कांचनताई परुळेकर - एक स्वयंसिद्ध व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व

विवेक मराठी    09-Jan-2024
Total Views |
विवेक गिरीधारी 9422231967
 
vivekकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ स्वयंसिद्धा संस्थेच्या माध्यमातून शहर व दुर्गम ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, अन्यायनिवारण व आरोग्यविषयक निष्ठापूर्वक कार्य करणार्‍या कांचनताई परुळेकर यांना पुण्यातील नातू फाउंडेशनतर्फे ‘सेवागौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मानचिन्ह व 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून देणारा हा विशेष लेख.
 
महिला आरक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्त्री-मुक्ती हे शब्द गेल्या दोन दशकांतले परवलीचे शब्द झाले आहेत. अर्थात या सर्वांची गरज असली, तरी खर्‍या अर्थाने सक्षमीकरणाचा मार्ग हा अर्थकारणातूनच पुढे सरकतो, हे वास्तव व व्यावहारिक सत्य आहे. बहुजन, पददलित अशा समाजाची घनघोर उपेक्षा व स्त्रियांच्या उन्नतीकडे झालेले कमालीचे दुर्लक्ष ही भारताच्या अवनतीचे दोन प्रमुख कारणे असल्याचे स्वामी विवेकानंदांनीही ठळकपणे अधोरेखित केलेले आहे. असे असले, तरी महिलांमधील स्वाभिमान जागविण्याचे प्रत्यक्ष काम सद्य:स्थितीत कसे केले पाहिजे, याची नमुनेदार उदाहरणे जागोजागी उभी राहणेही नितांत गरजेचे आहे. त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापूरमधील ‘स्वयंसिद्धा’चे काम व हे काम उभे करणार्‍या कांचनताई परुळेकर यांचे व्यक्तिमत्त्व. मानदंड ठरू शकेल असे आदर्शवत काम उभे करण्यामागची त्यांची तळमळ व तपश्चर्या मुळापासून समजून घेण्यासारखी आहे.
 
 
बालपण व कौटुंबिक पार्श्वभूमी
 
कांचनताई परुळेकर या मूळच्या कोल्हापूरच्या. कोकणच्या मातीचा वारसा त्यांच्या आडनावातही आहे. त्यांचा जन्म 1952चा. वडील मात्र लहानपणापासून कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील नितवडे गावात वाढलेले. त्यामुळे कोकणची बुद्धिमत्ता व घाटावरचा कणखरपणा त्यांच्यात उतरलेला आहे. सेवाभावी वृत्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच वडिलांकडून मिळाले. वडील बाळकृष्ण परुळेकर हे त्या काळी हरिजन सेवक संघाचे व ग्रामीण भागातील कार्यकर्ते होते.
 

vivek 
 
वडील पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून शिलाई काम करत. कोटाची शिलाई ही त्यांची विशेष खासियत होती. घरात मितभाषी असणारे वडील सामाजिक कार्यात मात्र खूपच सक्रिय होते. इतके की वडिलांनी राजारामपुरीत चालू केलेले व चांगले नावारूपाला आलेले ‘हाउस ऑफ फॅशन’ हे दुकान प्रत्यक्षात मात्र त्यांच्या आईलाच चालवावे लागले. सामुदायिक शेती व गोठा चालविण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, हरिजन-सवर्ण यांचे एकत्रित कार्यक्रम घडवून आणणे, चळवळीच्या माध्यमातून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविणे यातच वडील अधिक रमत होते.
 
काकाजींशी संपर्क व आयुष्याला मिळालेली कलाटणी
 
थोर शिक्षणतज्ज्ञ व माजी खासदार व आमदार डॉ. व्ही.टी. पाटील उर्फ काकाजी हे सामाजिक कामाची एक वेगळी दृष्टी असणारे आगळेवेगळे द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी कोल्हापुरात समाजकार्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी ‘शिक्षणातून विकास व विकासातून सामाजिक परिवर्तन’ या हेतूने गारगोटी येथे ‘मौनी विद्यापीठ’ या नावाने ग्रामीण शिक्षणाचे केंद्र उभारले होते. उद्याची स्त्री ही रणरागिणी, कर्तृत्ववान व स्वावलंबी व्हावी, म्हणून कोल्हापूरमध्ये त्यांनी महिलांसाठी ‘ताराराणी विद्यापीठ’ही उभारले होते. त्यांचे शिक्षणातील हे धडाडीचे व अभिनव प्रयोग पुढे चांगलेच नावारूपाला आले.
 
 
कांचनताई लहानपणापासून प्रभावी भाषण करत असत. वयाच्या 13व्या वर्षी पाटगावच्या हजारो धरणग्रस्तांसमोर भाषण करत त्यांनी उपस्थितांचे मन जिंकून घेतले होते. त्या वेळी व्यासपीठावर स्वत: काकाजी व आमदार रत्नाप्पा कुंभार होते. माणसांची पारख असणार्‍या काकाजींनी या चुणचुणीत व बुद्धिमान अशा बालवयातील कांचनला हेरले. बंडखोर पण स्वतंत्र व विचारी व्यक्तिमत्त्व असणार्‍या कांचनला त्यांनी व त्यांच्या पत्नी सरोजिनीदेवी यांनी आपली मुलगी मानले. यात जात-पात, भावकी आड आली नाही, कारण वारसा कर्तृत्वाचा चालवायचा होता!
 

vivek 
शिक्षण व नोकरीचा टप्पा
 
कांचनताईंनी इंग्लिश साहित्यात एम.ए. पूर्ण करून पुढे डी.एड.ही केलेले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी एन.सी.सी. अधिकारी म्हणून काम सुरू केले. एन.सी.सी.मध्ये असताना ‘बेस्ट ऑल राउंड लेडी कॅडेट’ व ‘बेस्ट शूटर’ असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळविणार्‍या त्या एकमेव महिला आहेत. तेथे दोन वर्षे त्यांनी काम केले. बरोबरीने चालू असणारे शिक्षण पूर्ण झाल्यावर कांचनताई यांनी ताराराणी शाळेत शिक्षिकेचे 10 वर्षे काम स्वीकारले. त्यानंतर 1978मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लिपिक म्हणून रुजू झाल्या. 14 वर्षे काम केल्यावर 1992मध्ये शाखाधिकारी पदावरून ‘स्वयंसिद्धा’ची धुरा हाती घेण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. अशी एकूण 26 वर्षे त्यांनी नोकरी केली.
 
 
1968मध्ये काकाजींनी आपल्या संपूर्ण जंगम मालमत्तेचा न्यास केला व सरोजिनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळाची स्थापना केली. आपली सगळी संपत्ती त्यांनी या मंडळाकडे सुपुर्द केली. ताराराणी विद्यापीठातील मुलींच्या विकासासाठी व एकूणच समाजातील महिलांच्या उत्कर्षासाठी या न्यासातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येऊ लागले. बँकेच्या नोकरीतून मुक्त झालेल्या कांचनताईंच्या पुढाकाराने 1992मध्ये ‘स्वयंसिद्धा’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमास सुरुवात झाली. 1969मध्ये सरोजिनीदेवी यांचे, तर 1995मध्ये काकाजींचे निधन झाले.
 
 

vivek
स्वयंसिद्धाची सुरुवात
महिलांनी फावल्या वेळात काही उद्योग करून उद्योजक व्हावे, या हेतूने कांचनताईंनी सुरुवातील महिलांची एक बैठक बोलाविली. त्यात आपल्याला बनविता येतील अशा वस्तू महिलांनी बनविल्या आणि शाळेत पालक सभेच्या दिवशी या वस्तूंची विक्री केली. यातून महिलांना आत्मविश्वास मिळाला. यातूनच पुढे स्वत: काहीतरी करू पाहणार्‍या धडपड्या महिलांसाठीचे ‘स्वयंसिद्धा’ हे व्यासपीठ उभे राहिले. स्त्रियांना स्वकर्तृत्वाने घरात व समाजात स्थान मिळवून देण्यासाठी स्वयंसिद्धा चळवळ आकाराला आली.
 
‘स्वयंसिद्धा’ हे नावच पुरेसे बोलके आहे. हे महिला मंडळ नसून महिलांना स्वावलंबी बनविणारी चळवळ आहे. ज्या महिलेला मार्गदर्शनाची गरज आहे, अशी कोणतीही महिला एक रुपया भरून नावनोंदणी करू शकते. महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणारी संस्था अशी संस्थेची हळूहळू ओळख वाढत गेली. विकल्या जाऊ शकणार्‍या वस्तू बनविणार्‍या काही महिला यामुळे संस्थेशी जोडल्या गेल्या, ज्या पुढे प्रशिक्षिका बनून इतरांना प्रशिक्षण देऊ लागल्या.
 
 
येथे तयार होणार्‍या महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळायला हवी. त्यासाठी हळदी-कुंकू समारंभ असणार्‍या महिलेच्या घरी स्टॉल लावण्याची शक्कल कांचनताईंनी लढविली. त्यातून हळूहळू मागणी वाढत गेली. पुढे संस्थेच्या आवारातच दर बुधवारी हा आठवडी बाजार भरू लागला. वस्तू बनविणार्‍या महिलांची हजारांमधली उलाढाल कधी लाखांवर पोहोचली, ते समजलेही नाही. यात सहभागी होणार्‍या छोट्या छोट्या उद्योजक महिलांची संख्यासुद्धा शेकड्यातून हजारांवर जाऊन पोहोचली. अशा उद्योजकांना पाठबळ मिळण्यासाठी कांचनताईंनी 1994मध्ये ‘स्वयंप्रेरिका औद्योगिक सहकारी संस्था’ स्थापन केली.
 
 
 
आतापर्यंत त्यांनी 58000हून अधिक शहरी महिलांना व 30000हून अधिक ग्रामीण महिलांना गेल्या 30 वर्षांत प्रशिक्षण दिले आहे. त्यातून छोटे-मोठे उद्योग करणार्‍या दहा हजारांहून अधिक महिला कोल्हापूर शहर व ग्रामीण भागात उभ्या राहिल्या आहेत, हे विशेष! यापैकी अनेकींची उलाढाल लाखांच्या घरात आहे. यापाठीमागे कांचनताईंनी महिलांमध्ये पेरलेला आत्मविश्वास, चोख व्यवस्थापन व वस्तूंच्या गुणवत्तेचा आग्रह होता.
 
 
सुमारे 25 वर्षांपूर्वी, कोल्हापुरातील या उत्साही उद्योजक महिलांनी दिल्लीत खाद्यपदार्थांचा स्टॉल लावून दिल्लीकरांना उकडीच्या मोदकांची भुरळ घातली होती! मंदा आचार्य, सुरेखा उबारे, शैलजा सुतार, मनीषा सावंत, कल्पना वरपे पाटील यांचा यात पुढाकार होता. काही उद्योजक महिला तर अशा काही तयार झाल्या आणि पुढे गेल्या की त्यांना आपल्या व्यवसायाच्या उलाढालीवर व व्यक्तिगत उत्पन्नावरही आयकर भरावा लागू लागला.
 
 

vivek 
कृतीतून सिद्ध झालेले परिवर्तनाचे तत्त्वज्ञान
 
कांचनताईंनी महिला सबलीकरणाची खूप सोपी व अर्थपूर्ण व्याख्या केलेली आहे - ‘एखादी गोष्ट मी करू शकते’ हा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण करणे म्हणजे सबलीकरण! कुटुंबाची चौकट न मोडता चौकटीबाहेरचे काम करता येऊ शकते. मला करावेसे वाटते व मी करू शकते म्हणजे मी करीनच करीन, हा महिलांमधील सामाजिक बदलाचा त्यांचा सिद्धान्त आहे. त्यासाठी महिलांना खूप चांगले, पाहायला, ऐकायला, विचार करायला, चांगला निर्णय घ्यायला आणि त्यातून विचारपूर्वक कृती करायला जाणीवपूर्वक शिकविले जाते. स्त्रियांना स्वावलंबनाच्या ध्येयाप्रत घेऊन जाणारे प्रबोधन व प्रशिक्षण हे महत्त्वाचे टप्पे निर्णायक ठरतात. याशिवाय श्रमप्रतिष्ठा, कार्यसंस्कृती व स्वयंव्यवस्थापन या बाबीही महत्त्वाच्या आहेतच.
 
 
स्त्रिया जर या देशाचे अर्धे अंग असतील, तर हा अर्धा भाग लुळापांगळा राहून कसा चालेल? त्या समर्थ, स्वावलंबी आणि आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, स्वयंसिद्ध झाल्या पाहिजेत याच धारणेने ही अखंड धडपड चालू आहे. आपले कुटुंब आणि समाज मिळून देश होतो. स्त्री आणि पुरुष हे त्याचे दोन पाय! जर दोन्ही पायांवर देश चालावा असे वाटत असेल, तर महिला सबलीकरणाला पर्याय नाही. ते झालेच पाहिजे. ते होण्यासाठी ‘स्वयंसिद्धा’ कटिबद्ध आहे.
 
 
प्रशिक्षण हा कामाचा गाभा
 
स्वयंरोजगाराचे व अनेकविध कौशल्ये शिकण्याचे पर्याय देऊन कांचनताईंनी अनेक शहरी व ग्रामीण महिलांवरचा ‘10वी नापास’चा शिक्का पुसला. त्यासाठी ‘स्वयंसिद्धा स्कूल’ चालू केली. त्यातल्या काही जणी तर आता चक्क प्रशिक्षिका म्हणून काम करीत आहेत. अशा व अन्य मिळून 150 प्रशिक्षिका स्वयंसिद्धाने आतापर्यंत घडविल्या आहेत.
 
 
कांचनताईं खरे तर स्वत: एकही प्रशिक्षण घेत नाहीत. पण एखाद्या महिलेचा त्यांच्याशी झालेला संवाद हेच तिचे पहिले प्रशिक्षण असते, समुपदेशन असते. त्यात कांचनताई त्या महिलेचा न्यूनगंड कायमचा दूर करतात. ‘बोला, वाचा, लिहा, करा आणि मिळवा’ ही कामाची पंचसूत्री दिशा महिलांचा कायाकल्प घडवून आणते. काय झाले पाहिजे? यापेक्षा हे असे करता येते असे प्रात्यक्षिकासह उदाहरण समोर ठेवण्यावर भर असतो. प्रश्नांमध्ये अडकून पडण्यापेक्षा उत्तराकडे चला असा त्यांचा आग्रह असतो. जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत महिलांमध्ये समृद्ध जगण्याची प्रेरणा निर्माण करण्यावर त्यांचा भर असतो. परप्रकाशाने तेजाळणार्‍या चंद्रापेक्षा स्वयंप्रकाशी सूर्य व्हा, कारण तो स्वत: प्रकाश देतो व इतरांनाही आपल्या प्रकाशात उजळून टाकतो, या भाषेतले कांचनताईंचे आव्हान महिलांना आतून भिडणारे असते.
 
 
 
प्रबोधन, प्रशिक्षण आणि स्वावलंबनासाठीची वृत्तीघडण ही ‘स्वयंसिद्धा’च्या यशाची त्रिसूत्री आहे. स्वाभिमान आणि स्वावलंबन ही संस्थेची मूल्यधारणा आहे. धडपडणार्‍या महिलांचे एक प्रेरणाकेंद्र अशी आज ’स्वयंसिद्धा’ची ओळख निर्माण झाली आहे. वैचारिक घडण, व्यवहाराची ओळख आणि आश्वासक आधार यामुळे ते महिलांचे तिसरे घर झाले आहे!
 
 
कामाचे वाढत जाणारे वैविध्य
 
महिलांनी आवर्जून लिहिते व्हायला पाहिजे, आपले अनुभव शब्दबद्ध करायला हवे यासाठी कांचनताईंनी ‘स्वानंदसखी फीचर्स’ नावाचे व्यासपीठ तयार केले. या माध्यमातून कोल्हापूरच काय, तर अन्य जिल्ह्यांतील दैनिकांमधूनही या अनुभवसिद्ध महिलांचे विचार पोहोचू लागले. महिलांनी व्यासपीठावर जाऊन आपले विचार मांडावेत यासाठीही महिलांना प्रोत्साहन दिले. यासाठी वाणीमुक्ती प्रकल्पाअंतर्गत सूत्रसंचालन व कथाकथन याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते.
 
 
संस्थेने एका गावातील पडीक जमिनी सामुदायिक शेतीसाठी घेण्यास महिलांना प्रवृत्त करून त्यांना बी-बियाणे व सुधारित तंत्रज्ञान पोहोचविले. जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठीची पोषक वातावरणनिर्मिती केली. त्यातून कुटुंबासाठी पुरेल एवढेच पिकविण्याची मानसिकता मागे पडून या महिलांनी पहिल्यांदाच ‘विकण्यासाठी पिकविले’! शेतीतून नगदी नफा मिळविण्याचा अनुभवही त्यांच्या पदरी पडला. ‘जिच्या हाती शेताची दोरी, ती गाव उद्धारी’ हा वाक्प्रचार त्यांनी त्या वेळी रूढ केला होता.
 
 
संस्थेने हिंडाल्को कंपनीच्या अर्थसाहाय्यातून कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील निवडक 25 गावांमध्ये महिला आरोग्यदूत प्रकल्प राबविलेला आहे. या महिलांना निवासी प्रशिक्षण व प्राथमिक औषधोपचार पेटी दिली जाते.
 
 
सरकारी अनुदानापासून चार हात दूर
 
कर्नाटकातील घटप्रभा येथील वैद्यकीय सेवा कार्यासाठी सुप्रसिद्ध असणार्‍या डॉ. माधवराव वैद्य यांचा कांचनताई यांच्या विचारांवर ठसा होता. ‘आपली बुद्धिमत्ता सरकार दरबारी, मंत्र्यांच्या दारी कधीही गहाण टाकता कामा नये. नवनवीन अभिनव व कल्पक कल्पनांचा अवलंब करत आपण आपले अंगीकृत काम स्वसमाधानासाठी करत राहावे. बाकी जगन्नियंत्याची शक्ती पाहून घेईल. सत्ता, पैसा, प्रतिष्ठा यांपासून दूर राहून नि:स्वार्थीपणे काम करत राहिल्यास यश आपलेच असते. आपला स्वाभिमान कायम जिवंत ठेवावा’ असे ते कांचनताईंना सांगत. त्यामुळे सरकारी अनुदानाच्या मागे धावायचे नाही असे स्वबंधन त्यांनी संस्थेत सुरुवातीपासूनच घालून घेतले होते. शासकीय अनुदान मिळविण्यासाठीच्या खटपटी व खटाटोप करत प्रकल्पांच्या कागदपत्रांच्या जंजाळात संस्था यामुळे कधीच अडकली नाही, हे विशेष!
 
 
नावीन्यपूर्ण अभिनव उपक्रम व प्रेरित मनुष्यबळ हाताशी असेल, तर सुरुवातीला हाताशी पैसे नसतानाही चांगले काम उभे राहू शकते. एकदा काम उभे राहायला सुरुवात झाली की पाठोपाठ पैसा उभा राहत जातो. नुसता व्यावसायिक अथवा व्यापारी दृष्टीकोन न ठेवता सेवाभावी वृत्ती कामाच्या मुळाशी हवी, हेच खरे! त्यामुळे आता संस्थेच्या कोणकोणत्या कामासाठी व किती निधी हवा आहे? अशी विचारणा चांगल्या चांगल्या व्यक्तींकडून व संस्थांकडून होत असते, हे स्वयंसिद्धाचे खरे यश आहे.
पिढ्यानपिढ्या परंपरेचे जोखड मानेवर बाळगणार्‍या स्त्रीने एक प्रकारचा न्यूनगंड सतत मनात जोपासलेला असतो. या न्यूनगंडातून शहरी व ग्रामीण महिलांना बाहेर काढण्याचे आव्हान कसे पेलले? असे कुणी कांचनताईंना विचारले, तर त्या सहजपणे म्हणतात, “कोणताही कठिणात कठीण धातू शेवटी वितळतोच ना? आपण त्यासाठी किती उष्णता देतो, हे महत्त्वाचे!” कोल्हापूरसारख्या परंपरावादी शहरात तर हे तीन दशकांपूर्वी घडवून आणणे हे खरेच मोठे आव्हानात्मक होते.
 
 
 
आज आता याच दिशेने महाराष्ट्रभर बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सबलीकरणाला एक वेगळी दिशा मिळाली आहे. परंतु हे बचत गट फक्त कर्जवाटपासाठी अथवा केवळ आर्थिक व्यवहारासाठी नसून ते अनौपचारिक शिक्षणाचे एक व्यासपीठ आहे, ती लोकशाहीची प्रयोगशाळा आहे, या कांचनताईंच्या विचारातून प्रेरणा घेऊन व्यापक अंगाने त्याकडे बघायला हवे. या बचत गटांच्या चळवळीसाठी स्वयंसिद्धाचे काम हे एका दीपस्तंभासारखे आहे, म्हणूनच या उल्लेखनीय कार्याबद्दल कांचनताई परुळेकर यांना नातू फाउंडेशनतर्फे ‘सेवागौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.