स्वरयोगिनी अनंतप्रभा

विवेक मराठी    19-Jan-2024
Total Views |
@नेहा लिमये

Prabha Atre 
भारतीय अभिजात संगीतात डॉ. प्रभा अत्रे हे नाव अजरामर राहील. त्यांनी संगीतात स्वत:च्या प्रतिभेने कशिदाकारी केली आणि किराणा घराण्याची शैलीच समृद्ध केली. संगीतातील सारे अलंकार हे प्रभाताईंचे गाणे अधिक श्रीमंत करत. ज्यांनी त्यांच्या मैफिली ऐकल्या आहेत, त्यांना हा अनुभव नक्की आला असेल. अशा या बहुपेडी, बहुआयामी, प्रतिभावंत तपस्विनीला, योगिनीला सादर नमन आणि आदरांजली!
जीवन माझे सुरासंगती
अर्पियले मी रसिका तुजसी ॥
जन्मजन्मीचे नाते अपुले
जाणून घे तू रसिक प्रिया रे ।
जगणे मरणे तुजसाठी रे
मी पण सरले सरली नाती ॥
 
- डॉ. प्रभा अत्रे (अंतःस्वर)
 
 
संगीत ही अशी जादुई गोष्ट आहे की, प्रत्यक्ष परिचय नसताना, न भेटता-बोलताही माणूस ‘आपलाच’ वाटू लागतो. त्यात तो कलाकार असेल, तर त्याच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाशी आपलं कुठलंतरी मागच्या जन्मीचं नातं असावं की काय, इतपत आत्मीयता, प्रेम निर्माण होतं. म्हणूनच पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे गेल्याची बातमी दिसली आणि काही काळ सगळं थांबल्यासारखं झालं. ‘हृदयेश म्युझिक फेस्टिवल’ला त्याच दिवशी त्यांचं गाणं असताना उस्ताद राशीद खाँ यांच्या अचानक जाण्याची जखम अजून ओली असताना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे काय झालं एकदम! मनात, अगदी आत, खोलवर फार म्हणजे फार दुखलं. ज्यांनी सांगीतिक जाणिवा घडवल्या, रुंदावल्या त्यांचं भर मैफिलीतून अचानक उठून निघून जाणं याची नोंद मेंदूत झाली, तरी ती स्वीकारण्यास मन त्याचा वेळ घेतं. आठवणींचे उभे-आडवे धागे हळूहळू जोडत त्याला एकदाचं वास्तवात आणावं लागतं. प्रभाताईंच्या बाबतीत माझ्यासारख्या असंख्य श्रोत्यांचं असंच झालं.
 
 
प्रभाताईंना मी पहिल्यांदा पाहिलं, समक्ष ऐकलं ते आईचा हात धरून सुरेल सभेच्या कार्यक्रमात. ऐकलं म्हणणं धाडसाचं ठरेल. कारण, त्यांचा ‘मधुवंती’ तर दूरच, पण साधं ‘सा रे ग म’ कळण्याचंही माझं वय नव्हतं तेव्हा. पण त्यांच्या गाण्यानंतरचा टाळ्यांचा कडकडाट आजही लख्ख आठवतो. कार्यक्रमानंतर मी आणि आई त्यांना भेटायला गेलो तेव्हा आईने ‘पाया पड’ म्हटल्यावर मी पटकन वाकले होते आणि श्रोत्यांच्या गराड्यात असूनही त्या माझ्याकडे पाहून खूप गोड हसल्या होत्या. ते लाघवी हसू मनाच्या एका कप्प्यात खास जपून ठेवलं आहे मी. त्याचे कवडसे सांभाळतच पुढे माझं गाणं ऐकणं सुरू झालं, हे आता प्रकर्षाने जाणवतं.
शास्त्रीय संगीत जरा आवडू, कळू लागलं, तेव्हा घरी असलेल्या ‘एलपी’मधून प्रभाताई वारंवार भेटत राहिल्या. मारूबिहाग आणि कलावती असलेली ती तबकडी म्हणजे वेल्हाळ, अनुरागी बंदिशींची रंगपेटी होती. त्यावर असलेली प्रभाताईंची सैलसर वेणी घातलेली, ठसठशीत कुंकू लावलेली, काठपदराची साडी नेसलेली, सात्विक पण तेजस्वी, बुद्धिमान प्रतिमा मनात आणखी रूजली. सत्तर-ऐंशीच्या दशकातल्या पिढीवर ‘तन-मन-धन तोपे वारू’ (कलावती), ‘जागू मैं सारी रैनाने’ (मारू बिहाग) अक्षरश: गारूड केलं. पुढे ‘भैरव’, ‘यमन’, भिन्न ‘षड्ज’, ‘श्याम कल्याण’, ‘मधुवंती’, ‘चंद्रकंस’मधलं त्यांचं ‘सरगम’युक्त भरतकाम ऐकत कान तृप्त झाले. ‘जमुना किनारे मोरा गांव’, ‘कौन गली गयो श्याम’, ‘सावरो नंदलाला’सारख्या ‘दादरा-ठुमरी’तलं नाजूक जरीकाम ऐकताना त्यातल्या ‘सावरे अयजययो’ आणि ‘श्याम’ला आम्ही आमचं काळीजच बहाल केलं. ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त उत्तररात्री त्यांनी गायलेली ‘जगतजननी, भवतारिणी, मोहिनी, तू नवदुर्गा’ ही भैरवी ऐकून कितीतरी वेळ डोळे झरत राहिले होते आणि मन काठोकाठ भरलं होतं. आता वाटतं, ते क्षण मुठीत घट्ट धरून ठेवता आले असते, तर किती बरं झालं असतं, नाही?
 
 
Prabha Atre
 
प्रभाताईंचं शास्त्रीय संगीताकडे वळणं हा एक ‘गोड’ अपघात होता, पण आता खरंतर त्याला परमेश्वराची कृपादृष्टी म्हणणंच योग्य ठरेल. प्रभाताईंचे आईवडील शिक्षक. आजारी आईसाठी संगीत उपचार-पद्धती म्हणून घरात संवादिनी आणली आणि ती शिकता शिकता आठ वर्षांच्या प्रभाताईंमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली. ‘किराणा’ घराण्याचे गायक सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर या गुरुजनांनी त्यांच्या गळ्याला पैलू पाडले आणि गायनाची ही धुरा प्रभाताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळली. आवाजातला अवीट गोडवा, एकेक स्वरांची लड उलगडत जाताना त्यात असलेली सहजता, लयीच्या अंगाने जाणारे शब्दांचे हिंदोळे, संपूर्ण गाण्यात एकसंध मोहक, आश्वासक तरीही आर्त खेळकरपणा यामुळे प्रभाताईंची गायकी अतिशय उठून दिसत असे.
 
  
‘किराणा’ घराण्याच्या गायकीचा घरंदाजपणा सांभाळत प्रभाताईंची गायकी वर्षानुवर्षे खुलत गेली. त्याची खोली आणि व्याप्ती काळानुरूप वाढत गेली. शास्त्रीय संगीताचं तंत्र सांभाळत त्यात जीवंतपणा आणणं, आपली स्वरभाषा श्रोत्यांपर्यंत रसपूर्ण पद्धतीने पोहोचवणं यात गायक-वादकांचा कस लागतो. प्रभाताई विज्ञान आणि कायद्याच्या पदवीधर होत्या, कथ्थकही शिकलेल्या होत्या. ‘संशयकल्लोळ’, ‘सौभद्र’, ‘मानापमान’सारख्या संगीत नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘सरगम’ विषयावर सादर केलेला प्रबंध आणि त्यातली डॉक्टरेट, आकाशवाणीच्या विभागप्रमुख यातून त्यांची असामान्य बुद्धिमत्ता झळकली होतीच. त्यामुळे पारंपरिक चौकटी, नियमबद्धता सांभाळून रागातल्या भावमुद्रा, बंदिशीतील कथानक, ख्यालातलं रसलालित्य सादरीकरणात आणणं, त्यातलं वैविध्य जपणं त्यांनी लीलया पेललं. एवढंच नव्हे, तर त्यात प्रसंगी धाडसी वाटावे, असे प्रयोगही केले आणि प्रस्थापित गृहीतकांना आव्हान दिलं. ‘मारू बिहाग’चंच उदाहरण घ्यायचं झालं, तर ‘जागू मै सारी रैना’या त्यांनी रचलेल्या बंदिशीत शुद्ध मध्यम न लावता (किंवा अगदी कामापुरताच स्पर्शूनदेखील) रागाचं सौंदर्य अबाधित राहू शकतं हे दाखवून दिलं. त्यावरून जाणकारांनी त्यावेळी नाराजी दर्शवली, पण तोच ‘मारू बिहाग’ श्रोत्यांनी डोक्यावर घेतला आणि अजरामर झाला. शास्त्रीय संगीतातल्या स्वरप्रधान गायकीला झुकतं माप देत, त्यातल्या शब्दांना जरा बाजूला ठेवण्याचं, बंदिशीत अंतर्‍याचा अडथळा नको म्हणण्याचा त्यांचा आग्रह, त्यावरूनही त्यांनी टीका झेलली, पण ते सप्रमाण सिद्ध करण्याचं त्यांचं कसब वाखाणलंही गेलं. अगदी अलीकडेच गानगुरूंचं चित्रपटातलं व्यक्तिचित्रण कसं नसावं हे ठरवताना अभ्यास, वैचारिक बैठक किती आवश्यक आहे, याविषयीही त्यांनी ठाम भूमिका घेतली होती.
 
  
देश-विदेशात जाऊन शास्त्रीय संगीतावरच्या कार्यशाळा घेणं, ‘प्रभा अत्रे फाऊंडेशन’, ’गानवर्धन’सारख्या संस्थांद्वारा युवा पिढीला प्रोत्साहित करणं, ‘आलोक’द्वारा युट्यूबसारख्या डिजिटल माध्यमाद्वारे सांगीतिक चिंतन, विचार मांडणं यातून त्यांनी मुक्तहस्ताने शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार केला. ‘स्वरमयी गुरुकुल’ मधून अनेक उत्तम शिष्य तर घडवलेच, पण त्याचबरोबर संगीतातले नवीन विचार प्रवाह, भावसंगीत आणि इतर शाखा-उपशाखांशी संलग्न असलेल्या कलाकारांशीही मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या अजोड कार्यावर, प्रतिभेवर भारत सरकारने तिन्ही ‘पद्म पुरस्कार’ बहाल करून मोहर उमटवली. ‘स्वरभास्कर’सारख्या कित्येक पुरस्कारांच्या धनी होऊनही त्यांच्यातली ऋजुता, विचारांचा मोकळेपणा कायम राहिला.
‘कलेसाठी कला’ न करता ती एक न संपणारी साधना आहे, हे मनाशी पक्कं ठेवून जो कलाकार कलेप्रति समर्पित होतो, त्याचा सर्जक स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याला कलेची इतर प्रांगणे खुणवू लागतात. प्रभाताईंच्या अवकाशातही संगीताबरोबरच साहित्य, कविता, गझल, भावसंगीत यांचा प्रवेश झाला. काहीतरी नवीन निर्माण करताना आधीचं काहीतरी मोडावं, वाकवावं लागतं, पण त्याचं सौंदर्य अबाधित ठेवून, या विचाराशी प्रामाणिक राहून त्यांनी सांगीतिक परीघ विस्तारत नेला. त्यातून ‘मधुरकंस’, ‘पटदीप मल्हार’, ‘दरबारी कंस’, ‘अपूर्व कल्याण’, ‘तिलंग-भैरव’ या रागांची निर्मिती झाली. सखोल चिंतन, संशोधनातून ’स्वरमयी’, ’सुस्वरावली’, ’स्वरांगिणी’ ’स्वररंजनी’, ’अलाँग द पाथ ऑफ म्युझिक’, ’एनलायटनिंग द लिसनर’ यातून प्रभाताईंमधली सिद्धहस्त लेखिकाही बहरत गेली. त्यांच्या गझल-रचना, भरतनाट्यम् गुरु सुचेता भिडे चापेकर यांच्या ‘नृत्यप्रभा’साठी केलेल्या रचना, ‘जॅझ’ शैलीसाठी त्यांच्या रचनांची झालेली निवड यातून प्रभाताईंची सांगीतिक प्रतिभा, कल्पकता असीम होती, यात शंकाच नाही.
 
 संगीतसाधनेच्या कठीण वाटेवर चालताना कधी पायात काटे रुतणार, कधी दिव्यत्वाची प्रचिती येणार, हे उघड आहे. मागच्या आवर्तनातलं समर्पण पुढच्या आवर्तनाची तहानही सोबत घेऊन येतं, हे त्यांना उमगलं होतं. म्हणूनच गाण्याइतकीच प्रभाताईंची कविताही तरल आणि उत्कट आहे. कलेतल्या अमूर्ताशी आणि संवेदनशील मनाच्या अंतर्गत झगड्याशी एकरूप आहे. त्यांच्या कवितेचा ‘अंतःस्वर’ निरंजन आहे. यासाठी ‘चिंतनिका’ अशी अतीव सुंदर संज्ञा त्यांनी योजली होती.
 
 
नादसमुद्राच्या तळाशी शोधते आहे सुरांचे मोती
 
गाणार्‍या यात्रिकाच्या हाती
 
कुणी दिल्या या विझलेल्या वाती?
 
गळ्याला डागून दिलाय सुरांचा मोह
 
आत्म्यापासून हाकेच्याच अंतरावर
 
भीतीचे डोह
 
उल्कापाताची साक्षात्कारी चांदणी
 
तळहातावर गोंदवून मी
 
हलकेच पुन्हा निघून जाते..
 
 
1950 सालापासून सुरू झालेली गानयात्रा 73 वर्षे अविरतपणे सुरू राहिली आणि 14 जानेवारी, 2024 रोजी ही स्वरयोगिनी कसलाही गाजावाजा न करता शांतपणे ‘नाद समुद्राच्या तळाशी’ विसावली. परंतु, तिची अनंतप्रभा संजीवक आहे. तिचं संचित शास्त्रीय संगीताच्या पुढल्या अनेक पिढ्यांना पुरून उरणार आहे.
 
 
प्रभाताई,
 
देहरूपाने तुम्ही आम्हाला आणखी खूप वर्षं हव्या होता, हे जरी कितीही खरं असलं तरी ते शाश्वत नाही, याची जाणीव आहे. पण तुमचे सूर, तुम्ही दिलेले विचार चिरंतन आहेत. 92 वर्षांचं तुमचं आयुष्य तुम्ही खूप समृद्धपणे जगलात, आम्हाला अगदी भरभरून दिलंत, त्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. तुमचा पुढचा प्रवास सुखकर होवो. तुमच्यातल्या बहुपेडी, बहुआयामी, प्रतिभावंत तपस्विनीला, योगिनीला सादर नमन आणि आदरांजली!