मंदिर नव्हे, भारताच्या पुनरुत्थानाचे प्रतीक!

05 Jan 2024 12:03:45

rammandir

रामजन्मभूमीवर आज उभे राहत असलेले राम मंदिर हे हिंदूंच्या विजयाचे प्रतीक आहे आणि हा विजय हिंदूंच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे, कारण त्यामागे ही व्यापक पृष्ठभूमी आहे. भारताचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी वाटचाल सुरू झालेली असताना हे राम मंदिर केवळ एक मंदिर राहिले नसून भारताच्या पुनरुत्थानाचे मूर्तिमंत प्रतीक बनले आहे.

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥
 
आसेतुहिमाचल पसरलेल्या या भारतवर्षाच्या अस्तित्वाची, अस्मितेची आणि एकात्मतेची प्रेरणा म्हणजेच भगवान श्रीराम. श्रीराम, रामायण आणि त्या इतिहासाशी संबंधित अनेक संदर्भ येथील हिंदू समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. रामायणाची लोकमान्यता हिंदूंमध्ये हजारो वर्षांपासून परंपरेच्या वारसारूपाने प्रवाहित झाली आहे. तिचे महत्त्व इतके खोलवर रुजलेले आहे की येथील बहुसंख्य जनता आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत या ना त्या कारणाने श्रीरामाचे नाव घेत असते. राम राम, राम कृष्ण हरी, जय सियाराम, सियावर रामचंद्र की जय, गेल्या काही दशकांत हिंदूंच्या संघटित राजकीय-सामाजिक शक्तीचे प्रतीक बनलेले ’जय श्रीराम’ या आणि अशा असंख्य रूपांतून रामाचे नाव आपल्या तोंडून कळत-नकळत येत राहते. एखाद्या गोष्टीत काही जीव उरला नाही, काही रस राहिला नाही हे सांगण्यासाठी आपण त्यात ’काही राम उरला नाही’ असे सहजपणे म्हणून जातो. कारण त्या गोष्टीतील अस्तित्वाला आपण ’राम’ म्हणून ’डिफाइन’ करत असतो. हिंदूंसाठी श्रीरामाचे महत्त्व केवळ धार्मिक, आध्यात्मिक नाही, तर ते राजकीय, सामाजिक, सांस्कृतिकदेखील आहे. कारण उत्तर, मध्य, दक्षिण असा भारताचा विशाल भूभाग रामायणाने जोडलेला आहे. बौद्ध, जैन, शीख चिंतनातही रामायणाचा प्रभाव आहे. इतकेच नव्हे, तर अगदी म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया अशा अनेक देशांमध्येही रामायण पोहोचलेले आहे आणि तिथे रामायणाची आपापली ’व्हर्जन्स’देखील प्रचलित झालेली आढळतात. हिंदूंसाठी श्रीराम हे मर्यादापुरुषोत्तम आहेत, महान योद्धा आहेत, प्रजाहितदक्ष-कनवाळू राजा आहेत, आदर्श पुत्र, पती, बंधू आहेत, धुरंधर राजनीतिज्ञदेखील आहेत. थोडक्यात, हजारो वर्षांच्या हिंदू जीवनमूल्यांचा एकत्रित संचय आपल्याला ’श्रीराम’ या व्यक्तित्वामध्ये झालेला आढळतो.
 


rammandir
 
 
श्रीराम हे भारतीय लोकमानसाचे, हिंदू संस्कृतीचे इतके मोठे श्रद्धास्थान असूनही या श्रीरामाची जन्मभूमी तेथील उचित स्मारकासाठी अनेक शतके संघर्ष करत राहिली, हे जगाच्या इतिहासातील एक मोठे आश्चर्यच म्हणायला हवे. मध्ययुगीन काळात भारत परकीय इस्लामी आक्रमणांच्या वरवंट्यात भरडला गेला. पश्चिमेकडून झालेल्या या आक्रमणांनी हिंदूंना नष्ट करण्याचे असंख्य प्रयत्न केले, यातून अनन्वित अत्याचार घडले आणि प्रतिकारार्थ लाखो हिंदू योद्ध्यांचे बलिदानदेखील घडले. तथापि, 1528 सालापर्यंत हे आक्रमक रामजन्मभूमीला नष्ट करू शकले नाहीत. अखेर बाबराच्या सैन्याने सम्राट विक्रमादित्यांनी बांधलेल्या प्राचीन राम मंदिरावर निर्णायक घाव घालत ते उद्ध्वस्त केले आणि तेथे बाबरी मशीद बांधली. सततच्या आक्रमणांना तोंड देत लढत असलेली, त्यामुळे क्षीण झालेली हिंदुशक्ती रामजन्मभूमीचे रक्षण करण्यास त्या वेळी असमर्थ ठरली. त्यानंतर मुघल काळ, ब्रिटिश काळ असा तब्बल 400 वर्षांहून अधिक काळ हिंदूंनी रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी लढा मात्र जरूर दिला. तथापि, ठिकठिकाणच्या स्वातंत्र्य-स्वराज्य संघर्षात हिंदुशक्ती विभागली गेलेली असल्याने रामजन्मभूमीकरिता एकत्रित निर्णायक लढा देणे हिंदूंना शक्य झाले नाही. तो एकत्रित निर्णायक लढा दिला गेला भारताच्या स्वातंत्र्यानंतर. खरे तर ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र-सार्वभौम भारताच्या भारतीय शासकांनी भारतीय चैतन्याची स्थाने पुन:स्थापित करणे अपेक्षित होते.
 
 

rammandir

 
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी, मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी आणि काशीचे काशीविश्वनाथ मंदिर ही मुस्लीम आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली तीन स्थाने हिंदूंना परत मिळावीत, तेथे भव्य मंदिरे उभी राहावीत, अशी हिंदूंनी स्वाभाविक मागणी केली. ही मागणी करताना हिंदूंनी आजच्या मुस्लीम समुदायावर कोणताही आकस अथवा द्वेष कधीही दाखवला नाही. मात्र सेक्युलॅरिझमचा चश्मा लावल्याने दृष्टी अधू झालेल्या आपल्याच राज्यकर्त्यांनी येथील बहुसंख्य हिंदूंच्या भावनांना केराची टोपली दाखवण्यात धन्यता मानली. तरीदेखील हिंदू समाज घटनात्मक चौकटीत आंदोलने-मोर्चे, सभा, जनजागृती आदी माध्यमांतून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुढची 45 वर्षे लढत राहिला. मात्र इतके सारे होऊनही ही न्याय्य मागणी पूर्ण होणे सोडाच, तत्कालीन शासकांनी हिंदूंच्या भावनांची चक्क खिल्ली उडवली. कम्युनॅलिझम, जातीयवाद, सांप्रदायिकता, रॅडिकलिझम अशी अनेक विशेषणे लावून या आंदोलनाची अवहेलना झाली. यापुढील हद्द म्हणजे रामजन्मभूमीवर जमलेल्या आपल्याच कारसेवकांवर आपल्याच भारतीय शासकांनी गोळ्या चालवल्या!
 

rammandir 
 
स्वातंत्र्योत्तर काळातही इतके सारे अन्याय-अत्याचार, अवहेलना होऊनसुद्धा हिंदू संयमाने संघर्ष करत होते, हा इतिहास एखाद्या बिगर-हिंदू, सेमेटिक उपासनापद्धतीत वाढलेल्या व्यक्तीने समजून घेतला, तर त्याचा यावर विश्वासच बसणार नाही. कारण त्याला अशा शांत, संयमी, सहनशील समाज-संस्कृतीची सवय नाही. पश्चिम आशिया आणि युरोपच्या हद्दीवर एकेक पवित्र स्थान मिळवण्यासाठी सेमेटिक समुदायांनी शेकडो वर्षे केलेला भयंकर रक्तपात असो वा पहिल्या-दुसर्‍या महायुद्ध काळातही नरसंहार असो, हिंसा ही पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया असलेल्या समाजांना हिंदूंचा सहिष्णुतेचा, परस्पर संवादाचा हा स्थायिभाव पचणारा-रुचणारा नाही. अशा हिंदूंची सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर मात्र या संयमाचा कडेलोट झाला आणि 1992 साली बाबरी ढाचा उद्ध्वस्त झाला. खांबातून प्रकटलेल्या अकराळविकराळ, उग्र नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध करावा, त्याचप्रमाणे हिंदूंनी उग्र अवतार धारण करत बाबरीची कलंकित वास्तू उद्ध्वस्त केली. हिंदू शांत राहतात म्हणजे तुम्ही हिंदूंना गृहीत धरू शकता, वाटेल तेव्हा वाटेल तसा उपमर्द करू शकता असा अर्थ नाही, हा संदेश यामुळे जगभरात पोहोचला. विशेष म्हणजे बाबरी पाडली म्हणून हिंदूंनी उन्माद केला, देशभरात अराजक माजवले, असे अजिबात घडले नाही. याउलट पुन्हा हिंदू समाजाने घटनात्मक चौकटीत न्यायालयीन लढ्याचा मार्ग धरला आणि पुढील 26-27 वर्षे नेटाने हाही लढा आपण लढत राहिलो. अखेर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने कौल दिला आणि मध्ययुगात सुरू झालेल्या या संघर्षामध्ये हिंदूंनी आधुनिक, स्वतंत्र-सार्वभौम भारताच्या सांविधानिक चौकटीत विजय नोंदवला. रामजन्मभूमीवर आज उभे राहत असलेले राम मंदिर हे हिंदूंच्या विजयाचे प्रतीक आहे आणि हा विजय हिंदूंच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे, कारण त्यामागे ही व्यापक पृष्ठभूमी आहे.
 

rammandir 
 
मंदिर कशाला हवे? मंदिर तिथेच कशाला हवे? तिथे रुग्णालय-शाळा वगैरे का सुरू केली नाही? मंदिर उभारणीचा इतका जल्लोश कशाला? असले कुजकट प्रश्न उपस्थित करणार्‍यांच्या आवाक्यात रामजन्मभूमीची ही विशाल पृष्ठभूमी सामावू शकत नाही. त्यामुळे अशा मंडळींना केव्हाच मागे सोडून हिंदू समाज मार्गस्थ झाला आहे. याचा अर्थ या मंडळींचे प्रमाद हिंदू विसरलेत, असा नक्कीच नाही. रामाचे अस्तित्व नाकारणार्‍या, रामाला काल्पनिक मानणार्‍या, हिंदूंमध्ये उत्तर भारत-दक्षिण भारत असा भेद निर्माण करू पाहणार्‍या सर्वांचा हिशोब हिंदूंनी व्यवस्थित ठेवलेला आहे आणि तो हिशोब याच वर्षी येत्या 4-5 महिन्यांत चुकता झालेला पाहायला मिळू शकतो. परंतु आज मात्र अशा कुणाही अवलक्षणी व्यक्तीला गांभीर्याने न घेता हिंदू समाजाला श्रीराम मंदिराच्या उभारणीचा निखळ आनंद घ्यायचा आहे. हा आनंद, उत्साह रामजन्मभूमी अयोध्येत दर्शनाला येणार्‍या भाविकांपासून देशभरात अक्षता कलशांचे स्वागत करणार्‍या नागरिकांपर्यंत सर्वत्र जाणवतो आहे. जाती, प्रांत, भाषा यांच्या पलीकडे असलेल्या श्रीरामाच्या मंदिराचा सार्वत्रिक आनंद पुन्हा एकदा भारताच्या एकात्मतेचे प्रतीक ठरला आहे. त्यामुळे या आनंदाला उन्माद म्हणणार्‍या, राजकीय ध्रुवीकरण म्हणणार्‍या, सांस्कृतिक सपाटीकरण म्हणणार्‍या आणि ’आम्ही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाही’ असे उगाचच सर्वांना सांगणार्‍या मंडळींना या भारताचे, येथील हिंदूंचे आकलन ना याआधी कधी झाले आणि ना भविष्यात कधी होईल, हेच पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
 
 
 
अयोध्येतील राम मंदिराचे पुनर्निर्माण याच काळात व्हावे, हाही नियतीने घडवून आणलेला विलक्षण योगायोग आहे. रामायणाचा एकूण प्रवास व त्यातून मिळणारी राष्ट्रीय प्रेरणा अभ्यासल्यास आपल्या हे लक्षात येईल. केवळ रावणाचा वध हेच श्रीराम अवताराचे इतिकर्तव्य असते, तर अयोध्येची विशाल सेना घेऊन महापराक्रमी राम केव्हाच रावणाचा वध करू शकले असते. परंतु श्रीरामांचा जीवनप्रवास इतका साधा-सोपा कधीच नव्हता, ती एक तपश्चर्या होती आणि त्यामागे एक व्यापक कारणदेखील होते. श्रीराम वनवासात राहिले, निषादराज, शबरीमाता, सुग्रीव आणि अशी असंख्य व्यक्तिमत्त्वे श्रीराम या प्रेरणेशी जोडली गेली, समाजाच्या सर्व स्तरांतील विविध घटक यातून एकत्र झाले. प्रत्येक समाजघटकास राजकीय प्रक्रियेत स्थान मिळाले आणि प्रत्येक घटक श्रीरामांशी ’समरस’ झाला. एक प्रकारे श्रीरामांनी भारत नव्याने जोडला आणि आपल्या आचरणातून, नीतीतून तेव्हापासून आजतागायत हजारो वर्षांचा आदर्श प्रस्थापित केला. आज हिंदू समाजाचा होत असलेला प्रवास रामायणाच्या या प्रेरणेशी सुसंगत आहे. आज हिंदू आपल्या प्रेरणा आणि आदर्श याबाबत सजग बनला आहे. जाती, प्रांत, भाषा यांमध्ये जाणीवपूर्वक विभागला गेलेला हिंदू समाज हळूहळू ’हिंदू’ म्हणून एक होऊ लागला आहे, ’हिंदू’ म्हणून उघडपणे आणि अभिमानाने अभिव्यक्त होऊ लागला आहे. देशाच्या राष्ट्रपतिपदापासून, पंतप्रधानपदापासून ते असंख्य लोकप्रतिनिधींपर्यंत स्वत:ला हिंदू व हिंदुत्ववादी मानणारे नेतृत्व आज सर्वत्र पाहायला मिळते आहे. हे हिंदुत्ववादी नेतृत्व हिंदूंमधील मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जनजाती आदी घटकांमधून स्वकर्तृत्वाने वर आलेले आहे. प्राचीन हिंदू मूल्ये व आधुनिक विचार यांच्या संगमातून आखलेल्या नीतीने जागतिक स्तरावर भारताचे अपेक्षित स्थान पुन्हा प्राप्त करण्यास सुरुवात केली आहे. आजही हिंदूंसमोर असंख्य आव्हाने असली, तरी न्यूनगंडात कुढत बसण्यापेक्षा त्यावर मात करत परमवैभवाकडे आपण जाऊ शकतो, हा आत्मविश्वास हिंदू समाजात नक्कीच निर्माण झाला आहे. या ’हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती’ असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे आणि मागील दहा वर्षे या देशात संघस्वयंसेवक असलेले नेतृत्व सत्तेत आहे. अशा या कालखंडात हिंदूंच्या चैतन्याचे प्रतीक असलेल्या रामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभे राहणे म्हणूनच सर्वार्थाने ऐतिहासिक आहे. भारताचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी वाटचाल सुरू झालेली असताना हे राम मंदिर केवळ एक मंदिर राहिले नसून भारताच्या पुनरुत्थानाचे मूर्तिमंत प्रतीक बनले आहे.
Powered By Sangraha 9.0