खानू सेंद्रिय शेतीचे गाव

विवेक मराठी    20-Jan-2024   
Total Views |

krushivivek
रत्नागिरी जिल्ह्यातील खानू हे सेंद्रिय शेती करणारे गाव म्हणून नावारूपाला आले आहे. गावात रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे याठिकाणी 100 टक्के सेंद्रिय/जैविक पद्धतीने शेती केली जाते. उत्पादित मालाची ’खानूखजाना’ या एकाच ब्रॅण्डखाली विक्रीही केली जाते. येथील शेतकर्‍यांना आपले कष्ट, बुद्धी व गुणवत्ताप्रधान उत्पादन पिकवल्याचे समाधान मिळत आहे. शिवाय ’घर तेथे कम्पोस्ट खत’ प्रकल्प व प्रत्येक घरासमोर शोषखड्डा उभारून ग्रामविकासात ही मोलाची भर घातली आहे.
रासायनिक शेतीच्याऐवजी सेंद्रिय/जैविक शेतीकडे आता शेतकर्‍यांचा कल हळूहळू का होईना वाढताना दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 25 किलोमीटर अंतरावरील खानू गाव हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. या गावातील शेतकर्‍यांनी 2016पासून सेंद्रिय शेतीची कास धरून त्या माध्यमातून लाखो रुपयांची बचतदेखील केली आहे. गावची एकूण लोकसंख्या 1,866 आहे, तर जमिनीचे एकूण क्षेत्र 998 हेक्टर आहे. आंबा, काजू, भात, नाचणी, काळी मिरी, कोकम, फणस, उडीदसह मिश्र शेती केली जाते. लाल व काळ्या रंगाच्या भाताची लागवड करणारे हे गाव म्हणून ओळखले जाते. पर्यावरणाच्या दृष्टीने गावात सुमारे 30 एकर क्षेत्रावर जैवविविधता उद्यान विकसित करण्यात आले आहे. वृक्षतोड होऊ नये, यासाठी जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावातील महिला व पुरुष 28 समूहाच्या माध्यमांतून एकत्रित आली आहेत. एकीच्या बळावर गावात सेंद्रिय शेतीची क्रांती घडवून आणली आहे. स्थानिक सेंद्रिय शेतीतज्ज्ञ व शेतकरी डॉ. संदीप कांबळे हे खानू गावचे शिल्पकार आहेत. कांबळे यांनी ’सेंद्रिय शेती’ क्षेत्रात विद्यावाचस्पती ही उच्च पदवी प्राप्त केली आहे. भाताच्या लाल व काळ्या रंगाच्या जाती त्यांनी विकसित केल्या आहेत. दूरदृष्टी व कायम नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा ध्यास बाळगलेल्या डॉ. कांबळे खानू गावच्या वाटचालीवर प्रकाश टाकताना म्हणाले, “ज्याने काळाची पावले ओळखली, त्याला जगाची ओळख झाली असे मानले जाते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे खानू गाव होय. 2014 पूर्वीची गोष्ट आहे. आमच्या गावात एका लेकीचा (माहेरवाशीण) कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. या घटनेमुळे ग्रामस्थ व ग्रामपंचायत तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष स्व. सुहास पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विषमुक्त शेती करण्याचा निर्णय घेतला. गावातील कोणताच शेतकरी आपल्या पिकांना रासायनिक खतांची, कीटकनाशकांची मात्रा देणार नाही, असा ग्रामस्थांनी ठराव केला. यास महिला सदस्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. सेंद्रिय शेती करताना पहिली तीन वर्षे शेतमालाचे उत्पन्न कमी येते. हा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी खानू गावच्या शेजारील पडीक जमीन लागवडीखाली आणून त्याठिकाणी रासायनिक खते वापरण्यास मुभा दिली. सेंद्रिय/जैविक शेतीला चळवळीला खर्‍या अर्थाने बळ दिले, आरिफ शाह व विकास पाटील या सजग कृषी अधिकार्‍यांनी. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली विषमुक्त शेतीचा रथ पुढे चालू ठेवला. दरम्यानच्या काळात जिल्हापरिषद व कृषी विभागाच्या सहकार्याने आमच्या गावात तीन दिवसांचे वैशिष्ट्यपूर्ण सेंद्रिय शेती कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात विविध राज्यांसह कोकणातील सहा जिल्ह्यांतील शेतकरी, तज्ज्ञ सहभागी झाले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमामुळे स्थानिक शेतकर्‍यांना शेतीविषयक नवीन ज्ञान मिळाले. या ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी शेतकर्‍यांनी विषमुक्त शेती करण्याचा चंग बांधला. अशाप्रकारे या कार्यक्रमात ’प्रथम जैविक ग्राम खानू’ असे गावाचे नामकरण करण्यात आले.”
 
krushivivek
 
गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना
 
खानू गावात मोठ्या संख्येने अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतकरी व उमेद अभियानांंतर्गत महिलांचे संघटन करून 28 गट तयार करण्यात आले. ‘इको फ्रेंडली फार्मर्स गटा’चे विश्वस्त डॉ.संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटात दर्जेदार सेंद्रिय शेती उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच सेंद्रिय शेती तंत्रज्ञानानुसार सेंद्रिय उत्पादनासाठी लागणार्‍या निविष्ठा तयार करण्यासाठी गटातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे जीवामृत दशपर्णी अर्क, गांडूळ खत, निंबोळी खत, निम अर्क इ. कृषी निविष्ठा गावातच उपलब्ध झाल्या. पहिल्या तीन वर्षांनंतर खानू गावाच्या जमिनीचा पोत (सेंद्रिय कर्ब 2 टक्के) कमालीचा सुधारला. सेंद्रिय शेतीमुळे गावात पशुधनाच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या गावात 500हून अधिक गाई, तर 50हून अधिक म्हशी आहेत. यामुळे शेतीला खते आणि दूधविक्रीतून शेतकर्‍यांच्या हाती आठवड्याला खेळते भांडवल उभे राहिले आहे. गावातील विविध कार्यकारी सोसायटीने शेतकर्‍यांना रासायनिक खते व कीटकनाशके वापरण्यास व बाहेरून खरेदी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे संपूर्ण गाव सेंद्रिय/जैविक शेतीच्या लागवडीखाली आले आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील ’समृद्धी ऑर्गेनिक फर्मचे’ प्रशांत मोरणकर यांच्या माध्यमातून गावातील सर्व शेतकर्‍यांच्या उत्पादनांचे सेंद्रिय प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे खानू गावातील सेंद्रिय शेतीमाल उत्पादनाचे मार्केटिंग करणे सुलभ झाले. डॉ.संदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली 2018साली ‘रत्नागिरी ऑर्गेनिक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना करण्यात आली आहे. कंपनीमार्फत गावातील शेतमालाची ग्राहकांना थेट विक्री केली जाते.


krushivivek 
 
 
एक गाव-एक ब्रॅण्ड (खानूखजाना)
 
काळा व लाल भाताची निर्मिती करणारे खानू हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. भाताचा रंग, चव आणि पोषणमूल्य वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यामुळे या भाताला ग्राहकांतून मोठी मागणी असते. या संदर्भात डॉ. संदीप कांबळे म्हणाले, “खानू गावांमध्ये भाताच्या अनेक पारंपरिक जाती होत्या. काळाच्या ओघात काही जाती नष्ट झाल्या. काळा आणि लाल भाताच्या तांदळासाठी खानूची ओळख झाली आहे. संशोधनातून व अभ्यासातून काळ्या भाताच्या दोन व लाल भाताच्या चार जाती पुढे आल्या आहेत. शिवाय ’मुडगा’, ’सर्वट’, ’तुर्ये’, ’काळभात’आणि ’काळेबयो’अशा सहा जाती निर्माण केल्या आहेत. या जातीचे भात 130-140दिवसांत परिपक्व होऊन काढणीला येते. खानू गावच्या पारंपरिक खजिन्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ’एक गाव-एक ब्रॅण्ड’ अंतर्गत गटामार्फत सेंद्रिय काळ्या व लाल भाताचे बीजोत्पादन ते सुधारित पद्धतीने लागवड असा कार्यक्रम आखला. याद्वारे भाताचे उत्पादन, प्रक्रिया ते विक्री अशी मूल्यवर्धित साखळी तयार केली. ”
 
’वाडाकोलम’, ’इंद्रायणी’ तांदळाप्रमाणे खानू गावचा काळा व लाल भाताचा ’खानूखजाना’ हा ब्रॅण्ड तयार केला.
 
पूर्वी आमच्या भाताला प्रतिकिलो 17 ते 18 रुपये दर मिळायचा. ‘खानूखजाना’ ब्रॅण्डमुळे हाच तांदूळ 35 ते 40 रुपयांनी विकू लागला. महिला गटामार्फत लाल व काळ्या रंगाचे तांदूळ, पोहे आणि चुरमुरे आदी मूल्यवर्धित पदार्थ करून बाजारपेठ काबीज केली. आज लाल भातास प्रतिकिलो 120 रुपये, तर काळ्या भाताला प्रतिकिलो 140 ते 300 रुपये दर मिळत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ’खानूखजाना’ ब्रॅण्डच्या उत्पादनाला ग्राहकांची पसंती मिळते.
 
 
संपर्क

krushivivek
 
डॉ.संदीप कांबळे, प्रवर्तक
खानू जि. रत्नागिरी
भ्रमणध्वनी : 9665249776
 
आमच्या गावच्या शेतीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मिश्र आधारित शेती होय. मिश्र शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी असल्याने दुप्पट उत्पन्न मिळू शकते. हे पीक कीड आणि रोगापासून संरक्षित आहे. त्यामुळे खानू गावचे शेतकरी भात शेतीच्या बांधावर (सहा इंच मध्ये) नाचणीच्या मध्ये कुळीथ, उडीद तसेच एक मीटरवर तूर अशी शेती करून एका कुटुंब वर्ष सहा महिने पुरेल इतके शेतमालाचे उत्पन्न घेते. याखेरीज काजू व आंबाच्या झाडावर काळी मिरी, दालचिनी आदी मसाले पीक घेतात. आंब्याच्या किंवा काजूच्या चार झाडांच्या मध्ये लिंबूचे उत्पादन घेतले जाते.
 
ग्रामविकासाचे उत्कृष्ट मॉडेल
 
खानू गावातील ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्नांतून गावाला सेंद्रिय शेतीचे मॉडेल विकसित करण्याबरोबरच ग्रामविकासाला नवे रूप दिले आहे. गावामध्ये 435 घरे आहेत. ‘महात्मा गांधी रोजगार हमी योजने’च्या माध्यमातून घर तिथे नॅडेप-कम्पोस्ट खत तसेच गांडूळ खत निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक घरातील ओला व सुका कचरा, परसबागेतील पालापाचोळा एकत्र करून कम्पोस्ट खत तयार केले जाते. तयार झालेले हे खत शेतकरी आपल्या जमिनीत खत म्हणून वापरतात. यासोबतच प्रत्येक घरासमोर शोषखड्डा बसविण्यात आला आहे. सांडपाणी परसबागेला वापरले जाते. परिणामी, गावात दुर्गंधीचे व डासांचे प्रमाण कमी झालेच, शिवाय आजारी पडणार्‍या नागरिकांची संख्या घटली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गावात एकही कर्करोग व क्षयरोगबाधित नाही. त्यामुळे खानू गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्य शासनाच्या ’कायाकल्प’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
’गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरूनी देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा’ असा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून रत्नागिरी जिल्ह्यातील खानू या छोट्याशा गावाने डोंगराएवढ्या उंचीचे कार्य केले आहे, ही छोटीशी गोष्ट अनेक गावांना प्रेरणा देणारी आहे.
 

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.