वास्तवाचा चिंतनशील शोध घेणारा साहित्यिक

विवेक मराठी    30-Jan-2024
Total Views |
@डॉ. वर्षा तोडमल कथा, कादंबरी, समीक्षा, ललित, अशा विविध साहित्यप्रकारांत डॉ. रवींद्र शोभणे यांनी सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, सांस्कृतिक, प्रांतीय स्थित्यंतरांची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. त्यांच्या लिखाणातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, त्यांची ग्रामीण जीवनाशी घट्ट नाळ जोडलेली आहे. त्यांच्या लिखाणात ग्रामीण जीवनातील कोवळे आणि अलवार अनुभव टिपण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे दारिद्य्र, शोषण, उपासमार याहीपेक्षा पार्थिव शरीराचे भोग, त्यामुळे वाट्याला येणारी असाहाय्य कुतरओढ आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक ताण यांचे संमिश्र चित्र ते रेखाटतात.
Amalner Marathi Sahitya Sammelan
 
मराठी कथेचा प्रवाह वाहता ठेवणार्‍या आणि त्याला आकार देणार्‍या आजच्या मोजक्या कथाकारांमध्ये डॉ. रवींद्र शोभणे यांचे नाव घ्यावे लागेल. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या कथा दोन स्तरांवर घडतात. एका स्तरावर त्या सामाजिक वळणाच्या कथा आहेत, तर दुसर्‍या स्तरावर त्या मानवी विकारवशतेचा आणि नात्याचा शोध घेताना दिसतात. काही कथांमधून ते लोककथेला साजेशा अद्भुताचा आश्रय घेताना दिसतात. अनेकविध विषयांवर लिहिते राहून त्यांनी बहुआयामी लेखक अशी प्रतिमा निर्माण केली आहे. डॉ. शोभणे यांनी कादंबर्‍यांतून आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविलेला आहे. विदर्भातील ग्रामीण वास्तवाचा वेध घेणारे एक लक्षणीय लेखक म्हणून डॉ. शोभणे चर्चिले गेले आहेत. कथा, कादंबरी, समीक्षा अशा सर्वच क्षेत्रांत डॉ. शोभणे यांनी महत्त्वपूर्ण भर घातली आहे. अनेक साहित्य प्रकारांच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे त्यांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत.
 
 
डॉ. रवींद्र शोभणेंच्या कादंबर्‍या, कथासंग्रह ग्रामीण नाळेशी जुळलेले आहेत. ग्रामीण जीवनातील कोवळे आणि अलवार अनुभव टिपण्याचा छंद या लेखकाच्या लेखणीला आहे, हे प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे दारिद्य्र, शोषण, उपासमार याहीपेक्षा पार्थिव शरीराचे भोग, त्यामुळे वाट्याला येणारी असाहाय्य कुतरओढ आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक ताण यांचे संमिश्र चित्र ते रेखाटतात.
 
 
वास्तवाचे भान ठेवत सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्वच स्थित्यंतरांची वैशिष्ट्ये डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपल्या कथा-कादंबरी या साहित्यप्रकारांमधून जपली आहेत. सामाजिक परिवर्तनांचे ग्रामीण व नागरी समाजजीवनावर होणारे चांगले व वाईट परिणाम टिपत कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत आकारास आलेल्या त्यांच्या साहित्यनिर्मितीने आपले वेगळेपण जपले आहे. कथा, कादंबरी, समीक्षा, ललित, अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन करणारे डॉ. रवींद्र शोभणे सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, सांस्कृतिक, प्रांतीय स्थित्यंतरांचा जाणीवपूर्वक अभ्यास करीत, परिस्थितीचे डोळसपणे अवलोकन करीत लेखक म्हणून घडत गेले आणि 1983मध्ये ‘प्रवाह’ ही त्यांची पहिली कादंबरी आली. लेखक समाजाकडे कसा पाहतो, समाजातील समस्यांचे आकलन करून घेऊन त्याचे प्रतिबिंब तो आपल्या लेखनातून कसे साकार करतो, ते शोभणे यांच्या कादंबरी प्रवासावरून लक्षात येऊ शकते.
 
 
डॉ. रवींद्र शोभणे त्यांच्या लेखनाचे काही उल्लेख म्हणजे ’कोंडी’. 1992मध्ये प्रकाशित झालेल्या ‘कोंडी’ या कादंबरीने त्यांना खर्‍या अर्थाने कादंबरीकार म्हणून लौकिक मिळवून दिला. वैदर्भीय प्रादेशिकतेची वैशिष्ट्ये, वैदर्भीय बोली भाषा, तेथील व्यक्तिमत्त्वे, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचा सांस्कृतिक वारसा, त्यांचे राजकीय डावपेच या सर्वांचे वास्तव चित्रण करीत त्यांनी विलक्षण ताकदीने ‘कोंडी’चे कथानक उभे केलेले आहे. त्यांच्या या कादंबरीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
 
 
1975 ते 1984 या कालखंडातील महाराष्ट्रीय, तसेच भारतीय समाजजीवनातील र्‍हासपर्वाचे, विविध राजकीय पक्ष-संघटनांचे, आणीबाणीनंतरच्या राजकीय जीवनाचे असे बहुकेंद्री पडसाद ‘पडघम’ या महाकादंबरीमध्ये उमटलेले आहेत, तर ‘सव्वीस दिवस’सारख्या स्वानुभव कथनात्मक लघुकादंबरी लिहिणार्‍या डॉ. रवींद्र शोभणेंच्या लेखणीतून ‘उत्तरायण’ ही महाभारतावर आधारित बृहद् कादंबरीही आकारास आली आहे. त्यांच्या घरी असलेल्या वारकरी संप्रदायाच्या वातावरणातून ते महाभारताकडे आकर्षित झाले. त्यातूनच त्यांनी ‘उत्तरायण’ ही दैवी चमत्कार, योगायोग यांना फाटा देत मानवी पातळीवरचे चित्रण करणारी कादंबरी लिहिली.
 
Amalner Marathi Sahitya Sammelan
 
वर्तमान, चंद्रोत्सव, चिरेबंद, दाही दिशा, महाभारताचा मूल्यवेध, मराठी कविता - परंपरा आणि दर्शन, संदर्भासह, अनंत जन्मांची गोष्ट (अनुवादित, मूळ हिंदी लेखक विश्वनाथ प्रसाद तिवारी), अदृश्याच्या वाटा (कथासंग्रह), अश्वमेघ, उत्तरायण (महाभारताची मानवी पातळीवर मांडणी करणारी कादंबरी), ऐशा चौफेर टापूत (ललित बंध), ओल्या पापाचे फुत्कार (कथासंग्रह), कादंबरीकार श्री.ना. पेंडसे (समीक्षाग्रंथ), गोत्र, चंद्रोत्सव (कथासंग्रह), चिरेबंद, जागतिकीकरण, समाज आणि मराठी साहित्य (साहित्य आणि समीक्षा), तद्भव (कादंबरी), त्रिमिती (साहित्य आणि समीक्षा), दाही दिशा (कथासंग्रह), पडघम (कादंबरी), पांढरे हत्ती, प्रवाह (कादंबरी), मराठी कविता: परंपरा आणि दर्शन (संपादित), मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा (साहित्य आणि समीक्षा), महत्तम साधारण विभाजक (कादंबरी), महाभारत आणि मराठी कादंबरी, महाभारताचा मूल्यवेध, रक्तध्रुव (कादंबरी), वर्तमान (कथासंग्रह), शहामृग (कथासंग्रह), सत्त्वशोधाच्या दिशा (कादंबरी), संदर्भासह (साहित्य आणि समीक्षा), सव्वीस दिवस (कादंबरी) ही त्यांच्या विचारातून प्रकटलेली साहित्यशिदोरी आहे.
 
 
’पडघम’, ‘अश्वमेध’ आणि ‘होळी’ या त्यांच्या तीन कादंबर्‍यांमधून 1975 ते 2000 या मोठ्या कालखंडाचे चित्रण दिसते. ही मराठीतील सर्वाधिक पृष्ठसंख्येची कादंबरी त्रयी आहे.
 
 
मात्र कादंबरीकार म्हणून डॉ. शोभणे यांची ओळख निर्माण झाली, ती त्यांच्या ‘कोंडी’ या कादंबरीमुळेच. या कादंबरीतून 1975नंतरची बदलती ग्रामीण पार्श्वभूमी अत्यंत प्रत्ययकारकरित्या साकारलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात गावात टिकून असलेली पारंपरिक व्यवस्था, लोकशाही व्यवस्थेचे विकृतीकरण, जागतिकीकरणाचा गावागावावर झालेला परिणाम, त्यातून निर्माण होणार्‍या समस्या, बदलत जाणारी मानसिकता याचे चित्रण डॉ. शोभणे यांनी या कादंबरीत नेमकेपणाने केले आहे. विदर्भातील खेडेगावच्या वास्तव परिस्थितीचे चित्रण साकारताना खेड्याची ढासळत जाणारी प्रतिमा त्यांनी प्रभावीपणे अधोरेखित केली आहे. या कादंबरीतून साकारलेली पात्रे त्या त्या गावातील माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. मोडकळीस आलेली कुटुंबव्यवस्था, सत्ता, संपत्ती आणि दहशत यांच्या माध्यमातून गावात निर्माण होणार्‍या राजकारणाचे, शेतमजुरांचे प्रभावी चित्रण ही कादंबरी करते. शहरी आणि पाश्चात्त्य संस्कृतीचे ग्रामीण जीवनावर होणारे परिणाम, त्यातून ग्रामीण माणसांचे बदलत जाणारे जगणे आणि शाळा, महाविद्यालये, दवाखाने इत्यादी बाबतीत खेड्यातील जीवनमान कसे बदलत चालले आहे, हे सगळे ‘कोंडी’त आले आहे.
 
 
‘रक्तध्रुव’ कादंबरीच्या कथानकात मानवी जीवन एखाद्या कॅनव्हाससारखे वापरले आहे. एका विलक्षण मानसिक कोंडीतून मानसिक उद्रेकातून जाणार्‍या माणसाचा प्रवास रेखाटणारी ही कादंबरी. या कादंबरीवर अनेक अभ्यासकांनी मतमतांतरे व्यक्त केली आहेत.
 
 
‘कोंडी’ आणि ‘पांढर’ या कादंबर्‍यांमधून त्यांनी ग्रामीण जीवन पूर्ण ताकदीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण जीवनातील कोवळे आणि अलवार अनुभव टिपण्याचा छंद त्यांच्या लेखणीला दिसतो. गाव हा त्यांच्या लेखणीचा आत्मा आहे असे दिसते. जीवन वास्तवाचा सखोल आणि चिंतनशील पातळीवरील अव्याहत शोध हा त्यांच्या लेखनाचा मूलधर्म सांगता येईल. समीक्षक म्हणूनही त्यांचा आवाका खोल आहे. आशयसूत्रांना धक्का न पोहोचता सांभाळलेली संवेदनक्षमता त्यांच्या समीक्षात्मक लेखनातून दिसते.
 
 
डॉ. शोभणे संवेदनशील लेखक म्हणून आपल्या परिसरातल्या वास्तवाने हेलावून जातात, तेव्हा त्यांच्या लेखणीतून ‘पांढर’सारखी कादंबरी उतरते. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच ग्लोबलायझेशनमुळे प्रगतीचा मुखवटा बेसूर असल्याची जाणीव झाली आणि कृषिव्यवस्थेला त्याची झळ लागली. भुईचेही सर्जनशीलत्व नष्ट होऊ लागले. कृषिवलांची ही अगतिकता आणि सुन्न करणारे हे वास्तव ‘पांढर’मधून मांडताना लेखक हळवा होतो. तेव्हा लक्षात येते की लेखकाची नाळ अजूनही गावाशी जोडलेली आहे.
 
 
‘पांढर’ ही कादंबरी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उभी राहिलेली कादंबरी आहे. पांढर कादंबरीतून दुष्काळाने गावची झालेली वाताहत आणि त्यामुळे मानवी जीवन कशा पद्धतीने उद्ध्वस्त होत गेले, याचे दर्शन या कादंबरीतून घडते. विदर्भात सातत्याने दुष्काळामुळे होत जाणारी ग्रामीण माणसांची होरपळ हा काही नवीन विषय नाही. परंतु दुष्काळ हा किती भयावह असू शकतो आणि त्यामुळे मानवी समाज कशा पद्धतीने विस्थापित होऊन जातो, हे डॉ. शोभणे यांनी या कादंबरीतून उभे केले आहे. या कादंबरीत जी समस्या अधोरेखित केली आहे, ती सातत्याने पाऊस न पडल्यामुळे दुष्काळाचे संकट गावावर ओढवते. दुबार पेरणी करूनही वाया जाते. सारेच गावकरी हवालदिल होतात. हळूहळू शेतीबरोबरच पिण्यासाठी पाणी मिळणेही दुरापास्त होऊन जाते आणि माणसे जगायला म्हणून बाहेर पडतात. गावात शेती उरत नाही, शेतमजूर नाही, प्यायला पाणी नाही अशा अवस्थेत जगणेच अशक्य होऊन बसते. तेव्हा एक-एक करून माणसे गाव सोडून जातात आणि बघता बघता गाव उजाड होऊन जाते. कादंबरीला समजून घेणारा वाचकही या कादंबरीतील कथानकाबरोबर मनानेही उजाड होत जातो.
 
 
अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये डॉ. शोभणे यांच्या कथासंग्रहातील कथा समाविष्ट केलेल्या आहेत. ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा म्हणजे ‘डोह’. या कथेला दिलेले ’डोह’ हे शीर्षक मोठे अर्थपूर्ण आहे. डोहामध्ये पाणी गोल फिरत कुणी सापडले तर त्याला बुडवून टाकत असते. त्याचप्रमाणे डोहासारखेच माणसाचे मनही असते. मनात जर कोणत्याही प्रकारचे विचार पुन: पुन्हा निर्माण होऊ लागले की, ते मनाचा ताबा घेतात. फिरून फिरून तेच विचार मनात येत राहतात. त्याचा एक भोवरा बनतो. मग माणसाचा सत्याशी, वास्तवाशी संबंध तुटतो. जे नाही आहे, तेच त्याला खरे वाटू लागते आणि या विचारचक्रात किंवा विचारांच्या डोहात तो गटांगळ्या खात राहतो. तसेच डोहाच्या खोलीचा जसा थांग लागत नाही, तसाच मनाच्या खोलीचाही थांगपत्ता लागत नाही. वाईट विचार कथानायकाच्या मनाचा पूर्ण ताबा घेतात. त्या भावनांवर तो नियंत्रण ठेवू शकत नाही व हे वाईट विचारच त्याचा अंत घडवून आणतात, म्हणून मानवी मनाचे प्रतीक म्हणून कथेला ’डोह’ हे शीर्षक दिले असावे, असे वाटते. अर्थपूर्ण शब्दरचना, ओघवती व प्रवाही अशी भाषाशैली, तृतीयपुरुषी निवेदनतंत्र, निवेदनासाठी प्रमाण मराठी, तर मदारी, त्याची आई, सरपंच या पात्रांच्या तोंडीच्या संवादासाठी बोलीभाषा या पात्राच्या तोंडी दोन-तीन वाक्ये आलेली आहेत, त्यासाठी प्रमाण बोलीचा वापर अशा पद्धतीने ही कथा साकारलेली आहे.
 
 
गोत्र म्हणून एक व्यक्तिचित्रसमूहदेखील प्रदर्शित झाला आहे. कादंबरीकार श्री.ना. पेंडसे, सत्त्वशोधाच्या दिशा, संदर्भासह, महाभारत आणि मराठी कादंबरी, त्रिमिती, साक्षेप असे त्यांच्या अनेक समीक्षात्मक वैचारिक प्रकाशित झाले आहेत. काही ग्रंथांचे संपादनसुद्धा त्यांनी केले आहे. मराठी कविता : परंपरा आणि दर्शन व जागतिकीकरण, समाज आणि मराठी साहित्य असे अनेक विषय त्यांनी मांडले आहेत. त्यांनी ‘अनंत जन्मांची गोष्ट’ हा विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या हिंदी कवितांचा अनुवाद केला आहे, तसेच ‘सॉक्रेटिस कधी मरत नसतो’ हा माधव कौशिक हिंदी कथांचा अनुवाद त्यांचा प्रकाशित झाला आहे. त्याबरोबरच त्यांच्या 5 पुस्तकांचा अनुवादही इतर भाषांमध्ये झाला आहे.
 
 
1990नंतरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय मूल्यांची आणि परिस्थितीची झालेली पडझड आणि त्यातून संवेदनशील मनाची झालेली अभिव्यक्ती या प्रवासात डॉ. रवींद्र शोभणे यांचे स्थान महत्त्वाचे आहे.