चरैवेति चरैवेति..

विवेक मराठी    31-Jan-2024
Total Views |
@दिनेश गुणे 9870339101
 सांगली जिल्ह्यातील एका गावातून सुरू झालेला मुंबईपर्यंतचा अतिशय खडतर प्रवास. मुंबईत नोकरी करीत असतानाच त्यांच्यातील तळमळीचा कार्यकर्ता घडत गेला. प्रगल्भ होत जाणार्‍या सामाजिक जाणिवांनी त्यांना राजकारणाच्या एका वळणावर आणून सोडले. 1959मध्ये जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून, ‘चरैवेति’ वृत्तीने सुरू झालेला एक व्रतस्थ प्रवास आज नव्वदाव्या वर्षीदेखील त्याच अदम्य उत्साहाने सुरू आहे. नऊ दशकांची वाटचाल याच व्रताच्या कठोर आचरणामुळे ध्येयपूर्तीच्या समाधानाने उजळली आहे. पद्मभूषण पुरस्काराच्या पावतीने त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली आहे.

ram naik
 
काही सुखद क्षणांचा आनंद केवळ वर्णने वाचून, किंवा ऐकून अनुभवता येत नाही. तो अनुभवण्यासाठी त्या क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार व्हावे लागते. असे झाले की त्या क्षणाचा आनंद आपल्या मनातल्या आनंदक्षणांच्या कुपीत साठून राहतो आणि पुढेही तो आठवणींच्या रूपाने मनात दरवळत राहतो. असा अनुभव असल्यामुळेच त्या दिवशी मी मुद्दाम गोरेगाव गाठले. गोरेगावच्या पूर्वेस गोकुळधाम नावाचा देखणा परिसर आहे. या परिसरात रामभाऊ नाईक राहतात. परवा 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ती आनंदाची बातमी कानावर आली आणि गोकुळधाम गाठायचे ठरविले. रामभाऊंच्या साडेसहा दशकांच्या ‘चरैवेति’ व्रताची सुफळ सांगता झाल्याचे समाधान देणारी ती बातमी होती. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडीसारख्या एका आडगावातून सुरू झालेल्या तब्बल नऊ दशकांच्या एका जीवनप्रवासाच्या गौरवगाथेचे नवे पान त्या बातमीने लिहिले. नवी दिशा दाखविणार्‍या, नव्या वाटा निर्माण करणार्‍या असामान्य व्यक्तींना केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. केंद्र सरकारने पद्मभूषण किताबाने रामभाऊंच्या तब्बल साडेसहा दशकांच्या सार्वजनिक जीवनातील असामान्य आणि आदर्श कामगिरीचा सन्मान केल्याची बातमी सर्वत्र पोहोचली आणि रामभाऊंना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा द्याव्या, असे मी ठरविले. हा केवळ औपचारिक विचार नव्हता. अशा व्यक्तींचा आशीर्वाद मिळविण्याची आणि अशा पायाशी नतमस्तक होण्याची अपूर्व संधी या निमित्ताने मिळेल, हा स्वार्थदेखील त्यामागे होता. म्हणूनच, त्या दिवशी मी गोरेगावातील गोकुळधाम गाठले.
 
 
रामभाऊंच्या घरी पोहोचलो, तेव्हा अपेक्षेप्रमाणे चाहत्यांची, शुभचिंतकांची गर्दी होतीच. त्याच गर्दीत मी घुसलो आणि एक जागा पकडून क्षण क्षण न्याहाळू लागलो. गर्दीच्या गराड्यातील प्रत्येकाला रामभाऊंच्या जीवनातील या क्षणाचा साक्षीदार होण्याची ओढ लागल्याचे जाणवत होते. मी पुढे झालो आणि रामभाऊंचे अभिनंदन करत त्यांच्या पायांना स्पर्श केला. याच क्षणाचा आनंद मला अनुभवायचा होता. मी लगेचच तो आठवणींच्या कुपीत साठविला आणि रामभाऊंसमोर बसलो. गर्दीशी मनमोकळ्या गप्पा सुरू असताना रामभाऊंचा फोन अखंड घणघणत होता आणि फोनवरील प्रत्येक संभाषणातून कौटुंबिक जिव्हाळ्याचा स्पर्श पाझरत होता. अशा गर्दीत रामभाऊंशी बोलता येणे अवघडच होते. पण एका क्षणातील बोलण्याचा एक धागा मी पकडला आणि रामभाऊ बोलते झाले..
 

ram naik 
नऊ दशकांच्या एका कृतार्थ वाटचालीचा एक पट आम्हा सर्वांसमोर उलगडू लागला. वय हा तर केवळ आकडा असतो असे म्हणतात. भूतकाळाबरोबर मागे सरलेल्या नव्वद वर्षांतील प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक आठवणींचा ताजातवाना पट आमच्यासमोर रामभाऊ उलगडू लागले. अशा क्षणी उचंबळून येणार्‍या असंख्य आठवणींना समाधानाचा स्पर्श असतो, म्हणून त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी अपूर्व ठरते. या क्षणी मागे वळून पाहताना रामभाऊंच्या भावना काय असतील, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आणि त्या क्षणाचीच संधी साधून मी त्यांना थेट तोच प्रश्न विचारला.
 
 
“तुम्ही माझी मुलाखत वगैरे घेताय की काय?”.. अवखळपणे रामभाऊंनी विचारले, पण माझ्याकडून त्यांना हो किंवा नाही अशा उत्तराची अपेक्षादेखील नसावी. रामभाऊंच्या शब्दांतून एका अथक प्रवासाचा पट उलगडू लागला आणि आम्ही सारे जण जिवाचे कान करून ते शब्द साठवून घेऊ लागलो.
 
 
सांगली जिल्ह्यातील आटपाडीसारख्या गावातून मुंबईपर्यंतच्या सुरुवातीच्या प्रवासाच्या त्या टप्प्याची रामभाऊंची आठवण काहीशी हळवी आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतरच्या चाकरीच्या दिवसांतून एक कार्यकर्ता घडत गेला आणि प्रगल्भ होत जाणार्‍या सामाजिक जाणिवांनी त्यांना राजकारणाच्या एका वळणावर आणून सोडले. 1958 साली कायद्याची पदवी घेऊन मुंबईतल्या खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या दिवसांनी रामभाऊंच्या जीवनाच्या प्रवासाची दिशा आखून दिली आणि याच काळात एक तळमळीचा कार्यकर्ता घडत गेला. 1959मध्ये जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून, ‘चरैवेति’ वृत्तीने सुरू झालेला एक व्रतस्थ प्रवास आज नव्वदाव्या वर्षीदेखील त्याच अदम्य उत्साहाने सुरू आहे. जनसंघाचा कार्यकर्ता, मुंबईचा संघटनमंत्री या नात्याने सुरू केलेली पूर्णवेळ राजकीय कारकिर्द आणि त्यानंतर विविध संघटनात्मक जबाबदार्‍या सक्षमपणे पेलून गाठलेला यशाचा टप्पा हा सारा प्रवास अचंबित करणारा आहेच, तसाच प्रेरणादायकही आहे. या प्रवासात रामभाऊंना अनेक व्यक्तिगत आव्हानांना तोंड द्यावे लागले. कोणत्याही सामान्य व्यक्तीस अशा आव्हानांचा सामना करणे कदाचित शक्यदेखील झाले नसते, अशा असीम धैर्याने कर्करोगासारख्या दुर्धर आजारास परतवून लावून जिद्दीने चरैवेति व्रताचे आचरण करण्यासाठी असामान्यत्व अंगी असावे लागते. तीन वेळ मुंबई भाजपाचे अध्यक्ष, सलग तीन वेळा बोरिवली मतदारसंघाचे भाजपाचे आमदार, तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील पालघऱपर्यंत पसरलेल्या सर्वात मोठ्या लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विक्रमी मतांनी विजयी होणारे लोकप्रिय खासदार, भाजपाच्या स्थापनेपासून उत्तर प्रदेशाच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारेपर्यंतच्या काळात सातत्याने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, पक्षाच्या राष्ट्रीय शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी प्रशिक्षण प्रकोष्ठाचे संयोजक, अशा अनेक पदांना रामभाऊंच्या अनुभवाची जोड मिळाली.
 

vivek 
 
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपदाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळतानाच, गृह, योजना आणि संसदीय कार्य राज्यमंत्रिपद, पुढे केंद्रीय पेट्रोलियम खात्याची स्थापना झाल्यावर सलग पाच वर्षे या खात्याचा कार्यभार सांभाळताना सामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचलेली गॅस जोडणी क्रांती हा राजकीय प्रवास केवळ नोंदीपुरता नाही. या प्रत्येक पदाच्या कारकिर्दीत मतदारसंघातील, राज्यातील आणि देशातील तळागाळातील प्रत्येकाच्या जगण्याशी निगडित समस्येचे निराकरण करण्यासाठी झटणारा कार्यकर्ता अशीच रामभाऊंची ओळख राहिली. मुंबईतील बोरिवली मतदारसंघातील कुष्ठरुग्णांच्या जीवनातील हलाखीवर रामभाऊंच्या आस्थेवाईक आपुलकीची फुंकर मिळाली आणि देशभरातील 700हून अधिक वसाहतींमधील कुष्ठरुग्णांच्या जीवन परिवर्तनाची एक चळवळ उभी राहिली. संघाच्या संस्कारातून घडलेली मने समाजाच्या सेवेसाठी व्रतस्थभावाने समर्पित करण्याचा एक आदर्श या वाटचालीतून उभा राहिला आहे. बोरिवली उपनगराच्या एका बाजूला काहीशा उपेक्षित अवस्थेत असलेल्या गोराई आणि मनोरी या खेड्यांतील कोळी आणि ख्रिस्ती बांधवांची घरे आता विजेच्या उजेडाने उजळलेली दिसतात, त्यांना मुंबईत ये-जा करता यावी यासाठी बेस्टच्या लाँच सेवेची सुरुवात झाली, खाडीपलीकडच्या या गावांना समुद्राखालून पाइपद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आणि ही खेडी अक्षरश: रामभक्तीने भारावून गेली. तोदेखील रामभाऊंनी त्या काळी सोडलेल्या परिवर्तनाच्या संकल्पाचाच साक्षात पुरावा आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी, कोळी भगिनींच्या प्रेमभरल्या राख्यांनी रामभाऊंचा हात आणि मनदेखील भारावून गेलेले असते. मुंबईच्या शेजारी असलेला वसईच्या अर्नाळा किल्ल्यातील वस्त्या सूर्यास्तानंतर अंधारात बुडून मुंबईच्या दिशेने दिसणार्‍या विजेच्या झगमगाटाकडे पाहत कुढत राहायच्या. या वस्तीवरल्या अंधाराने अस्वस्थ झालेल्या रामभाऊंनी तेथपर्यंत वीज पोहोचविली आणि ती कुटुंबे विजेच्या उजेडाबरोबर आनंदाने उजळली. पालघरजवळच्या सातपाटी गावातील मच्छीमार कुटुंबांशी जुळलेल्या कौटुंबिक नात्याची कहाणी सांगताना तिथल्या प्रत्येक भेटीच्या आठवणी रामभाऊंच्या मनात ताज्यातवान्या होताना आम्ही अनुभवल्या.
 
 
उत्तर प्रदेशचे राज्यपालपद हे रामभाऊंच्या सुसंस्कृत सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीचे शिखर आहे. राज्यपालपदाला पठडीबाजपणातून बाहेर काढून समाजाभिमुख करणार्‍या प्रथांनी रामभाऊंमुळेच उत्तर प्रदेशाच्या राजभवनात जन्म घेतला आहे. राज्यपाल हे राज्याचे विश्वस्त असतात. त्यामुळे जनता व राजभवने यांमध्ये अंतर असता नये, हा विचार रामभाऊंनी अमलात आणला आणि आता देशभरात राज्यपाल व जनता यांतील नात्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
 
 
प्राचीन भारतीय वाङ्मयातील ऐतरेय सूक्तामध्ये एक बोधवचन आहे - ‘चराति चरतो भग:, चरैवेति चरैवेति... चरन्वै मधु विन्दन्ति, चरन्स्वादुमुदम्बरम्, सूर्यस्य पश्यश्रेमाणं यो न तन्द्रयते चरंश..’
 
 
- ‘मधमाशा धडपड करून मध गोळा करतात, पक्षी फिरून गोड फळे खातात, तो सूर्य तर सतत चालतच असतो, तेव्हा मानवा, तू चालतच राहा. जागीच उभे राहणार्‍याचे भाग्यही जागीच थबकून उजळण्याची वाट पाहत असते. झोपलेल्याचे भाग्य झोपूनच राहते, चालणार्‍याचे भाग्य मात्र त्याच्यासोबत चालत राहते..म्हणून, चालत राहा.’
 
 
आठवणींचा एक सलग पट उलगडताना रामभाऊंनी आपल्या चरैवेति व्रताचा जणू वसाच आम्हाला दिला. नऊ दशकांची वाटचाल याच व्रताच्या कठोर आचरणामुळे ध्येयपूर्तीच्या समाधानाने उजळली आहे. पद्मभूषण पुरस्काराच्या पावतीने त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली आहे. रामभाऊ नाईक नावाच्या एका समर्पित आयुष्यातील या आनंदक्षणाचे साक्षीदार होऊन निघताना, आमची मने त्या अनोख्या अनुभवाने समृद्ध झाली आहेत.