युगांतराचा कालखंड

12 Jan 2024 17:51:59
Vande Mataram
आता अपूर्ण वंदे मातरम म्हणण्याचा कालखंड संपला असून संपूर्ण वंदे मातरम अभिमानाने गाण्याचा कालखंड सुरू झाला आहे. स्वामी विवेकानंद शाळेतील मुले आणि मुली अभिमानाने आणि गौरवाने संपूर्ण वंदे मातरम गात होती. मी भूतकाळातील घटनेत केव्हा गेलो, मला कळलेच नाही आणि या दोन प्रसंगांची तुलना मला स्वस्थ बसूही देईना, म्हणून हा लेखनप्रपंच.
 
Vande Mataram
 
वंदे मातरम गीताच्या असंख्य आठवणी माझ्या मनात आहेत. त्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख नाही. काही वेळेला असे होते की, एकाच विषयाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडतात आणि संवेदनशील मन या दोन घटनांची तुलना करायला लागते. असा प्रसंग माझ्या आयुष्यात तीन जानेवारीला घडला. तीन जानेवारीपूर्वीचा एक प्रसंग 1990चा आहे.
 
 
पुण्याला 1990 साली अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे यजमानपद आले होते. ही संस्था पुण्यातील ज्येष्ठ आणि कर्तृत्ववान स्वयंसेवक चालवीत होते. तेव्हा मी विवेकचा संपादक होतो. संपादक या नात्याने मी साहित्य संमेलनासाठी गेलो. मला भाषणाचे वगैरे कसले निमंत्रण नव्हते आणि तो काळ संघाशी संबंधित असणार्‍यांना अस्पृश्य ठरविण्याचा असल्यामुळे मलाही त्याचे काही सोयरसुतक नव्हते.
 
 व्यासपीठावर उभे असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ते गीत थांबविले.
उद्घाटनाचा सोहळा सुरू झाला आणि वंदे मातरमने त्याची सांगता होणार होती. वंदे मातरम गाण्यासाठी गायकाने सुरू केले. पहिले कडवे झाले आणि दुसरे कडवे ‘कोटी कोटी कंठ निनाद कराले’.. सुरू होताच, व्यासपीठावर उभे असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ते गीत थांबविले. संपूर्ण वंदे मातरम म्हणता येणार नाही असा त्यांनी आदेश दिला. हा तुमचा कार्यक्रम नसून साहित्य संमेलन आहे, वगैरे वगैरे ते बोलले.
 
 
खरे सांगायचे, तर त्या वेळी झालेल्या प्रकाराने मला भयंकर संताप आला, परंतु मी काही करू शकत नव्हतो. आयुष्यात अनेक वेळा राग आणि अपमान मुकाटपणाने गिळून बसावे लागतात. आपण हतबल असतो. तर्कतीर्थांनी वंदे मातरम गाण्याला आक्षेप घेऊन ते बंद पाडावे, हा विषय मी जन्मात विसरू शकणार नाही.
 
 
तर्कतीर्थ हिंदू धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या विद्वत परंपरेतील ते ज्येष्ठ विद्वान होते. अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. काही जण त्यांना यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय गुरू असे म्हणतात. आपली हिंदू परंपरा भरणपोषण करणार्‍या सर्व गोष्टीत मातृत्व पाहते, म्हणून नदी आपल्याला नदी नसते, ती माता असते. भूमी म्हणजे माती, जमीन, धोंडे, दगड नसते, तर ती माता असते. निसर्ग आमच्या दृष्टीने मातेसमान असतो. या सर्वांची आपण पूजा करतो. ही पूजा रूपकात्मक असते. तशा अर्थाने निर्जीव वस्तूवर सजीवपणाचा आरोप करून आपण तिची पूजा बांधतो. तर्कतीर्थांना हे माहीत नव्हते असे म्हणून मी माझे घोर अज्ञान प्रकट करू इच्छित नाही.
 
  संघाचा द्वेष करण्याची एक सैद्धान्तिक भूमिका निर्माण केली. नेहरू म्हणजे देव मानणारा एक संप्रदाय होता. कळत-नकळत अनेक जण त्या संप्रदायाचे सदस्य झाले. तर्कतीर्थ त्यातील एक होते.
मग तर्कतीर्थांनी वंदे मातरम मध्येच का थांबविले? त्याचे उत्तर मला ‘द मोदी गेम चेंजर’ (खेळ बदलणारे नरेंद्र मोदी) हे पुस्तक लिहीत असताना सापडले. पं. नेहरू यांनी एक खेळ सुरू केला. सेक्युलॅरिझम, सोशालिझम, अलिप्ततावाद, तुष्टीकरण ही त्याची चौकट झाली. नेहरू आणि या चौकटीचा प्रभाव जबरदस्त झाला. पं. नेहरू यांनी दुसरी गोष्ट केली, ती म्हणजे संघाचा द्वेष करण्याची एक सैद्धान्तिक भूमिका निर्माण केली. नेहरू म्हणजे देव मानणारा एक संप्रदाय होता. कळत-नकळत अनेक जण त्या संप्रदायाचे सदस्य झाले. तर्कतीर्थ त्यातील एक होते. वंदे मातरम गाण्यास विरोध करून आपण सनातन, शाश्वत, सार्वभौम भारतीय चिंतनाचा अवमान करीत आहोत, असे त्यांना वाटले नाही.
 
 
परंतु काळ कुणासाठी थांबत नाही. काळाने नेहरूंचे चक्र उलटे फिरविले. ज्या वंदे मातरमला तर्कतीर्थांनी विरोध केला, ते संपूर्ण वंदे मातरम तीन जानेवारीला सावित्रीबाई जयंती दिनानिमित्त स्वामी विवेकानंद शाळा, सानपाडा येथे झालेल्या कार्यक्रमात दीड हजार विद्यार्थ्यांच्या मुखातून ऐकले आणि कान तृप्त झाले, मन मोहरून गेले आणि तर्कतीर्थांची आठवण झाली. ते आज या शाळेत असते, तर वंदे मातरम बंद पाडण्याची त्यांची हिम्मत झाली असती का?
 
 
नसती झाली. कारण कालचक्र आता उलटे फिरले आहे. ज्या हिंदुत्वाचा द्वेष केला गेला, ज्या रामाकडे त्याचा जन्मदाखला मागण्यात आला, रामाच्या अयोध्येवर असंख्य शंका घेण्यात आल्या, जे हिंदूपण सार्वजनिक जीवनात अडगळीत टाकण्यात आले, ते आपल्या पूर्वीच्या तेजाने उफाळून वर येत चालले आहे. अनेकांना आश्चर्य वाटेल की महात्मा गांधींनीच याची भविष्यवाणी केली होती, तर्कतीर्थांना ती माहीत नसेल असेही नाही.
 
 स्वामी विवेकानंद शाळा, सानपाडा येथे झालेल्या कार्यक्रमात दीड हजार विद्यार्थ्यांच्या मुखातून ऐकले आणि कान तृप्त झाले, मन मोहरून गेले आणि तर्कतीर्थांची आठवण झाली.
 
आज नेहरू मॉडेलच्या चिंधड्या झाल्या आहेत आणि राष्ट्रभक्तीचे, भारतभक्तीचे, संस्कृतिभक्तीचे, आपल्या सनातन, शाश्वत, धर्मसंकल्पनेचे नवीन मॉडेल वेगाने उभे राहत आहे. या विचारधारेत भारत हा जमिनीचा तुकडा नसून भारत ही माता आहे, जगज्जननीचे साक्षात रूप आहे, तीच दुर्गा आहे, तीच सरस्वती आहे आणि तीच लक्ष्मी आहे ही भावना आता देशव्यापी झालेली आहे.
 
 
ही भावना पूर्वीपासून कोट्यवधी लोकांच्या मनात होतीच, ही भावना नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेली नाही. त्यांनी या भावनेला साथ दिली. तिचा सन्मान केला. ती प्रकट होण्याची आराधना केली. ही भावना आता सहस्रपट वेगाने प्रकट होत चाललेली आहे. तर्कतीर्थ सानपाड्याच्या शाळेतील कार्यक्रमात असते, तर वंदे मातरम थांबविण्याची त्यांची हिम्मतच झाली नसती. या भावनेच्या त्सुनामीने त्यांना चितपट केले असते.
 
अंधाराचा कालखंड संपून प्रकाशाचा कालखंड सुरू होत आहे. आणि काय योगायोग असतो पाहा - सावित्रीबाई फुले यांना क्रांतिज्योती असे म्हटले जाते. त्यांनी केलेली मूकक्रांती अजोडच आहे. दुर्गा-लक्ष्मी-सरस्वतीरूपा आपल्या कन्यांना त्यांनी शिक्षणाद्वारे सक्षम केले. ज्ञानासारखे धन नाही हे त्यांनी सांगितले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या समाजाच्या सेवेसाठी त्यांनी आपला देह झिजविला. भारतमातेच्या या लेकीने आईचे पांग फेडण्याचे आपल्या परीने प्रयत्न केला. एक ज्योत पेटविली, तिची आज केवळ मशालच न होता, ज्ञानसूर्य झालेला आहे आणि त्यामुळेच स्वामी विवेकानंद शाळेतील मुले आणि मुली अभिमानाने आणि गौरवाने संपूर्ण वंदे मातरम गात होती. मी भूतकाळातील घटनेत केव्हा गेलो, मला कळलेच नाही आणि या दोन प्रसंगांची तुलना मला स्वस्थ बसूही देईना, म्हणून हा लेखनप्रपंच. आता अपूर्ण वंदे मातरम म्हणण्याचा कालखंड संपला असून संपूर्ण वंदे मातरम अभिमानाने गाण्याचा कालखंड सुरू झाला आहे, हे युगांतर आहे.
Powered By Sangraha 9.0