प्रभू श्रीराम - जनजाती बांधवांच्या जीवनातील

विवेक मराठी    10-Jan-2024
Total Views |
Ayodhya Ram Mandir 2024, The Story Of Shabari in Ramayana
@युवराज लांडे 9921716935
श्रीरामाबद्दलच्या भावना सर्व जनमानसात सारख्याच आहेत, तशाच त्या जनजाती म्हणजेच आदिवासी समाजबांधवांतही आहेत. आदिवासी बांधवांच्या जीवनमानात रामाचे स्थान अतुलनीय आहे. रामायण ग्रंथाचा कर्ता वाल्मिकी ऋषी अर्थात एकेकाळचा वाल्या कोळी होय. या ग्रंथकर्त्याचा वाल्या ते वाल्मिकी असा परिवर्तनाचा प्रवास अवर्णनीयच. या वाल्मिकी ऋषींना जनजाती बांधव आपला पूर्वज मानतात, एवढेच नाही, तर रामायण ग्रंथाच्या या संपूर्ण प्रवासात रामरायांचे वनवासातील सर्वच प्रसंग अत्यंत अवर्णनीय असून संपूर्ण भारतीय समाजाला योग्य दिशा देणारे असे आहेत, तसेच या वनाजंगलात निवास करणार्‍या जनजातीय बांधवांचा गौरव वाढवणारेदेखील आहेत.

Ram_Mandir_ Ayodhya
 फोटो सौजन्य : google
अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिरनिर्माणाच्या कामास सुरुवात झाली असून ते वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे आणि त्याच मंदिरात आता प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा थोड्याच दिवसांत होणार आहे. प्रभू श्रीराम हे कर्तव्यधर्माचे मूर्तिमंत रूप होय. प्रभू रामचंद्रांप्रती भक्तिमय श्रद्धा भारतात ठायी ठायी दिसते. श्रीरामाबद्दलच्या त्याच भक्तिमय श्रद्धेचे विलोभनीय रूप, जनजाती म्हणजेच आदिवासी समाजबांधवांत तर अतिशय प्रकटतेने, उत्कटतेने जाणवते हेही खरेच होय. कारण रामायण ग्रंथाचा कर्ता वाल्मिकी ऋषी अर्थात एकेकाळचा वाल्या कोळी होय. या ग्रंथकर्त्याचा वाल्या ते वाल्मिकी असा परिवर्तनाचा प्रवास अवर्णनीयच. या वाल्मिकी ऋषींना जनजाती बांधव आपला पूर्वज मानतात, एवढेच नाही, तर रामायण ग्रंथाच्या या संपूर्ण प्रवासात रामरायांचे वनवासातील सर्वच प्रसंग अत्यंत अवर्णनीय असून संपूर्ण भारतीय समाजाला योग्य दिशा देणारे असे आहेत, तसेच या वना-जंगलात निवास करणार्‍या जनजाती बांधवांचा गौरव वाढवणारेदेखील आहेत. धन्य ते वनबंधू, ज्यांच्यामुळे श्री रामचंद्रांचा 14 वर्षांचा वनवास सुसह्य झाला. श्रीरामांच्या वनवासाचा हा संपूर्ण प्रवास जसा वाल्मिकी रामायणात वर्णन केलेला आहे, तसाच तो जनजातीय बांधवांच्या स्थानिक भाषांमध्ये व जमातीनिहाय रामायण कथांच्या रूपाने जनमानसात खोलवर झिरपून तेथे रुजला आहे - उदा., अनुसूचित जमातींत मुंडारी रामायण, गोंडांचे रामायण (महाकाव्य), करबी रामायण, बिरहोर रामायण, भिलोडी रामायण असे अनेक रामायणांच्या कथांचे अनेक उल्लेख आलेले आहेत, हेच लक्षात घेतले म्हणजे रामाचे अस्तित्व जनजाती बांधवांच्या जीवनात किती खोलवर व महत्त्वपूर्ण होते व आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहात नाही. तसे पाहिले, तर हे वना-जंगलात निवास करणारे वनबंधू आणि अयोध्यावासी श्रीराम यांची भेट म्हणजे शहरनिवासी व ग्रामनिवासी आणि वना-जंगलात राहणार्‍या वननिवासी संस्कृतीचे आदान-प्रदान होते, असे निश्चित म्हणता येईल. अशा या रामरायाला गंगा पार करून देणारा गंगातिरी शृंगवेपूरला राज्य करणारा निषाद राजा म्हणजेच रामचंद्रांचा परममित्र राजा गुहक. रामरायाची आयुष्यभर रोज वाट पाहणारी आणि भक्तीच्या जोरावर रामरायाला स्वत:च्या अंगणी येण्यास भाग पाडणारी, त्याला प्रेमाने बोरे खाऊ घालणारी माता शबरी असो वा सीतामाईचा शोध घेण्यात, अंतिमत: राम-रावण युद्धात सेतुनिर्माणात संपूर्ण सहभाग घेत, द्रोणागिरी पर्वत उचलून आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवण्याबरोबरच रावणाचा संपूर्ण पाडाव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा महाबली हनुमान, सुग्रीव, अंगद, नळ, नीळ, जांबुवंत आणि अशा सर्वच वानर वीरांची म्हणजेच वनात राहणार्‍या या नरवीरांची कथाच वेगळी.
 
 
एवढेच नाही, तर या 14 वर्षांच्या कालखंडात श्रीरामाने या वना-जंगलात निवास करणार्‍या नाग, कोल, किरात, शबर, गुह, पुलिंद, निषाद, कोळी, भिल्ल व वानर अशा अनेक जमातींत विखुरलेल्या समाजबांधवांचे जीवन जवळून पाहिले, समजून घेतले व आत्मसात केले आणि म्हणूनच पुढे रामप्रभू राजे झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण राजकारणात व राज्यकारभारात या वनबंधूंच्या गुणांचे, संस्कृतीचे, संपूर्ण प्रतिबिंब प्रभावीपणे उमटले आणि रामराज्य म्हणून प्रसिद्ध झाले.
 
 
vanvas and ramayan
 फोटो सौजन्य : google
अयोध्यापती भगवान श्रीराम आमच्या वना-जंगलात निवास करणार्‍या वनबंधूंच्या हृदयात विराजमान होते आणि याचे सुंदर उदाहरण म्हणजे रामायणात मारुतीरायांनी आपली छाती उघडून रामरायाच्या अस्तित्वाचा दिलेला पुरावा होय. एवढेच नाही, तर वननिवासींच्या अर्थात जनजाती बांधवांच्या शक्तिसामर्थ्याचे प्रतीक म्हणूनही रामायणातील सर्वच पात्रांना पाहता येते, हे नाकारता येत नाही. एकूणच रामायणामुळे व रामचंद्रामुळे तत्कालीन काळात वनात, जंगलात निवास करणार्‍या सर्वच जमातींना आपल्या शक्तीचे, सद्गुणांचे, अरण्य संस्कृतीचे प्रकटीकरण करण्याची संधी मिळाली वा जगासमोर येण्यास मदत झाली, असेही म्हणता येते.
 
 
मात्र कालौघात अशा या पुराणप्रसिद्ध मर्यादापुरुषोत्तम रामरायाच्या जन्मभूमी अयोध्येत रामरायांचे अस्तित्वच परकीय आक्रमकांनी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यात या परकीय आक्रमकांना काहीसे यशही आले; मात्र भारतातील सर्वच हिंदू धर्मीय देशबांधवांनी श्रीरामचंद्रांचे अयोध्येतील अस्तित्व चिरंतन राखण्यासाठी उणीपुरी 492 वर्षे अविरत संघर्ष केला. संपूर्ण भूतकाळात यासाठी झालेल्या रक्तरंजित संघर्षात चार लाखांहून अधिक हिंदू धर्मीय बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अंतिमत: एकविसाव्या शतकाच्या पहाटेस भारतीय स्वातंत्र्यानंतर जवळजवळ छत्तीस वर्षांच्या शृंखलाबद्ध मोहिमेतून संपूर्ण समाजाने लिंग, जाती, वर्ण, भाषा, पंथभेद, प्रदेश याच्या पलीकडे जाऊन एकात्म भावनेने श्रीरामाच्या मंदिरासाठी केलेल असीम त्याग आणि समर्पण यांना यश आले. कारण सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत चालू असलेल्या खटल्याचा निकाल रामलल्लांच्या बाजूने दिला. हा निर्णय म्हणजे संपूर्ण हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेचा विजय होता. परिणामस्वरूप 9 नोव्हेंबर 1989 रोजी श्रीरामलल्ला ताडपत्रीच्या तात्पुरत्या छताखाली आपल्या जागी विराजमान झाले. पुढे दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी देशभरातील पूज्य आचार्य, संत, महंत यांच्या उपस्थितीत भारताचे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राम मंदिर भूमीचे पूजन करून मंदिर निर्माणाचा शुभारंभ केला. या शुभकार्यामध्ये देशातील तीन हजारपेक्षा अधिक नद्यांचे पवित्र जल व विभिन्न जाती-जमातींच्या पवित्र स्थानांवरील पवित्र माती आणि रामजन्मभूमी आंदोलनात बलिदान दिलेल्या रामभक्तांच्या घरातून आणलेली माती यासह संपूर्ण भारत वर्षाला आध्यात्मिक रूपाने भूमिपूजनात सामील केले गेले. या संपूर्ण आध्यात्मिक सोहळ्यामध्ये पूजनीय साधुसंतांनी आवाहन केले की हे भव्य राम मंदिर बनविण्याबरोबरच लोकांच्या जीवनात श्रीरामांची व त्यांच्या जीवनमूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी, जी जीवनमूल्ये त्यांना अयोध्येत व त्यांच्या संपूर्ण 14 वर्षांच्या वनवासातील कालखंडात वना-जंगलात निवास करणार्‍या संपूर्ण वन अरण्य संस्कृतीत सुस्पष्टपणे दिसली आणि रामराज्यात उमटली. ह्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्याबरोबरच आज सामूहिक पुरुषार्थाने आपल्याला रामराज्यातला सद्भाव, मैत्री, समता, करुणा, दया, न्याय, कर्तृत्व, आरोग्य आणि समृद्धपूर्ण जीवन अशा या सगळ्यांच्या पुन:स्थापनेचा दृढ संकल्प करायचा आहे, जी आज काळाची गरज आहे. या राममंदिर भूमिपूजनाचे आपण साक्षीदार होतो आणि श्रीरामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचेदेखील साक्षीदार होणार आहोत. ज्या वेळी राम मंदिर उभारण्याच्या ऐतिहासिक धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी आपणाकडे चालून आलेली होती, तेव्हा संपूर्ण जनजाती समाज या देवकार्यात पूर्णत्वाने सामील झाला. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दान करण्याची पुण्यपुरातन परंपरा आहे. विद्यार्थी, वानप्रस्थी, संन्यासी, भिक्षुक इत्यादी समाजघटकांना त्यांचे जीवन व्यतीत करण्यासाठी व त्यासाठी संसाधने उत्पन्न करून देणे यासाठी जसा समाजाकडून मिळालेल्या या दानाचा उपयोग केला जात असे, तसाच तो मंदिर निर्माण, तीर्थक्षेत्र स्थळांची निर्मिती करण्यासाठीदेखील होत असे. एकूणच समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी या अस्मिताजागृतीच्या सर्वच कार्यात या दानाला महत्त्व होते व आजही आहे. म्हणूनच या ऐतिहासिक राम मंदिराच्या उभारणी कार्यात आपण आपला सहभाग अतिशय उत्स्फूर्तपणे नोंदवला. अर्थात रामसेतू निर्माणाचे कार्य हे अनेक वानरांनी, नरवीरांनी मिळून पूर्ण केले. त्यांच्याशिवाय रामसेतू निर्माणाचे काम अशक्यच होते. अशा या महान कार्यात छोट्याशा खारूताईने तिला स्वत:ला शक्य असलेली सर्वतोपरी मदत केली. तिच्यामुळेच सेतुनिर्माणाचे कार्य पूर्ण झाले असे जरी म्हणता येत नसले, तरी आपल्या संपूर्ण समर्पण वृत्तीने केलेल्या कामामुळे ती अजरामर झाली. अशा या समर्पण वृत्तीमुळेच श्रीरामांना खारूताईची व शबरी मातेची दखल घ्यावी लागली. अगदी त्याच निरपेक्ष भावनेने आपणही आपला राम मंदिर निधी संकलन कार्यात सहभाग नोंदवला होता. आपल्या याच अल्पस्वल्प सहभागातून आज हे भव्यदिव्य राम मंदिर पूर्णत्वास जात असताना, प्रभू रामचंद्रांच्या या भव्यदिव्य मंदिर निर्माणात माझादेखील सहभाग आहे, ही भावना आज मनास आनंद व सार्थकता देत आहे. या महान पुण्यकार्यात रामद्वेष असणार्‍या काही विघ्नसंतोषी मंडळींनी त्या वेळी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला होता खरा. तो दुर्लक्ष करण्याजोगा होता, तरीही ‘राम आपला नाही’ या विखारी प्रकारामुळे भविष्यकालीन परिणाम मात्र गंभीर होऊ शकतात, हे तेव्हा जाणवले होतेच. कारण या रामद्वेषी विरोधकांद्वारा जनजाती समाजामध्ये आदिवासी म्हणजेच जनजाती समाज हिंदू नाहीत, असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असल्याचा अत्यंत खोटा प्रचार चालू होता, जो आजही चालू आहेच. यासाठी या रामद्वेषी मंडळींकडून काहीही संबंध नसणारी कागदपत्रेदेखील सादर केली जात होती व याच सर्व विपर्यस्त कागदपत्रांच्या आधाराने व खोट्या प्रचाराच्या आधाराने तुम्ही हिंदू नाहीत, म्हणून तुम्ही हिंदूंच्या रामाच्या मंदिराला देणगी देऊ नका असा विखारी प्रचारही त्या वेळी केला गेला होता, हे आपणास आठवत असेल.
 
vanvas and ramayan 
 फोटो सौजन्य : google
 
त्या वेळी आपण सर्वांनी मिळून, जनजाती समाजाचा गौरव कमी करण्यास निघालेल्या व स्व-समाजाचे पौराणिक आणि ऐतिहासिक अस्तित्व संपवायला निघालेल्या रावणभक्तांना बाजूला करत ज्या रामचंद्रांमुळे आम्हा वना-जंगलात निवास करणार्‍या जनजाती समाजाचा गौरवशाली पराक्रम व अस्तित्वाच्या पाऊलखुणा रामायण ग्रंथाद्वारे देश-परदेशात पोहोचल्या, त्या प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिर निर्माण निधी संकलनाच्या यज्ञात यथाशक्ति योगदान करून या राष्ट्रकार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहेच.
 
vanvas and ramayan 
 फोटो सौजन्य : google
आजपर्यंत आमच्या हृदयात असणारे प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष भूतलावर प्रकट होण्याचा शुभ समय येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या रूपाने होत आहे. त्या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशा निमंत्रणाच्या अक्षता आपणापर्यंत पोहोचल्या आहेत किंवा पोहोचतील, सोबतच अयोध्येतून आलेला मंगल कलशदेखील पोहोचेल. असे असले, तरी आम्हा सर्वांना अयोध्येपर्यंत पोहोचणे मात्र शक्य नाही, म्हणूनच सर्वांना एकच विनंती आहे की दि. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होत असताना, आपल्या घरासमोर रांगोळी घालावी, दरवाज्याला तोरण बांधावे, सायंकाळी घरासमोर किमान 5 दिवे लावावेत. सर्वांनी मिळून एकत्र टीव्हीवर प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा अवश्य पाहत सहभागी व्हावे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, हीच नम्र विनंती.
 
श्रीराम जयराम जय जय राम।