देवभूमीतील जत्रोत्सव

विवेक मराठी    31-Jan-2024
Total Views |
@निलेश जोशी  9422632156
 
jatra 2024 
कोकणातील माणूस आणि देव यांच्यातील ऋणानुबंध अनुभवायचे असतील तर तेथील जत्रोत्सवांना भेटी द्याव्यात. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागते. भातशेतीची कामे पूर्ण झालेली असतात. आलेले भात विकून बळीराजाच्या हातात पैसे आलेले असतात. असा सुगीच्या काळात प्रबोधिनी एकादशीपासून म्हणजेच बारशीपासून कोकणाच्या मंदिरातील वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. नवसाला पावणार्‍या अशा देवी-देवतांची ख्याती असल्याने लाखोंच्या संख्येने स्थानिक तसेच चाकरमनीही या यात्रांना हजेरी लावतात. कोकणाच्या या देवभूमीत प्रत्येक गावाचा वार्षिक जत्रोत्सव, सप्ताह, दिंडी, नित्योत्सव आणि परंपरा यातूनच गावचे गावपण जपले गेले आहे आणि मालवणी मुलखाची सांस्कृतिक परंपरा टिकली आहे.
रामायण-महाभारत काळापासूनच ‘अपरांत भूमी’ म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश म्हणजेच आपले आजचे कोकण. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांत कोकण भूमी सामावलेली आहे. या पाचही जिल्ह्यांना - विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील सलग प्रदेशाला आणखी एक नवे नाव खूप शोभून दिसेल, ते नाव म्हणजे देवभूमी. वस्तुत: संपूर्ण पृथ्वी ही देवभूमीच आहे. देवाने निर्माण केलेली, देवांचे अस्तित्व असलेली, म्हणून ती देवभूमीच असते़; मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे म्हणजेच दक्षिण कोकणची भूमी एका वेगळ्या अर्थाने देवभूमी आहे.
 
 
दक्षिण कोकण भागातील गावागावांमधील ग्रामदेवतांचे येथील स्थानिक लोकजीवनाशी असलेले नाते केवळ भक्तीने सुरू होऊन भक्तीतच संपत नाही. ही सगळी दैवते तेथील आबालवृद्धांच्या दैनंदिन जीवनाचाही अविभाज्य घटक बनलेली असतात. ग्रामदैवत हे येथील लोकरितीचे आणि लोकजीतीचे केंद्रस्थान असते. ही दैवते येथील माणसांशी बोलतात, संवाद साधतात. ही संवादाची प्रक्रिया नागरी संस्कृतीत वाढलेल्या सुशिक्षित माणसांना धर्मभोळेपणाची आणि अंधश्रद्धेची वाटत असली, तरी येथील ग्रामीण भागात उभे आयुष्य काढणार्‍या सामान्य माणसांना ती मोठ्या मोलाची आणि प्रसंगी आधार देणारी अशी वाटते, किंबहुना त्यांच्या खडतर अशा दैनंदिन जीवनामध्ये प्रसंगी तोच त्याचा एकमेव आधार असतो.
 

jatra kokan 
 
कोकणच्या या देवभूमीत प्रत्येक गावात शिव हेच प्रमुख दैवत मानले जाऊ लागले. त्याबरोबर भवानीचे म्हणजेच पार्वतीचेही मंदिर गावातील प्रमुख मंदिरांपैकी एक असे ठरवले गेले. गावची जत्रा याच मंदिरात साजरी होऊ लागली. भवानी येथील प्रत्येक गावात पावणाई, शिवराई, अंबा, दिर्बादेवी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाऊ लागली. शिव मंदिरेसुद्धा लिंगेश्वर, रामेश्वर, कलेश्वर अशा नावांनी संबोधली जाऊ लागली. त्याचबरोबर गांगेश्वर, सातेरी, नवलाई, विठलाई, रासाई, विठाई अशा स्थानिक देवतांनाही या रहाटीत स्थान प्राप्त होऊन या सर्व मंदिरांचा एक समूह निर्माण झाला आणि या सर्वांना रहाटीच्या मंदिराच्या मानाचे स्थान लाभले.
 
 
जिल्ह्यात सुमारे 3975 मंदिरे आहेत. यातील पश्चिम देवस्थान समितीकडे 197 मंदिरे आहेत. सर्व गावांतील पाषाणे, मूर्तींची संख्या सुमारे 35142 आहे. याशिवाय निसर्गदेवता, राईतली पाषाणे, देवळाबाहेरचे वीरगळ ही श्रद्धेची स्थानेही आहेत.
 
 
गावोगावची ग्रामदैवते, पुरातन देवस्थाने यांना काही ना काही ऐतिहासिक घटनांचा संदर्भ वा दंतकथांची पार्श्वभूमी असते. दक्षिण कोकणच्या या देवभूमीत मैल-मैल अंतरावर असलेल्या प्रत्येक गावातील ग्रामदैवतांना अनन्यसाधारण महत्त्व आणि मान असतो. शिवाय या दैवतांचे वर्षभरात होणारे सण, उत्सव, जत्रा, यात्रा हे तर कोकणी माणसाचे आणि नोकरी-व्यवसायानिमित्त गावाबाहेर पडून इतरत्र वसलेल्या चाकरमान्यांचेही अत्यंत जिव्हाळ्याचे विषय.
 


jatra kokan 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रांचा विचार केला, तर कुडाळ तालुक्यातील आवळेगाव या गावची श्री देव नारायणाची जत्रा ही पहिली जत्रा. प्रबोधिनी एकादशीला ही जत्रा असते. या वार्षिक जत्रोत्सवाने सिंधुदुर्गातील जत्रोत्सवास सुरुवात होते. साधारण हा काळ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील असतो. थंडीची चाहूल लागलेली असते. भातशेतीची कामे पूर्ण झालेली असतात. आलेले भात विकून बळीराजाच्या हातात पैसे आलेले असतात. एकंदरीतच सर्वच जण सुगीचा काळ अनुभवत असतात. त्याच वेळी प्रबोधिनी एकादशीपासून - म्हणजेच बारशीपासून विविध मंदिरांतील वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होते.
 
 
अगदी सकाळपासूनच देवळामध्ये धार्मिक कार्यांना सुरुवात होते. ज्या कोणाचे ते कुलदैवत असेल, ज्या कोणाची त्या देवतेवर श्रद्धा असते, ती माणसे अगदी दूरवरून आपल्या देवाच्या जत्रेला येतात. माहेरवाशिणीसुद्धा आवर्जून येतात. देवी असेल तर त्या देवीची खणा-नारळाने ओटी भरली जाते. देवाची जत्रा असेल तर श्रीफळ अर्पण करून गुरवांकडून गार्‍हाणे केले जाते. गार्‍हाणी घालण्याची म्हणजेच देवाला सांगणे करण्याची ही पद्धतसुद्धा गावागावाप्रमाणे बदलत असते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे माणसे एकमेकांना भेटणेच दुरापास्त झाले आहे, त्या अनुषंगाने हे वार्षिक जत्रोत्सव म्हणजे माणसांनी एकत्र येण्याचे सोहळेच म्हटले पाहिजेत.
 
ज्या देवाचा वार्षिक जत्रोत्सव असेल, त्या देवतेच्या मंदिरात काही दिवस आधीपासूनच ते मंदिर सजवायला सुरुवात होते. रंगरंगोटी केली जाते. जत्रेच्या दिवशी मंदिरावर आकर्षक सजावट केली जाते. आताशा तर मंदिरावर आकर्षक विद्युत्र्ोशणाई करण्याची प्रथा आहे. वेगवेगळ्या वस्तूंची, खेळण्यांची, शेतीच्या अवजारांचीही दुकाने मांडली जातात. चवदार पदार्थांच्या वासांनी हॉटेले खुणावत असतात. मग आपोआप चाय-भजी-उसळपाव खायला पावले तिकडे वळतातच. गाठीला पैसा असल्याने उलाढालसुद्धा उत्तम होते. जत्रेला गेले आणि खाजे नाही आणले, तर मग जत्रेला जाऊन उपयोग काय, असा एक प्रश्न विचारला जातो. हे खाजेसुद्धा गूळ आणि आल्याचे असतात. जत्रेला जागरण होतेच, त्यामुळे हे खाजे त्यावर उत्तम उपाय असल्याचे सिद्ध होते. जागरणाचा त्रास होत नाही. शिवाय हल्ली आपल्या जत्रेचा प्रसाद म्हणून हे खाजे दुसर्‍यांना देण्याचीसुद्धा पद्धत आहे. त्याशिवाय चुरमुर्‍याचे लाडू, शेंगदाणा आणि खटखटे लाडू, बंगाली खाजा, बर्फी यांनासुद्धा खूप मागणी असते.
 

jatra kokan
 
वार्षिक जत्रोत्सव आणि दहीकाले यांचे एक अतूट नाते आहे. दहीकाला म्हणजे दशावतारी नाटके. बांधलेले दह्याचे मडके नाटक संपल्यावर फोडले जाते आणि काला केला जातो, म्हणून याला दहीकाला म्हणतात. कोकणची ही समृद्ध लोककला मंदिरातून सादर केली जाते. प्रत्येक मंदिरांत सादर करणारी दशावतारी नाट्य मंडळी ठरलेली असतात. परंपरेप्रमाणे तीच मंडळी त्या मंदिरात नाटक सादर करतात. साधारणत: हे नाटक कोणत्या वेगळ्या रंगमंचावर सादर न होता देवळातच सादर होते.
 
 
साधारणपणे देवाची पालखी प्रदक्षिणा झाली की मध्यरात्री हे नाटक सुरू होते आणि उत्तररात्रीपर्यंत किंवा कधीकधी पहाटेपर्यंत हे नाटक चालते. रात्रीचे नाटक असल्याने वार्षिक जत्रोत्सवांना रात्रीची गर्दी जास्त होते. पूर्वी जत्रोत्सव असला की त्या गावातल्या शाळांना जागरणाची सुट्टी असायची किंवा अर्धवेळ शाळा असायची, एवढा हा वार्षिक जत्रोत्सव माणसाच्या दैनंदिन जीवनाशी मिसळून जायचा.
 
 
कोकणच्या या देवभूमीत सोनुर्लीची माउली, आंगणेवाडीची भराडी देवी, कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा, नारुरगावची महालक्ष्मी, मातोंड-पेंडूरची घोडेमुख कोंब्याची यात्रा अशा काही यात्रांना लाखो भाविक हजेरी लावतात. त्यासाठी पूर्ण प्रशासकीय यंत्रणा राबत असते. नवसाला पावणारे अशी या देवतांची ख्याती असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रांना हजेरी लावतात. त्या निमित्ताने व्यापारसुद्धा चांगला होतो. चार पैसे गाठीला राहतात.
सोनुर्लीची जत्रा
दक्षिण कोकणातील लोटांगणासाठी प्रसिद्ध असणार्‍या सोनुर्ली येथील श्री देवी माउली वार्षिक जत्रोत्सव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर शेजारच्या गोवा आणि कर्नाटक राज्यातसुद्धा प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा व कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, तसेच लोटांगण नवसही फेडतात.
 
 
‘नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी’ अशी ख्याती असलेले श्री देवी माउली जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. जिल्ह्यातील मोठ्या जत्रांना सोनुर्लीच्या जत्रेपासून प्रारंभ होतो. जत्रोत्सवानिमित्त मंदिराला केली जाणारी रोशणाई, पालखी येताना केली जाणारी आतशबाजी आणि लोटांगणांचा उत्सव याबरोबरच साजशृंगार केलेले देवीचे रमणीय रूप डोळ्यात साठवून भाविक तृप्त होतात. केवळ यासाठीच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविक येथे गर्दी करत असतात. लोटांगण घालून येथील नवस फेडले जातात. लोटांगणांनी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा करायची असते. त्यासाठी दिवसभर उपवास ठेवावा लागतो. जिल्ह्यातली पहिलीच मोठी यात्रा असल्याने आणि लाखो भाविक उपस्थित राहत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
 
 
आंगणेवाडी यात्रा
 
कोकणातील बहुतेक जत्रोत्सव लोकल न राहता ग्लोबल बनले आहेत. त्यात मालवण तालुक्यातील आंगणेवाडी यात्रेचा - अर्थात देवी भराडीच्या यात्रेचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. भावभक्तीचा अलोट मेळा, श्री देवीचा अगाध महिमा, जनसामान्यांपासून राजकीय नेत्यांची गार्‍हाणी, सेलिब्रेटींची उपस्थिती, प्रशासकीय आणि आंगणेवाडी मंडळाचे सुयोग्य नियोजन अशा सर्व स्तरांवर आंगणेवाडी जत्रा प्रत्येक वर्षी व्यापक होत चालली आहे.
 
 
मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी ही एक वाडी असून आंगणे आडनावावरून आंगणेवाडी हे नाव प्रचलित झाले. श्री देवी भराडी माता हे स्वयंभू देवस्थान असून आंगणे कुटुंबीयांप्रमाणे देश-विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी अशी साक्षात्कारी आणि जागृत देवी म्हणून श्री भराडी देवी मातेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवामध्ये देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक इथे नतमस्तक होतात. या वेळी ओटी भरून नवस बोलले जातात अथवा फेडले जातात. देवीचा कौल घेऊन वार्षिक यात्रोत्सव साजरा होतो.
 
 
आंगणेवाडी यात्रेची ठरावीक तारीख नसते. श्री भराडी देवीची यात्रा वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे ठरते. दिवाळीच्या हंगामानंतर शेतीची कामे आटोपल्यानंतर आंगणे मानकरी बांबूपासून बनविलेल्या अर्थात पारंपरिक डाळीवर बसतात. जत्रेअगोदर करावयाच्या शिकारीचे नियोजन करतात. गावातील पुरुषमंडळी शिकार अर्थात पारध मिळेपर्यंत जंगलातच थांबतात. ही पारध झाल्यानंतर देवीचा कौल घेऊन जत्रेची तारीख ठरते. कोकणवासी या तारखेकडे लक्ष ठेवून असतो. एकदा तारीख प्रसिद्ध झाली की देशाच्या कानाकोपर्‍यातील भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांद्वारे सर्वतोपरी प्रयत्न होतात.
 
 
दुसर्‍या दिवशी मोडयात्रेने यात्रेची सांगता होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा धार्मिक-सांस्कृतिक विराट सोहळा वर्षानुवर्षे आपली कक्षा वाढवीत आहे. राजकीय नेत्यांची आणि सेलिब्रेटीची उपस्थिती, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीची यात्रा कोकणची आध्यात्मिक ओळख बनली आहे.
 
 
मातोंड पेंडूरची घोडेमुख कोंब्याची जत्रा
 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात मातोड पेंडूर गावचा 360 चाळ्याचा अधिपती श्री देव घोडेमुख. याची जत्रा ‘कोंब्याची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे. श्री देव घोडेमुख देवस्थान म्हणजेच मार्तंड भैरव! एक शक्तिशाली सेनापती. या ठिकाणी कोंबड्यांचा नवस केला जातो. पण असे असले, तरी घोडेमुखला कोंब्याचा नवस ही नंतर रूढ झालेली प्रथा आहे. भक्तीचे श्रद्धेत रूपांतर झाल्यानंतर स्वयंस्फूर्तीने भाविकांनी सुरू केलेली ही प्रथा, म्हणूनच ही कोंब्याची जत्रा. खरे तर कुठल्याही नवसापेक्षा देव अर्थात शिवअवतार भक्तीचा मोठा भुकेलेला असतो. 360 चाळ्यांचा अधिपती हा शब्दही मार्तंड अवताराशी साम्य साधणारा आहे. खंडोबाच्या ग्रंथातही 360 विश्वासू सैनिकांचा उल्लेख आढळतो. आपण ज्या रूढ अर्थाने ज्याला चाळा म्हणतो, ते त्याच्या सैन्याचा अंश. भक्त सुखाचा, शांतीचा मार्ग शोधताना भक्तीचा अमूल्य प्रसाद घेऊन जातात, याचा अनेक भक्तांना प्रत्यय आलेला आहे.
 
 
कुटुंबावर काहीही संकट कोसळले, तरीही ‘देवा घोडेमुखा धाव’ असे शब्द नेहमी कानावर पडतात. हीच श्रद्धा. श्रद्धेतून निर्माण झालेले हे पावन मंदिर 1986 रोजी नव्याने बांधण्यात आले. श्रमदानातून भाविकांनी रस्ता किंवा तत्सम कामे पार पाडली. निसर्गरम्य अशा परिसरात हे देवस्थान वसले आहे. याच्या जत्रोत्सवालाही शेजारच्या गोवा आणि कर्नाटक राज्यांतून हजारो भाविक हजेरी लावतात. या ठिकाणचे एक वैशिष्ट्य सांगितले जाते. ही जत्रा सूर्यास्तापर्यंत असते. त्या वेळेपर्यंत हजारो कोंबड्यांचा बळी येथे दिला जातो. पण दुसर्‍या दिवशी या ठिकाणी गेले, तर सर्व परिसर स्वच्छ असतो. कोणताही कचरा, बळी दिल्याच्या खाणाखुणा काही आढळत नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
 
 
साधारणपणे फेब्रुवारीपर्यंत या जत्रा सुरू असतात. नंतर या यात्रा कमी होतात. श्रद्धेच्या गाथेमध्ये आणि कोकणचा सांस्कृतिक इतिहास न्याहाळताना डॉ. भालचंद्र आकलेकर यांनी संप्रदायानुसार कोकणच्या देवस्थानांची रचना सांगितली आहे. रवळनाथ संप्रदाय, सातेरी, वेतोबा, दत्त, रामदासी संप्रदाय परंपरा, सूर्य उपासनेची परंपरा हे सारेच प्रत्येक मंदिरात दर्शन घेताना लक्षात येते. जिल्ह्यात रवळनाथाच्या मंदिरांचा वेध घेता वेंगुर्ले 26, कणकवली 16, देवगडमध्ये 11, कुडाळ 31, सावंतवाडी दोडामार्ग 53, मालवण 37, गोव्यामध्ये 49 मंदिरे आहेत. सातेरी मातेचीसुद्धा मंदिरे सिंधुदुर्गात सर्वाधिक आहेत. माउलीच्या मंदिरांची ख्याती सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले भागात अधिक आहे, तर वेतोबाची मंदिरे सिंधुदुर्गात तब्बल 143 आहेत. मालवणी मुलखातील प्रत्येक गावाची परंपरा वेगळी आहे, तशी मंदिराची रचनाही वेगळी आहे, मात्र श्रद्धेचे सूत्र एक आहे, म्हणूनच प्रत्येक गावाचा वार्षिक जत्रोत्सव असू दे की सप्ताह, दिंडी, नित्योत्सव आणि परंपरा असू दे.. यातूनच त्या गावाचे गावपण जपले गेले आहे आणि मालवणी मुलखाची सांस्कृतिक परंपरा त्यामुळेच टिकली आहे.