सुनंदाताई पटवर्धन सामाजिक कार्याचा आदर्श वस्तुपाठ

विवेक मराठी    19-Jan-2024
Total Views |
@अरुण करमरकरठाणे जिल्ह्यातील वनवासीबहुल परिसर ज्या अनेक समाजसमर्पित व्यक्तिमत्त्वांच्या स्पर्शाने अभिमंत्रित झाला आहे, त्यांच्या सूचित अग्रमानांकनाच्या स्थानावर कोरले गेलेले एक नाव म्हणजे सुनंदाताई पटवर्धन. ‘प्रगती प्रतिष्ठान’ आणि ‘स्वयंसिद्धा’ यांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात, तसेच महिला सक्षमीकरणात मोलाचे योगदान दिले आहे.
rss
 
नंदाताईंनी इहलोकीची यात्रा कृतार्थ मनाने संपन्न केली आणि त्या दिव्ययात्रेला निघून गेल्या. शेवटचे चारच दिवस त्या अंथरुणावर राहिल्या. त्याआधी त्या निरंतर प्रसन्न वृत्तीने सर्व भवताल दरवळत राहिल्या होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा सौम्य धक्का येऊन गेला होता. त्यानंतरही अगदी अल्पावधीतच त्या सक्रिय झाल्या. रोज सकाळी दोन-अडीच किलोमीटरची फेरी एकटीनेच करण्याचा परिपाठ शेवटचे आठ-दहा दिवस वगळता अखंड सुरू होता. एवढेच काय, जव्हार-मोखाड्याच्या आपल्या कर्मभूमीतही पूर्ववत नियमित प्रवास करण्याचा हट्टही अगदी अलीकडच्या काळापर्यंत त्या पार पाडत होत्या.
 
 
ठाणे जिल्ह्यातील (आता पालघर जिल्ह्यात समाविष्ट झालेला) वनवासीबहुल परिसर ज्या अनेक समाजसमर्पित व्यक्तिमत्त्वांच्या स्पर्शाने अभिमंत्रित झाला आहे, त्यांच्या सूचित अग्रमानांकनाच्या स्थानावर कोरले गेलेले एक नाव म्हणजे सुनंदाताई पटवर्धन. वनवासी, जनजाती बांधवांच्या ‘सुनंदा वहिनी.’ कृष्णामाईच्या तीरावर वसलेले, ‘दक्षिणकाशी’ अशाही शब्दात वर्णन केले जाणारे वाई हे गाव सुनंदा वहिनींचे माहेर. नदीतीरावरील एक प्रशांत, निवांत स्थान म्हणजे वाई. एका सलग दगडातून घडविलेल्या मूर्तीचे, ढोल्या गणपतीचे तसेच विष्णू-लक्ष्मी, काशी विश्वनाथ, रोकडोबा हनुमान अशा प्राचीन मंदिरांनी व्यापलेले गाव म्हणून वाईला पुण्यक्षेत्र-उपासना क्षेत्राचेही महत्त्व प्राप्त झाले आहे. वेदांचे अध्ययन करणारी प्रज्ञा पाठशाळा, ‘मराठी विश्वकोश मंडळा’चे कार्यालय आदींमुळे या गावाला ज्ञानकेंद्राचीही परंपरा प्राप्त झाली आहे. अशा ज्ञानवंत, कर्तृत्वसंपन्न आणि श्रद्धावान वातावरणाचा वसा-वारसा जन्मतःच सुनंदाताईंना लाभला आणि पुढे आयुष्यभर त्यांनी तो जोपासला, वृद्धिंगत केला. अगदी तशीच माणूस या घटकाविषयीची आस्थाही त्यांना जणू जन्मजात लाभली होती. त्यामुळे ’जीवनछाया’मध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी केलेल्या आतिथ्यातून या आस्थेचा प्रत्यय येत असे. कोणी त्याला गृहिणीची कर्तव्यदक्षता म्हणेल, तर कोणी कुटुंबवत्सलता. मात्र, त्यांच्या ठायी असलेली आस्था या सर्व संकल्पनांच्याही पलीकडेच जाणारी होती. त्यामुळेच वनवासी बांधवांच्या संदर्भात त्यांच्या या आस्थेवाईकपणाने सामाजिक व्याप्ती सहजपणे प्राप्त केली.
 

rss 
 
वसंतराव पटवर्धन यांनी 1970च्या दशकातच सुरू केलेल्या ’प्रगती प्रतिष्ठान’च्या कामात सुनंदाताई सहजपणे आणि अतिशय तन्मयतेने सहभागी झाल्या, त्या या अंतरीच्या आस्थेपोटीच. त्याच्याही आधी ठाण्यातल्या कब्रस्तानजवळच्या वस्तीमधील बांधवांची दैनंदिन जीवनात होत असलेली अवहेलना निवारण्यासाठी त्या शब्दशः पदर खोचून सरसावल्या. सरकारी निर्णयप्रक्रियेतल्या सगळ्या किचकट बाबींच्या गाठी सहजपणे सोडवून त्या वस्तीचे सर्वांगीण उन्नयन त्यांनी घडवून आणले. ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या, विशेषतः दुर्बल गटातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या कामातही त्या तितक्याच तन्मयतेने सहभागी झाल्या. साधी साडी नेसून, सायकलवर बसून जिल्हाधिकारी, आयुक्त, सिव्हिल सर्जन अशा उच्चपदस्थांना थेट जाऊन भेटणार्‍या, आपल्या आर्जवी परंतु निग्रही संपर्काच्या बळावर त्या सर्वांना अचंबित करून प्रभावित करणार्‍या सुनंदा पटवर्धन यांचे रूप त्या 50 वर्षांपूर्वीच्या काळात ठाणेकरांच्या दृष्टीला विलक्षण भासे. ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी मोखाडा, जव्हार परिसरात जे काम उभे केले, ते व्यक्ती आणि परिवारजीवनाच्या सर्व पैलूंना आधुनिक अद्ययावत स्वरूप देऊन समृद्ध करणारे. शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या सर्व क्षेत्रांत निरनिराळे अर्थपूर्ण उपक्रम सुरू करूनच सुनंदाताई थांबल्या नाहीत, तर त्या प्रत्येक उपक्रमाचे सातत्याने मूल्यवर्धन करीत राहिल्या. भाताची उत्पादक बीजे प्रसारित करणे आणि पर्यावरणपूरक भातशेती करण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाचा लाभ 12 हजार वनवासी शेतकर्‍यांपर्यंत ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी पोहोचवला. सकस भाजीपाला उत्पादनाद्वारे शेतकर्‍यांना मिळणार्‍या उत्पन्नात वृद्धी, कुपोषणावर मात तसेच, स्थिर आणि पर्याप्त उत्पन्न मिळू लागल्याने वनवासी बांधवांच्या स्थलांतराला प्रभावी आळा, असे बहुमुखी परिणाम साध्य झाले.
 
 
शेती समृद्ध करण्याच्या याकामी सुनंदा वहिनींच्या पुढाकाराने अतिशय डोळस आणि आधुनिक दृष्टिकोन अंगीकारला जाण्याचे एक ठळक उदाहरण म्हणजे शेतीच्या निमित्ताने येथील पाड्यांवर केला गेलेला सौरऊर्जेचा अंगीकार. शेताला पाणीपुरवठा करणार्‍या यंत्रणेपासून पाड्यांच्या वाटा प्रकाशाने उजळून टाकण्यापर्यंत विविध स्तरांवर सौरऊर्जेचे, सौरपॅनलच्या यंत्रणेचे जाळे सुनंदाताईंनी ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून निर्माण केले. जव्हार तालुक्यातल्या 16, तर शहापूर तालुक्यातल्या 14 पाड्यांवरच्या वाटा सौरदिव्यांनी उजळल्या.
 
 

rss
 
दूरवरून पाण्याचे हंडे डोक्यावरून वाहून आणणार्‍या ग्रामीण महिलांची चित्रे पाणीटंचाईच्या संदर्भात माध्यमांमधून बर्‍याच वेळेला झळकत असतात. सुनंदा वहिनी आदिवासी पाड्यांपर्यंत पाणी पोहोचवणारी ‘नळ पाणी योजना’ 110 पाड्यांवर आणून ते चित्रच पालटवून टाकले. पाणीपुरवठ्याच्या संदर्भात शेती तसेच घरगुती वापर या दोन्ही बाबतीत त्यांनी या भागात निर्माण केलेले चित्र अत्यंत आकर्षक तसेच आल्हाददायक आहे. या भागातील आठ बंधारे निकामी आणि नादुरुस्त झाल्याच्या अवस्थेत पडून होते, या आठही बंधार्‍यांचे पुनरुज्जीवन करण्यात येऊन शेताला त्यातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्याचबरोबर अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भूमिगत बंधार्‍यांची एक अभिनव योजना सुनंदा वहिनींनी कार्यान्वित केली. या नवीन तंत्राद्वारे नऊ भूमिगत बंधारे बांधले गेले. त्यामुळे जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील सुमारे 600 पाड्यांवरील विहिरींना वर्षभर पाणी राहू लागले. अर्थात, महिलांची अनावश्यक कष्टातून सुटका होण्याबरोबरच बारमाही शेती सुलभ होण्यात याची परिणती झाली. ‘बार्लोग इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ आशिया’, ‘सिंजेंटा इंडिया फाऊंडेशन’ यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थांकडून साहाय्यता मिळवणे, आधुनिक तंत्राचा अवलंब करण्याचा दृष्टिकोन वनवासी शेतकरी वर्गात रुजवणे, त्यासाठी जर्मन तसेच इस्रायली तंत्रांचा अभ्यास करण्यास त्याना प्रवृत्त करणे इत्यादींतून सुनंदाताईंच्या अद्ययावत दृष्टीची साक्ष मिळते.
 
 
 
‘प्रगती प्रतिष्ठान’चे वनवासी क्षेत्रातील शिक्षण प्रसाराच्या क्षेत्रामध्येही अत्यंत भरीव काम गेल्या 40-45 वर्षांत विकसित झालेले दिसते. 45 वर्षांपूर्वीच मोखाडा येथे विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्यात आले. यामुळे दुर्गम भागातील छोट्या-छोट्या पाड्यांवर राहणार्‍या मुलांसाठी शिक्षणाचा मार्ग प्रशस्त झाला. मोखाड्यातील ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालया’त ही मुले शिकू लागली. गेल्या दहा-बारा वर्षांपासून दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे प्रमाण 100 टक्के झालेे आहे. आतापर्यंत या वसतिगृहात राहून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आठशेच्या पार गेली आहे. हे सर्व माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत कर्तबगारी गाजवून स्थिर आणि समृद्ध जीवन जगत आहेत. 1985 साली जव्हार येथे कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा (निलेश मुर्डेश्वर कर्णबधीर विद्यालय) सुरू करण्यात आली. 14 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शाळेत आता दरवर्षी 60-65 मुले प्रवेश घेतात. दोन पूर्व प्राथमिक वर्ग आणि पहिली ते चौथीचे वर्ग शाळेत भरतात. डिजिटल श्रवणयंत्रे पुरवून या विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित आणि वृद्धिंगत होण्यास चालना दिली गेली. तसेच, पोषक आहार, आयुर्वेदिकऔषधे यांच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याची काळजी जागरूकपणे घेतली जाते. आतापर्यंत या निवासी शाळेत शिक्षणास प्रारंभ केलेले शंभरहून अधिक विद्यार्थी शेती, शेतीपूरक व्यवसाय, मूर्तिकाम, गवंडीकाम, वारली चित्रकला अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत आनंदाने जीवन जगत आहेत.
 
 
सुनंदाताई पटवर्धन यांच्या स्वभाव आणि प्रवृत्तीचा एक विशेष पैलू आवर्जून अधोरेखित केला पाहिजे. आदिवासी बांधवांविषयीची अत्यंत उत्कट आस्था त्यांच्या मनात होती, हे तर खरेच. मात्र, भावनेने ओथंबलेल्या शब्दांत ती प्रकट करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त करण्यावर त्यांचा भर असे. या दृष्टीने आवश्यक असलेला अनासक्त कर्मयोगाचा सहजभाव त्यांच्या वृत्तीत होता. ’अन्अटॅच्ड इनव्हॉल्वमेंट’ आणि ’अनइनव्हॉल्वड अटॅच्डमेंट’ यातील समतोल त्यांनी उत्तम रीतीने सांभाळला होता. तोच समतोल सांभाळत अतिशय शांतपणे त्यांनी जगाचा निरोप घेतला. जाण्यापूर्वी निरलस आणि सार्थक सामाजिक कार्याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आगामी पिढ्यांसमोर ठेवला आहे. त्याचा अनुसर करीत सामाजिक पर्यावरणाच्या निरामयतेसाठी आपापल्या परीने कार्यरत होणे, हीच सुनंदा पटवर्धन यांच्या स्मृतीना उचित आदरांजली ठरेल.
सुनंदाताईंच्या व्यापक सामाजिक कार्याची दखल घेणारे शासकीय तसेच सार्वजनिक, सामाजिक स्तरातील अनेक मानाचे पुरस्कार त्यांना स्वाभाविकपणे प्राप्त झाले.
@महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार
 @झी मराठी वाहिनीचा ‘उंच माझा झोका’ हा जीवनगौरव पुरस्कार
 @महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचा ‘बाया कर्वे पुरस्कार
 @रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा ‘अंत्योदय पुरस्कार’
 @नातू फाऊंडेशन पुणे: ग्रामीण सामाजिक कार्य विषयक पुरस्कार
 @वरोरा, चंद्रपूरच्या विद्यार्थी साहाय्यक समितीचा आदिवासी सेवा पुरस्कार
 @भगिनी मंच, कोल्हापूर तसेच तुळजाभवानी शिक्षण मंडळ, इस्लामपूर यांचे सामाजिक कार्य पुरस्कार असे, सामाजिक सेवेविषयीचे एकूण 24 पुरस्कार सुनंदाताई पटवर्धन यांना प्रदान करण्यात आले.