गोष्ट अक्षय संस्कृतीची

विवेक मराठी    29-Jan-2024
Total Views |
@शैलेंद्र कवाडे 
 भारतीय संस्कृती अभेद्य राहण्यामागे महत्त्वाची दोन कारणे आहेत- संस्कृतीच्या स्मृती भारतीय समाज वेगवेगळ्या माध्यमांतून जपते आणि स्मृती जपण्याची दुसरी पद्धत म्हणजे मंदिर आणि शिल्पकला. भारतीय मंदिरे ही निव्वळ प्रार्थनास्थळे नसतात, तर संस्कृतीचा कोरीव आरसा असतो. भारतीयांनी आपल्या देवतांना आपल्या स्वत:च्या आतमध्ये मुरवून घेतले आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ हे तत्त्व ते त्यांच्या व्यवहारांतून, लोककलांतून सादर करीत असतात. म्हणूनच भारतीय धर्म आणि संस्कृती परत परत पुनरुज्जीवित होत राहिली, राखेतून पुन्हा फुलत राहिली.

vivek
 
‘गेम ऑफ थ्रोन’ ह्या सिरीजमध्ये Three Eyed Raven ही एक कल्पना आहे. आपल्या हजारो डोळ्यांनी ही व्यक्ती जगात घडत असलेल्या सगळ्या घटना बघत असते. ती त्यांचा भाग नसते, पण ती एक निरीक्षक असते. जेव्हा आर्मी ऑफ डेड्स मानवाला संपवण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा ती खासकरून ह्या Three Eyed Ravenला संपवण्याचा प्रयत्न करते, कारण ती व्यक्ती म्हणजे मानवी वंशाचा जिवंत इतिहास असते, स्मृती असते. ती स्मृती संपली की जिवंत व मृत मानव यांत फरक राहणार नसतो.
मानवी समाजाची स्मृती एखाद्या धाग्यासारखी असते, कापसाचे अनेक तंतू एकत्र करून विणलेल्या धाग्यासारखी. ह्या धाग्याला आपण संस्कृतीही म्हणतो. तसा तर प्रत्येक काळातील प्रत्येक तंतू वेगळा, पण एकमेकांत विणलेला आणि म्हणूनच सलग, एक. जो समाज आपली स्मृती जतन करू शकतो, तोच आपली संस्कृती जतन करू शकतो. जगात फार कमी संस्कृतींना हा अखंड प्रवास जपता आला आहे, फार कमी लोकांना स्वत:ची स्मृती जपता आली आहे.
 
 
भारत हा अशा लोकांचा देश आहे, जिथे कमीत कमी पाच हजार वर्षांच्या सलग संस्कृतीचे पुरावे आहेत. नुसते पुरावेच नाहीत, तर त्या संस्कृतीच्या स्मृती आहेत. सिंधू संस्कृती संपली हा जो जुना प्रवाद होता, तो आता बर्‍यापैकी अमान्य ठरला आहे. राखीगढी आणि सिनौली हे दोन स्वल्पविराम सिंधू संस्कृतीला सलग वैदिक काळाशी जोडतात आणि घोडा आणि रथासह त्यांना हाकणारे लोक व वेद रचणारे लोकदेखील इथलेच होते, हे ठणकावून सांगतात. ते सगळे भारतीय होते हेही सांगतात.
 
 
अर्थातच ह्या कालचक्रात अनेक वंशांचे व मतांचे लोक भारतात आले. पर्शियन आले, ग्रीक आले, शक आले, हूणही आले. हळूहळू ह्या सगळ्या लोकांचे रक्त आणि त्यांच्या श्रद्धादेखील ह्या मातीत मिसळून गेल्या. ह्या संस्कृतीने त्यांना आपल्या पोटात घेतले. त्यांची आठवण जपली, पण वेगळेपणा विरघळवून टाकला.
 
 
मिलिंद किंवा मिनांडर नावाच्या बॅक्टरियन ग्रीक राजाची स्मृती भारतीयांनी अशीच जपली आहे. ह्या राजाने ज्ञानाच्या शोधात भारतभर प्रवास केला आणि शेवटी नागसेन नावाच्या बौद्धमतवादी पंडितांशी चर्चा करून त्याने बौद्धमत स्वीकारले. प्रश्नमंजुषा नावाच्या पाली भाषेतील नोंदीत ह्या राजा मिलिंदाची स्मृती जपली गेली. राजा मिलिंदला आज आपण भारतीय समजतो.
 
 
चौदाशे वर्षांपूर्वी अरबस्थानातील एका कोपर्‍यात इस्लाम नावाच्या धर्माची स्थापना झाली. विरळ लोकवस्तीच्या वाळवंटात इस्लाम वेगाने पसरला. तिथल्या देवतांची, धर्माची आणि त्या धर्माच्या गोष्टींचीही स्मृती त्याने पुसून टाकली. नंतर इस्लाम इराणमध्ये आला. खरे तर इराणी संस्कृती भारतीय संस्कृतीसारखीच जुनी. भारतीय आणि इराणी सांस्कृतिक विश्वात अगदी एकमेकांच्या बहिणी शोभाव्यात इतकी समानता. मात्र इस्लामच्या झपाट्यापुढे इराणच नव्हे, तर इराणी संस्कृतीही पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. एकेकाळी जगाच्या मोठ्या भागावर राज्य केलेली पर्शियन संस्कृती संपली.
 
vivek
 
 ‘अहं ब्रह्मास्मि’ हे तत्त्व भारतीयांनी वेदांमधून, लोककथांतून जागृत ठेवले.
 
मग इस्लाम भारतात आला. एका हातात पुस्तक आणि दुसर्‍या हातात तलवार घेऊन आला. भारतावर अरबी वंशाचे आणि इस्लामी धर्माचे आक्रमण सुरू झाले. भारताच्या सीमेवर असलेला, इराणचा शेजारी असलेला अफगाणिस्तान आणि त्याच्या वरचा मध्य आशिया हळूहळू पूर्णपणे इस्लामी झाला, मात्र ह्यालाही शे-दोनशे वर्षे लागली. अफगाणिस्तान अंकित झाल्यावर हळूहळू इस्लाम भारताच्या मुख्य भूमीवर पसरू लागला. तीन-चारशे वर्षे लढून पंजाब आणि उत्तर भारत इस्लामी झेंड्याखाली आला. तेराव्या शतकानंतर तर इस्लाम पूर्ण भारतभर पसरला. उणीपुरी पाचेकशे वर्षे सगळा भारत इस्लामी सत्तेखाली आणि दट्ट्याखाली होता.
 
 
पण तरीही भारतीय धर्म आणि भारतीय संस्कृती नष्ट झाली नाही. जे इस्लामला अरबस्थानात, पर्शियात जमले, ते भारतात जमले नाही. भारत आणि भारतीय संस्कृती टिकून राहिली. इस्लामने लढाया जिंकल्या, पण युद्ध अजूनही सुरू आहे. भारतीय धर्म आणि संस्कृती परत परत पुनरुज्जीवित होत राहिली, राखेतून पुन्हा फुलत राहिली.
 
 
हे का आणि कसे घडले?
 
 
संस्कृतीच्या आणि राजकारणाच्या कोणत्याही अभ्यासकापुढे हा मोठा प्रश्न आहे. इस्लाम भारतात का थबकला? हिंदू संस्कृती आणि धर्म का टिकला?
 
 
भारतीय समाजाची रचना, ग्रामाधारित अर्थव्यवस्था, बहुदैविक व बहुपंथी समाज अशी अनेक कारणे ह्या बाबतीत दिली जातात. माझ्या मते महत्त्वाची आणखी दोन कारणे आहेत, ज्यांची चर्चा शक्यतो होत नाही.
 
 
पहिले कारण म्हणजे भारतीय समाजाची आणि संस्कृतीची स्मृती आणि ती स्मृती जतन करण्याची एक विशिष्ट पद्धत. भारतीय समाज स्वत:च्या इतिहास लेखनाबद्दल आळशी आहे असे आपण बर्‍याचदा म्हणतो. माझ्या मते हे अर्धसत्य आहे. भारतीय समाज आपला इतिहास एका विशिष्ट पद्धतीने लिहायचा. ह्या इतिहासाला अनेकदा काव्याचे रूप दिले जायचे, अनेकदा त्यात कल्पनाविलास मिसळला जायचा. त्या इतिहासातील व्यक्तींचे दैवतीकरण केले जायचे. त्यांच्या गोष्टी लिहिल्या आणि सांगितल्या जायच्या. त्यातच तत्त्वज्ञान व धर्म विणून घेतला जायचा, रूढी निर्माण केल्या जायच्या, एका पिढीतून दुसर्‍या पिढीत पसरवल्या जायच्या. त्यात नीतितत्त्वांची, कर्तव्यांची, आदर्शांची पेरणी केली जायची. काळानुसार त्या कथेत नवीन उपकथानक यायचे. नवीन नायक आणि नायिका यायच्या, प्रसंग यायचे. आज आपण ज्याला महाकाव्यातील, धार्मिक ग्रंथातील प्रक्षिप्त भाग म्हणतो, तो खरे तर त्या साहित्यावर पडलेली काळाची सावली आहे. प्रक्षिप्त भाग आपल्याला त्या काळात काय घडत असेल ह्याची कल्पना देतो.
 
 
रामायण किंवा महाभारत ह्यासारखी महाकाव्य असोत की अठरा पुराणे आणि स्मृती असोत, त्यांच्यात एक इतिहास खुबीने मांडलेला आहे, जपलेला आहे. त्यावर कल्पनेचा जरासा वर्ख जरूर आहे, काव्याचा आणि चमत्कारांचा जरासा मुलामा नक्की आहे, पण त्याचे बीज मात्र खरे आहे. ते खरे आहे म्हणूनच जिवंत आहे.
 

vivek
 
दुसरे कारण म्हणजे स्मृती जपण्याची भारतीयांची आणखी एक पद्धत - मंदिर आणि शिल्पकला. भारतीय मंदिर हे निव्वळ प्रार्थनास्थळ नाही. तो संस्कृतीचा कोरीव आरसा असतो. समाजाच्या त्या काळातील समजुती, नजीकच्या इतिहासातील प्रतीकात्मक गोष्टी, बदलत गेलेली आराध्य दैवते आणि आदर्श पुरुष, उपासनेच्या बदललेल्या पद्धती, उन्नत आणि अवनत होत गेलेले सांस्कृतिक प्रवाह.. हे सगळे आपल्याला मंदिरातून कळू शकते. प्रत्येक मंदिर हे एक काव्य आहे, एक गोष्ट आहे, एक इतिहास आहे, त्याही पलीकडे मंदिर हे भारतीय समाजाच्या चिवट प्रतिकाराचे प्रतीक आहे.
 
 
इस्लामी आणि ख्रिश्चन आक्रमकांनी अनेक मंदिरे पाडली. उत्तर भारतातले तर एकही जुने मंदिर आज उभे नाही, जी काही आहेत ती सगळे अठराव्या शतकानंतर मराठ्यांनी मोगल सत्ता खिळखिळी केल्यावर बांधलेली आहेत.
 
 
मुस्लिमांनी पाडलेले पहिले मोठे मंदिर म्हणजे कदाचित मुलतानचे (मूलस्थानाचे) सूर्य मंदिर. ह्या मूलस्थानाची कहाणी मोठी दुर्दैवी आहे, पण तिच्यात एक धडाही आहे. मोहम्मद बिन कासीमने आठव्या शतकात मुलतान घेतले, मूर्ती फोडली, पण पुजार्‍यांनी त्याला खंडणी देऊन काही काळ मंदिर वाचवले. नंतर दुसर्‍या इस्लामी सुलतानांनी तेही पाडले. त्यानंतर मोरक्कन प्रवासी अल अद्रसी जेव्हा भारतात आला, तेव्हा हा भाग इस्लामी अमलाखाली होता. पण तो लिहितो की लोक अजूनही सूर्याच्या लाकडी प्रतिमेची पूजा करतात आणि जेव्हा आक्रमण होते, तेव्हा ती प्रतिमा घेऊन पळून जातात. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण अशा प्रकारची सूर्यपूजा थेट औरंगजेबाच्या काळापर्यंत तिथे चालू होती. शेवटी औरंगजेबाने ते छोटेसे मंदिर आणि तो छोटासा समूह संपवला. पूजा संपली आणि पाकिस्तान सुरू झाला. पन्नास वर्षांत संपूर्ण पर्शियन संस्कृती संपवणार्‍या इस्लामला एक मंदिर संपवायला हजार वर्षे लागली.
 
 
अयोध्येचे राम मंदिर अनेकदा पाडले गेले आणि अनेकदा बांधले गेले. सगळ्यात शेवटी जेव्हा ते पाडले आणि त्यावर मशीद बांधली, त्यानंतरही हिंदूंनी त्यावरचा दावा सोडला नाही, ती जागा सोडली नाही. औरंगजेबाने काशीचे बिंदुमाधव मंदिर पाडले, तेव्हा पुरोहितांनी तिथूनच जवळ एका लहानशा जागी परत देव स्थापला. काशी विश्वनाथ मंदिर नष्ट झाले, पण अहल्याबाईंनी त्या जागेच्या जितक्या जवळ शक्य होईल तितक्या जवळ परत ते मंदिर उभे केले. मथुरेचा इतिहास तर आणखीनच रोमांचक आहे. आपले देव आपल्या डोळ्याआड झाले, तरी भारतीय त्यांना विसरले नाहीत, त्यांचे देव त्या देवाचे मूळ स्थान त्यांच्या स्मृतीत सदैव राहिले.
 
 
त्याचबरोबर भारतीयांनी आपल्या देवतांना आपल्या स्वत:च्या आतमध्ये मुरवून घेतले. ’अहं ब्रह्मास्मि’ हे तत्त्व जगत त्यांनी नाचात, नाटकांत देवाच्या लीला मांडल्या. मंदिर पडले तरी देव संपले नाहीत. भाविकांना देव सतत भेटत राहिला. कधी रामलीलेत भेटला, कधी भजनात आणि कीर्तनात भेटला. घरात भेटला, तसेच लग्नाच्या मांडवात भेटला. आपण कधीही न पाहिलेली आणि कदाचित कधी पाहणे शक्यही नाही ती बलोचिस्थानमधली हिंगलाई माता आपल्याला कोळीगीतात भेटत राहिली. चीनच्या ताब्यात गेलेला कैलास पर्वत आपल्या आरतीमध्ये अमर होत गेला.
 
 
‘मी आहे’ हा विश्वास देवाने भक्तांना दिला आणि ‘आम्ही तुझे आहोत’ हा विश्वास भक्तांनीही देवाला दिला.
 
 
म्हणूनच भारतीयांनी मंदिरे बांधणे थांबवले नाही, ग्रंथ लिहिणे, काव्य शिकवणे, पुराण सांगणे थांबवले नाही. देवाला काव्यातून, गाण्यांतून, नाटकांतून मांडणे थांबवले नाही. इतिहास अलंकृत करून सांगणे थांबवले नाही. इतिहासातून चमत्काराची आणि चमत्कारातून नीतितत्त्वांची फारकत केली नाही. संपूर्ण खर्‍या पण निरस इतिहासाची जपणूक केली नाही.
 
 
भारतीयांनी इतिहास गोष्ट म्हणून सांगितला.
 
 
आणि गोष्ट हे मानवी समाजातील सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे. प्रत्येक धर्म ही एक गोष्ट आहे, नीती-अनीती, आदर्शवाद, राज्यव्यवस्था ह्या आपण एकमेकांना फुलवून सांगितलेल्या गोष्टी आहेत. गोष्टी आपल्या लक्षात राहतात, आपल्याला गोष्टी आवडतात. हळूहळू आपण गोष्टी जगतो. ज्याची गोष्ट जास्त इंटरेस्टिंग, जास्त कन्व्हिन्सिंग, ती जास्त ऐकली जाते, जास्त सांगितली जाते, जास्त टिकते.
 
 
भारतीय संस्कृती ही अशीच एक गोष्ट आहे.
 
 
दर पिढीत परत परत सांगितली गेलेली, अश्वत्थ वृक्षासारखी पारंब्यांतून फुलणारी, जिवंत आणि रसरशीत..
 
आपणही आपल्या पिढीचे कर्तव्य केले पाहिजे, ती गोष्ट परत एकदा सांगितली पाहिजे.