सेंद्रिय कर्ब जमिनीचा आत्मा

विवेक मराठी    19-Jan-2024
Total Views |

@डॉ. हरिहर कौसडीकर
9423142210
सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. या कर्बवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. सध्या राज्यातील जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण 0.3 ते 0.5 टक्के आहे. जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणवत्तेत बदल होत गेल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते आहे. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी सेंद्रिय कर्बचे प्रमाण अडीच टक्क्यांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय किंवा नैसर्गिक खते अधिक प्रमाणात जमिनीत मिसळावीत.
krushivivek
 
माती, पाणी, जंगल ही पृथ्वीचे महत्त्वाचे घटक आहेत. याचा अधाशीपणे वापर करून मानव पृथ्वीचे नुकसान करत आहे. माती किंवा जमिनीचा विचार केला असता, मातीच्या होणार्‍या धुपेमुळे 2050पर्यंत पीक उत्पादनात दहा टक्के घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मृदा संरक्षण हा महत्त्वाचा अजेंडा ठरत आहे. दुसरीकडे जमिनीतील सेंद्रिय कर्बची समस्या डोके वर काढत आहे. देशाची वाढती लोकसंख्या आणि त्यांची अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर वाढला. परिणामी, जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण कमी झाले. महाराष्ट्राचा विचार केला असता, केवळ सेंद्रिय कर्बचे प्रमाण 0.3-0.5 टक्के आहे. पिकेसुद्धा त्यांच्या क्षमतेच्या 30 ते 50 टक्केच उत्पादन देत आहेत. हा बदल रोखण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण योग्य राखले गेले पाहिजे. सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्यावर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. विशेषतः जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंची संख्या, त्यांची क्रियाशीलता, जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता हे सेंद्रिय कर्बशी निगडित आहेत. उदा. जमिनीत एक टक्के सेंद्रिय कर्ब म्हणजेच 100 किलो मातीत अंदाजे दोन किलो शेणखत असावे लागते. सेंद्रिय कर्ब हा सर्व अन्नद्रव्ये पुरविणारा स्रोत आहे. सेंद्रिय कर्बचे प्रमाण हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून असते. सेंद्रिय कर्ब हे जमिनीचे गुणधर्म संतुलित ठेवण्याचे कार्य करते. पारंपरिक पद्धतीत शेती ही निसर्गाशी संबंधित असते. निसर्गाप्रमाणे शेतीचेसुद्धा चक्र असते. शेतातील झाडांचा गळून पडलेला पालापाचोळा, भूसा व टाकाऊ सेंद्रिय पदार्थांपासून कम्पोस्ट खताच्या एकात्मिक वापरास ’सेंद्रिय चक्र’ असे म्हणतात.
 
krushivivek 
 
सेंद्रिय कर्ब कमी होण्याची मुख्य कारणे
 
 
जमिनीत 45 टक्के रासायनिक पदार्थ, 25 टक्के सेंद्रिय पदार्थ, 25 टक्के पाणी आणि 25 टक्के हवा हे महत्त्वपूर्ण घटक असतात. जमिनीतील अल्कधर्मी सामू, सेंद्रिय कर्बची कमतरता, एक पीक पद्धतीचा अवलंब, रासायनिक खतांचा अतिवापर, जमिनीची धूप आदी कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडते आहे. याशिवाय उष्ण हवामानामुळे तसेच जैविक क्रियेमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बचे विघटन आणि भस्मीकरण क्रिया सतत सुरू असते. तसेच शेतीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके, पाण्याचा अतिरिक्त वापर त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बचेे प्रमाण हळूहळू कमी होत असून हे प्रमाण 0.1 ते 1 टक्के एवढे आहे. हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नत्र, स्फूरद, पलाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, तांबे, जस्त, बोरॉन, क्लोरीन आदी 16 अन्नघटकांच्या उपलब्धतेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. हे अन्नघटक शेतीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात.
 
krushivivek 
 
जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण कसे वाढवावे?
 
 
जमिनीवर पडून कुजणार्‍या पदार्थांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. पालापाचोळा फक्त जमिनीवर कुजण्यास एक महिना लागतो, तोच कचरा गाईच्या शेणामध्ये एका दिवसात कुजतो. शेणामधून कर्बचा पुरवठा जास्त होतो. यासाठी जैविक खते, शेणखत, कोंबडीखत, कम्पोस्ट खत, पिकांचे अवशेष पालापाचोळा, पाने, फांद्या, हिरवळीच्या खतांचा वापर वाढवला पाहिजे. कोकणात पाऊस आणि हवेतील आर्द्रता यामुळे एखादी गोष्ट कुजून त्याचे कर्बमध्ये रूपांतर लवकर होऊ शकते. मराठवाड्याचा विचार केला असता तेथील मातीत ओलावा कमी असल्यामुळे तिथे एखादी गोष्ट कुजण्यास जास्त वेळ लागू शकतो. म्हणून मातीतील कर्बचे प्रमाण वाढविण्यासाठी हवामानानुसार त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. हिरवळीची पिके घेऊन ती फुलोर्‍यात येताच जमिनीत गाडावीत. कडधान्येवर्गीय वनस्पती उदा. टाकळा, तरवड, बरबडा यांच्या फुलोर्‍यास सुरुवात होत असताना शेतात गाडल्यास जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बचे प्रमाण वाढविता येते.
 

krushivivek 
 
जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण का करावे?
 
सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेसाठी मूलभूत घटक आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण हे उष्ण हवामानावर अवलंबून असते. तापमान वाढल्यास सेंद्रिय द्रव्यांचा विघटनाचा वेग वाढतो. कमी तापमानाच्या प्रदेशात जमिनीतील वनस्पती आणि प्राणिजन्य अवशेषांचे विघटन हळू होते. सेंद्रिय कर्बयुक्त पदार्थार्ंमुळे सूक्ष्मजीवांना खाद्य व ऊर्जा मिळते. सूक्ष्मजीवांमुळे मातीच्या कणांचे छोट्या समूहात एकत्रीकरण केले जाते. जमिनीखाली गांडुळे, सूक्ष्मजीव यांच्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचा वेग वाढतो, तसेच खनिजीकरणाची प्रक्रियाही होते. उष्ण हवा व कमी पावसामुळे सेंद्रिय भागाचे विघटन जलदगतीने होते. त्यामुळे सेंद्रिय घटक तयार होण्याच्या क्रियेत समतोलपणा राहत नाही. हा समतोलपणा आणण्यासाठी सेंद्रिय खते किंवा भरखते अधिक प्रमाणात जमिनीत मिसळावीत. ही भरखते (शेणखत, लेंडीखत इ.) नियमितपणे प्रत्येक पिकास देणे गरजेचे आहे. त्यामुळे मातीचीदेखील घट होत नाही.
 
सेंद्रिय पदार्थांचे फायदे
 
 
जमिनीची घनता कमी करून मातीच्या कणाकणातील पोकळी वाढवून हवा खेळती राहते. हवा, पाणी योग्य प्रमाणात राहते. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. सेंद्रिय कर्बमुळे जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंच्या संख्येत वाढ होते. जमिनीची जलवाहकशक्ती वाढते. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. जमिनीत पुरेसा ओलावा टिकून राहतो व जलप्रदूषणही होत नाही, तसेच शेतीला फायदेशीर असणारे कीटक आणि वन्यजीवांचे नुकसान कमी होते. सेंद्रिय पदार्थ हे जमिनीतील जीवाणू जीवंत राहण्यासाठी आवश्यक असतात. हलक्या जमिनीत मातीचे कण एकमेकांना जोडण्यास यामुळे मदत होते. त्यामुळे जमिनीची संरचना चांगली होते. तसेच सेंद्रिय शेतीमुळे पाण्याची गुणवत्ता चांगली राहते. जमिनीची होणारी धूप कमी होते. अनावश्यक किंवा जस्त मुक्त चुना हे घटक पिकांच्या वाढीसाठी घातक ठरतात. सेंद्रिय खताचे प्रमाण वाढवून चुन्याची घातकता कमी करता येते.
 
 
शासनाचे दिशादर्शक धोरण
 
देशातील जमिनीतील सुपीकता वाढावी, सेंद्रिय शेतीला दिशा मिळावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून दिशादर्शक पावले उचलण्यात येत आहेत. देशात जैविक/सेंद्रिय शेतीचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात ‘डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन’ या योजनेंतर्गत विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये 500 शेतकरी गट तयार करून जैविक/सेंद्रिय शेती विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्याच्या राज्याच्या शासनव्यवस्थेने केंद्र सरकारच्या धर्तीवर नैसर्गिक शेती धोरणाला पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुमारे 25 लाख हेक्टर क्षेत्र विकसित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एकूणच राज्यात येत्या काळात जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल, अशी आशा बाळगूया.
 
 
(लेखक महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतील (पुणे) संशोधन व विस्तार शिक्षण विभागाचे संचालक आहेत.)