मधाचे गाव - ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी संकल्पना

विवेक मराठी    05-Jan-2024   
Total Views |
honey village
‘मधाचे गाव’ या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अभिनव संकल्पनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेस निश्चित गती मिळेल. यामुळे पंचक्रोशीतील गावे स्वयंपूर्ण होतील, शुद्ध सेंद्रिय मध उपलब्ध होईल. पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होईल, गावकर्‍यांचे जीवनमान सुधारेल, या सार्‍याचा परिणामस्वरूप गावांचा शाश्वत विकास होण्यास मदत होईल. ‘मधाचे गाव’ ही मंडळाची चळवळ महाराष्ट्रात मधुक्रांती घडवेल, अशी आशा आहे.
मधमाशीचे नाव काढले की आपल्याला दोन गोष्टी चटकन आठवतात, त्या म्हणजे सुमधुर मध आणि मधमाशीचा असह्य असा डंख. मधमाशीबाबत अनेक समज-गैरसमज जनमानसात आहेत. मात्र सर्वसामान्यांना फारसे माहीत नाही की मधमाशी हा अतिशय छोटा कीटक जीवविविधतेतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मधमाशा या मध तयार करण्याबरोबरच परागसिंचनाची महत्त्वाची भूमिका बजावतात. परागसिंचन ही अशी प्रक्रिया आहे की, ज्यामुळे फुलांमधील परागकणांचे वहन केले जाते. निसर्गातील प्रमुख पिकांपैकी 75% पिके मोठ्या प्रमाणात मधमाश्यांनी केलेल्या परागसिंचनावर अवलंबून असतात, इतके महत्त्वाचे कार्य हा छोटा जीव करीत असतो. याचा अर्थ सृष्टिचक्र परस्परांवर अवलंबून असते. मोबाइल टॉवरमधून प्रसारित होणार्‍या किरणोत्सर्गामुळे मधमाश्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे की, मधमाश्या नष्ट झाल्या तर जीवविविधतेच्या साखळीतच खंड पडेल आणि कृषी उत्पादनावर त्याचा मोठ्या प्रमाणावर थेट परिणाम होईल. संशोधनाअंती असे निदर्शनास आले आहे की, पृथ्वीवरील शेवटची मधमाशी ज्या दिवशी नष्ट होईल, तेव्हापासून मनुष्यजात फार फार तर तीन ते पाच वर्षेच पृथ्वीवर तग धरू शकेल. ही अतिशयोक्ती वाटत असली, तरी सत्य परिस्थिती आहे. ही धोक्याची घंटा वेळीच लक्षात घेऊन मधमाशीचे जतन व संवर्धन करणे ही सृष्टिचक्राची गरज आहे आणि यातच मानवजातीचे कल्याण आहे.
 
honey village
 
संपर्क
आपलेही गाव ‘मधाचे गाव’ व्हावे असे वाटत असेल, तर खादी व ग्रामोद्योग मंडळाशी संपर्क साधू शकता.
रवींद्र साठे - भ्रमणध्वनी : 9820007064
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,
सभापती (राज्यमंत्री दर्जा)
 
 
सृष्टिचक्राचे हेच महत्त्व ओळखून ‘महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योेग मंडळ, मुंबई’ यांनी मधमाश्यांच्या वसाहतींचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘मधाचे गाव’ ही अनोखी संकल्पना मांडली. या संकल्पनेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच जीवविविधतेतील मधमाशीचे महत्त्वपूर्ण कार्य सर्वांसमोर येण्यासाठी मंडळातर्फे जानेवारी महिन्यात राज्यात पहिल्यांदाच ‘मध महोत्सव’ आयोजित करणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योेग मंडळ, मुंबई’चे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.
 
 
मधुमेहींसाठी पर्वणी
“आहारातील भारतीयत्वाचा विचार केला, तर मधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणूनच बदलापूरमधील ग्रामस्थांनी आपलेही गाव ‘मधाचे गाव’ व्हावे असा प्रस्ताव खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे सादर केला. आमच्या गावातील बदलापूर जांभळाला नुकतेच जीआय मानांकन मिळाले आहे. जांभूळ हे मधुमेहींसाठी वरदान आहे. गोड आणि मधुमेही यांचा छत्तीसचा आकडा असताना जांभळाचा मध ही मधुमेहींसाठी पर्वणीच ठरेल. हीच बाब लक्षात घेऊन खादी व ग्रामोद्योग विभागाने गावाचे सर्वेक्षण करून प्रशासकीय बाबी पूर्ण करून, बदलापूरमधील पिंपळोलीवाडी हे ठाणे जिल्ह्यातील पहिले ’मधाचे गाव’ होण्याकरिता दर्जा देण्यास पात्र आहे, असे जाहीर केले आहे. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर अधिकृतरित्या पिंपळोलीवाडी ‘मधाचे गाव’ होईल” अशी माहिती जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट बदलापूरचे मुख्य विश्वस्त आदित्य गोळे यांनी दिली.
 
 
मुळातच ग्रामोद्योगाला व कुटिरोद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘खादी आणि ग्रामोद्योग’ मंडळाची स्थापना झाली होती. खेडी स्वयंपूर्ण व स्वावलंबी झाली तरच भारताचा विकास होईल. त्यामुळेच कुटिरोद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. पूर्वीपासून परंपरागत पद्धतीने खेड्यात मध उत्पादन होत होते. प्रशिक्षणाअभावी म्हणावे तसे अर्थार्जन मात्र होत नसे. मध उत्पादन उद्योग केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न राहता एक प्रमुख व्यवसाय केल्यास ग्रामीण रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, तसेच मधमाश्यांद्वारे परागसिंचन होऊन विविध पिकांच्या व अन्य महत्त्वपूर्ण वनस्पती, फळझाडे यांच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होते, हा दुहेरी फायदा लक्षात घेऊन मधमाशीपालन हा उद्योग कृषी उत्पादनवाढीसाठी तसेच सेंद्रिय शेतीसाठीही महत्त्वाचा आहे.
honey village 
 
‘मधाचे गाव’ ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ‘मधाचे गाव’ दर्जा देण्याकरिता कोणते निकष लावले जातात? या प्रश्नावर रवींद्र साठे यांनी सविस्तर माहिती दिली - “मध उत्पादन पूर्वीपासून परंपरागत पद्धतीने खेड्यात होत होते, पण त्याचे योग्य प्रकारे मार्केटिंग आणि ब्रँडिंग होत नव्हते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवविविधतेतील महत्त्वाचा घटक असणार्‍या मधमाशीचे जतन व संवर्धन नैसर्गिक अधिवासातच व्हावे, हा महत्त्वाचा निकष ठरवला. यासाठी आम्ही अशी गावे निवडली, ज्या गावात मधमाशीपाल असतील, जंगल व घनदाट झाडीचा भाग ज्यात फुलोरा जास्त असेल. एखादे पुरस्कारप्राप्त गाव, सर्वात मुख्य म्हणजे मधाचे गाव व्हावे असा ग्रामपंचायतीचा ठराव, गावकर्‍यांची इच्छा, जनसहभाग या सर्व जमेच्या बाजू असतील, तरच हाती घेतलेला प्रयोग यशस्वी होतो. या सर्व निकषांची पूर्तता करणार्‍या गावाला ‘मधाचे गाव’ हा दर्जा प्राप्त होऊ शकतो. ”
 
2022 साली महाबळेश्वर येथील मांघर गाव हे पहिले ‘मधाचे गाव’ झाले, तेव्हापासून ही संकल्पना पुढे आली. या गावात 90% लोक मधमाशीपालन करतात. मधाचे गाव झाल्यापासून त्या गावचे सामूहिक उत्पन्न वाढले. ‘मधुबन’ या नावाचे मधाचे ब्रँडनेम तयार झाले. मधाचे गाव झाल्यामुळे पर्यटनास चालना मिळाली. पर्यटनाच्या अनुषंगाने त्या गावात पायाभूत सोयीसुविधांची रेलचेल झाली. अनेक पूरक व्यवसायांना गती मिळाली. एकंदर या सर्व प्रक्रियेमुळे गावाचा विकास होतो, ही मधाच्या गावाची फलश्रुती समजली पाहिजे आणि हे मांघर गावामुळे सिद्ध झाले आहे. मधाचे गाव ही संकल्पना केवळ महाराष्ट्रातच आहे.
 
 
मधउत्पादनासाठी घोलवड सर्वोत्कृष्ट

 “घोलवड हे चिकूसाठी प्रसिद्ध आहे आणि हे फळ बाराही महिने असते. शिवाय आमच्या गावात अनेकांच्या फळा-फुलांच्या परंपरागत वाड्या आहेत. चिकू, आंबा, फणस, जाम, लिची, पपनस इत्यादी. त्यामुळेे घोलवड गावात बाराही महिने फुलोरा असतो. त्यामुळे मधउत्पादनाकरिता घोलवड गाव हे सर्वोत्कृष्ट ठरेल” अशी खात्री घोलवड गावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व घोलवड गावचे उपसरपंच कुणाल शहा यांनी दिली.
 
जेव्हा एखाद्या गावाला ‘मधाचे गाव’ म्हणून दर्जा प्राप्त होतो, तेव्हा त्या गावात पर्यटकांच्या आकर्षणासाठी सेल्फी पॉइंट, कमान, मधविक्री केंद्र, प्रदर्शन उभारतो. मधाचे गाव ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याचे आपल्या जीवनात काय स्थान आहे, हे या आकर्षक सादरीकरणामुळे पर्यंटकांना विचार करण्यास भाग पाडते. शिवाय आजच्या ट्रेंडी सादरीकरणामुळे गावात विकासाची गंगा वाहू लागली आहे.
 
20 मे हा जागतिक मधमाशी दिन असतो. हे औचित्य साधून गेल्या वर्षीपासून मंडळाने ‘मधुमित्र पुरस्कार’ सुरू केला. तसेच आरोग्यदायक मधाचे महत्त्व जाणून मंडळाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सणासुदीला आपल्याकडे गोडाचे पदार्थ देण्याची परंपरा आहे, ही परंपरा खर्‍या अर्थाने आनंदाने साजरी करण्यासाठी आपण गोड म्हणून एकमेकांना मध भेट म्हणून देऊ या.
 
महाबळेश्वर येथील मांघर हे पहिले आणि कोल्हापूर येथील पाडगाव हे दुसर मधाचे गाव झाले आहे. पुढील टप्प्यात आमझरी (अमरावती), गुहिणी (पुणे), घोलवड (पालघर), पिंपळोलीवाडी (ठाणे), देवडे (रत्नागिरी), मुख्यमंत्र्यांचे मूळ गाव दरे-तांब (सातारा), आंबोली (सिंधुदुर्ग), पिर्ली (चंद्रपूर) व लेखा-मेंढा (गडचिरोली), किनवट (नांदेड) या जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण होऊन ‘मधाचे गाव’ म्हणून त्यातील गावांची प्राथमिक निवड झाली आहे.
 
राज्याच्या सहा प्रशासकीय भागात पुढील सहा महिन्यांत ‘मधाचे गाव’ म्हणून किमान एक गाव विकसित व्हावे, यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मा. देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 16 कोटी रुपयांची तरतूद केली होती. काही जिल्हाधिकार्‍यांच्या विकासनिधीतूनही काही गावे ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. पाडगाव हे याचेच उदाहरण.
 
‘मधाचे गाव’अंतर्गत मधमाशीपालांना मधपेट्यांच्या वाटपासाठी सबसिडी आणि नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून तयार होणार्‍या मधाला मंडळ जास्तीचा हमीभाव - प्रतिकिलो पाचशे रुपये भाव मधमाशीपालांना देण्यात येतो. मंडळाच्या या अभिनव संकल्पनेमुळे खेडी खर्‍या अर्थाने स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत, हा विश्वास रवींद्र साठे यांनी यानिमित्त व्यक्त केला.
 
येत्या जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच साजर्‍या होणार्‍या ‘मध महोत्सव’बद्दल रवींद्र साठे यांनी माहिती दिली, “सर्वसामान्यांना मधमाश्यांबद्दल जागृती आणि आरोग्यदायक मधाची महती समजावी, या हेतूने मध महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात सर्व प्रकारचे मध (ओव्याचा मध, तुळशीचा मध, जांभळाचा मध, सूर्यफुलाचा मध इ.) विक्रीसाठी ठेवणार आहोत. मधमाशी जागृतीसाठी मधमाशीविषयक प्रदर्शन असणार आहे. मधमाशीपालनाकरिता असणार्‍या साहित्याचे प्रात्यक्षिक असणार आहे. तसेच मधाची वेगवेगळी उत्पादने असतात - प्रॉपोलिस, रॉयल जेली इ. सौंदर्यप्रसाधनातदेखील मधाचा व मेणाचा वापर केला जातो. मधमाशीचे विषदेखील कॅन्सरसारख्या रोगावर औषध म्हणून प्रभावी ठरणारे आहे. मधमाशीला हानी न पोहोचवता विष काढणे हे अत्यंत जिकिरीचे व कौशल्याचे काम आहे. खादी मंडळाचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या संदर्भातील माहिती देण्याचा प्रयत्नही या महोत्सवात होणार आहे.”
 
आजच्या ट्रेंडला धरून महाराष्ट्रात चार-पाच ठिकाणी ‘हनी कॅफे’ सुरू करण्याची संकल्पना आहे. हनी कॅफेमध्ये हनी विथ टी, हनी विथ कॉफी, हनी विथ सॅडविच, हनी विथ फ्रूट सलाड, हनी विथ चॉकलेट.. एकूण या सगळ्या पदार्थांत मधाचा वापर करण्यात येेणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये मधापासून तयार करण्यात आलेली चॉकलेट्स तसेच मधापासून तयार होणारी अन्य उत्पादने काय काय असू शकतात, याचा स्टॉल असेल.
 
शहरी भागात ज्यांना मधमाशीपालन करायचे आहे, त्यांच्यासाठी एखादा मार्गदर्शक स्टॉल असेल. मधाच्या मेणापासून तयार होणारी उत्पादने, मेणकापड, प्रॉपोलिस, रॉयल जेली या सगळ्यांचा स्टॉल असेल. मधपेटीचे प्रत्यक्ष प्रदर्शन असेल. मधमाशीपालन करताना कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कोणकोणती अवजारे लागतात, या संदर्भातील माहिती, शिवाय एकूण वीस स्टॉल लागणार आहेत.
 
या प्रदर्शनात ‘मधाचे गाव’ दर्जाप्राप्त काही निवडक गावांना संधी देणार आहोत. गावातील मधमाशीपालांना मनोगते व्यक्त करण्याची संधी मिळावी, यासाठी परिसंवादाचे आयोजन केले असून 1. मध आणि प्रकृती, 2. मध आणि कृषी, 3. मधाचे गाव हे या परिसंवादातील विषय असणार आहेत. त्या विषयातील अभ्यासक, तज्ज्ञ, प्रत्यक्ष व्यावसायिक, मधमाशीपाल अशा सर्वांचा या परिसंवादात समावेश असणार आहे. जानेवारी महिन्यात 18 व 19 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हे प्रदर्शन आयोजिले आहे.
 
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या ‘मधाचे गाव’ या संकल्पनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेस निश्चित गती मिळेल. यामुळे पंचक्रोशीतील गावे स्वयंपूर्ण होतील, शुद्ध सेंद्रिय मध उपलब्ध होईल. पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होईल, गावकर्‍यांचे जीवनमान सुधारेल, या सार्‍याचा परिणामस्वरूप गावांचा शाश्वत विकास होण्यास मदत होईल. ‘मधाचे गाव’ ही चळवळ झाली, तर महाराष्ट्रात मधुक्रांती होईल, असा राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळास विश्वास आहे.
 

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.