भाषा, साहित्य आणि कलेसाठी भूमिका घ्यायला शिकवणारे संमेलन

31 Jan 2024 14:37:53
@ममता क्षेमकल्याणी
विवेक साहित्य मंच, विवेक व्यासपीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विदिशा विचार मंच, विवेक समूह, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि शिक्षण विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी पुण्यात ‘नुक्कड साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आलं होतं. 13 तारखेला मोठ्यांसाठी, तर 14 तारखेला बच्चे कंपनीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या संमेलनाने वाचकांना, श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना नेमकं काय दिलं, त्याविषयी..

sahity
 
साहित्य, नाट्य, संगीत या त्रिसूत्रीचा आविष्कार असलेला कलाप्रकार म्हणजे ’नुक्कड’. पुण्यात विक्रम भागवत यांनी गुंफलेला ’नुक्कड’ कथाविश्वाचा गोफ आज विवेक साहित्य मंचच्या पुढाकारातून वर्षभरात अनेक उपक्रम राबवत असतो. नुक्कड साहित्य संमेलन म्हणजे या उपक्रमांचा मेरुमणी. सामाजिक परिस्थिती आणि संदर्भ हा ’नुक्कड’ या शब्दाचा गाभा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यामुळेच साहित्य आणि जगणं या परस्परपूरक बंधांना खतपाणी मिळेल, अशा विषयांचा समावेश या साहित्य संमेलनात प्रकर्षाने करण्यात येतो, याचा प्रत्यय यंदाच्याही नुक्कड साहित्य संमेलनात आला.
 
मराठी साहित्यविश्व आणि जगण्याच्या समकालीन बांधावरचे विषय हे यंदाच्या संमेलनाचं ठळक वैशिष्ट्य ठरलं. मुक्तसंवाद, अभिवाचन, एकांकिका सादरीकरण या कार्यक्रमांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात मराठी भाषेतील लेखन-वाचनासह कविता, नाटक, कथा, कादंबरी या साहित्यप्रकारांचा वेध घेण्यात आला.
 
साहित्य आणि समाज यांच्यातील अद्वैताच्या सेतूखालून वाहणारे अनेक बदल या संमेलनात अचूकपणे टिपण्यात आले. गेल्या सुमारे दोन दशकांमध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनात तंत्रज्ञानाने झपाट्याने केलेले बदल, अर्थकारणाच्या रेट्यामुळे स्वीकारलेले नवे रोजगार, उपलब्ध झालेली नवनवीन समाजमाध्यमं, कोविड-19च्या महामारीतून अनुभवलेली टाळेबंदी अशा अनेक गोष्टींनी आपल्या जगण्यावर, प्राधान्यक्रमांवर, मराठी भाषेवर, वाचन-लेखनावर आणि पर्यायाने साहित्य, नाट्य आणि कला विश्वावर केलेले दूरगामी परिणाम या संमेलनात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून चर्चिले गेले.
 

sahity 
अर्थातच सध्याच्या समकालीन साहित्य, कला आणि नाट्य व्यवहारावर या सगळ्याचे प्रतिबिंब कशा प्रकारे उमटतं आहे, हे त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी आणि अनुभवी व्यक्तींनी सविस्तरपणे अधोरेखित केलं.
 
 
समाज ही प्रवाही संकल्पना असून त्याच्याशी संबंधित सर्व घटकांमधील बदलांचा स्वीकार ही बरेचदा आपल्या जगण्यातील अपरिहार्यता होऊन बसते. अनेकदा याबद्दल दोन टोकाची मतं अनुभवायला मिळतात किंवा याविषयी मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्थादेखील पाहायला मिळते. या बदलांचा लोलक नेमक्या कोणत्या बिंदूवर आहे आणि आपण त्याचा स्वीकार करताना आपली भाषा, साहित्य आणि कला यांना पोषक ठरेल अशी भूमिका घेणं किती आवश्यक आहे, हे या सगळ्यातून प्रकर्षाने जाणवलं. अर्थातच केवळ काठावर उभं राहून भूमिका घेण्याऐवजी वाचक, लेखक, श्रोता आणि प्रेक्षक या चारही बाजूंचा मेळ आपल्या दैनंदिन जीवनात घातला गेला, तरच त्याला ‘भूमिका’ म्हणता येईल, हेदेखील यातून स्पष्ट झालं. आपण वाचक म्हणून, श्रोता म्हणून आणि प्रेक्षक म्हणून रोजच्या जीवनात कसे आहोत, याचा आरसाच या मुक्तसंवादाच्या माध्यमातून दाखवण्यात आला. ‘माझं’ आणि ‘माझ्यापुरतं’ याच्या पलीकडे जाऊन ‘आपल्या सगळ्यांचं’ असा भाव जागृत करून आपली क्रियाशीलता वाढवण्यासाठी या संमेलनाने उमेद दिली, असं म्हणायला हवं. कथा, कादंबरी, कविता, नाटक या साहित्यप्रकारांची चिरफाड न करतादेखील या विविध प्रकारच्या लेखनाला समृद्ध ठरतील अशा विषयांची बीजं अप्रत्यक्षपणे उपस्थितांच्या झोळीत पडली.
 
 
sahity
 
दुसर्‍या दिवशी रंगलेलं नुक्कड बालसाहित्य संमेलन हे तर पूर्णपणे लहान मुलांनी लहान मुलांसाठी (अर्थात मोठ्यांसाठीदेखील) व्यक्त केलेला एक सुंदर आविष्कार होता. बालसाहित्य संमेलनांच्या व्यासपीठावरून वाचकसंख्या घटल्याची हाळी ठोकत मराठी भाषा मरणासन्न झाल्याचा साक्षात्कार व्यक्त केला जातो. बालसाहित्याची दिशा वगैरे सांगताना त्याची ‘दशा’ कशी झाली आहे, यावर दळण दळणारी मोठी मंडळी (प्रौढ या अर्थाने) बालरसिकांना त्यांच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतात. यातून बालवाचकांच्या आणि बालरसिकांच्या हाती खरंच काही पडतं का, हा प्रश्न कायम अनुत्तरितच राहतो. याउलट नवी पिढी अशा संमेलनांकडे आणि साहित्याकडे पाठ फिरवण्याची शक्यताच अधिक वाढते. नुक्कड बालसाहित्य संमेलनात मात्र या सगळ्या आखीवरेखीव चौकटीच्या पलीकडे जाऊन मुलांच्या सहभागावर भर दिला जातो. तसा तो या वर्षीही देण्यात आला. संमेलनात येणार्‍या मान्यवरांना हार-फुलं, शाली देऊन त्यांचं ओझं वाढवण्याच्या प्रथेला फाटा देऊन मुलांनी रंगवलेले कॅनव्हास देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पाहुणे मंडळीदेखील मोठ्या कौतुकाने हे कॅनव्हास मिरवाताना पाहून मुलांबरोबर त्यांच्या पालकांनाही आनंद होणं स्वाभाविकच होतं. संमेलनाच्या प्रारंभीच उद्घाटक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांनी मुलांना सोबत घेऊन वेगवेगळी गाणी सादर करून मुलांमध्ये ऊर्जा भरली. प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत मुलांबरोबर गप्पांचा फड रंगवला. नुक्कड बालसाहित्य संमेलन हे खर्‍या अर्थाने मुलांचं व्यासपीठ ठरलं. मुलांच्या कवितांचं मुलांनीच केलेलं सादरीकरण, त्यातले वेगवेगळे विषय श्रोत्यांमध्ये बसलेल्या पालकांची आणि शिक्षकांचीही दाद घेऊन गेले. कविता लेखनाबरोबरच त्याच्या सादरीकरणासाठीदेखील वेगळा बाज लागतो आणि त्यासाठी मुलांनी केलेला सराव खरंच उल्लेखनीय होता. नाट्यछटा सादरीकरणाच्या सत्रातदेखील मुलं उत्साहाने सहभागी झाली होती. संमेलनापूर्वी त्यांना देण्यात आलेल्या विषयांवर चोख तयारी करून चार वर्ष वयापासून 12-13 वर्षांपर्यंतच्या विविध गटातील मुलांनी सादर केलेल्या नाट्यछटा त्यांच्या कलानैपुण्याचा सुंदर आविष्कार होता. ‘खगोल ते भूगोल’ या आनंद घैसास यांच्या कार्यक्रमात मुलांनी विचारलेले विज्ञानाचा पाया असलेले प्रश्न अचंबित करणारे होते. मुलांपुढे मांडलेल्या कोणत्याही विषयाकडे ते किती वेगवेगळ्या प्रकारे पाहतात, हे त्यांची कल्पनाशक्ती, विचार करण्याची पद्धत, प्रश्न विचारण्याची हातोटी यावरून सिद्ध झाले. नव्या पिढीच्या विचारांना आणि पर्यायाने त्यांच्या लेखनकौशल्यांना विज्ञानाची दृष्टी दिली, तर काल्पनिक लेखनाबरोबरच अभ्यासपूर्ण विज्ञान लेखकांची फळी निश्चितपणे तयार होऊ शकते, असा आशावाद यातून निर्माण झाला. मात्र, या सगळ्या गोष्टी संमेलनात सहभागी झालेल्या मुलांपर्यंत इतक्या सहजपणे आणि कोणताही मुलामा न देता पोहोचवण्यात आल्या, की त्याचं अवडंबर वाटलं नाही. हलक्याफुलक्या मजेदार शैलीत मुलांपर्यंत माहिती आणि ज्ञानाचा हा खजिना पोहोचवण्यात आला.

sahity 
 
मुलांच्या भावविश्वामध्ये पालक आणि शिक्षक या दोन्ही घटकांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. मुलांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन देण्यात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. पण मुलांना कायम ‘शिकवण्या’च्या भूमिकेत जाणारे हे दोन्ही घटक स्वत:च्या कौशल्यांकडे कसे पाहतात किंवा कोणत्याही गोष्टी कसे सादर करतात, याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांना पालकांच्या कथाकथन कार्यक्रमातून आला. मुलांच्या उपक्रमांमधील आपला सहभाग नेमका कसा असावा, असा अप्रत्यक्ष धडादेखील पालकांना आणि शिक्षकांना यातून मिळाला असणार.
या संमेलनात सादर झालेला ‘आली सुट्टी.. आली सुट्टी...’ हा डॉ. माधवी वैद्य दिग्दर्शित कार्यक्रम असो किंवा रवींद्र सातपुते यांनी दिग्दर्शित केलेलं आणि रमणबाग शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं ‘आभाळमाया’ हे नाटक असो.. या दोन्ही गोष्टींमध्ये जाणवलेल्या समान गोष्टी म्हणजे मुलांच्या क्षमता ओळखून नवीन विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्याकडून चोख तयारी करून घेणं, कविता पाठांतरासारख्या गोष्टींचं महत्त्व ओळखणं खूप खूप आवश्यक आहे. तसं झालं, तर आपल्याला ‘आली सुट्टी.. आली सुट्टी...’ आणि ‘आभाळमाया’ यासारखे उत्तम कलाविष्कार वरचेवर पाहायला मिळतील.
‘मुलांसाठी मुलांनी’ हे या बालसाहित्य संमेलनाचं सूत्र मुलांबरोबर पालकांना आणि शिक्षकांनाही अगदी सहजपणे समृद्ध करून गेलं. त्यामुळेच मुलांसाठी वर्षभर उपक्रम राबवून बालसाहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांना आविष्कृत करणार्‍या अशा व्यासपीठांची संख्या वाढणं खरोखरच आवश्यक आहे, असं वाटतं.
लेखिका विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक आहेत.
Powered By Sangraha 9.0