'सवंगतेचा तवंग'

01 Jan 2024 20:21:48
 
rss
एका दैनिकाने तेलंगणातील कंदकुर्ती हे रा.स्व. संघाचे संस्थापक पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचं जन्मगाव असल्याची हेडलाइन एका बातमीत दिली. दिलेली ती बातमी तर तथ्यहीन होतीच, पण  पू. डॉ. हेडगेवार यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाबद्दलची वार्ताहराची मूलभूत माहितीदेखील चुकीचीच होती! कंदकुर्ती हे  पू. डॉ. हेडगेवार यांचं जन्मगाव नसून त्यांच्या पूर्वजांचं गाव आहे. थोडं ‘गूगल’ केलं असतं, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा जी सारवासारव करावी लागली, ती टाळता आली असती! 
- 'साबणावर लवंग नक्की लावा, मोठ्या समस्येवर उपाय पहा..',

- 'जानेवारीपासून ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘आदित्य मंगल राजयोग’ बनल्याने पहिल्या महिन्यातच मिळू शकते मोठे यश'

- 'ठरलं! * व ### २०२४मध्ये बांधणार लग्नगाठ, पाँडेचरीतून शेयर केला रोमँटिक फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष'

- 'कडाक्याच्या थंडीत साडी नेसून बाईकवर उलटी बसली, बाईकस्वराला पाहून तरुणीने केलं असं काही की व्हिडियो व्हायरल'
 
एका प्रतिष्ठित आणि आघाडीच्या मराठी दैनिकाच्या समाजमाध्यमांवरील आजच्या या काही अपडेट्स! अर्थात ही स्थिती काही त्यांची एकट्याची नाही. बहुतेक सर्व मुद्रित प्रसारमाध्यमं आणि न्यूज चॅनल्स यांच्या समाजमाध्यमावर अशाच ‘क्लिकबेट’ शीर्षकांसह ‘सवंगतेचे तवंग’ पसरलेले आपल्या दिसतात. कधीकाळी मुद्रित माध्यमांतून छापून आलेल्या गोष्टींची प्रचंड विश्वासार्हता असायची. ‘पेपरमध्ये छापून आलंय, मग ते खोटं कसं असेल?’ असं लोक म्हणायचे. आता कुठलीही बातमी आली की त्यावर पटकन कोणी विश्वासच ठेवत नाही! माध्यमांच्या विश्वासार्हतेचे धागे असे सुटत का चाललेत, याचं आत्मपरीक्षण बहुधा होत नसावं!
 
  
'लोकांना काय हवं ते देण्याची आमची जबाबदारी नाही, तर त्यांना कशाची गरज आहे ते देण्याची आहे!' अशी मराठीतील एका अत्यंत प्रतिष्ठित दैनिकाची कधीकाळी जाहिरात असायची. त्यांच्या सध्याच्या बातम्या आणि समाजमाध्यमांवरची हेडिंग्ज बघा. त्यांच्या त्या नैतिक निश्चयाच्या भरजरी पोशाखाच्या चिंध्या झाल्यात आणि त्यालाच ते 'फॅशन स्टेटमेंट' म्हणून मिरवत आहेत!
 
काळानुरूप बदल सगळीकडेच होतात. माध्यमं त्याला अपवाद नाहीतच. पण बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून माध्यमांनी अधिक विश्वासार्हता मिळवायला पाहिजे होती. त्याऐवजी उलटा प्रवास सुरू झाला. नेमकं याच वेळी समाजमाध्यमांचा बोलबाला झाला. माहिती सहज उपलब्ध झाली आणि माध्यमांनी केलेल्या चतुराईचे वाभाडे निघायला लागले.
 
 
rss
 
काल एका दैनिकाने तेलंगणातील कंदकुर्ती हे रा.स्व. संघाचे संस्थापक  पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचं जन्मगाव असल्याची हेडलाइन एका बातमीत दिली. दिलेली ती बातमी तर तथ्यहीन होतीच, पण  पू. डॉ. हेडगेवार यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाबद्दलची वार्ताहराची मूलभूत माहितीदेखील चुकीचीच होती! कंदकुर्ती हे डॉ. हेडगेवार यांचं जन्मगाव नसून त्यांच्या पूर्वजांचं गाव आहे. थोडं ‘गूगल’ केलं असतं, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा जी सारवासारव करावी लागली, ती टाळता आली असती! दुसरी बाजू समजून घ्यायची, म्हणून तरी बातमी लिहिताना संघ पदाधिकाऱ्याचा एखादा quoteदेखील देण्याची तसदी या कथित मेनस्ट्रीम, निष्पक्ष म्हणवणाऱ्या दैनिकाच्या पत्रकाराला घ्यावीशी वाटली नाही.
 
 
'The man who reads nothing at all is better educated than the man who reads nothing but newspapers.' असं थॉमस जेफरसन एकदा म्हणाला होता म्हणे! बिचाऱ्याचे तेव्हाचे बोल अक्षरश: सत्य वाटावेत अशी स्थिती आता पुन्हा दिसते आहे!
 
प्रबोधन आणि समाजाला दिशा देण्याचं उद्दिष्ट घेऊन निघालेल्या माध्यमांनी आपला समाज घडवण्यात अद्वितीय योगदान दिलेलं आहे, त्याबद्दल कुणाचंच दुमत असू नये. आपल्याकडे याची तेजस्वी परंपरादेखील आहे. पण काही सन्माननीय अपवाद वगळता आजची माध्यमं - विशेषत: वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रं या परंपरेला साजेशी वागतात का? हा प्रश्न आहे. अधिकाधिक व्यावसायिक यश मिळवण्याचं ध्येय ठेवणं चूक नाही. पण त्यापायी वार्तांकनातील मूलभूत गोष्टींकडे सररास दुर्लक्ष परवडणारं असतं का?
 
अकबर इलाहाबादीचा सुप्रसिद्ध शेर आपण नेहमी उद्धृत करतो -
 
'खींचो न कमानों को न तलवार निकालो।
 
जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो।'
 
त्यात समाजपरिवर्तनाची आस आहे. व्रतस्थ पत्रकारांनी क्रांती घडवून आणल्यात. तिथून सुरू झालेला प्रवास मंत्रि‍पदांच्या लॉबीइंगपर्यंत पोहोचला, तेव्हा त्या व्रतस्थ पत्रकारांच्या आत्म्यांना काय वाटलं असेल?
 
  
कुठल्याही क्षेत्रात शॉर्टकट चालतच नाहीत. इथेही नाही. पण समाजमाध्यमांवरच्या गोष्टी उचलून त्याच्या ब्रेकिंग न्यूज होताना जेव्हा दिसतात, तेव्हा मात्र लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आतून पोखरत चाललाय की काय, अशी शंका यायला लागते.
 
सर्वसामान्य वाचकांनी या माध्यमांपासून दूर जायला सुरुवात केली आहे, त्याचं आणखी एक कारण म्हणजे ‘अजेंडारेटू’ पत्रकारिता! अन्याय- अत्याचार आणि शोषण याविरुद्ध आघाडी उघडणं, माध्यमांद्वारे न्यायासाठी प्रयत्न करणं वेगळं. ते अवश्यच करायला पाहिजे. मात्र आपापला राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी माध्यमांचा वापर ही खरंच चिंताजनक गोष्ट आहे. समाजातील वाईट गोष्टींनादेखील आता ‘सिलेक्टिव्ह विरोध’ होतो. माध्यमं हाताशी धरून सिलेक्टिव्ह आउटरेज करताना नैतिकतादेखील अलगद बाजूला ठेवली जाते, हे विशेष!
 
 
काही काळापूर्वीपर्यंत देशाच्या राजकारणात आपण ‘किंगमेकर’ होऊ शकतो, नेतृत्वाला घडवू- बिघडवू शकतो असा काही माध्यमांना गर्व झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं गर्वहरण केलं. ‘माध्यमकृपे’विनादेखील जगात अफाट लोकप्रियता मिळवली. ते या माध्यमांना व त्यांच्या प्रचार-अपप्रचाराला काडीचीही किंमत देत नाहीत. ते थेट लोकांशी संवाद साधतात व तो लोकांपर्यंत पोहोचतोदेखील. रेडिओचा, विविध समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करत त्यांनी जे साध्य केलं, त्यापासून मेनस्ट्रीम माध्यमांनी धडा शिकायला हवा होता, पण तेही होताना दिसत नाही!
 
मी हे का लिहितोय? मला माध्यमांवर टीका करायचा काय अधिकार? माझ्यापुरतं याचं उत्तर आहे की मी वर्तमानपत्रांचा एक वाचक आहे आणि माध्यमांकडून वाचक म्हणून माझ्या काही अपेक्षा आहेत. भारतीय माध्यमं सवंगतेला बाजूला सारून लोकशाहीचे विश्वासार्ह भागीदार बनतील, तो सोनियाचा दिन असेल, यावर माझी श्रद्धादेखील आहे. त्यामुळे हा लेखनप्रपंच! ‘उडदामाजी काळे गोरे’ असतातच. माध्यमक्षेत्रातील ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत’ आहे ते याला अपवाद आहेत, याची मला कल्पना आहे. त्यांनी वृद्धिंगत व्हावं, ही अपेक्षा.
 
Prasanna.vpp@gmail.com
Powered By Sangraha 9.0