली असतील. त्याचे विषयही हिंदू धर्म, भारतीय स्त्रियांची स्थिती, आपले मतभेद का आहेत, धर्म ही भारताची निकड नाही, बुद्धाची शिकवण, वेदान्त तत्त्वज्ञान इ. होते. परिषदेच्या शेवटी स्वामीजींनी विश्वधर्माची संकल्पना मांडली आणि म्हणून ते विश्वबंधुत्वाचे प्रणेतेही ठरले. स्वामीजींना सर्वधर्मपरिषदेत जरी यश मिळाले असले, तरी नंतर पुढे अमेरिकेत राहून त्यांनी व्याख्याने देऊन पाश्चात्त्यांना वेदान्त आणि अध्यात्म शिकवून आपल्या भारतातील कार्यासाठी पैसे उभे करायचे होते. त्यातच रेव्हरंड मुजुमदार आणि थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रतिनिधींसारख्या झारीतील शुक्राचार्यांमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. मुजुमदारांनी तर विवेकानंदांना कोलकत्यातील एक अभिनेता असेच संबोधले. बॉस्टन येथे असलेल्या रमाबाई सर्कल या संस्थेने स्वामीजींविषयी घृणास्पद अफवा पसरवून स्वामीजींना खूप त्रास दिला. कारण पंडिता रमाबाईंनी स्वत:च्या अनुभवांवर आधारित कथनाचा या ख्रिस्ती मिशनरी बायकांनी केलेल्या गैरवापराच्या विरोधात व्याख्याने दिली. अमेरिकेत असताना, व्याख्यान आयोजित करणार्‍या अशाच एका ब्युरोने त्यांना फसविले होते. ते आपल्या व्याख्यानांतून हिंदू धर्माचा प्रसार करत आहेत म्हणून अमेरिकेतील ख्रिस्ती मिशनरी लोकांनी प्रचंड त्रास दिला.
 
 
अमेरिकेतून भारतात परतल्यावर
 
 
स्वामीजींनी शिकागो सर्वधर्मपरिषदेनंतर दोन-तीन वर्षे अमेरिकेतच राहून काम केले. त्यांचा स्वत:चा शिष्यवर्ग उभा केला. तरीही स्वामीजींविरुद्धचा मिशनर्‍यांनी चालविलेला अपप्रचार कमी होत नव्हता. स्वामीजींनी आपल्या गुरुबंधूंना आणि अलासिंगा पेरुमलला भारतातच सभा घेऊन स्वामीजी हे भारतीय जनतेचे प्रतिनिधी आहेत हे सभांमध्ये ठराव रूपाने मान्य करून त्याचे वृत्त स्थानिक वर्तमानपत्रांत छापून आणण्याविषयी सांगितले होते. त्या छापलेल्या वृत्तांची कात्रणे स्वामीजींना पाठवून देण्यास सांगितलेली होती. त्याप्रमाणे त्यांनी केलेही, पण स्वामीजींचा पत्ता सारखा बदलत असल्याने ही कात्रणे त्यांना खूप उशिरा मिळाल्याचा संदर्भ एस.एन. धर यांनी लिहिलेल्या द्वितीय खंडातील आठव्या प्रकरणात दिलेला आहे. अमेरिकेतून येता येता ते इंग्लंडमध्येही थांबले होते आणि तिथेही त्यांचे काम चालू केले. त्याच वास्तव्यात त्यांना मार्गारेट नोबल (भगिनी निवेदिता)सारख्या समर्पित शिष्या मिळाल्या. भारतात परतल्यावर कोलंबोपासून, मद्रास आणि कोलकत्यापर्यंत सर्वत्र त्यांचे जोरदार स्वागत झाले. काही ठिकाणी तर लोकांनी त्यांना आपल्या खांद्यावर बसवून त्यांची मिरवणूक काढली. ब्रिटिशांनी स्थानिक धनिकांवर, राजांवर वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे स्वामीजींच्या कामासाठी जमीन देण्याचा निर्णयदेखील ब्रिटिश अधिकारीच घेत असत. पण पाश्चात्त्यांना जमीन खरेदीस अडचण येत नसे, म्हणूनही बेलूर मठ आणि अद्वैताश्रमासाठीच्या जागा या त्यांच्या पाश्चात्त्य शिष्यांनी खरेदी करून स्वामीजींना दिल्या असाव्यात, असेही आपण म्हणू शकतो. शिकागोतील सर्वधर्मपरिषदेपासून पाश्चात्त्य देशांत स्वामीजींची कीर्ती पसरली. स्वामीजींनीच पाश्चात्त्य देशांत हिंदू धर्म, वेदान्त तत्त्वज्ञान सर्वदूर पोहोचविले, म्हणून हा दिन विश्वबंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो.
Powered By Sangraha 9.0