@वसुमती करंदीकर
दि. 22 जानेवारी 2024 रोजी सर्व विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या राम मंदिराचे लोकार्पण झाले. या राम मंदिराच्या निमित्ताने अयोध्यानगरीचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. तेथील रस्ते, वाहतूक, विमानतळ, रेल्वे स्थानक, रहिवासाची ठिकाणे अशा अनेक घटकांनी अयोध्यानगरी सुसज्ज झाली. श्रीकृष्ण आणि मथुरा हे जसे समीकरण आहे, तसेच प्रभू श्रीराम आणि अयोध्यानगरी हे समीकरण आहे. अयोध्यानगरीचा रामायण काळाच्या आधीपासूनचा सुवर्ण इतिहास आहे. अयोध्या या नावाच्या इतिहासापासूनच या नगरीचा विस्तृत पट पाहणे माहितीपूर्ण ठरेल.
अयोध्यानगरी हे हिंदू धर्मीयांचे तीर्थस्थळ म्हणून उदयास येत आहे. परंतु अयोध्या ही प्राचीन काळी हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांचे तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध होती. तसेच, कौशल (कोशल) देशाची राजधानीही होती. ईशान्येस शरयू (घाग्रा) नदीच्या दक्षिण तिरावर वसलेल्या या नगरीचे ‘शाकेत’, ‘साकेत’, ‘कौशल’, ‘नंदिनी’, ‘अयोज्झा’, ‘विनीता’, ‘सुकोशल’, ‘रामपुरी’, ‘इक्ष्वाकुभूमी’, ‘सोगेद’, ‘विशाखा’ अशा भिन्न नावांनी साहित्यात उल्लेख आढळतात. ’अवध’ आणि ‘औध’ ही अयोध्येची दोन नावे अधिक प्रसिद्ध आहेत.
साहित्यामधील अयोध्या
अयोध्यानगरीची स्थापना वैवस्वत मनूने केली, असे म्हटले जाते. ब्राह्मण ग्रंथांतही अयोध्या ही वैभवशाली नगरी असल्याचा उल्लेख आढळतो. या नगरीत इक्ष्वाकुवंशीय राजांपैकी मांधातृ, हरिश्चंद्र, सगर, भगीरथ, दिलीप, खट्वांग, रघु, दशरथ व रामचंद्र हे पराक्रमी राजे राज्य करत होते. श्रीरामपुत्र लव-कुश यांनी आपल्या राज्याची राजधानी श्रावस्ती व कुशावती येथे हलविल्याने अयोध्येस विजनावस्था प्राप्त झाली. परंतु सूर्यवंशीय ऋषभ राजाने अयोध्यानगरीला पुन्हा संजीवनी देण्याचे कार्य केले. महाभारतात ‘पुण्यलक्षणा’ असा या नगरीचा उल्लेख आढळतो. बौद्ध काळात अयोध्येचे उपनगर साकेत समृद्धावस्थेत होते, तसेच ‘अयोज्झा’ गावी गौतम बुद्ध दोन वेळा आले होते, असा उल्लेख बौद्धवाङ्मयात आहे. ह्यूएनत्संगाच्या प्रवासवर्णनात अयोध्यानगरीतील अशोकस्तूप, मठ व मंदिरे यांचे उल्लेख आढळतात. जैन संप्रदायातही अयोध्यानगरी पवित्र समजली जाते. जैन तीर्थंकरांपैकी ऋषभदेव, अजितनाथ, अभिनंदन, सुमतिनाथ व अनंतनाथ या तीर्थंकरांचा जन्म अयोध्या येथे झाला होता. सुविख्यात सम्राट भरत, सगर, मधवा, सनत्कुमार आणि सुभौम यांची राजधानी अयोध्या हीच होती. अयोध्येमध्ये इ.स.पू. 600मध्ये पुरुषांना 72 व स्त्रियांना 64 विद्या शिकविण्याची व्यवस्था असलेले पहिले जैन विद्यापीठ असल्याचा उल्लेख जैन तत्त्वज्ञ हेमचंद्रसूरी यांनी केला आहे. मुसलमानांचा अंमलही या अवध प्रांतात होता.
अयोध्यानगरीमध्ये कनकभवन, रामजन्मस्थान, रत्नमंडप, स्वर्गद्वार, गोप्रतारतीर्थ, लक्ष्मणकुंड, हनुमानगढी ही हिंदू धर्मीयांकरिता असणारी पवित्र स्थाने, मणिपर्वत, सुग्रीवपर्वत, कुबेरपर्वत, दतूनकुंड ही बौद्धधर्मीय स्थाने आणि जैन तीर्थंकरांची मंदिरे या अयोध्यानगरीत असल्याचे उल्लेख साहित्यातही आढळतात.
रामायण, महाभारत, आदिपुराण, प्राचीन जैन, संस्कृत महाकाव्यांमध्ये अयोध्या नावाच्या शहराचा उल्लेख आहे. पाणिनीच्या ’अष्टाध्यायी’मध्ये आणि त्यावरील ‘पातंजलभाष्या’मध्ये साकेत नगरीचा उल्लेख आढळतो. ब्रह्मांड पुराणातील एका श्लोकात ‘सर्वात पवित्र नगर’ असा अयोध्येचा उल्लेख आला आहे.
अयोध्या नावाची व्युत्पत्ती
स्कंदपुराणानुसार, अयोध्या हा शब्द ’अ’कार ब्रह्मा, ’य’कार विष्णू आणि ’ध’कार रुद्राचे रूप आहे. याचा शाब्दिक अर्थ असा आहे की, जेथे युद्ध होत नाही. ‘अवध’ म्हणजे जेथे कोणाला ठार मारले जात नाही. अयोध्येचा अर्थ ज्याला कोणीही युद्धाने जिंकू शकत नाही. श्रीरामांच्या काळात ही नगरी अवध नावाने ओळखली जात होती. काही बौद्ध ग्रंथात या नगरीला प्रथम अयोध्या आणि यानंतर साकेत म्हटले गेले आहे. कालिदासाने उत्तरकौशलची राजधानी साकेत आणि अयोध्या अशा दोन्ही नावांचा उल्लेख केल्याचे आढळून येते.
कौशल नगरी अयोध्या
श्रीरामांच्या कार्यकाळात भारत 16 महाजनपदांमध्ये विभागला गेला होता. महाभारतकाळात हीच महाजनपदे 18 भागांत विभागली गेली. या महाजनपदांअंतर्गत अनेक जनपदे असायची. त्यापैकीच एक म्हणजे कौशल महाजनपद आणि त्याची राजधानी अवध होती, ज्याचे साकेत आणि श्रावस्ती असे दोन भाग झाले. अवधलाच अयोध्या म्हणतात. दोघांचे अर्थ एकच आहेत. वाल्मिकी रामायण आणि ‘रामचरितमानस’नुसार राजा दशरथाचे राज्य कौशल आणि त्याची राजधानी अयोध्या होती. पौराणिक कथेनुसार, जेव्हा ब्रह्मदेव मनूला विष्णूंकडे घेऊन गेले, तेव्हा विष्णूंनी रामावतारासाठी त्यांना साकेतधाममधील एक स्थळ सुचविले. विष्णूंनी या नगरीच्या निर्मितीसाठी विश्वकर्मांना ब्रह्मांच्या आणि मनूच्या समवेत पाठविले. त्यांच्यासोबत महर्षी वशिष्ठही होते. महर्षी वशिष्ठांनी शरयू नदीच्या काठावर लीलाभूमीची निवड केली. तेथे विश्वकर्मांनी या नगरीची निर्मिती केली.
वाल्मिकी रामायणाच्या पाचव्या सर्गात अयोध्यापुरीचे तपशीलवार वर्णन केले आहे. शरयू नदीच्या काठावर वसलेल्या या नगरीची निर्मिती वैवस्वत मनूंनी केली होती. रामायणासह अनेक ग्रंथांमध्ये ‘शरयू नदीच्या काठावर वसलेली नगरी’ म्हणूनच अयोध्येचा उल्लेख आढळून येतो. अयोध्येपासून 16 मैल अंतरावर नंदीग्राम नामक स्थान आहे. तेथूनच श्रीरामांच्या अनुपस्थितीत भरताने अयोध्येचा राज्यकार्यभार सांभाळला. येथे भरतकुंड सरोवर आणि भरताचे मंदिरही आहे. अन्य कोणत्याही ठिकाणी नंदीग्राम किंवा शरयू नदी किंवा हनुमानगढी नाही. त्यामुळे ग्रंथांमध्ये आलेले उल्लेख हे याच स्थळाचे आहेत.
सप्तपुरी आणि अयोध्या
प्राचीन उल्लेखांनुसार, सप्तपुरींपैकी एक असलेल्या अयोध्येत प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. सध्या शरयू नदीच्या काठावर असलेली अयोध्या उपरोक्त सप्तपुरींपैकी एक आहे. भारतातील प्राचीन नगरांपैकी एक अयोध्येला हिंदू पौराणिक इतिहासात पवित्र्य सप्तपुरींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सप्तपुरींमध्ये अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांची, अवंतिका (उज्जयिनी) आणि द्वारका यांचा समावेश आहे.
रघुवंशीय अयोध्या
अयोध्या रघुवंशी राजांच्या कौशल जनपदाची फार जुनी राजधानी होती. वैवस्वत मनूचा मुलगा इक्ष्वाकू वंशजांनी या नगरीवर राज्य केले होते. या वंशात पुढे राजा हरिश्चंद्र, राजा भगीरथ, सगर आदींनंतर राजा दशरथ हे 63वे शासक होते. याच वंशातील श्रीरामांनी पुढे शासन केले होते. त्यांच्या पश्चात श्रीरामपुत्र कुशने हे नगर पुन्हा वसविले. कुशच्या पश्चात सूर्यवंशाच्या पुढील 44 पिढ्यांपर्यंत रघुवंशीयांनी शासन केले. महाभारतकाळात याच वंशातील बृहद्रथ, अभिमन्यूच्या हातून महाभारताच्या युद्धात ठार मारला गेला. बृहद्रथानंतर बर्याच काळापर्यंत ही नगरी आधी मगधच्या, मग कन्नोजच्या शासकांच्या आधिपत्याखाली राहिली. शेवटी येथे सैयद सालारने तुर्क शासनाची स्थापना केली. त्यानंतर अयोध्येसाठीचा संघर्ष सुरू झाला.
आज अयोध्यानगरी सर्वार्थाने प्रभू रामचंद्रांशी जोडली गेली आहे. अयोध्यानगरी श्रीरामांच्या जीवनकार्यासह महत्त्वाच्या अनेक घटना, राज्ये, युद्ध यांची साक्षीदार आहे. जी कोणी जिंकू शकत नाही, जी नष्ट होऊ शकत नाही आणि जिच्याशी युद्ध करू नये ती अयोध्यानगरी होय. विजयपताका फडकाविणार्या या नगरीने आता नवीन इतिहास रचला आहे. राम मंदिराच्या निमित्ताने अयोध्येच्या इतिहासाला दिलेला हा उजाळा!