विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आठव्या राष्ट्रीय सेंद्रिय शेती अधिवेशनाचे फलित

विवेक मराठी    19-Jan-2024
Total Views |
 
@राजेंद्र भट
9324601272
’ऑर्गेनिक फार्मिग असोसिएशन ऑफ इंडिया’ (ओएफएआय) ही संस्था राष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय शेतीसाठी कार्य करत आहे. या संस्थेचे दि. 28, 29 आणि 30 डिसेंबर, 2023रोजी केरळ राज्यातील अलूवा येथील युसी महाविद्यालयात आठवे राष्ट्रीय सेंद्रिय शेती अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात देशभरातून हजारो शेतकरी, तर महाराष्ट्रातून 177 शेतकरी सहभागी झाले होते. या अधिवेशनात सहभागी झालेले बदलापूर ठाणे येथील सेंद्रिय उत्पादक शेतकरी राजेंद्र भट यांचा हा वृत्तांत.
 
krushivivek
 
जगात सेंद्रिय शेती, जैविक शेती, प्राकृतिक शेती आणि निसर्ग शेती अशा वेगवेगळ्या नावाने हजारो वर्षांपासून पारंपरिक कृषी विज्ञानावर आधारित शेती केली जाते. काही प्रमाणात अशाप्रकारेच शेती केली जाते. आज सध्याच्या शेतीपुढे असंख्य समस्या आहेत. बदलते ऋतुचक्र, दुष्काळ, हवामान, अवकाळी पाऊस, पोषण आहारातील स्वयंपूर्णता, पर्यावरणाचा र्‍हास असे काही प्रश्न आहेत. पोषणाची समस्या सोडवयाची असेल, तर सुरक्षित व शाश्वत अन्नाचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. सुरक्षित अन्न पिकविण्यासाठी रासायनिक अंशमुक्त अन्नाची निर्मिती करायला हवी. भविष्यातील पोषण सुरक्षेचा प्रश्नाला समोरे जाण्यासाठी सेंद्रिय/जैविक शेतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. हाच धागा पकडून 2002साली ’ऑर्गेनिक फार्मिग असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. स्वदेशी, सेंद्रिय शेतमालाचा प्रचार, प्रसार करणे, पारंपरिक ज्ञान कौशल्याचा विकास करणे, सेंद्रिय शेतमालाच्या मूल्यसाखळीचा विकास व विस्तार करणे, हवामान आधारित पीकपद्धतीचा अंगीकार करणे, सेंद्रिय शेतीआधारित धोरणे आखणे, तळागळातील सेंद्रिय शेतमाल शेतकरी उत्पादकांना संघटित करणे आदी उद्दिष्टांवर ही संस्था काम करत आहे. या संस्थेचे 2006 साली वर्धा (महाराष्ट्र) येथे पहिले राष्ट्रीय सेंद्रिय शेती अधिवेशन पार पडले, तर दुसरे अधिवेशन 2008मध्ये त्रिची (तामिळनाडू), तिसरे अधिवेशन 2010मध्ये आनंद (गुजरात), चौथे अधिवेशन 2012मध्ये भुवनेश्वर (ओडिशा), पाचवे अधिवेशन 2015मध्ये चंदिगढ (पंजाब), सहावे अधिवेशन नोएडा(नवी दिल्ली) आणि सातवे अधिवेशन 2019मध्ये उदयपूर (राजस्थान) येथे आयोजित करण्यात आले होते.
 
 


krushivivek
 
अलुवा (केरळ) येथील आठव्या अधिवेशनाचे स्वरूप
 
 
अधिवेशनाच्या माध्यमातून संस्थेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. संस्थेपासून प्रेरणा घेऊन आज देशातील लाखो शेतकरी सेंद्रिय व जैविक शेती करत आहेत. निसर्गसंपन्न, नारळ, सुपारी, दालचिनी, काळी मिरी, वेलची, अननस आणि भात या पिकांमध्ये अग्रसेर असलेल्या केरळ राज्यातील अलुवा येथे दि. 28, 29 आणि 30 डिसेंबर 2023रोजी संस्थेचे आठवे राष्ट्रीय सेंद्रिय शेती अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, ओडिशा आदी राज्यांसह देश-विदेशातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. ’ऑर्गेनिक फार्मिग असोसिएशन ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. पी. इलियास, प्रदेश सचिव प्रेम सिंह (उत्तर प्रदेश) कोषाध्यक्ष शमिका मोने (महाराष्ट्र) आदींनी अधिवेशनाचे नेतृत्व केले, तर प्रताप मोराडे यांनी महाराष्ट्रासाठी समन्वयकाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 177 शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. सलग तीन दिवस मला या अधिवेशनात सहभागी होता आले. त्यानिमित्ताने नवीन ओळखी झाल्या, मान्यवरांच्या भाषणातून नवनवीन गोष्टी ऐकता आणि शिकता आल्या.
 
 
“ज्ञानात भर घालणारे अधिवेशन”
- किरण लेले
केरळ राज्यात झालेल्या राष्ट्रीय सेंद्रिय शेती अधिवेशनात मला सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो. या अधिवेशनाविषयी खूप उत्सुकता होती. याठिकाणी नक्की काय बघायला मिळेल, कार्यशाळेत काय असेल? वक्ते नेमके काय बोलतील? याविषयी मनात साशंकता होती. ही साशंकता प्रत्यक्ष सहभागी होऊन दूर केली. दि. 28 डिसेंबरला आम्ही सकाळी कार्यक्रमस्थळी पोहोचलो.उद्घाटन सत्रातील काही मान्यवरांची भाषणे ऐकली. शिवाय तीन दिवसांच्या कार्यक्रम पत्रिकेतील वक्त्यांचे विषय ऐकले, त्यांच्याशी बोलता आले. यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. या सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे कृषी प्रदर्शनी आणि त्यात सहभागी झालेले पारंपरिक बियाणांचे स्टॉल. जवळपास दीड ते दोन हजार प्रकारच्या पारंपरिक बियाणांचा खजिना याठिकाणी उपलब्ध होता. त्यातील काही बियाणे आणि कंद मी जैवविविधता जपण्यासाठी विकत घेतले. उत्तम व नीटनेटके नियोजन, व्यवस्थापनामुळे हे अधिवेशन चिरस्मरणात राहील, यात तीळमात्र शंका नाही.
 

krushivivek
 
-व्यवस्थापकीय संचालक, रोहिणी कृषी पर्यटन केंद्र
मु.पो.बोरांडा, ता.विक्रमगड जि.पालघर
9284067120 9860161632
 
 
अधिवेशनाचे वैशिष्ट्ये
 
तीन दिवस चालेल्या या अधिवेशानात खाद्य, सेंद्रिय शेतमाल उत्पादने, पारंपरिक बियाणे, कृषी स्टार्टअप, जैविक उत्पादन अशा विविध दालनांसह विषयानुरूप वक्त्यांची व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशाचे उद्घाटन केरळचे कृषिमंत्री पी. प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अलुवाचे नगराध्यक्ष एम.ओ.जॉन, फिजीचे ‘ऑर्गेनिक्स इंटरनॅशनल’चे अध्यक्ष कैरेन मापुसुआ आदींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. पहिल्या व दुसर्‍या दिवशीच्या सत्रात विविध राज्यांतील सेंद्रिय शेतकरी उत्पादक शेतकर्‍यांचे अनुभवकथन झाले. तीन दिवसांच्या सत्रात महेशभाई पटेल, गुजरात (विविध राज्यातील जमिनीचा स्तर), सुभद्रा खापर्डे, महाराष्ट्र (पारंपरिक बियाणे व ज्ञान), आकाश चौरसिया, मध्य प्रदेश (मिश्र शेती), सुजाता गोयल (जैविक विविधता ) आदी मान्यवरांवर सेंद्रिय शेतमाल निर्यात धोरण, महिला व युवा सक्षमीकरण, शाश्वत शेती, सेंद्रिय बाजारपेठ संधी आदी विषयांवर मार्गदर्शन केले. समारोपास ‘हरित केरल मिशन’च्या समन्वयिका टी.एन.सीमा यांची विशेष उपस्थिती होती. यानिमित्ताने अनेक दिग्गज वक्ते व त्यांची व्याख्याने ऐकण्याची व संवाद साधण्याची संधी मिळाली.
 

krushivivek 
 
रोज संध्याकाळी शेतकर्‍यांसाठी प्रश्नोत्तर, कृषी संस्कृतीशी निगडित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय 24 राज्यांतील पारंपरिक बीजसंग्रहाचे 120 स्टॉल्स होते. या प्रदर्शनात कंद, भात, भाजीपाला, मसाले, तृणधान्य, कडधान्ये असे अनेक प्रकार याठिकाणी पाहता आले. शेतकर्‍यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरले.
 
 
या अधिवेशानात सेंद्रिय शेती चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल जपान येथील ताकाहाता सेंद्रिय शेती परिषद व ओडिशा राज्यात गेल्या 25 वर्षांपासून 1400 प्रकारच्या पारंपरिक भाताच्या बियाणांचे संकलन आणि संवर्धन करणारे डॉ. देवल देव यांना ‘आयएफओएम ऑर्गेनिक्स आशिया 2023’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने सेंद्रिय चळवळीला गती आणि दिशा देण्याचे काम करण्यात आले. देशभरातील सेंद्रिय शेती चळवळीत काम करणार्‍या शेतकर्‍यांना, संस्थांना एकाचवेळी एकाच ठिकाणी संवाद साधण्याची संधी मिळाली. विशेषतः सेंद्रिय शेतीचा दृष्टिकोन अधिक निकोप व विज्ञाननिष्ठ होण्यास यानिमित्ताने मदत झाली. हेच आठव्या राष्ट्रीय सेंद्रिय शेती अधिवेशनाचे फलित म्हणावे लागेल.
लेखक ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी आहेत.