ग्रंथालयांची समृद्ध परंपरा

विवेक मराठी    30-Jan-2024
Total Views |

Libraries  Khandesh
 
@प्रा. प्रकाश धर्माधिकारी  9822091923
 
गेल्या शतकभरात मराठी साहित्यात सौंदर्यवाद, वास्तववाद, निसर्गवाद, प्रतीकवाद, मार्क्सवाद, रचनावाद या साहित्यिक चळवळी फोफावल्या, त्याचे पडसाद खान्देशातील साहित्यिकांच्या लिखाणात उमटले आहेत. खान्देशचा एक पाय केळीच्या व कपाशीच्या शेतात, तर त्याचा दुसरा पाय काव्याच्या खुंटीला बांधलेला असतो. आज खान्देशात 150 वर्षे पूर्ण केलेली सात ग्रंथालये असून प्रत्येक ग्रंथालयाची 50,000 ग्रंथसंपदा आहे. ज्या काळात देशाच्या कानाकोपर्‍यात ज्ञानाची पहाट झालेली नव्हती, त्या काळात या ग्रंथालयांनी नवनव्या साहित्यिक चळवळींची नोंद घेतली. साहित्यातील नवे प्रवाह अभ्यासकांसमोर ठेवले. खान्देशच्या साहित्यिकांच्या स्वप्नांच्या माळा ओघळल्या असून ‘अजुनी येतो वास काव्यफुलांचा!’
‘खान्देशातील साहित्यिक चळवळ लोप पावते आहे का?’ असा खोचक उपरोधात्मक प्रश्न विचारला जातो, त्याला सरळ आणि त्वेषपूर्ण उत्तर नकारार्थी आहे. 1952 साली अंमळनेरला प्रा. कृ.पां. कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली, 1984 साली जळगावला शंकरराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि आता 2024मध्ये पुन्हा अंमळनेरला प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली होणारे अ.भा. मराठी साहित्य संमेलन हे ठोस पुरावे हेच दर्शवितात की खान्देशने साहित्यिक चळवळ हिरिरीने सुरू ठेवून रसिकांची अभिरुची संपन्न केली.
 
आज खान्देशात 150 वर्षे पूर्ण केलेली सात ग्रंथालये असून प्रत्येक ग्रंथालयाची 50,000 ग्रंथसंपदा आहे. त्यात कथा, कादंबरी, काव्य, नाटक, प्रवासवर्णन, याशिवाय अध्यात्म, समीक्षा, शास्त्रीय लिखाणाला वाहिलेले ग्रंथ उपलब्ध आहेत. हीच खान्देशची साहित्यिक श्रीमंती. अंमळनेरचे पू. साने गुरुजी ग्रंथालय (स्थापना 1871), जळगावचे व.वा. वाचनालय (स्थापना 1877), नंदुरबारचे लोकमान्य टिळक वाचनालय (स्थापना 1883), चोपड्याचे नगर वाचनमंदिर (स्थापना 1885), प्रताप तत्त्वज्ञान केंद्र (स्थापना 1916), चाळीसगावचे शेठ ना.बं. वाचनालय (स्थापना 1906) आणि धुळ्याचे का.स. वाणी प्रगत अभ्यास केंद्र यांचे साहित्यिक योगदान मोलाचे आहे. या ग्रंथालयांनी दर वर्षी प्रतिभावान साहित्यिकांना आमंत्रित करून साहित्यरसिकांचे प्रबोधन केले. नवसमीक्षेवर चर्चा घडवून आणली. ज्या काळात देशाच्या कानाकोपर्‍यात ज्ञानाची पहाट झालेली नव्हती, त्या काळात या ग्रंथालयांनी नवनव्या साहित्यिक चळवळींची नोंद घेतली. साहित्यातील नवे प्रवाह अभ्यासकांसमोर ठेवले.
 
 
Libraries  Khandesh
 
गेल्या 100 वर्षांत मराठी साहित्यात सौंदर्यवाद, वास्तववाद, निसर्गवाद, प्रतीकवाद, मार्क्सवाद, रचनावाद या साहित्यिक चळवळी फोफावल्या, त्याचे पडसाद खान्देशातील साहित्यिकांच्या लिखाणात उमटणे साहजिक होते. अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये अध्यापनाचे कार्य करणार्‍या कवी माधव ज्युलियन यांनी सौंदर्यवादाचा रस्ता धरला. धरणगावचे बालकवी ठोंबरे यांनी निसर्गवाद स्वीकारला. साने गुरुजींनी समतावादी चळवळीत राहून शोषित-वंचितांचे प्रश्न पुढे मांडले. बहाद्दरपूरला नोकरी करणारे कवी बा.सी. मर्ढेकर प्रतीकवादाच्या कडेने प्रवास करीत राहिले. भडगावला राहणारे कवी केशवसुत यांनी नवक्रांतीची तुतारी वाजवून परिवर्तनाची नांदी गायली. बहिणाबाईंनी ग्रामीण भागातील शेतातील अनुभव लेखणीद्वारे संपन्न केले.
 
पळासखेड्याच्या ना.धों. महानोरांनी सुगम भाषेत रानातील कविता गायल्या. राजधानीपासून दूर राहून हे साहित्यिक नावारूपाला आले ते त्यांच्या वाङ्मयीन कलाकृतींनी! या साहित्यिकांनी खान्देशात साहित्यिक चळवळींची ज्योत पेटती ठेवली. एकदा राम शेवाळकर अंमळनेरला आले असताना ’कविता-रती’ या द्वैमासिकाचे संपादक पुरुषोत्तम पाटील यांनी “खान्देशच्या साहित्यिकांकडे दुर्लक्ष केले जाते” अशी तक्रार केली होती. तेव्हा राम शेवाळकर यांनी उत्तर दिले होते की “ज्यांना प्रतिभेचा साक्षात्कार झालेला नाही, अशांची चिंता करण्याचे कारण नाही.”
 
 
या झाल्या खान्देशातील जुन्या साहित्यिक चळवळी. आता गेल्या पंचवीस वर्षांत खान्देशात नऊ तालुक्यांत पुण्यातील मसापच्या आपल्या शाखा सुरू केल्या. खान्देशातील मसापने युवा नाट्य संमेलन, समीक्षा संमेलन, शाखा मेळावा, मराठी साहित्य परीक्षा, संतसाहित्य संमेलन यांचे आणि विविध विषयांवर व्याख्यानमालांचे आयोजन केले. खान्देशातील साक्षरतेची पाहणी केली. त्या पाहणीत असे दिसून आले की खान्देशात साक्षरतेचे प्रमाण 78% आहे. मसापने नवकवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ’अंकुर’ आणि ’अभिरुची’ या मंडळांनी वाङ्मयीन नियतकालिकांचा डोलारा सांभाळला. त्यांनी आणि मसापने साहित्यिकांच्या मुलाखती घेऊन प्रकाशित केल्या. परीक्षण लेख प्रकाशित केले. समीक्षा लेखांची जंत्री तयार केली. अंमळनेरच्या साने गुरुजी ग्रंथालयाने नामवंत वक्त्यांना आमंत्रित करून नवसाहित्याचा परामर्श घेतला. चोपड्याच्या एकलव्य वाचक मंडळानेसुद्धा साहित्य संस्काराचा वसा जपला.
 

Libraries  Khandesh 
 
तथापि 97व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची जबाबदारी ज्या मराठी वाङ्मय मंडळाने घेतली आहे, त्याने 72 वर्षांत अंमळनेरसारख्या आडवळणाच्या लहान गावी दोन साहित्य संमेलनाचे प्रपंच मांडले, ही उल्लेखनीय गोष्ट होय. म.वा. मंडळाचे वर्षभर साहित्यिक उपक्रम सुरू असतात. 35व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला अनेक विद्वान साहित्यिक उपस्थित होते. त्यात ना.सी. फडके आणि आचार्य अत्रे यांनी ‘कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला’ यावर हिरिरीने आपली मते मांडली. 35व्या आणि 97व्या साहित्य संमेलनाची धुरा म.वा. मंडळावर आहे. साहित्य संमेलन राजकीय वादंगापासून दूर असावे, अशी म.वा. मंडळाची भूमिका आहे. हे मंडळ वर्षभर वाङ्मयाचे दर्शन घडेल असे कार्यक्रम आयोजित करते. त्यात संगीत, नाट्य, नृत्य या कलांनाही स्थान देण्यात येते. 35व्या साहित्य संमेलनात मधू लिमये यांच्या सुविद्य पत्नी चंपावती लिमये यांनी आणि इतर अनेक महिलांनी सक्रिय भाग घेतला होता. ग्वाल्हेरपासून बेळगावपर्यंतचे साहित्यिक आले होते. महाराष्ट्रातून साहित्यिक येणार म्हणून मिलचे मालक आणि संमेलनाचे उद्घाटक दानशूर प्रतापशेठजींनी पाहुण्यांसाठी नव्या 500 गाद्या पाठविल्या होत्या.
 
अध्यक्ष कृ.पां. कुळकर्णी म्हणाले होते, “पंढरीचा देव अंमळनेरला आला। भक्तीला लुब्ध झाला पांडुरंग।”
 
याच म.वा. मंडळाला अ‍ॅड. रावसाहेब नांदेडकर यांनी इमारतीसाठी जागा दान दिली. नंतर प्रा. र.का. केले स्मृतिप्रीत्यर्थ केले कुटुंबीयांनी मंडळाला ग्रंथालय निर्मितीसाठी पाच लाख रुपये देणगी दिली होती. वाढत्या वयाबरोबर संस्था तरुण होत गेली.
गेल्या 75 वर्षांत म.वा. मंडळाला साने गुरुजी, प्र.के. अत्रे, ना.सी. फडके, बाबासाहेब पुरंदरे, मंगेश पाडगावकर, सोनोपंत दांडेकर, कवी बा.भ. बोरकर, शांता शेळके, पु.भा. भावे, अनंत काणेकर, वसंत कानेटकर, राम शेवाळकर, नरहर कुरुंदकर, मधू लिमये, संत तुकडोजी महाराज, प्रभाकर पणशीकर या आणि इतर अनेक नामवंत साहित्यिकांनी भेटी दिल्या, विचार दिले. म.वा. मंडळाला समृद्ध वारसा लाभला आहे. या मंडळाच्या माध्यमातून श्रोत्यांना अभिनेते, कवी, लेखक, नाटककार, विचारवंत ऐकायला मिळाले, पाहायला मिळाले. या मंडळाने साहित्य शिल्प घासूनपुसून चकचकीत ठेवले.
 
खान्देश साधाभोळा आहे. साहित्याच्या आनंदाने तो बेहोश होतो. त्यामुळे महाराष्ट्राची शब्दगंधा त्याला बाहूत घेणार नाही, हे शक्य नाही. खान्देशचा एक पाय केळीच्या व कपाशीच्या शेतात, तर त्याचा दुसरा पाय काव्याच्या खुंटीला बांधलेला असतो. खान्देशात ललित कला लोप पावत आहेत असे म्हणणे म्हणजे साहित्यिक चळवळींना नाउमेद करणे होय. कमी खर्चात खान्देश बघायचा असेल तर गिरणा नदीच्या पाण्यात पाय सोडून बसलेले केशवसुत, बोरी नदीवरून येणारा रानवारा अनुभवणारे माधव ज्युलियन आणि गणेश कुडे, भा.ज. कविमंडन वाचायला हवेत. या नद्यांच्या काठी आणि सातपुड्याच्या माळरानावर खान्देशच्या साहित्यिकांच्या स्वप्नांच्या माळा ओघळल्या असून ‘अजुनी येतो वास काव्यफुलांचा!’